नवीन लेखन...

मानवी शरीरातील सप्तचक्रे आणि अंतस्त्रावी ग्रंथी.

रविवार १ एप्रिल २०१२

योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल, अधिकारवाणीने खूपच महिती सांगितलेली आहे. या चक्रांच्या शरीरातील जागा, चक्रांचे गुणधर्म आणि त्यांच्या कार्यांचा, शारीरिक व्यवहारातील सहभाग सांगितलेला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, मानवी शरीरातील सात अंतस्त्रावी ग्रंथींच्या जागा, त्यांचे कार्य आणि सात योगिक चक्रांच्या जागा यात कमालीचे साम्य आढळते.
शरीर आणि मेंदू यांचे सुयोग्य संतूलन होण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम, आरोग्य आणि मनस्वास्थ्य यांची आवश्यकता असते. मनस्वास्थ्यासाठी योगाचरणे आणि योगाभ्यासाची गरज आहे. जाणीव, मन, बुध्दी, भावना, विचार, विवेक वगैरेंसाठी, शरीरात, कुठेही अलग अलग केन्द्रे नाहीत. ही सर्व केन्द्रे मेंदूतच असतात. सजीवांना चेतना असते तसेच जाणीव, म्हणजे कॉन्शसनेस असतो हे देखील मेंदूतल्या विशिष्ट भागातील पेशीमुळेच शक्य झाले आहे.
मानवी शरीरात अनेक उर्जास्थाने आहेत हे रुशीमुनींनी फार पूर्वीच ओळखले. योगशास्त्रात सात चक्रांची संकल्पना रूढ झाली आहे. शरीरातील या, अनेकांपैकी महत्वाच्या, उर्जाकेन्द्रांना विशिष्ट नावे दिलेली असून ही केन्द्रे शरीराच्या व्यवहाराला आणि कर्मेन्द्रियांना कशी मदत करतात हेही विस्ताराने सांगितले आहे.
चक्रे आणि नाड्या
ही केन्द्रे एकमेकांशी तर जोडलेली आहेतच, शिवाय शरीराच्या सर्व भागास जोडलेली आहेत. त्यामुळे विशिष्ट संवेदना, गरजेनुसार, शरीराच्या विशिष्ट भागात पोचविल्या जातात. ही केन्द्रे, एकमेकांशी इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांनी जोडलेली आहेत. प्राणशक्तीने चालणार्‍या श्वासोच्छ्वासाच्या गतीशी या तीनही नाड्यांचा संबंध असतो. प्राणशक्ती जेव्हा सुषुम्ना नाडीच्या जोरावर चालते तेव्हा दोनही नाकपुड्यातून श्वासोच्छ्वास चालतो. दुपार, मध्यरात्र आणि सकाळ-संध्याकाळचा संधिकाळ यावेळी सुषुम्ना नाडीचा जोर असतो. इडानाडीचा जोर असतो तेव्हा डाव्या नाकपुडीने, तर पिंगलेचा जोर असतो तेव्हा उजव्या नाकपुडीने श्वास चालतो. प्रत्येक नाडी, सुमारे ३ तास कार्य करीत असते. इडेला शीतल नाडी किंवा चन्द्रनाडी तर पिंगलेला उष्णनाडी किंवा सू्र्यनाडी असेही म्हणतात. इडा ही संवर्धक, पिंगला ही संरक्षक आणि सुषुम्ना, ही नियंत्रक नाडी समजली जाते.
सुषुम्ना, मेंदूच्या खालच्या भागापासून सुरू होते, मान आणि मेरुदंडातून म्हणजे स्पायनल कॉलममधून माकडहाडापर्यंत जाते. इडा ही मेरुदंडाच्या डाव्या बाजूस तर पिंगला ही उजव्या बाजूस असते. आयुर्वेदाचा वैद्य जी नाडीपरीक्षा करतो ती, खरे म्हणजे शुध्द रक्तवाहिनी धमनी असते. कानशीलाजवळ आणि मनगटाजवळ ती उडतांना आढळते. तिच्या स्पंदनावरून रोगनिदान करता येते. ज्यावेळी ह्रदयाकडून शरीराकडे रक्त पाठविले जाते त्यावेळी ही नाडी उडते आणि ज्यावेळी ह्रदय प्रसरण पावलेले असते त्यावेळी ही नाडी खाली गेलेली असते.
चक्रांच्या जागा.
सहा चक्रे मेरुदंडाच्या पुढील बाजूस असतात. त्याचा आकार गोल असल्यामुळे त्यांना चक्रे असे म्हणतात.
सातवे चक्र मेंदूत असते. ही सात चक्रे अशी ::(आकृती १ पहा)
१. सहस्त्रार चक्र (Crown चक्र) जागा…मेंदू.
२. आज्ञा चक्र (Brow चक्र) जागा…मेंदूतच दोन भुवयांच्या मधल्या जागेत.
३. विशुध्द चक्र ( Throat चक्र) जागा…घसा
४. अनाहत चक्र (Heart चक्र) जागा.. हृदयाजवळचा भाग.
५. मणिपुर चक्र (Solar Plexus चक्र) जागा..बेंबीच्या आसपासचा भाग.
६. स्वाधिष्ठान चक्र (Secral चक्र) जागा…जननेन्दियांच्या आसपासचा भाग.
७. मूलाधार चक्र (Root /Base चक्र) जागा…मेरुदंडाचे खालचे टोक.

स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र यांच्या जागांविषयी थोडे मतभेद आहेत. काही साधक, स्वाधिष्ठान चक्राची जागा मेरूदंडाच्या खालच्या टोकापाशी समजतात आणि मूलाधार चक्राची जागा, ओटीपोटाखालच्या त्रिकोणी जागेत समजतात. मूलाधार चक्र हे सर्वात खालचे चक्र आहे याबद्दल मात्र एकमत आहे.
योगशास्त्रानुसार सात चक्रांचे वर्णन ::
१. सहस्त्रार चक्र : सहस्त्र म्हणजे हजार घड्यांचे बनलेले हे चक्र असून त्याचे क्रियाप्रेरक ज्ञानतंतू सर्व शरीरभर पसरलेले आहेत. म्हणून अख्ख्या शरीराचे नियंत्रण या चक्रामुळे होते. या चक्राचा रंग जांभळा असून या चक्राला अनेक पाकळ्या आहेत.
२. आज्ञाचक्र : या चक्राची जागा मेंदूत असून, समोरून पाहिल्यास ते कपाळावर दोन भुवयांच्या मधील जागी असल्यासारखे वाटते. हे चक्र प्रभारित किंवा कार्यक्षम रहावे म्हणून कपाळावर गंध किंवा भस्म लावण्याची परंपरा आहे. याला दोन पाकळ्या आहेत. रंग : निळा. या चक्रावर लक्ष्य केंद्रित केल्यास तुमची अध्यात्मिक शक्ती वाढते अशी समजूत आहे. या चक्राला तिसरा डोळा असेही म्हणतात. भगवान शंकराने हा डोळा उघडला तर त्यातून निघणार्‍या शक्तीकिरणांनी राक्षस मरत असत.
३. विशुध्द चक्र: या चक्राचा रंग अस्मानी असून त्याला १६ पाकळ्या आहेत. जीवात्मा ही या चक्राची देवता आहे.
४, अनाहत चक्र : रंग..हिरवा. याला १२ पाकळ्या आहेत. ह्रदय आणि फुफ्फुसे याच्या कार्यांना, या चक्रामुळे शक्ती मिळते.
५. मणिपूर किंवा नाभी चक्र : रंग : पिवळा. हे चक्र पाठीच्या कण्यात, बेंबीच्या मागच्या भागात आहे. १२ पाकळ्या. विष्णू ही देवता आहे. जठर, यकृत, मूत्रपिंड आणि आतडी यांना, या चक्रामुळे प्राणशक्तीचा पुरवठा होतो.
६. स्वाधिष्ठान चक्र : रंग… नारिंगी. ६ पाकळ्या. हे चक्र जननसंस्थेच्या मागच्या बाजूस असते. प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे या चक्रावर नियंत्रण झाल्यास, योग्याला ब्रम्हचर्य प्राप्त होते.
७. मूलाधार चक्र : रंग… लाल. ४ पाकळ्या. मेरूदंडाच्या खालच्या टोकाजवळ हे चक्र आहे. गणपती देवता. अनेक जन्मातील संस्कार जिच्यात आहेत ती कुंडलिनी या चक्रात सुप्तावस्थेत आहे. नागिणीचे कुंकवासारखे लाल पिल्लू वेटोळे घालून बसते त्याप्रमाणे ही कुंडलिनी साडेतीन फेर्‍यांचे वेटोळे घालून, खाली तोंड करून झोपलेली असते.
योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल, अधिकारवाणीने खूपच महिती सांगितलेली आहे. या चक्रांच्या शरीरातील जागा, चक्रांचे गुणधर्म आणि त्यांच्या कार्यांचा, शारीरिक व्यवहारातील सहभाग सांगितलेला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, मानवी शरीरातील सात अंतस्त्रावी ग्रंथींच्या जागा, त्यांचे कार्य आणि सात योगिक चक्रांच्या जागा यात कमालीचे साम्य आढळते.
मानवी शरीरातील अंतस्त्रावी आणि बाह्यस्त्रावी ग्रंथी :
आधुनिक वैद्यकशास्त्राच्या अभ्यासामुळे, निर्विवादपणे असे सिध्द झाले आहे की, मानवी शरीराच्या अनेक कार्यात, अंतस्त्रावी आणि बाह्यस्त्रावी ग्रंथींचा फार महत्वाचा सहभाग आहे. ज्या ग्रंथीतून निघालेला स्त्राव बाहेर पडतो त्या ग्रंथींना बाह्यस्त्रावी ग्रंथी म्हणतात. उदा. लाळ ग्रंथी. जेवतांना, अन्नाचा घास तोंडात घालून, तो चावूनचावून बारीक करतांना ही लाळ त्यात मिसळते आणि अन्नपचनास मदत करते. घामाच्या ग्रंथीतून बाहेर आलेला घाम, शरीराचे तापमान कमी करतो. डोळ्यांवर ताण पडला म्हणजे अश्रूग्रंथीतून निघालेले अश्रू डोळ्यांना आराम देतात. मातेच्या स्तनातील दूधग्रंथीतून स्त्रवणारे दूध हे नवजात बालकाचा परिपूर्ण आहार असतो. या सर्व ग्रंथी, त्यांच्यातून वाहणार्‍या रक्ताचे रुपांतर, त्या त्या स्त्रावात करतात.
अंतर्स्त्रावी ग्रंथीतून संप्रेरके म्हणजे हॉर्मोन स्त्रवतात आणि ते सरळ रक्तातच मिसळून योग्य तो परिणाम साधतात.
या ग्रंथींना endocrine किंवा ductless glands असे म्हणतात. अंतर्स्त्रावी ग्रंथींच्या जागा आकृती २ मध्ये दाखविल्या आहेत.
या ग्रंथींच्या जागा आणि सात योगिक चक्रांच्या जागा जवळजवळ त्याच आहेत ही खरोखर आश्चर्याची बाब आहे. रुशीमुनिंना फार पूर्वीच कळून चुकले होते की, डोक्यापासून गुदद्वारापर्यत बरीच उर्जा केन्द्रे आहेत. त्यांनी, त्यापैकी सात महत्वाची केन्द्रे आणि त्यांच्या जागाही बरोबर हेरल्या. हात आणि पाय मिळून शरीराचा जवळजवळ अर्धा भाग होतो पण त्यात एकही चक्र नाही याचे कारण म्हणजे त्यात एकही अंतर्स्त्रावी ग्रंथी नाही.
अंतर्स्त्रावी ग्रंथी ::
१. पिनियल ग्रंथी (Pineal Gland)(सहस्त्रार चक्र).. मेलॅटोनीन नावाचा हॉर्मोन स्त्रवतो. रात्र झाली किंवा शरीर थकले असले किंवा भरपेट जेवण झाले असले म्हणजे ही ग्रंथी कार्यान्वित होते, मेलॅटोनीन स्त्रवते आणि माणसाला झोप येते. मेलॅटोनीन ही झोपेची नैसर्गिक गोळी आहे. जितके आवश्यक असते तेव्हढेच मेलॅटोनीन स्त्रवते आणि तितकाच काळ झोप लागते. शरीर ताजेतवाने झाले की मेलॅटोनीन स्त्रवण्याचे थांबते आणि आपण जागे होतो. पिनियल ग्रंथीत काही बिघाड झाला तर मेलॅटोनीन निर्माण होत नाही आणि त्या माणसाला निद्रानाशाचा विकार जडतो.
२. पूरस्थ ग्रंथी (Pitutary Gland)(आज्ञा चक्र). ही ग्रंथी म्हणजे सर्व ग्रंथींची राणी आहे कारण इतर ग्रंथींना कार्यान्वित होण्याच्या आज्ञा याच ग्रंथीतून जातात. म्हणजे आज्ञा चक्र हे नाव अगदी सार्थ आहे. या ग्रंथीतून ९ हॉर्मोन स्त्रवतात.
३. गलग्रंथी आणि उप-गलग्रंथी. (Thyroid and Para-Thyroid Glands)(विशुध्द चक्र). यातून ३ हॉर्मोन स्त्रवतात.
४. उरस्थ ग्रंथी. (Thymus Gland) (अनाहत चक्र) यातून १ हॉर्मोन स्त्रवतो.
५. अधिवृक्क ग्रंथी आणि स्वादुपिंड.(Adrenal glands and Pancreas)(मणिपूर चक्र) या दोन्ही ग्रंथीतून ७ हॉर्मोन स्त्रवतात. त्यातील इन्सुलीन हा फार महत्वाचा हॉर्मोन आहे.
६. जनन ग्रंथी (Gonads. पुरुषांची वृषणे आणि स्त्रियांचे बीजांडकोष)(स्वाधिष्ठान चक्र) यातून लिंगदर्शक हॉर्मोन स्त्रवतात. पुरुषत्वासाठी Testosterone आणि स्त्रीत्वासाठी Estrogen आणि Progesterone.
७. उत्सर्जन यंत्रणा (गुदद्वार, मूत्राशय, मूत्रमार्ग)(मूलाधार चक्र). शरीराचा गुरुत्वमध्य.
आधुनिक वैद्यकशास्त्रात, मानवी शरीरातील सर्व घटकांचे, मूर्तस्वरूपातील ज्ञान झाले आहे. वेगवेगळ्या रंगांची सात चक्रे आणि लाल रंगाची साडेतीन वेढे घातलेली कुंडलिनी आढळली नाही. परंतू चेतातंतूंचे गोलाकार जाळे आणि अंतस्त्रावी ग्रंथी मात्र आढळल्या. त्यांची कार्यप्रणालीही समजली.
सजीवांचा जन्म, त्यांची वाढ, त्याच्या शरीरातील इंद्रिये आणि अवयव, त्यांनी खाल्लेल्या आहारातूनच त्यांच्या शरीरातील सर्व घटकांची आणि विशिष्ट साध्यासाठी निर्माण होणारी जीवरसायने, त्यांची प्रजनन करण्याची क्षमता आणि यंत्रणा…हे सर्व निसर्गाने कसे साध्य केले आणि गेली कित्येक कोटी वर्षांपासून परिपूर्णावस्थेत कसे टिकविले हे समजणे, मानवी मेंदूच्या मर्यादेपलिकडले आहे असे वाटते. हे सर्व विज्ञान पुढच्या पिढीत संक्रमित होण्यासाठी कोणत्या सांकेतिक भाषेत आज्ञावल्या निर्माण केल्या हे अचाट आहे. सजीवांची निर्मिती हे निसर्गाचे अतर्क्य, अनाकलनीय यश आहे.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

10 Comments on मानवी शरीरातील सप्तचक्रे आणि अंतस्त्रावी ग्रंथी.

  1. आपले सप्तचक्रे व शरीरातील ग्रंथींचा लेख आवडला. ह्या ग्रंथीची कार्य व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे ह्याबद्दल अधिक माहिती हवी आहे, कुठे मिळेल?

  2. मी एम ए योग 4थे सत्र विद्याथीनी आहे, माझा प्रबंधाचा हाच विषय आहे, याबद्दल अजून माहिती, लिंक कृपया ई-मेल वर पाठवावे त्यामुळे मला मदत होईल

    • धन्यवाद. या विश्वातील कोणत्याही घटकाला देवता नाहीत. निसर्गनियमानुसारच विश्वाचा कारभार चालतो.
      देवता मानवनिर्मित आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाला कोणताही पुरावा मिळत नाही.
      मानवी शरीरातील सर्व अवयवांचं कार्य, त्यांच्यात असलेल्या पेशी आणि आनुवंशिक आज्ञावल्या यांच्यानुसारच चालते.

  3. मला आपली माहिती खुप आवडली मला ईमेल वरती आध्यतमिक माहिती मिळेल का?

Leave a Reply to Wamancharya Gajanan Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..