नवीन लेखन...

आफ्रिकेचे बिअर आख्यान

आफ्रिकेत आल्यावर कोणत्याही बिअर-प्रेमीला अगदी आपल्या घरी किंवा “माहेरी” आल्यासारखे वाटावे इतके वेगवेगळे बिअरब्रॅंड उपलब्ध आहेत. आफ्रिकेच्या तीस देशात कुठेही जा. बिअरची नुसती चंगळ.

चिअर्स !!

बिअर बनविण्याच्या पध्दती आदिवासी लोकांनीच ठरवल्या. बिअर खरेदी करतांना बिअर बरोबर बाटल्यांचे डिपॉझिट पण भरावे लागते. त्यामुळे एकच बाटलीचा पुनः वापर करता येतो. दक्षिण आफ्रिकेत बिअर पिण्याचे प्रमाण अन्य आफ्रिकन देशांपेक्षा सर्वात जास्त आहे.

टांझानियात बिअरसेवन राष्ट्रीय अभिमानाची बाब समजतात. कारण बिअर उत्पादन देशाच्या अर्थव्यवस्थेचा भलाभक्कम स्तंभ आहे. एके वर्षी दोन बिअर कंपन्यांत मालकी-हक्काबद्दल अशी काही जुंपली! वादाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. ‘टान्झानियन ब्रुअरीज’ कंपनीचा देशात ऐंशी टक्के विक्रीभाग आहे. ‘सेरेंगेटी बिअर’ कंपनीचा वीस टक्के विक्रीभाग. यामध्ये ‘आफ्रिकन ब्रुअरीज लिमिटेड’ ही तिसरी मोठी कंपनी. ती पण अग्रेसर आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बिअर कंपन्यातल्या भांडणांना राष्ट्रीय पातळीवरचा संघर्ष मानतात. टान्झानियन बिअर कंपनी देशातली सर्वात जास्त कर भरणारी कंपनी आहे. कंपनीचा वार्षिक नफा पंचाऐंशी कोटी डॉलरच्या घरात जातो. कर दोन कोटीच्या वर आहे. एकट्या दक्षिण आफ्रिकेत सध्या दरसाल दरडोई साठ लिटर बिअर लागते. १९७० साली हे प्रमाण चौदा लिटर होते.

पूर्व आफ्रिकेतल्या ‘टस्कर’ या बिअर विक्रीचा तर अगाध महिमा आहे. विक्रीला १९२३ साली प्रारंभ झाला. ‘केनिया बिअर’चा संस्थापक जॉर्ज हर्स्ट एके दिवशी शिकारीला गेला असतांना त्याला एका हत्तीने ठार मारले. जॉर्जच्या स्मरणार्थ बिअरला ‘टस्कर’ नाव दिले. ही बिअर इतकी लोकप्रिय झाली की इंग्लंडच्या सुपरमार्केटमध्ये ती २००८ सालापासून विक्रीसाठी अवतरली.

‘आप पिये और आप ना झूमे आपकी बसकी बात नही’

एका सर्वेक्षण-अभ्यासानुसार आफ्रिकेतील बिअर सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.पूर्वी देशी बिअरना खूप मागणी होती. पण परदेशी बिअर तेवढ्याच लोकप्रिय होत आहेत. बिअर कंपन्यांच्या जाहिरातीचा पण प्रभाव पडत आहे. बिअरसेवन हा एक नवा सामाजिक शिष्टाचार समजला जातो. आणखी एक प्रभावी कारण म्हणजे, आफ्रिकन स्त्रिया सर्रास बिअर सेवन करायला लागल्या.

वाढत्या मद्यप्राशनामुळे रस्त्यावरचे अपघात वाढले. दक्षिण आफ्रिकेत प्रमाण सर्वात जास्त आहे. अलिकडच्या संशोधनात आढळले, रस्त्यांच्या अपघातातील मृतांमध्ये सुमारे पन्नास टक्के मृतांच्या रक्तात मद्य आढळले. शास्त्राच्या नमुन्यात ०.२४ मिलिग्रॅम प्रमाणाच्या वर मद्य दंडप्राप्त ठरते. पोलिसांनी थांबवले असता चालकाला नकार देता येणार नाही. २०११ साली केवळ रस्ते-अपघातावर देशाचा सुमारे पाच टक्के जीडीपी खर्च झाला. एका वरीष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले, ‘‘डर्बन शहरात ख्रिसमस सूट्टीच्या कालावधीत म्हणजे एक डिसेंबर ते आठ जानेवारी दरम्यान १२२१ अपघात झाले. त्यात १४६५ जण ठार झाले. डर्बनच्या परिसरात २०१० साली १०८३७ जण तर २०११ साली ११२३८ जण ठार झाले. २०१२ साली हा आकडा २,७९,०८० वर गेला’’. एका आफ्रिकन सशोधन संस्थेच्या मते, दक्षिण आफ्रिकेमध्ये रस्त्यावरील सुरक्षा ही सर्वात चिंतेची बाब बनली आहे. रस्त्यावरील अपघातात मृत्यू पावणार्‍या लोकांतील पन्नास टक्के लोकाच्या शरीरातील अल्कोहोल पातळी प्रमाणाबाहेर गेल्याचे आढळले आहे.

“चिकणी चमेली छुपके अकेली पौहा चढाके आयी! ”

एका आफ्रिकन अभ्यासात आढळले, मद्यसेवनाचा पुरूषांपेक्षा स्त्री वाहन-चालकांवर जास्त प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, ४५ किलो वजनाच्या महिलेने एक ग्लास वाईन घेतली तर तिच्या रक्तात ०.०४५ ग्रॅम प्रमाण आढळते. उपाशी स्त्रीवर अधिक प्रभाव होतो. मद्याचा प्रभाव कमी होण्यासाठी तासाचा अवधी लागतो.

जगात बिअर म्हणजे ‘लय भारी’! पण ‘गुड-बॉय’ नवर्‍यांच्या घरातल्या घरवालीलाही हे पटत नाही! आफ्रिकेत पण तीच गत.

आफ्रिकन जनतेचे बिअरवरील प्रेम तसे काही वेगळे नाही पण त्यावरच्या इतरांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. दारेसालाम या शहराचे उदाहरण घ्या. ही टांझानियाची राजधानी आणि १९६३ पूर्वी झांझीबार हा टांझानियाचा भाग होता. दारेसालाममध्ये बरेच लहान मोठे बिअरचे पब्स आहेत. तिथले वातावरण अगदी दोस्तीचे असते. मंडळींना स्थानिक बिअरच जास्त पसंत असते. बिअर सेवन करतांना दोस्तांच्या गप्पा रंगतात. त्याबरोबर स्थानिक संगीत, मांसाहारी चमचमीत पदार्थ आणि विशेष म्हणजे मित्रांसमवेत फूटबॉल सामना पाहताना दोस्त रंगून जातात. पबमध्ये सर्वात जास्त गर्दी असते शुक्रवार, शनिवार आणि रविवारला. शहरी दोस्तांची बहुधा रविवारी पार्टी रंगते. काही विशेष प्रसंगी इतर दिवशीही पण मस्त पार्टी जमते. पबना कोणत्याच दिवशी सुट्टी नसते. काही पब्सम्ध्ये गिर्‍हाइकांच्या विशेष पसंतीचे करमणूक कार्यक्रम पण आयोजित होतात. काही पब्समध्ये खास स्थानिक व पॉप संगीताचे मोठे आकर्षण ठरते. स्थानिक गीतांबरोबर खास टांझानियन नृत्य पण असते. त्यावर मित्रमंडळी खूष असतात. याखेरीज काही पबमध्ये स्थानिक करमणुकीच्या कार्यक्रमाचा समावेश असतो.

दारेसालामच्या ‘न्यू मैशा क्लब’मध्ये एक मजला स्थानिक संगीतासाठी आणि दुसरा मजला पॉप संगीतासाठी. मित्रमंडळीची सर्वात जास्त गर्दी जमते शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत. धूम्रपानासाठी आणि खास बड्या लोकांसाठी वेगळ्या खोल्या असतात. पण खास नृत्यमंच असलेले मुख्य सभागृह सर्वांसाठी खुले असते. तेथे बार, टेबल, खुर्च्या आकर्षक पध्दतीने मांडलेल्या असतात. या खेरीज बाहेर खुल्या मैदानात पण बसायची सोय असते. तुलनेने प्रवेश फी फार जास्त नसते. म्हणजे एका बिअरची किंमत तीन हजार पाचशे टांझानियन शिलींग (अंदाजे शंभर रूपये) तर प्रवेश फी दहा हजार शिलींग. सकाळपर्यंत उघडे असणारे क्लब अधिक प्रिय असतात. पबपासून गावात जायला बर्‍याच टॅक्सी पण मिळतात.

दक्षिण आफ्रिकेची बिअर

तशी दक्षिण आफ्रिका देशाची अस्मिता जरा वेगळी आहे. बिअर विकासात हा फरक चांगला जाणवतो. युरोपियनांनी देशात प्रवेश केला त्यावेळी ते प्रत्येक बाबीतील युरोपियन कुशलता व अनुभव बरोबर घेऊन आले. डच १६५० नंतर आले आणि ब्रिटीश एकोणीसाव्या व विसाव्या शतकात आले. त्यांच्या गाठीला त्यांनी आपापल्या देशाचा बिअर उत्पादनातला दीर्घ अनुभव बरोबर आणला होता. याखेरीज खुद्द आफ्रिकन जनतेचा स्थानिक अनुभवही बिअर निर्मितीत मोलाचा ठरला. विशेषतः सोथो, झुलू आणि झोसो या तीन जमातींकडे बिअर तयार करण्याचे एक वेगळे आणि खास कौशल्य होते. या तीन जमातींची बिअर ब्रिटीश येण्याअगोदरपासून लोकप्रिय होती.

आता ‘साऊथ आफ्रिकन ब्रुअरीज’ ही संस्था स्थानिक दक्षिण आफ्रिकेतील बिअर उत्पादनावर नियंत्रण ठेवते. याखेरीज पिरोनी, पिल्स्नर, यूरकवेल आणि अन्य कितीतरी बिअर संस्थेच्या नियंत्रण अखत्यारीत येतात. या सर्वात ‘कार्लिंग ब्लॅक लेबल’ ही बिअर सर्वात लोकप्रिय. या बिअरने वेगवेगळ्या देशातील वीस पुरस्कार मिळविले आहेत. मात्र हाइनीकेन, गिनीस सारख्या परदेशी बिअर कंपन्यांनी नियंत्रण स्वतःकडेच ठेवले. दक्षिण आफ्रिकेत लागर बिअर बरेच जण घेतात कारण उष्ण देशात ह्या बिअरला बरीच मोठी मागणी असते. ‘जोबर्ग’ नावाच्या बिअरची किंमत कमी असते व ती अल्प वेतनाची मंडळी पसंत करतात. अलिकडच्या एक दोन दशकात बर्‍याच नव्या बिअर बाजारात आल्या. त्यांचे स्थानिक गिर्‍हाईक असतात. पण या बिअर्सची प्रादेशिक शर्यत चांगलीच असते. यामध्ये आणखी एका बिअरचे नाम प्रमुख्याने येते. ते म्हणजे, ‘निढोक लागर’. ही नामिबियातली बिअर पण दक्षिण आफ्रिकेत तिचे बरेच गिर्‍हाईक आहेत. याशिवाय स्थानिक लघु उद्योगातल्या पण बर्‍याच बिअर कंपन्या आहेत. या स्थानिक बिअर स्थानिक खास उत्सवात घेतात.

या बिअरची अशी लांबलचक यादी वाचल्यावर वाटेल की आफ्रिकन देश म्हणजे अस्सल दारूड्यांचे देश आहेत का?

नेमक्या ह्याच विषयावर ‘टाईम’ या नियतकालिकाने सखोल अध्ययन केले. त्यात आफ्रिकेतल्या पंचावन्न देशातल्या मदिरा सेवनाच्या सवयींचा अभ्यास झाला. त्यामध्ये बरेच वैविध्य आढळले. बरेच लोक अजिबात मद्यसेवन करत नाही असेही आढळले. पुढे ‘डब्ल्यू एच ओ’ संस्थेने या संशोधनाचा पाठपुरावा केला. त्यात आढळले, जगातील लोक सरासरी दरडोई दरवर्षी ६.१३ लिटर मद्य सेवन करतात. तर आफ्रिकन लोकांचे हे प्रमाण ६.१५ इतके आहे. म्हणजे युरोपियन (१२.८) व अमेरिकन (८.६७) जनतेपेक्षा खूप कमी आहे. तर दक्षिण आशियात (भारताचा समावेश आहे) खूपच कमी म्हणजे फक्त २.२ लिटर आहे.

म्हणजे भारतीय खरंच गुड बॉईज आहेत !

—  अरुण मोकाशी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..