नवीन लेखन...

विश्वकर्मा शिल्पकार : वैदिक कालखंड

(इ.स.पू. ५००० – इ.स. पू. १५००)

वेदकालीन शिल्पकार समाज शोधण्यासाठी वैदिक वाङमयाव्यतिरिक्त अन्य मार्ग नाही. सिंधू संस्कृतीचा कालखंडही साधारण वैदिक काळाच्या जवळपासचाच गृहित धरल्या जातो. त्यामुळे उत्खननातील पुरावेही शिल्पकारांची माहिती पुरवितात परंतु उत्खननातून उपलब्ध झालेली माहिती वैदिक समाजजिवनाचीच आहे, याबाबत निर्णायक मत अजूनपर्यंत तरी कोणी देऊ शकलेले नाही. काही समान तथ्यांचा केवळ आधार घेतला जातो. प्रस्तुत लेखकाने प्रचलीत धारणांचाच आधार घेऊन वेदकालीन विश्वकर्मा समाजाची स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

वैदिक किंवा सिंधू संस्कृतीतील शिल्पकारांच्या जीवन व्यापाराची पार्श्वभूमी तपासली असता, ती स्वत:पुरतीच मर्यादित नसून त्याची नाळ निदान आशिया आणि युरोप खंडातील समाजाशी आधी पासूनच जोडलेली दिसून येते. त्यामुळे वैदिक शिल्पकाराच्या ज्ञानाचे स्त्रोत युरोप आशियापुरतेच काय वैश्विक सुद्धा असू शकते आणि त्याचा काळ सुद्धा पाषाण युगापर्यंत मागेही न्यावा लागतो. ज्यावेळेस मानव गुहेत वस्ती करीत असे. तेव्हा सुद्धा कला आणि कारागिरीचा उगम झालेला होता असे दिसून येते. त्या काळी सुद्धा शिल्पकार दगड व हाडापासून उपकरणे बनवित असे. त्या काळातही आभूषणाची हौस होती. दक्षिणी फ्रांस आणि उत्तरी स्पेनमध्ये अशा अनेक गुहा आहेत की, जिथे पुरापाषाणकालीन मनुष्याचे अवशेष आणि त्यांनी बनविलेल्या कलाकृती पहावयास मिळतात. सर्वात प्रसिद्ध कलाकृती म्हणजे एका नाचणाऱ्या मानवाची आहे. त्याला लांब दाढी, घोड्याचे शेपुट, डोक्यावर हरणांची शिंगे व खांद्यावर जनावराची कातडी आहे.

पूर्वी मानव अनूकुचीदार दगडाचाच अवजार किंवा हत्यारासारखा वापर करीत असे. परंतु पुढे त्याने लाकडी दांडयाला दगड किंवा हाडांचे उपकरण बांधून हत्यारासारखा वापर सुरु केला. या मोस्टेरियन संस्कृतीत लहान कुऱ्हाडी, दातेदार यंत्र, करवत, चाकू, नोकदार हत्यार, वेधयंत्र, बाण, भाला, बर्धी, चित्रलेखणी आणि मूर्ती कोरण्याचे अवजार वगैरे उपकरणे सापडली आहेत. या नंतरच्या काळात कुदळ फावड्यासारख्या अवजाराचा वापर सुरु झाला. या काळच्या नव्या कारागीरांनी बहुमूल्य चांगल्या पोताच्या दगडांना (उप रत्नांना) छिद्रे पाडणे, तासून व घासून नवीन रूप देणे अवगत केले. याच काळात छन्नी आणि आरीचा जन्म झाला. हरीत वर्ण पाषाण (Jade) आरीने कापता येऊ लागले. त्याचा अलंकार निर्मितीचा व्यवसाय चीन, न्युजीलैंड, अमेरीकेचा उत्तर प्रशांत सागरतट व मेक्सिको येथे पसरला होता. युरोपात हाडे आणि लाकडाला कापण्याचे व छिद्र पाडण्याची कला कारागिरांना अवगत झाली. डेन्मार्क मध्ये शवपेटी, लांब प्रवासी नाव, मासे धरण्याचे गळ, प्रक्षेपण हत्यार (बुमरँग), चिमटे, कुऱ्हाडी, कातणारे व विणणारे उपकरण, पेटी, सिडी, ढोल इत्यादी वस्तू सापडल्या आहेत. यावरुन तत्कालीन शिल्पकाराची प्रगती लक्षात येते.

नंतरच्या अरिग्नेशियन संस्कृतीत चित्रकला आणि मूर्ती निर्माण कलेचा उद्भव झाला. अल्तामिराजवळच्या गुहेत तर वळू, हरीण, घोडे तसेच अन्य पशूंची पूर्ण विकसित चित्रे आढळली आहेत. स्पेनमध्ये नृत्यमुद्रेतील स्त्रिया कोरलेल्या आढळल्या आहेत. साल्युट्रियन संस्कृतीने कलेचे आणखी वरचे शिखर गाठले होते. दगडाचे चाकू, मणी, आरी, हाडाच्या सूया, हस्तीदंती मणी या वस्तूंची निर्मीती मोठ्या कलात्मक शैलीने केलेली आढळली आहे. तर मॅडेलिनियन संस्कृतीच्या शिल्पकारांनी धनुष्य आणि भाले यांच्या टोकावर नक्षीकामही केले आहे आणि गुहेतील स्वतःची घरे काळ्या लाल रंगानी चित्रित केली आहेत. अजिलीयन संस्कृतीचे लोक शरीर अलंकृत करीत, दगडावर चित्रे काढीत आणि वस्तूंचे आदानप्रदान करुन व्यापार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंतरच्या नवपाषाण युगात म्हणजे ५००० ते ८००० वर्षापूर्वी लोकांचे आवागमन वाढले आणि पशुपालनाबरोबरच शेतीचा व्यवसाय सुरु झाला. त्याबरोबरच अवजारासाठी दगड, लाकूड, हाडे आणि शिंगाचा वापर सुरु झाला. मातीची भांडी, कंगवा, शिंगाचे मणी, लाकडी चमचा, मुसळ, कांडणी, टोपली अशा वस्तूंची निर्मीती झाली. तरी या पाषाण युगाच्या शिल्पींना प्रगती साधायला सहस्त्रोवर्षे जावी लागलीच. जेव्हा त्याला खनिजात टणक धातूचा शोध लागला तेव्हा मात्र त्याने प्रगतीची विलक्षण झेप घेतली. आणि कास्य युगाचा प्रारंभ झाला.

अंदाजे पाच हजार वर्षापूर्वी विविध नद्याखोऱ्यात नवनव्या संस्कृतीचा उदय झाला. भूमध्यसागर व एजियन सागराजवळचा प्रदेश, चीनच्या हवांगहो खोरे, मिश्रचे नील नदी खोरे, इराक (मेसापेटोमिया) च्या दजला व फरात नदी खोरे आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात अशा नव्या संस्कृतीची केंद्रे निर्माण झालीत. आणि या संस्कृतीनी प्रगतीचा जो उच्चांक गाठला तो एकमेकाशी केलेल्या आदानप्रदानामुळेच होय.

तत्कालीन शिल्पींना धातू वितळविण्यात यश मिळताच त्यानी धातूच्या वस्तू बनविणे सुरु केले. त्यात सूया, मासे धरण्याचे गळ, तांव्यांचे भाले, चिमटे, छन्नी इत्यादी वस्तू निर्माण होऊ लागल्या. अशा वस्तूंच्या निर्मितीसाठी जे तांबे वितळवावे लागत असे त्याच्या मूशी (crucible) सर्वप्रथम किरमान पर्वत मालाच्या ताल-ए-इब्लिस येथून प्राप्त झाले आहेत. (इ. स. पूर्व ४०००). नंतर मिश्रचा मेसोपोटेमिया (इराक), फिलीस्थीन, क्रिट, या देशांशी संबंध वाढला आणि कारागिरांनी शिल्पकामात अधिक सुधारणा घडवून तांब्याचे ओतीव वासले, बांगड्या, छल्ले आणि छन्नी बनविली. इ. स. पूर्व ३२०० नंतर तर धातूच्या वाट्या, चपट्या कुऱ्हाडी, भाल्याचे नोक, वासले, चाकू, मासे मारण्याचे भाले मोठ्या प्रमाणात लोकांच्या वापरात येऊ लागले होते. इराणी शिल्पकारांनी तर त्या आधीच (इ. स. पूर्व ४०००) मैलाकाईट पासून ताम्र उपकरणे जशी छन्नी, सूया, आरसा बनविण्यात यश मिळविले होते.

इराणात धातूकर्माच्या क्रमिक विकासाचे अध्ययन केल्या गेले तेव्हा असे लक्षात आले की, इराणी शिल्पी प्रारंभी थंड्या धातूलाच हातोडीने ठोकून वस्तू बनवीत. नंतर तांबे वितळवून खुल्या साच्यात ओतून वस्तू तयार करणे सुरु केले. पुढे बंद तोंडाचे दोन साचेही उपयोगात आणले जाऊ लागले. त्यानंतर लुप्तमोम पद्धतीने धातू ओतून वस्तू बनविले जाऊ लागले.

अफगानिस्थानाच्या मुंडीगाक येथील अध्ययनात धातूकर्माच्या विकासाची क्रमवार साखळीच स्पष्ट झाली आहे. आधी तांब्याचे फाळ, नंतर मोठी सुई, भालाग्र, घुंडीशिर्ष सूया, छिद्र असलेल्या सुया, नंतर कथील मिश्रीत तांबे, दांडा घालता येईल अशी छिद्राची कुऱ्हाड, वासला, विळा, पाते अशा वस्तू सापडल्या आहेत. यावरुन इतिहास तज्ज्ञांनी असे सिद्ध केले आहे की, ताम्रकर्मीय तंत्रज्ञान इराण कडून अफगानिस्थानात व पुढे बलुचिस्थानातून सिंधुखोऱ्यातील मोहांजोदडो आणि हडप्पा संस्कृतीत पोहचले. हडप्पामध्ये धातूकर्माची स्वतंत्र उत्पत्ती झाली नाही तर, ती विकसित अवस्थेतच त्यांना मिळाली. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या कारागीरांनी स्वतंत्ररित्या तांब्याच्या वस्तू इ. स. पूर्व ३००० पासून बनविणे सुरु केले असे जरी असले तरी, कास्पीयन समुद्रापासून तर पंजाब पर्यंतचा फार मोठा भूप्रदेश एकमेकांना परिचित असलेल्या लोकांनीच व्यापला होता. कारण त्या वैदिक काळी अशा प्रदेशात लोकांचे सतत आवागमन चालले होते. लढाया होत होत्या. प्रदेश जिंकल्या जात होते. व्यापार वाढला होता. तेव्हा व्यापार आणि स्थलांतर जसजसे वाढू लागले. तसतसे दुसऱ्यांचे विकसित तंत्रज्ञान प्राप्त करणे आणि उपयोगात आणणे साहजिकच होते. यातूनच वैदिक विश्वकर्मा शिल्पींनी भारतीय समाजाला जे योगदान दिले ते येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

वेदकाळातील शिल्प कारागीरांचे अस्तित्व स्पष्ट करायचे म्हटले म्हणजे जसे वेदातील शिल्पविषयक उल्लेख महत्वाचे ठरतात तसे उत्खनातून बाहेर पडलेली तथ्येही महत्वाची आहेत. पुरातत्ववेत्यांनी आणि कार्बन तिथी निर्धारण पद्धतीने सुद्धा सिंधू संस्कृतीचा काळ साधारणतः इ. स. पूर्व ३००० ठरविला आहे. तेव्हा ऋग्वेदात उल्लेखीत नद्या, त्याकाठच्या किंवा प्रदेशातील मनुष्यवस्त्या, शहरे, तिथे झालेली युद्धे, मनुष्य जीवन, धार्मिक चालिरिती, वस्तू, अलंकार यांचे उल्लेख आणि सिंधू खोऱ्यातील उत्खननात सापडलेल्या मनुष्यवस्तीच्या खूणा, घरे, उपयोगी वस्तू, दागिणे, धार्मिक चालीरिती आणि स्त्री पुरुषांचा पेहराव दर्शविणाऱ्या मूर्त्या या सर्वांचा तौलनिक विचार करता सिंधू संस्कृतीचा काळ हा वेदकालातच अंतर्भूत होतो.

उत्खननातून मानव वस्तीचे अवशेष जेथे सापडलेत ती स्थळे म्हणजे मोहेन्जोदडो, हडप्पा, कोटदीजी, चहुन्दडो, सुरकोटडा, लोथल, रंगपूर, कालीबंग, आलमगीरपूर रोपड, सुत्कगेनडोर, डाबरकोट वगैरे सर्व जसे बलुचिस्थान, सिंध, पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात या प्रांतातील आहेत तसे ऋग्वेदातील निर्देशित राजे महाराजे यांच्यातील युद्धे आणि भिन्न भिन्न विचारधारा जोपासणाऱ्या गटातील संघर्ष सुद्धा याच प्रदेशातील आहेत.

– डॉ. चक्रपाणी चोप्पावार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..