नवीन लेखन...

इतिहासाच्या खांद्यावरचं वेडं वर्तमान..!!

काल बऱ्याच वर्षांनी मुंबई-गोवा रस्त्यावरून प्रवास केला. चार-पांच वर्षांपूर्वी या रस्त्यावरून अनेकदा प्रवास करत असे. तेंव्हा रस्त्याचं काम सुरु झालं होतं. सुरु झालं होतं म्हणजे पेपरमधे बातम्या वाचल्या होत्या. काही ठिकाणी, म्हणजे मुंबईच्या उंबऱ्यावरची रस्त्याच्या आजुबाजूच्या काही इमारती तोडलेल्या दिसतंही असत. रस्त्याला काही कळणारी आणि अनेक न कळणारी डायव्हर्जन्स काढली होती. सुखरुप प्रवासापेक्षा अपघाताचीच शक्यता जास्त होती. हे सर्व लक्षात घेता, कधी गांवी जायचंच झालं तर, पुणे-सातारा-कोल्हापूरमार्गे जाणं, थोडं लांबचं पडलं तरी, सोयीचं नि सुरक्षित होतं..!

काल मात्र अगदी ठरवून खालच्या रस्त्याने गेलो. अगदी अमुलाग्र बदल झालाय. ओळखीच्या खुणा अनोळखी झाल्यासारख्या वाटतायत. रस्ता पूर्ण व्हायला तरी आणखी दोनेक वर्ष तरी जातील, अजून रस्ता अगदी नजर लागेल आणि नजर ठरणारही नाही अशा पद्धतीने तयार होतोय. हे श्रेय नि:संशय श्री. नितीन गडकरींचं. गडकरी हे चवीने खाण्याचे शौकीन असल्याचं अनेकदा त्यांच्या मुलाखतीत ऐकलंय. ते त्यांच्या प्रकृतीतही दिसतं. ‘रस्ता’ आणि ‘पूल’ हे शब्द, रस्सा आणि पुलाव शब्दांशी साम्य राखणारे असल्याने असेल कदाचित, पण गडकरी यात कमालीचा रस घेतात आणि ते पूर्णब्रम्ह असल्यासारखे पूर्णही करतात, हा आजवरचा अनुभव आहे. मोदी सरकारच्या काळात देशात रस्त्यांची काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाली किंवा सुरू आहेत हे मात्र खरंच आहे.

नवीन तयार होणारा चार लेनचा मुंबई-गोवा हायवे ही काही पूर्णपणे नवीन निर्मिती नाही. नवीन हायवे इतिहास बनण्याच्या दिशेने प्रवास करत असलेल्या जुन्याच दोन लेनच्या हायवेच्या आधारानेच कात टाकतोय, त्यामुळे काही जुन्या खुणा अद्याप शिल्लक आहेत. फक्त त्या नवीन साज चढवून उभ्या असल्याने चटकन ओळखता येत नाहीत, एवढंच..! माझी इतिहासात रुची असल्याने, माझा अशा जुन्या खुणा शोधायची खोड आहे. कारण नवीन जे काही नव्या रुपात उभं असतं, ते त्या जुन्याच्या खांद्यावरच उभं राहात असतं. इतिहास असा सहजासहजी पुसता येत नसतो. थोडं शोधक नजरेने पाहिलं तर काही ओळखीच्या खुणा अजुनही शिल्लक असलेल्या दिसून येतात..

रस्त्याचा असो वा एखाद्या ठिकाणाचा किंवा अगदी एखाद्या व्यक्तीचाही, इतिहास पूर्णपणे खोडून काढता येत नाही, हे सत्य आहे. इतिहासाच्या खांद्यावर वर्तमान उभं असतं आणि ते भविष्याच्या दिशेने कुतुहलाने पाहात असतं. ‘विकासा’चंही तसंच असतं. विकास काही एका दिवसांत किंवा काही वर्षांत होत नाही. वर्तमानातला जो काही काळा-गोरा विकास दिसतोय, तो असाच त्याच्या इतिहासाच्या खांद्यावर उभा आहे. त्यामुळे आजची प्रगती छाती फुगवून सांगताना, गत काळात काहीच झालं नाही असं म्हणणं, खोटेपणाचं तर आहेच, परंतु कृतघ्नपणाचं जास्त आहे. नवीन बनत असलेला मुंबई-गोवा हाचवे असाच ७० वर्ष किंवा त्याहीपूर्वी इतिहासातील कुणी गरजूने तयार केलेल्या जुन्या रस्त्याचा आधार घेत आकाराला येत आहे..! नवीन असेल, तर त्याचं रुपडं..!!

तशीच विलक्षण सुधारणा रेल्वेतही दिसते. माझा संबंध उपनगरी रेल्वेशी जास्त आणि अगदी दैनंदिन येत असल्यामुळे, मला हा फरक नुसता दिसतोच असा नाही, तर अनुभवायलाही येतो. योगायोगाने आज १६ एप्रिल. बरोबर १६६ वर्षांपूर्वी, इसवी सनाच्या १८५३ मधे आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली, ती अजुनही धावत आहे. आजची रेल्वे आणि सुरुवातीच्या काळातली रेल्वे यात जमीन अस्मानाचा फरक असला तरी, आजची रेल्वे त्याच ऐतिहासिक मार्गावरून धावत आहे. आजच्या रेल्वेत झालेल्या सुधारणा त्याच इतिहासातल्या, १६६ वर्षांपूर्वी इंग्रजांनी भारतात आणलेल्या फलाटांवर आणि रुळांवर झालेल्या आहेत, हे इतर सर्व विसरत असले तरी मला विसरता येत नाहीत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या, गत ७० (या अटल बिहारी वाजपेयींची ६ व मोदी सरकारची ३-४ वर्ष धरलेली आहेत) वर्षांतल्या प्रत्येक सरकारने आपापल्या कुवतीनुसार आणि वेगानुसार त्या सुधारण घडवत आणलेल्या आहेत. हे श्रेय सर्वांचं आहे. सध्याच्या सरकारचा सुधारणांचा वेग मोठा आहे, हे त्यांचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं आणि मोदी सरकारचं अभिनंदन करायला हवं. ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला द्यायलाच हवं. ते नाकारण्याचा कोतेपणा किंवा खोटेपणा करु मये असं मला वाटतं. आपल्याला सर्वात जास्त चीड कशाची यायला हवी, तर ती खोटेपणाची..!

दोन-तीन वर्षांपूर्वी एका कट्टर राष्ट्रवादी (काॅग्रेस नव्हे, तर राष्ट्रभक्त किंवा नुसतं भक्त ) विद्वानाने माझ्याशी चर्चा करताना, त्या काळची आठवण काढून ‘रेल्वे हिन्दूंनी आणली म्हणून आपण आज प्रगती करु शकलो’ असं सद्गदीत उद्गार काढलेले मला आठवतात. वर माझ्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह पाहून ‘त्या काळी ब्रिटिश हिन्दूस्थानवर राज्य करत असल्याने, ते हिन्दूच नव्हते काय’ असंही स्पष्टीकरण दिलं. ‘मग त्याच न्यायाने अनेक मुसलमान राजवटींनी शेकडो वर्ष हिन्दूस्थानवर काज्य केलं होतं, मग त्यांना हिन्दू का म्हणू नये’ असा प्रश्न त्यांना विचारण्याचं माझ्या ओठांवर आला होता, पण सोयिस्कर राष्ट्रवादावर वाद घालायचा नसतो, हे मला माहित असल्याने मी वाद घालायच्या भानगडीत पडलो नाही. भक्ती, मग ती कुणाचीही असो, काही काळाने ती आंधळी आणि बहिरीही होत असते..!

हा लेख मी दोन दिवसांपूर्वीच लिहून ठेवला आहे आणि पोस्ट करायची वाट पाहात होतो. वाट पाहात होतो, कारण सिंधुदुर्र्गातल्या माझ्या गांवी माझ्या मोबाईलला डिजिटल रेंज नव्हती. रेंज हवी असली तरी ७-८ किलोमिटरचा प्रवास करुन मला फोडा किंवा वैभववाडीत येणं भाग पडतं. डिजिटल इंडीया माझ्या खेड्यात त्या ताकदीनं अद्याप पोचलेला नाही, परंतु तो निश्चितच पोहोचेल. कारण ‘जीओ’च्या लायनी टाकायचं काम जोरात सुरू आहे. कुणाच्या का आरवण्याने पाहाट होत असेल, तर तिचं स्वागत करायला हवं. पण हे स्वागत करताना, ह्या डिजिटल युगाचा पाया, सर्वांचा विरोध पत्करुन माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधींनी घातला होता, हे मला विसरता येत नाहीय..!!

©️नितीन साळुंखे
9321811091
१६.०४.२०१९
वैभववाडी.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..