साहित्य रसिकांना आपल्या आवडत्या साहित्यिकाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तु सखोल माहिती मिळावी असे वाटते.परंतु ती माहिती घरातल्या जबाबदार व्यक्तीने लिहिली असेल तर ते पुस्तक वाचायला आनंद वाटतो.
मला वाचनालयात ” गदिमांच्या पंचवटीतून ” हे पुस्तक मिळाले. माझे आवडते सहित्यिक ” ग. दि. माडगूळकर यांच्या सूनबाई शीतल श्रीधर माडगूळकर ( कर्जतच्या विसुभाऊ आरेकर यांची कन्या माया आरेकर ) यांचे पुस्तक मी घेतले आणि सुरुवातीपासून शेवट पर्यंत वाचून काढले.
या पुस्तकात १ मुकी अंगडी बालपणाची… २ रंगीत वसने तारुण्याची… ३ लेणे वार्धक्याचे ह्या शीर्षकानुसार मायाताई यांनी तीन भागात माहिती दिली आहे. पहिल्या भागात त्यांनी लग्नापूर्वीच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यात त्यांनी कर्जत जि. रायगड येथील आरेकर वाडा व तेथील आई, वडील, आजी आजोबा, काका, काकू व लहान भावंडे यांच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.
दुसऱ्या भागात लग्नानंतर पंचवटी येथे राहायला गेल्या नंतरच्या आठवणी सांगितल्या आहेत. सासरे गदिमा सासूबाई, आजे सासूबाई, पती श्रीधर, दीर, नणंदा, श्रीधर यांचे जिवलग मित्र इत्यादी अनेक नातेवाईकांच्या आठवणी शब्दबद्ध करताना पपा ( गदिमा ) यांना केंद्र बिंदू समजून अनेक अनुभव सांगितले आहेत. तसेच अनेक सुखद घटनांचे असे वर्णन केले आहे की ते वाचताना वाचक सुखसागरात डुंबायला लागतो तसेच दुःखद घटनांचे वर्णन वाचताना वाचकला दुःख होते. ह्या लेखात कोठेही आत्मप्रौढी, आत्मप्रदर्शन, आत्म प्रशस्ती, अथवा आत्मकेंद्रिता आढळली नाही यावरून माया ताईंचे मोठेपण दिसून येते. मायाताई यांना गदिमा यांचा सहवास अवघा साडेतीन वर्षाचा लाभला होता परंतु पुस्तक वाचताना असे वाटते की त्यांना अनेक वर्ष सहवास लाभला होता.
तिसऱ्या भागात मायाताई यांनी गदिमा यांच्या निधना नंतरच्या आठवणी सांगितल्या आहेत. . पंचवटी म्हणजे फक्त चार भिंतीचे घर नव्हते तसेच तेथे नात्याची गर्दी नव्हती तर प्रत्येक नात्यामध्ये जिव्हाळा होता. सर्व पुस्तक वाचून झाल्यानंतर एका चारोळीची आठवण येते…
“शब्द पेरता पेरता
जुळली अक्षरनाती
शब्द हृदयी कोरता,
तयार झाली साहित्यकृती
माया ताईंनी सर्व कुटुंबावर मनापासून प्रेम केलं सर्व आठवणी हृदयात साठवल्या आणि अनेक वर्षानंतर ही साहित्य कृती निर्माण झाली. गदिमां चे निधन होऊन जवळ जवळ अर्ध शतक होत आले तरी सुद्धा साहित्य रसिकांना त्यांचा विसर पडला नाही. त्याचे कारण त्यांनी निर्माण केलेलं अजरामर साहित्य तर आहेच परंतु गदिमा यांच्या निधना नंतर त्यांच्या पत्नी, मुलं, मुली, जावई, सुना, नात, नातू इत्यादीनीं विविध उपक्रमाद्वारे अक्षर यज्ञ सुरु ठेवला आहे.अशाच वास्तू व वास्तूसह वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींवर प्रेम करणाऱ्या सुना सर्व साहित्यिकांना लाभल्या व त्यांनी ह्या आठवणी शब्दबद्ध केल्या तर ती साहित्यकृती वाचकांना नक्कीच आवडेल
मायाताई यांनी पहिल्याच प्रयत्नात ४१४ पानी पुस्तक प्रकाशित करून साहित्य क्षेत्रात दमदार प्रवेश केला आहे. त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. वाचकांनी सहाशे रुपये किंमतीचे हे पुस्तक खरेदी करून संग्रही ठेवावे ही ही अपेक्षा.
दिलीप प्रभाकर गडकरी
कर्जत – रायगड
९९७०१९७६६६
dilipprabhakargadkari@gmail.com


Leave a Reply