नवीन लेखन...

वसंत देसाई

हिंदी चित्रपट संगीतकारांचा विचार करताना, बरेचसे संगीतकार हिंदी चित्रपटांपुरते किंवा हिंदी भाषिक गीतांपुरते आपले अस्तित्व ठेवतात. यात अगदी इतर भाषिक संगीतकार जसे बंगाली, मराठी, पंजाबी दक्षिण भारतीय संगीतकार (जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांसाठीच स्वररचना करीत होते) यांनी आपली  कारकीर्द हिंदी चित्रपटाभोवतीच साकार केली. अर्थात हे त्यांची मर्यादा असे म्हणता येणार नाही पण त्यांनी हिंदी चित्रपट हेच आपले ध्येय ठेवले. या मताला सणसणीत अपवाद म्हणून वसंत देसाई यांचे नाव अवश्यमेव घ्यावेच लागेल.

कोकणपट्टीतील सावंतवाडी जवळील सोनवड गावी जन्म. हा तपशील जरा महत्वाचा म्हणायला लागेल कारण हा परिसर धर्म आणि लोकसंगीताने गाजणारा आहे. याचा प्रभाव आणि परिणाम वसंतदेसायांवर नक्कीच झाला असणार. त्यांच्या नंतरच्या कारकिर्दीचा बारकाईने आढावा घेतला तर वरील मताला पुष्टी मिळते.

संगीतात लहानपणापासून अतोनात रस, याची परिणीती, उस्ताद इनायत खान आणि डागर बंधू, यांच्याकडून शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतली. वसंत देसायांच्या स्वररचनेवर रागसंगीताचा फार प्रभाव आहे, याचे मूळ इथे सापडू शकते. पुढे तरुण वयात प्रभात कंपनीत, गोविंदराव टेबे यांच्या हातखिळी सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि प्रभात कंपनीत स्थिरावले. इथे त्यांना व्ही. शांताराम भेटले आणि नंतर जेंव्हा व्ही. शांतारामांनी प्रभातपासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला तेंव्हा वसंत देसाई यांना तिथे भरपूर संधी मिळाल्या. या दोघांना प्रभातचा वारसा मिळाला होता, हे मुद्दामून ध्यानात ठेवावे लागेल. समान विचार आणि ध्येये यांचा परिणाम दोघांच्याही कार्यात दिसला. राजकमल बरोबर त्यांनी दीर्घकाळ काम केले.

वास्तववादी चित्रपटनिर्मितीत ज्याचा उद्भव होतो त्या संगीतावरच भर असल्याकारणाने विविध आणि वास्तव ध्वनी-उगम वापरण्यावर देसाई यांचा कटाक्ष होता. उदाहरणार्थ, ” डॉ आँखे बारा हाथ” या चित्रपटातील “सैय्या झुठो का बडा सरताज निकला” या गाण्यात “रावणहथ्था” या लोकवाद्याचा समर्पक उपयोग!! तसेच याच चित्रपटातील “ऐ मालिक तेरे बंदे हम” या गाण्यात योजलेला लयबंध वाऱ्याने उघडझाप करणाऱ्या खिडकीने पुरवला जातो.

वसंत देसाईंच्या रचनांत थोडाफार नाट्यगीतांचा गंध राहिलापण हे थोडे अपेक्षित असेच म्हणावे लागेल. याशिवाय असे जाणवते, पारंपरिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्या कारणाने त्या जशाच्या तशा व परिणामकारकतेने वापरण्यात त्यांनी मागेपुढे पहिले नाही. याचाही संबंध मराठी नाट्यसंगीताशी असलेल्या त्यांच्या जवळच्या नात्याचा असावा. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो असा मराठी नाट्यसंगीतपरंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो, हा दृष्टिकोन इथे महत्वाचा आहे. या परंपरेचा आणि देसाई यांचाही कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भरवसा नव्हता. उदाहरणार्थ “दिल का खिलौना हाये टूट गया” (भैरवी), “बोल रे पपीहरा” ही गाणी ऐकावीत. तसेच “गुड्डी” या चित्रपटातील गाणे – हमको मन की शक्ती देना – या प्रार्थना गीताला केदार या शांत-गंभीर रागाचा आधार आहे पण रागविस्ताराची अपेक्षा निर्माण होऊ नये अशी खबरदारी चालीच्या चलनातून घेतली आहे. या उलट “बोल रे पपीहरा” ही शास्त्रोक्त चीज त्रितालाऐवजी केहेरवासारख्या तालात बांधून जरा हलकी फुलकी केली आहे. याचाच वेगळा अर्थ असा घेता येतो, परंपरेत राहून प्रयोग करण्याकडे देसायांचा कल होता.

“झनक झनक पायल बाजे” या चित्रपटातील “नैन सो नैन” या गाण्यासाठी “मालगुंजी” रागाचा आधार घेतला आहे आणि हा राग प्रेम-प्रणय इत्यादींसाठी वारंवार वापरलेल्या बागेश्रीपासून नाजूक अंतर राखून असतो म्हणजे तास ठेवावा लागतो. याच चित्रपटातील, भारताच्या अनेक प्रांतांत प्रचलित “बारमासा” या पारंपरिक लोकगीतप्रकारच्या धर्तीवर त्यांनी ऋतूवर्णनपर पद्यें योजली आहेत. या रचनांना गीतांचे स्वरूप न देता केवळ चाली ठेवण्यात देसाई यांनी परंपरेत राहून थोडा बदल करण्याच्या रचनापद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे त्यांच्यावर काही बंधने आली हे खरे, पण त्याचबरोबर तयार चाली व त्यासाठी सज्ज ऐकणारेही निश्चित झाले. “जो तुम तोडो पिया” किंवा ” ऐ मेरे दिल बता” या रचनासुद्धा ठरीव दृश्यांसाठी साचेबंद संगीत, वसंत देसाई कसे वापरीत असत, याची कल्पना येते,

आणखी एका बाबीकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. व्ही. शांतारामांसाठी काम करताना केलेल्या रचना नाट्यप्रभावित वास्तववादाला धरून असत पण इतर चित्रपटांसाठी त्यांचे धोरण वेगळे रहात असे. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी दिलेले “मेघा बरसने लगा है आज की रात” – शक चित्रपटातील गाणे अधिक वेधक उदाहरण म्हणून मांडता येईल. राजकमलसाठी केलेल्या संगीतरचनांत न आढळणारे विशेष अशा संगीतरचनांत आढळतात याचा वेगळा अर्थ, त्यांच्या सर्जनशीलतेस व्यापक रूप होते.

वसंत देसायांच्या पुढील सांगीतिक रचनांचा आराखडा अत्यंत व्यामिश्र तसेच परंपरेत राहून प्रयोग करणारा आणि नंतरच्या काळात आधुनिक वाद्यांच्या सहाय्याने अधिक गुंतागुंतीचा होता, असे विधान ठामपणे करता येते. अशी प्रतिभा लाभलेला संगीतकार विरळाच असतो. एका बाजूने हिंदी चित्रपट, दुसरीकडे मराठी चित्रपट आणि तिसरीकडे मराठी रंगभूमीवरील कामगिरी – इतका व्यापक पट एकाच कारकिर्दीत समर्थपणे हाताळणे, हीच खरी वसंत देसायांची सर्जनशीलता म्हणायला लागेल.

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..