हिंसक आंदोलनात सुरक्षा सामान्य माणसांची

सर्वात मोठा दुष्परिणाम सामान्य माणसांवर

राज्यकर्त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम आहे सामान्य जनतेची सुरक्षा करणे. त्याकरता कायदा सुव्यवस्था राखणारे पोलिस अजुन सक्षम करण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. मग तो हिंसाचार भीमा कोरेगावचा हिंसाचार, औरंगाबादेतला गोंधळ असो, दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि आता मराठा आरक्षणातला हिंसाचार, यामध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ज्यानी ही आंदोलने पुकारले त्यात शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी संपत्तीचे,राज्य परिवहनच्या बसेस, खाजगी वाहाने आणि खाजगी संपत्तीचे नुकसान झाले आहे. एसटी हे गरीब सामान्य जनतेच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे एसटी नुकसानीचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा सामान्य माणसांवर होतो.

शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.रोजची रोटी रोज कमावणार्यांना रोजी रोटी मिळत नाही.आजारी पडलेल्याना हॉस्पिटल किंवा डॉक्टरांकडे जाता येत नाही. प्रवासाकरता गावाच्या बाहेर पडलेल्याचे रस्ते बंद पडतात. राज्यातील महत्त्वाचे रस्ते बंद केल्यास अर्थव्यवस्थेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते.

सर्व हिंसाचारात सामान्य नागरिक बळी

गुजरात मध्ये पटेलांचे, पाटीदारांचे आंदोलन, हरियाणात जाट आंदोलन, राजस्थानात गुज्जरांचे आंदोलन या सर्वांतील हिंसाचारात सामान्य नागरिक मारले गेले व जखमी झाले. सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले. तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही धक्का पोहोचला. त्यामुळे महागाई वाढली.हिंसक आंदोलने हा सुद्धा दहशतवादाचा एक प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणुन हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. एखाद्या समाजाला, संस्थांना सरकारकडून कोणतीही मागणी मान्य करुन घ्यायची असेल ती कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे. अशा प्रकारचा बंद आणि हिंसाचारामुळे फक्त देशाचेच नुकसान होते. येत्या 2018-2019 मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात आणि एकच एक दृष्य, फोटो सतत दाखवली जातात. या प्रकारचे वृत्तांकन थोडक्या शब्दांत न करता सतत तेच ते दाखवून त्यात तेल ओतण्याचे काम का केले जाते?.हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे.

मतपेटीच्या राजकारणासाठी हिंसाचार

अशा प्रकारच्या हिंसाचाराला तोंड देण्याचे सामर्थ्य पोलिस,राजकिय पक्ष/राज्यकर्त्यांमध्ये असलेच पाहिजे. मतपेटीच्या राजकारणासाठी हिंसाचार कोण घडवतो आहे हे माहित असूनही तो थांबवण्याचा प्रयत्न केला जात नाही. अशा हिंसक आंदोलनात एक लक्ष्मणरेषा असली पाहिजे.लक्ष्मणरेषा ओलांडली जाते जेंव्हा आंदोलक सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीची नासधूस करतात. तेव्हा त्यांना थांबवणे हे पोलिसांचे,राजकिय पक्ष/राज्यकर्त्यांचे व सर्वांचे काम आहे. मतपेटीसाठी हे सर्व गप्प बसतात. आंदोलक एकत्र येतात आणि हिंसाचार भडकवण्याची साधने बरोबर बाळगतात. पोलिसांची संख्या कमी पडते. त्यामुळे हिंसाचार नियंत्रित करण्यावर मर्यादा येतात. जिथे  हिंसाचार होतो तिथे पोलिस आणि सुरक्षा दले यांची संख्या वाढवण्याचीही गरज आहे. जेणेकरून रस्त्यावरील लोकांची सुरक्षा शक्य होईल.

व्हिआयपी सुरक्षेचे प्रस्थही कमी करुन अधिक पोलिस कर्मचार्यांना सामान्य माणसाच्या रक्षणासाठी रस्त्यावर आणले पाहिजे. पोलिसांकडे अनेक व्यवस्थापकीय कामे आहेत. त्यातुन त्यातून पोलिसांना मुक्त करता येईल का हे सुद्धा तपासले पाहिजे.

पोलिसांची संख्या लगेच वाढवण्यासाठी

आज महाराष्ट्रात अडीच ते तीन लाख निवृत्त पोलिस कर्मचारी आहेत त्यामधून 50 ते 60 हजार व पोलिस अधिकारी ज्यांनी आपल्या कारकीर्दीत उत्तम काम केले होते आणि ते शारीरिक आणि मानसिक द़ृष्ट्या आज सक्षम आहेत, त्यांना पुन्हा पोलिस दलात काही काळासाठी का आणले जाऊ शकत नाही. अर्थातच त्यांची पोलिसदलात काम करण्याची तयारी हवी.

राज्याकडे होम गार्डची संख्या वाढवून कार्यालयीन कामकाज,व्हीआयपी सेक्युरीटी त्यांना दिल्या जाऊ शकतात. प्रशिक्षित पोलिस हे रस्त्यावर हिंसाचाराचा सामना करण्यासाठी उतरु शकतात. निव्रुत्त अनुभवी पोलिसांचा वापर आपण का करु शकत नाही?

हिंसाचाराविषयी गुप्तहेर माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. त्याकरता गुप्तहेर खात्याची ताकद व क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्याकरता निवृत्त सक्षम गुप्तहेर अधिकार्यांचा पुन्हा एकदा वापर करु शकतो. आज जम्मू काश्मिर, ईशान्य भारतात आणि इतर ठिकाणी देशात अनेक गुप्तहेर संस्था काम करतात. त्यात गुप्तहेर खाते, रिसर्च अनालिसिस विंग, सैन्य गुप्तहेर खाते, महसूल, आयकर या विभागांची गुप्तहेर खाती कार्यरत असतात. त्यांनी प्रत्येक महिन्याला एकत्र येऊन गुप्तहेर माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे.पोलिस अधिकार्यांनी गुप्तहेर संस्थांना कोणती माहिती मिळवावी याविषयी काम द्यावे. हिंसक आंदोलनाची आगाऊ माहिती मिळवावी. त्यासाठी सर्व गुप्तहेर संस्थांची बैठक राज्य, जिल्हा पातळीवर होणे गरजेचे आहे.अशा प्रकारच्या बैठका या मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस संचालक,जिल्हा पालक मंत्री आदींनी घेतल्या पाहिजेत.

टेक्निकल इंटेलिजन्सने संशयित दंगलखोऱांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लक्ष ठेवणे शक्य आहे. या सर्व उपायामुळे पोलिसांना कुठे काही गडबड होणार असेल तर त्याची माहिती आधीच कळेल व ते हिंसाचार वेळेवर थांबवु शकतिल.

अर्धसैनिक दले, सैन्य,तैनात करा

राज्यात सीआरपीएफ, बीएसएफ यांचे प्रशिक्षण केंद्रे आहेत तसेच गरज भासल्यास गृहमंत्रालयाकडून आपल्याला अर्धसैनिक दले तैनात करता येतिल. म्हणून राज्यातील राज्य राखीव पोलिस दलाबरोबर या अशा प्रकारच्या अर्धसैनिक दलांची मदत घेऊन लवकरच हिंसाचार थांबवला पाहिजे.हिंसाचाराची व्याप्ती राज्यभर पसरली तर पोलिसांची संख्या कमी पडते.

आज राज्यात सैन्याच्या अनेक कॅन्टोन्मेंट मुंबई, पुणे, भुसावळ, औरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी आहेत. सैन्याचा वापर पण हिंसाचार गंभिर झाल्यास  केला जाऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्याचा वापर देशात अनेकदा केला गेला आहे. जाट आणि गुज्जर आंदोलनाच्या वेळी हरियाणा आणि राजस्थानमध्ये  पोलिसांना हिंसाचार थांबवता आला नाही, तेव्हा सैन्याला पाचारण करण्यात आले होते. म्हणून हिंसाचार अधिक भडकण्याची  वाट न पाहता तो नियंत्रित करण्यासाठी कारवाई केली पाहिजे.

आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करणे गरजेचे 

पोलिसांना दंगेखोरांवर काबू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे आहेत. हे तंत्रज्ञान जम्मू काश्मिर पोलिस वापरत आहेत. यामुळे पोलिस  दंगलखोरांवर काबू मिळवू शकतिल. सध्या अश्रुधुराशिवाय दंगलखोरांवर काबू मिळवण्याचे इतर अनेक उपाय आहेत.

आंदोलक संघटनांना आंदोलनात झालेले नुकसान भरून देणे न्यायालयाने बंधनकारक केले पाहिजे. जेणेकरून भविष्यातील हिंसाचार, नुकसान टाळण्यास मदत होईल. आंदोलकांवर खटले जलदगती न्यायालयात चालवून आंदोलकांना शिक्षा मिळाली पाहिजे, जेणेकरून कायद्याची भीती आंदोलकांना बसेल.

यात सोशल माध्यमे, छापील माध्यमांनी आंदोलनांचे वार्तांकन करताना हिंसाचाराला महत्त्व न देता वार्तांकन करावे. हिंसक आंदोलनांला अनेक संस्था आर्थिक मदत करतात. त्यांच्यावरही कारवाई करावी. जसे राष्ट्रीय गुप्तहेर संस्थेने हुरियत कॉन्फरन्सच्या आर्थिक नाड्या आवळते आहे तशाच पद्धतीने या आंदोलकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या पाहिजेत.

स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ़्री फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करुन पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरुन हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल. हिंसक आंदोलक आंदोलनाचे विविध मार्ग अनुसरतात पोलिसांनीही एक पाऊल पुढे जाऊन हा हिंसाचार थांबवला पाहिजे. त्याकरता सामान्य माणसांनीही पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे.म्हणुनच हिंसक आंदोलने थांबवण्याकरता सर्व समावेशक उपाय जरुरी आहेत.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 256 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…