श्रीलंका – हिंद महासागरातील मोती

भारतीय उपखंडाच्या दक्षिण टोकापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर, हिंद महासागराच्या निळ्याशार पाण्यात तरंगणारा एक सुंदर बेटराष्ट्र म्हणजे श्रीलंका. प्राचीन काळी याला लंका, सीलोन आणि सिंहलद्वीप अशा नावांनी ओळखले जात असे. आज “मोत्याचे बेट” म्हणूनही हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. श्रीलंका आकाराने लहान असली तरी तिचा इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचे वैभव अपार आहे. रामायणातील अनेक महत्त्वाचे प्रसंग याच भूमीशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी ही केवळ एक परदेशयात्रा नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भावविश्वाचा अनुभव आहे.
याशिवाय, श्रीलंकेचे उष्णकटिबंधीय हवामान, हिरव्या डोंगररांगा, चहाचे मळे, स्वच्छ समुद्रकिनारे आणि सुरक्षित पर्यटन सुविधा यामुळे जगभरातील प्रवासी येथे आनंदाने वेळ घालवतात.
श्रीलंका आणि भारताचे ऐतिहासिक नाते
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये केवळ समुद्राचे पाणी आहे; संस्कृती, धर्म, भाषा आणि परंपरा मात्र शतकानुशतके एकमेकांत मिसळल्या आहेत. बौद्ध धर्माचा प्रसार, व्यापारी संबंध, वाङ्मयीन देवाण-घेवाण, रामायणाची परंपरा – या सर्वांमुळे दोन्ही देशांत एक अविभाज्य नाते आहे.
भारतीय महाकाव्य रामायणात लंकेचा उल्लेख रावणाचे साम्राज्य म्हणून येतो. वाल्मिकी रामायणापासून ते तुलसीदासांच्या रामचरितमानसापर्यंत, अनेक आवृत्त्यांमध्ये लंकेचे वैभव वर्णिले आहे. आज श्रीलंकेतल्या काही जागा या रामायणकथांशी जोडल्या गेल्याने भारतीय पर्यटकांसाठी त्या स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
रामायण पर्यटन – श्रीलंकेतल्या पवित्र पाऊलखुणा
भारतातील रामायण यात्रेसारखाच अनुभव आता श्रीलंकेतही घेता येतो. भारतीय पर्यटकांसाठी विशेष “रामायण टूर सर्किट” तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये सीतेचे वनवास, रावणाची राजधानी, हनुमानाचे पाऊलखुणा आणि रामसेतु या सर्वांचा अनुभव घेता येतो. श्रीलंकेतले काही प्रमुख रामायण स्थळे अशोक वाटिका रामायणातील एक प्रसिद्ध प्रसंग म्हणजे – रावणाने सीतेला अपहरण करून लंकेला नेले आणि तिला अशोकवाटिकेत ठेवले. आज श्रीलंकेत नुवारा एलिया शहराजवळ असलेले हक्गला बोटॅनिकल गार्डन हेच ठिकाण अशोक वाटिका मानले जाते. या उद्यानात आजही प्राचीन वृक्ष, दाट हिरवळ आणि फुलझाडे आहेत. इथे सीता अम्मन मंदिर आहे, जिथे सीतेची पूजा केली जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरातील काही खुणा म्हणजे सीतेच्या पाऊलखुणा आहेत. पर्यटक येथे गेल्यावर एक वेगळाच आध्यात्मिक स्पंदनांचा अनुभव घेतात. भारतीय भाविक विशेषतः या ठिकाणी नमस्कार करून आपली यात्रा पवित्र मानतात.
(Photos : Seetha Amman Mandir Ramboda Hanuman Temple)
दिवुरुमपोल मंदिर – सीतेची अग्निपरीक्षा
रामाने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली, पण तिच्या पवित्रतेवर संशय घेतला. तेव्हा सीतेने अग्निपरीक्षा दिली. ही घटना घडल्याचे मानले जाणारे ठिकाण म्हणजे दिवुरुमपोल मंदिर. आजही येथे यात्रेकरू जातात आणि देवी सीतेला प्रणाम करतात. हे ठिकाण भारतीय भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
हनुमानगढी व हनुमानाचे पाऊलखुणा
रामायणात वर्णिल्याप्रमाणे हनुमानाने समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश केला. त्याचे पहिले पाऊलखुणा उमटलेले ठिकाण श्रीलंकेतल्या अनेक भागांत दर्शवले जाते. नुवारा एलिया जवळील रामबोड मंदिर हे हनुमानाला अर्पण केलेले आहे.
येथे हनुमानाची भव्य मूर्ती असून भाविक येथे दर्शन घेतात. हनुमानाच्या पवित्रतेमुळे हे ठिकाण भारतीयांसाठी खास आकर्षण आहे. भारतीय पर्यटकांसाठी श्रीलंकेचा प्रवास म्हणजे केवळ परदेश दर्शन नाही, तर रामायणातील पवित्र क्षणांना अनुभवण्याची संधी आहे. अनेक हिंदू संघटना दरवर्षी “रामायण यात्रेचे” आयोजन करतात. भाविक इथे जाऊन सीता अम्मन मंदिरात पूजाअर्चा करतात. यामुळे भारत-श्रीलंका संबंध अधिक दृढ होतात.
श्रीलंकेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा निसर्ग.
नारळांच्या रांगांनी सजलेले समुद्रकिनारे, धुक्याने नटलेले डोंगर, हिरवीगार चहाची शेते, कळपाने फिरणारे हत्ती, उड्या मारणारे बिबटे, झुळझुळणारे धबधबे – या बेटराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात निसर्गाने आपला खजिना खुला केला आहे.

सर्वात लोकप्रिय समुद्रकिनार्याची गाव म्हणजे बेंटोटा. कोलंबोपासून केवळ दोन तासांवर असलेल्या ह्या गावात आहे स्वच्छ, लांब वाळूचा किनारा, वॉटर स्पोर्ट्स – जेट स्की, बनाना बोट राईड, स्कुबा डायव्हिंग, किनाऱ्यालगत रिसॉर्ट्स, आयुर्वेदिक स्पा. शिवाय मॅन्ग्रोव्हस मधून एक थरारक बोट राईड आणि एक वेगळेच ठिकाण म्हणजे कोसगोडा कासव hatchery , जिथे कासवांचे संवर्धन केले जाते.
दक्षिण किनाऱ्यावरमिरिस्सा पण एक जगप्रसिद्ध ठिकाण आहे – इथून बोटीने समुद्रात जाऊन व्हेल आणि डॉल्फिन बघायलाया मिळतात. हे जगातील सर्वोत्तम व्हेल वॉचिंग स्पॉट्सपैकी एक , नोव्हेंबर ते एप्रिल हा सर्वोत्तम हंगाम.
हिक्कडुवा आणि उनावाटुना चे बीचेस तरुण वर्गात खूप लोकप्रिय आहेत कारण इथे बीच पार्टी आणि नाईटलाइफ करीत.

डोंगररांगा व हिरवाई ने नटलेल्या श्रीलंकेच्या मध्य भागातील महत्वाचे ठिकाण म्हणजे नुवारा एलिया , ज्याला लिटिल इंग्लंड असे पण संबोधतात. १८व्या शतकात ब्रिटिशांनी वसवलेले शहर, इथे आजही कॉलोनियल बंगलो, गोल्फ कोर्स, चर्च दिसतात. ६,००० फूट उंचीवर वसलेले हे थंड हवेचे ठिकाण रामायणातील ठिकाणे आणि चहा च्या माळ्यांकरिता लोकप्रिय आहे. थंड हवामान, ढगांनी झाकलेले डोंगर, चहा बागा आणि धबधबे – हे दृश्य स्वर्गासारखे वाटते. भारतातील दार्जिलिंगसारखा अनुभव, पण आणखी स्वच्छ व शांत.
श्रीलंका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. ब्रिटिशांनी आणलेल्या या परंपरेने आज हजारो लोकांना रोजगार दिला आहे. निवारा एलीया येथील चहा कारखान्याला भेट देता येते , चहा वर प्रक्रिया कशी होते हे बघता येते आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा विकत पण घेता येतात.

श्रीलंकेचे सांस्कृतिक हृदय आणि जुनी राजधानी म्हणजे कॅंडी. एका शांत अश्या टाळावा च्या भोवती वसलेले हे शहर खूप नेटके असे आहे. चहू बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शहर इथल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाणांमुळे प्रसिद्ध आहे. इथले टेम्पल ऑफ टूथ रेलिक श्री लंकेतले सर्वात महत्वाचे बौद्ध मंदिर आहे. ह्याच्यात गौतम बुद्धाचा दाता चा एक तुकडा ठेवलेला आहे. हा दात इथे येण्यामागे पण भारताचा संबंध आहे कारण एका भारतातील राज्याच्या राणी च्या केसांमध्ये लपवून हा दात इथे आल्याची आख्याकिका इथे सांगतात. इथले इतर महत्वाची ठिकाणे कँडी लेक, बोटिंग, हिरवेगार डोंगर. पेराडेनिय बोटॅनिकल गार्डन. इथले रत्न जग भर प्रसिद्ध आहेत आणि कॅंडी शहरात अनेक ठिकाणी जेम दुकानांमध्ये मुसेम बघता येते जिथे ह्या रत्नांचा शोध कसा घेतला जातो हे आपल्याला बघता येते
श्री लंका म्हणजे वन्यजीवांचा खजिना

श्रीलंकेत २० हून अधिक राष्ट्रीय उद्याने आहेत. वन्यजीव सफारीचा अनुभव आफ्रिकेपेक्षा स्वस्त आणि सहज मिळतो.
सर्वात प्रसिद्ध आहे याला राष्ट्रीय उद्यान जिथे बिबट्यांचे सर्वाधिक प्रमाण.शिवाय हत्ती, अस्वल, म्हैस, हरणे, पक्ष्यांचे शेकडो प्रकार. इथे आपल्याला घेता येतो सफारी जीपमध्ये ३–४ तासांचा अविस्मरणीय प्रवास. तसेच मिनेरिया राष्ट्रीय उद्यान पण जगप्रसिद्ध आहे इथला हत्तीच्या कल्पां मुळे. हे गॅदरिंग ऑफ एलिफंट्स – जुलै ते सप्टेंबर दरम्यान अधिक चांगले दिसते आई कधी तर ३००+ हत्ती एकत्र दिसतात. हे जगातील हत्तींच्या सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक.
शिवाय सिन्नहराजा रेन फॉरेस्ट हि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट आहे आणि श्रीलंकेतील एकमेव उष्णकटिबंधीय पावसाळी जंगल जिथे आपल्याला पाहता येतात दुर्मिळ पक्षी, वनस्पती, औषधी वनस्पती. ६०% पेक्षा जास्त झाडे, प्राणी आणि पक्षी श्रीलंकेतील स्थानिक (endemic) आहेत.
विल्पत्तू नॅशनल पार्क (Wilpattu National Park), श्रीलंकेतील सर्वात जुनं आणि सर्वात मोठं उद्यान. “विल्पत्तू” म्हणजे तळ्यांचा देश – उद्यानात शेकडो नैसर्गिक तलाव आहेत जे पक्ष्यांच्या वैविध्यपूर्ण जातींकरिता जग प्रसिद्ध आहेत. . चित्ते, अस्वल, हत्ती, कोल्हे, विविध पक्षी येथे आढळतात. तुलनेने कमी गर्दी असल्यामुळे शांत आणि खऱ्या जंगलाचा अनुभव मिळतो.
श्रीलंकेचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर सर्फिंग करू शकता, दुपारी डोंगरात जाऊन थंड वातावरणात ट्रेकिंग करू शकता, संध्याकाळी राष्ट्रीय उद्यानात सफारी करू शकता. एका दिवसात एवढा विविध निसर्ग अनुभवता येणे हे जगात क्वचितच कुठे शक्य आहे.
आपल्या लक्षात आलेच असेल कि श्रीलंका फक्त पौराणिक स्थळांचा देश नाही, तर तो नैसर्गिक सौंदर्याचा खजिना आहे. समुद्रकिनाऱ्यांचा शांत स्पर्श, डोंगरातील थंड हवा, चहाच्या बागांची हिरवाई, धबधब्यांचे जलप्रपात, जंगलातील हत्ती व बिबट्यांचा खेळ – हे सर्व पाहून प्रत्येक प्रवासी मंत्रमुग्ध होतो.
श्री लंकेतील सांस्कृतिक वारसा आणि बौद्ध परंपरा
श्रीलंका म्हणजे केवळ समुद्रकिनारे आणि डोंगररांगा नाहीत, तर हा देश आहे सांस्कृतिक वारशाचा खजिना.
श्रीलंका म्हणजे बौद्ध धर्माचे आश्रयस्थान. इथे सर्वत्र स्तूप, विहार, बुद्धमूर्ती दिसतात. वेसाक (मे महिन्यात) हा सर्वात मोठा उत्सव – बुद्ध जयंती साजरी केली जाते. संपूर्ण देश रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघतो.
आपण आधी रामायणातील पाऊलखुणांबद्दल वाचलेच आहे. आता पाहू इथल्या बौद्ध वारश्या बद्दल. दोन हजार वर्षांचा प्राचीन इतिहास, बौद्ध धर्माशी असलेले घट्ट नाते, राजघराण्यांचे सुवर्णयुग आणि आजही जतन केलेल्या पवित्र परंपरा – या सर्वांमुळे श्रीलंकेची ओळख जगभरातील प्रवाशांसाठी विशेष ठरते. बौद्ध परंपरेची ओळख करून देणार प्रमुख ठिकाणे म्हणजे अनुराधापुरा – प्राचीन राजधानी, श्रीलंकेच्या इतिहासाचा पहिला सुवर्ण अध्याय लिहिला गेला तो अनुराधापुरा या प्राचीन नगरीत. इ.स.पूर्व ४थ्या शतकात स्थापन झालेले हे शहर जवळपास १,३०० वर्षे राजधानी होते. आज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित आहे. इथली काही प्रमुख आकर्षणे आहेत श्री महा बोधी वृक्ष – भारतातील बोधगयातील मूळ बोधिवृक्षाची रोपटी आणून लावलेला हा वृक्ष २,२०० वर्षांहून जुना मानला जातो.
रुवनवेलिसाया स्तूप – १०३ मीटर उंच, श्रीलंकेतील सर्वात भव्य स्तूपांपैकी एक.
जेटावनारामाय स्तूप – एकेकाळी जगातील सर्वात उंच रचना.
इसुरुमुनिया मंदिर – ‘इसुरुमुनिया लव्हर्स’ या शिल्पामुळे प्रसिद्ध.
अनुराधापुरा म्हणजे श्रीलंकेचे अजन्ता-एलोरा. भव्य वास्तु, स्तूप, बौद्ध मठ – हे सर्व पाहून प्रवासी थक्क होतात.


पोलोन्नरुवा – अनुराधापुरानंतर श्रीलंकेची राजधानी झाली ती पोलोन्नरुवा. इ.स. १० व्या शतकात राजा विजयबाहूने हे शहर उभारले. आज येथे सुंदर अवशेष, भव्य बुद्धमूर्ती आणि राजवाड्यांचे भग्नावशेष दिसतात. इथली प्रमुख आकर्षणे गलबिहा बुद्धमूर्ती – ४ वेगवेगळ्या मुद्रांमधील बुद्धमूर्ती (उभा, बसलेला, पडलेला, ध्यानस्थ), रंकोट विहार स्तूप – ५५ मीटर उंच,राजा पराक्रमबाहूचा राजवाडा – ७ मजली होता, आज भग्नावशेष उरले आहेत, पराक्रम समुद्र – १२ व्या शतकात कृत्रिम तलाव उभारला गेला, आजही पाण्याचा स्रोत आहे. पोलोन्नरुवा म्हणजे इतिहास आणि निसर्गाचा संगम.
कँडी – श्रीलंकेचे सांस्कृतिक हृदय
इथेच आहे श्री दंतधातू मंदिर (Temple of the Sacred Tooth Relic). बौद्ध धर्मीयांसाठी हे जगातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. मंदिरातील सोनेरी खोली जिथे हा दात ठेवलेला आहे, , भव्य शिल्पकला आणि दररोज होणारी पूजा हे विशेष आकर्षण. जुलै–ऑगस्टमध्ये होणारा एसला पेराहेरा उत्सव – हत्तींची मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, नृत्य – असा एक अविस्मरणीय सोहळा असतो कँडीला भेट न देता श्रीलंका प्रवास अपूर्णच राहतो.
वॉटर स्पोर्ट्स, साहसक्रीडा

श्रीलंका हे वॉटर स्पोर्ट्सचे स्वर्ग मानले जाते. काही महत्वाची ठिकाणे सर्फिंग – अरुगम बे, हिक्काडुवा हे जागतिक दर्जाचे सर्फिंग स्पॉट्स. स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग – त्रिंकोमली, हिक्काडुवा, मिरिस्सा येथे रंगीबेरंगी कोरल रीफ्स आणि सागरी जीवन पाहता येते. व्हेल व डॉल्फिन सफारी – मिरिस्सा व कालपिटियामध्ये जगातील सर्वात मोठ्या निळ्या व्हेल्स पाहण्याची संधी. काइट सर्फिंग – मान्नार आणि कालपिटिया हे या क्रीडेसाठी उत्तम केंद्र. डीप सी फिशिंग – समुद्राच्या खोल पाण्यात मासेमारीचा रोमांचक अनुभव. साहसाची आवड असणाऱ्यांसाठी श्रीलंका म्हणजे स्वप्नवत ठिकाण.

पर्यटन सुविधा आणि आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर
एखाद्या देशाला भेट देताना तिथल्या सुविधा, प्रवासाचे पर्याय, सुरक्षितता आणि सोयीसुविधा ह्या गोष्टी प्रवाशासाठी खूप महत्त्वाच्या असतात. श्रीलंका या बाबतीत खरोखरच आदर्श देश आहे. नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा याबरोबरच इथले आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर, उत्कृष्ट रस्ते, रेल्वे सेवा, हॉटेल्स व रिसॉर्ट्स, आणि प्रवाशांसाठी तयार केलेल्या सेवा हे श्रीलंका पर्यटनाचे मोठे आकर्षण आहे.
रस्ते आणि महामार्ग
श्रीलंकेतील रस्तेव्यवस्था अत्यंत आधुनिक आणि सुटसुटीत आहे. एक्सप्रेसवे नेटवर्क – कोलंबोहून गॉल, मातारा, हंबनटोटा, कटुनायके विमानतळापर्यंत झपाट्याने जाणारे महामार्ग. A-क्लास हायवे – मोठ्या शहरांना जोडणारे रुंद, पक्के रस्ते. ग्रामीण भागातसुद्धा रस्ते व्यवस्थित व डांबरीकरण केलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे खूप सोयीचे आहे.
रेल्वे प्रवास – चित्रमय सफर
श्रीलंकेतील रेल्वे प्रवास हा स्वतःच एक अनुभव आहे. कोलंबो ते कँडी – चहाच्या मळ्यांमधून जाणारा मार्ग.
कँडी ते एला – जगातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासांपैकी एक मानला जातो. हिरवेगार डोंगर, धबधबे, धुक्याने भरलेली दऱ्या – प्रवासी अक्षरशः मोहित होतात.
कोस्टल लाईन (कोलंबो ते गॉल, मातारा) – समुद्रकिनाऱ्यालगतची रम्य सफर.
रेल्वेत फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि एअरकंडिशन्ड केबिन्सचा पर्याय आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ
श्रीलंकेत सर्वात महत्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे बंडारानायके आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलंबोजवळ)
भारतासह आशियातील प्रमुख देशांतून थेट उड्डाणे उपलब्ध आहेत. म्हणजेच भारतीय प्रवाशांसाठी श्रीलंका अगदी सहज उपलब्ध ठिकाण आहे.
हॉटेल्स व रिसॉर्ट्स
श्रीलंका पर्यटनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व प्रकारची राहण्याची सोय उपलब्ध आहे. लक्झरी रिसॉर्ट्स – गॉल, बेंटोटा, नुवारा एलिया, सिगिरिया, कँडी येथे जागतिक दर्जाचे रिसॉर्ट्स. बुटीक हॉटेल्स – स्थानिक परंपरा व आधुनिक सोयी यांचा संगम. बजेट हॉटेल्स व होस्टेल्स – बॅकपॅकर्ससाठी परवडणारे पर्याय. होमस्टे व व्हिला – स्थानिक कुटुंबासोबत राहून खऱ्या श्रीलंकन पाहुणचाराचा अनुभव. विशेष म्हणजे श्रीलंकेतील हॉटेल्सची स्वच्छता, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि मैत्रीपूर्ण सेवा जगभर प्रसिद्ध आहे.
टुरिस्ट-फ्रेंडली वातावरण
श्रीलंकेतील लोक परदेशी पर्यटकांशी खूपच मैत्रीपूर्ण व मदतीस तत्पर असतात. इंग्रजी भाषेचा चांगला प्रसार झाल्याने संवाद साधणे सोपे होते. पर्यटन स्थळांवर स्पष्ट दिशादर्शक फलक व माहितीपत्रके. स्थानिक टॅक्सी, बस, टुक-टुक (ऑटो रिक्षा) सहज उपलब्ध. प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि सोय ह्याला इथे सर्वोच्च प्राधान्य आहे.
अन्नपदार्थ व खानपान
श्रीलंकेतील खाद्यसंस्कृती प्रवाशांसाठी एक वेगळा अनुभव असतो. श्रीलंकन राईस अँड करी – भातासोबत विविध प्रकारच्या करी. हॉपर्स (अप्पा) – पातळ वड्यांसारखा पदार्थ, नाश्त्यासाठी लोकप्रिय. सीफूड – समुद्रकिनाऱ्यावर ताजे मासे, प्रॉन्स, क्रॅब्स. फळे – पपई, अननस, मॅंगोस्टीन, डुरियन – ताज्या उष्णकटिबंधीय फळांची रेलचेल.
भारतासारखे शाकाहारी पर्यायही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
व्हिसा आणि प्रवेश सोय
भारतीय पर्यटकांसाठी श्रीलंका हा सर्वात सोयीस्कर परदेश प्रवास आहे. ई-व्हिसा (ETA) ऑनलाइन सहज मिळतो आणि भारतीयांसाठी फ्री आहे. अर्ज प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होते. त्यामुळे श्रीलंका हा ट्रॅव्हल-फ्रेंडली डेस्टिनेशन ठरतो.
शॉपिंग व स्मरणिका
श्रीलंका शॉपिंगसाठीही प्रसिद्ध आहे. रत्ने आणि ज्वेलरी – विशेषतः निळे नीलम (Blue Sapphire) हे तुम्हाला कॅंडी ला मिळतात.
चहा – सिलोन टी जगप्रसिद्ध जो पर्यटक निवारा एलीया मध्ये विकत घेऊ शकतात.
बटिक कपडे व हस्तकला – हाताने बनवलेले रंगीबेरंगी कपडे जे बरेच ठिकाणी उपलब्ध
लाकडी शिल्प व मुखवटे – पारंपरिक हस्तकला कोलंबोतील ओडेल, हौस ऑफ फॅशन, नो लिमिट , पेट्टा मार्केट, पॅराडाईज रोड हे लोकप्रिय शॉपिंग स्पॉट्स आहेत.
श्रीलंकेचा प्रवास सुखकर व संस्मरणीय बनवण्यात आधुनिक रस्ते, सुंदर रेल्वे प्रवास, हॉटेल्स, सुरक्षितता, लोकांचा मैत्रीपूर्ण स्वभाव, व्हिसाची सोपी प्रक्रिया यांचा मोठा वाटा आहे.
श्रीलंका हा लहानसा पण वैश्विक आकर्षणांनी भरलेला देश आहे. रामायणातील पवित्र स्थळे असोत, समुद्रकिनाऱ्यांची मोहकता असो, हिरव्यागार चहाच्या बागांची शांतता असो वा जंगल सफारीचे थरारक क्षण – प्रत्येक ठिकाण प्रवाशाला वेगळी अनुभूती देतं. उत्कृष्ट रस्ते, पर्यटनाभिमुख सुविधा, स्वच्छता आणि स्थानिकांचे आत्मीय आदरातिथ्य यामुळे येथे प्रवास सुखकर व अविस्मरणीय ठरतो. भारताच्या जवळच असलेलं हे बेट राष्ट्र धार्मिक, सांस्कृतिक, निसर्गरम्य आणि आधुनिक अशा सर्व पैलूंनी परिपूर्ण आहे. त्यामुळे श्रीलंका हा फक्त एक प्रवास नसून, ती आहे एक अशी अनुभूती जी मनाला समाधान, डोळ्यांना सौंदर्य आणि आत्म्याला अध्यात्मिक शांतता देते.
काव्यमय निष्कर्ष
श्रीलंका म्हणजे केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर ती एक जीवंत कथा आहे—
रामायणाच्या आठवणींनी स्पंदणारी, निसर्गाच्या सान्निध्यात न्हालेली,
आधुनिक सोयीसुविधांनी सजलेली आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेली.
इथे हत्तींच्या कळपात थरार आहे, समुद्रकिनाऱ्यांच्या लाटांत विश्रांती आहे,
पर्वतरांगांच्या कुशीत शांतता आहे, तर प्राचीन मंदिरांत अध्यात्मिक ओढ आहे.
भारताच्या जवळचं हे छोटंसं बेट प्रवाशाच्या मनात
आनंद, समाधान आणि स्मरणीय क्षणांचा ठेवा निर्माण करतं.
प्रवास संपतो, पण श्रीलंकेची आठवण मनात कायमची दरवळत राहते—
जणू ती स्वतःच सांगते, “एकदा माझ्याकडे यावे आणि पुन्हा पुन्हा यावे.”


छान माहितीपूर्ण लेख आहे
खूपच छान माहिती…. तसं नितीन Sir कायमच त्याच्या Podcast मधून खूप छान आणि उपयोगी माहिती देत असतात… तसंच हा लेख पण खूप छान वाटला…. अता लवकरात लवकर श्रीलंका बघायची असं ठरलं… धन्यवाद Sir…