बायका आणि चंद्रावरच्या खड्ड्यांचं रहस्य..

गोष्ट अगदी आजची. सकाळी नेहेमी प्रमाणे लोकलने दादरला उतरलो. मी गेली अनेक वर्ष जो डबा पकडतो, त्या डब्याच्या बरोबर पुढचा डबा ‘लेडीज लोकां’चा (मुंबईत लेडीज डब्याला लेडीज लोगोंका डब्बा असंच म्हणतात) येतो. मी उतरलो आणि टिसी माझ्याकडे बघतोय का, तिकडे हळुच पाहात पुलाच्या दिशेने निघालो. म्हंजे मी नेहेमी तिकिट काढूनच प्रवास करतो, पण कधीतरी आपल्याला टिसीने तिकिट विचारवी अशी सुप्त इच्छा आहे माझी. म्हणून टिसीकडे नेहेमी पाहात जातो. पण गरीब चेहेरा, कपडे आणि माझी झोळी पाहून कदाचित मी कधी विदाऊट तिकिट प्रवास करत असेन, असं टिसीच्या मनातही येत नसेल. डेअरिंगवाली माणसं वेगळीच दिसतात.असो, तर मी डब्यातून उतरून निघालो आणि तेवढ्यात लेडीज डब्यातून ‘शुक शुक’ ऐकू आलं. पुरुषांचं नैसर्गिकपणे म्हणा वा समोरुन कुणीतरी बोलावतंय, ते आपल्यालाच असावं’ या समजुतीने म्हणा, सर्व वयांची अवघी पुरूष गर्दी, लेडीज डब्यातून शुक शुक कुठून ऐकू आलं ते पाहायला म्हणा, दोन क्षण थबकली. नक्की कोण आणि कुणाला शुक शुक करतंय याचा अंदाज घेत तेवढ्यातल्या तेवढ्यात माझ्यासहीत प्रत्येक वयाच्या जेन्टसने आपापल्या वयाच्या आणि सर्व वयाच्या लेडीजच्या चेहेऱ्यांकडे जमेल तेवढं आणि जमेल तसं पाहून घेतलं. अशी संधी पुरुष सहसा गमावत नाहीत.

“साळुंखे साहेब” अशी हाक ऐकू आली आणि प्लॅटफाॅर्मवरची बाकीची पुरुष भीड माझ्याकडे आणि माझ्या अवताराकडे आश्चर्याने किंवा असुयेने पाहात हलती झाली. आता चकित व्हायची माझी पाळी आली. मी मनात म्हटलं, आयला, मला कोण लेडीज डब्यातून बोलावतंय, म्हणून. म्हटलं बायको असेल. म्हणून घड्याळ पाहिलं. तर तिला मिस्टरपेक्षा मस्टर महत्वाचं असल्याने, अगोदरच त्याच्या ओढीने निघून गेली होती. सुटकेचा एक बेसावध नि:श्वास नकळत निघून गेला. परत बायको मला ‘साहेब’ कशाला म्हणेल, अशी सवयीची शंकाही आली. तेवढ्यात लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या जीन्स-टाॅप्स-मेकपच्या गर्दीतून एक चेहेरा डोकावला. माझी ओळख काही पटेना. तरीही माझी छाती दोन इंचं फुगलीच. असे गोड प्रसंग आले, की हे नेसर्गिकरित्याच होतं बरं का, आणि सर्वच नरपुंगवांचं होतं.

हल्ली काय झालंय, की मी फेसबुकावर लिहायला सुरुवात केल्यापासून मला काहीजण ओळखू लागलेत. काहीजण म्हणजे, दादरसारख्या दिवसाच्या कोणत्याही प्रहरी १०-२० हजारांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी कधीऽऽतरी मला पूर्वी कधीही न भेटलेले दोनेकजण ओळखतात आणि माझं लेखन त्यांना आवडतं असं सांगतात. मला तर फोटोवरून जिवंत माणूस ओळखणाऱ्यांचं जबरदस्त कोतुक वाटतं राव. त्याच आमच्या चेहेऱ्यात काही वैशिष्ट नाही. चारचौघात सहज लपून जावा असा सर्वसामान्य चेहेरा नियंत्याने आम्हाला बक्शलाय. असं असुनही फोटोवरून मला ओळखणारांचं मला कवतुक वाटतं. अर्थात, कवतुक मला ओळखलं या पेक्षा कसं ओळखंल याचंच जास्त असते.

तर, मला त्या जीन्स-टाॅप-गाॅगल, चुन्न्यांच्या गर्दीतून, एक सुंदर चेहेरा बाहेर डोकावून, त्याने मला ‘साळुंखे साहेब’ म्हणून बोलावल्यावर, मला स्वत:चंच भयंकर कवतुक वाटलं. माझे कान पुढच्या, ‘तुम्ही छान लिहिता’, ‘मला आवडतं’ वैगेरे माझ्या कवतुकाचे शब्द झेलण्यासाठी आतूर झाले होते. मला एकदम प्रसिद्ध लेखक बिखक झाल्यासारखं वाटलं आणि मी सातव्या आसमानात पोहोचलोच होतो, तेवढ्यात पुढचे शब्द ऐकू आले, “तेवढं लालबागच्या राजाचं दर्शन घडवा हो, दोन वर्षांपूर्वी तुम्ही छान व्यवस्था केली होती. मी शुभाच्या मैत्रिणीची मैत्रिण”. फुलांचा वर्षाव होईल या अपेक्षेनं मनातल्या मनात डोळे मिटून उभं राहावं आणि वरून दगड पडावेत असे हे बोल ऐकले आणि सातव्या आस्मानातून प्लॅटफाॅर्म फाडून मी थेट पाताळात घुसलो आणि चंद्रावर आणखी एक खड्डा वाढला. वैज्ञानिकांना काय म्हणायचं ते म्हणो, परंतु देखण्या चंद्रावरच्या अनेक खड्ड्यांचं रहस्य मला अशा रितीने रेल्वेच्या प्लॅटफाॅर्मवर उलगडलं..

बायका कुणाला, कधी, कुठे आणि काय विचारतील आणि कुठून कुठे पाठवतील याचा थांग ब्रम्हांड निर्मात्या ब्रम्हदेवालाही लागणार नाही, हे मात्र खरं.

हे सर्व नाट्य दादर स्टेशनवरच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक चारवर अवघ्या ४५ सेकंदात घडलं. ४५ सेकंद अवधी मुंबई बाहेरची जनता जमेसही धरत नसेल, मुंबईत मात्र या वेळेत चंद्र ते व्हाया पृथ्वी पुन्हा चंद्रावरचा आणखी एक खड्डा एवढा प्रवास सहजपणे होतो..

गणपतींचं विसर्जन होईपर्यंत मी लेडीज डब्याच्या पुढचा डब्बा पकडायचं ठरवलंय.

— नितीन साळुंखे
9321811091

या स्फुटात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. १०० टक्के सत्य घटना आहे.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड

अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ ...

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर ...

जलग्राम : जळगाव

मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर ...

Loading…