नवीन लेखन...

भारतीय संस्कृतिचे संवर्धक : विश्वकर्मा शिल्पकार – प्रस्तावना

धर्म, नीती, इतिहास, भाषा चालीरीती, पेहराव, कला, सौंदर्य इत्यादी विषयक धारणा भारतीय संस्कृतिचे मूळ आधार आहेत. आणि ही सर्व टिकवून ठेवणारी साधने म्हणजे ग्रंथ, जुनी स्मारके, वास्तू, मंदिर, लेणी, मूर्ती, शिल्प, चित्र आणि कलाकौशल्याच्या वस्तू होत. त्यामुळे ही साधने निर्माण करणारे तत्वज्ञानी, नीतिप्रवीण, धर्मशास्त्री, कलामर्मज्ञ, शिल्पी एक तर ग्रंथात सापडतात, किंवा कलात्मक शिल्पकृतीतून शोधून काढावे लागतात. ते काळाबरोबर येतात आणि संस्कृतीची ठेव ठेऊन काळाबरोबरच निघून जातात.

जेव्हा जेव्हा भारतीय संस्कृतीचा गौरव होतो, तेव्हा तेव्हा भारतीय शिल्प संचिताचाही गौरव हातो. शिल्पांची भरपूर चर्चा होते, शिल्पकार मात्र उपेक्षित राहतो. विद्वान अभ्यासकांनी आजपर्यंत प्रासाद-लेणी-मूर्ती-रचनाशास्त्रावर लिहिले आहे, त्यांच्या शैली प्रकारावर प्रकाश टाकला आहे, त्याची कला समीक्षाही केली आहे, परंतु स्वयं प्रज्ञेने साऱ्या कलाकारागीरीचे प्रदर्शन मांडणाऱ्या शिल्पकारांची मात्र अभावनेच दखल घतल्या गेल्याचे जाणवते.

ऋग्वेदात एकीकडे वस्तू निर्माण करणारा तक्षा, कर्मार वगैरे कारागीर आहेत, तर दुसरीकडे विश्व निर्माण करणारा विश्वकर्मा आहे. (ऋ. १०.८१-८२) तत्कालीन विद्वान ऋषींना विश्वाचे शिल्प घडविणाऱ्या शिल्पकाराला विश्वकर्मा म्हणण्याची कल्पना समाजातील शिल्पकाराला पाहूनच सुचली आणि परवर्ती (वेदोत्तर) साहित्यानी प्रासाद, लेणी, मंदिर, मूर्ती, चित्र, अलंकार अशा कला कौशल्याच्या अनेक वस्तू, वास्तू निर्माण करणाऱ्या शिल्पकराला विश्वकर्मा हे नामाभिधान दिले आणि ते रुढही झाले. म्हणून विश्वकर्माच्या नावाने कला-शिल्पकारागिरांचा समाज नाव लौकिकास आला. विश्वकर्मा समाज म्हणजे कला-कारागिरांचा समाज हे समीकरण वेदोत्तर प्राचीन ग्रंथानीच रुढ केले.

विश्वकर्मा समाज हा मुख्य पांच घटकांचा मिळून बनला आहे. ते घटक म्हणजे लोहार, सुतार, कासार, शिलाशिल्पी, आणि सुवर्णकार होत. पुराणांनी त्यांना अनुक्रमे मनु, मया, त्वष्टा, शिल्पी, आणि दैवज्ञ असे दैवी अधिष्ठान देऊन त्यांच्यात एकत्व आणले आहे कारण मनु-शिव, मय-विष्णु, त्वष्टा-ब्रह्मा, शिल्पी-इंद्र, आणि दैवज्ञ-सुर्य अशा या पांच देवतांचे अधिष्ठान प्राप्त झालेला समाज हिंदू संस्कृतीचे अभिन्न अंग आहे, हेच दर्शविण्याचा हतु दिसतो. त्यामुळे धातू, काष्ठ, पाषाण या माध्यमातून शिल्प घडविणारे शिल्पी बाह्यांगाने जरी भिन्नत्व दर्शवीत असले तरी त्यांची सामायिक प्रेरणा एक आहे. म्हणून त्यांचा एकत्रित विश्वकर्मा समाज निर्माण झाला आहे. मात्र वरवर विचार करण्याऱ्याला या भिन्न गुणधर्मीय शिल्पींची विश्वकर्मा समाज म्हणून एकत्रित निर्देशित केलेली संकल्पना वादग्रस्त वाटली असल्यास नवल नाही. त्यातल्यात्यात त्यांची आर्थिक आणि सामाजिक अवस्थाही भिन्नत्व दर्शवू लागली आहे. अभ्यासकांनाही त्यांचा एकत्रित समग्रलक्षी विचार करता आलेला नाही. आणि तसे लेखनही झालेले नाही.

ई.बी. हॅवेल आणि आनंद कुमारस्वामी यांनी विश्वकर्मा समाजाची बरीच माहिती पुरविली. हॅवेलच्या ‘द हिस्ट्री ऑफ आर्यन रुल इन इंडिया’ नामक ग्रंथात देवयज्ञीय शिल्पींची गौरवपर माहिती आली आहे. तर कुमार स्वामीनी शिल्पी ब्राह्मणांच्या श्रेष्ठते विषयी आणि धार्मिक, सामाजिक हक्का विषयी लिहिले आहे. त्यांच्याच ‘द इंडियन क्राफ्ट्समन’ या ग्रंथात शिल्पी ब्राह्मण ब्रह्मकर्माचे अधिकारी पुरोहित असल्याचे लिहिले आहे. डॉ. पुलने अँडी यांनी ‘जर्नल ऑफ इंडियन आर्ट अँण्ड इंडस्ट्री’ या ग्रंथात शिल्पकर्म करणाऱ्यांना जगतगुरुत्व असल्याचे म्हटले आहे. ही शिल्पकारांसाठी नक्कीच गौरवाची बाब आहे मात्र या साऱ्या विद्वान लेखक समीक्षकांचा रोख भारतीय समाजजीवनाचा परामर्श घेण्याच्या ओघात आलेल्या शिल्पकाराचे वर्णन करणे हा होता. शिल्पकारावर लक्ष्य केंद्रित करणे नव्हते, त्यामुळे त्यांच्या विवेचनात समग्र विश्वकर्मा समाज त्याच्या अंग प्रत्यंगानीशी उभा राहत नाही.

त्या दृष्टीने पुण्याच्या वेदशास्त्र संपन्न रावजीशास्त्री नारायणशास्त्री क्षीरसागर, यांचे कार्य अधिक महत्वाचे समजावे लागेल. त्यांनी ‘विश्वब्रह्म कुलोत्साह’ नावाचा ग्रंथ मराठीत लिहिला. पुढे या ग्रंथाची पुनर्रचना करुन त्यांचे कनिष्ठ बंधू वे. शा. स. बाळशास्त्री क्षीरसागर यांनी त्यांचे पुनर्मुद्रण केले. व उत्तरोत्तर त्या ग्रंथाची प्रकरणे वाढवून त्यांच्या इ.स. १९०६ ते १९२१ पर्यंत चार आवृत्या काढल्या. यातील सखोल अध्ययनामुळे, नेटक्या वर्गीकरणामुळे आणि प्रभावी विषय प्रतिपादनामुळे या ग्रंथाला विश्वकर्मा समाजात आणि अभ्यासकात अत्युच्च मान मिळाला. बाळशास्त्रींनी अथक परिश्रमाने संस्कृत, मराठी, इंग्रजी, तामिळ भाषेचे ग्रंथ अभ्यासिले. विविध नियतकालीकातील अभिप्राय व विद्वानांची मते अवलोकिली. वेद, ब्राह्मण, उपनिषद, पुराण, इतिहास ग्रंथ, भाष्य, शिल्पग्रंथ अशी जवळ जवळ २५० ते ३०० ग्रंथाचे आधार घेऊन लेखन केले. या माध्यमातून सामाजिक, धार्मिक अवनतीला लागलेल्या या समाजाला जुन्या रुढीपरंपरेबद्दल स्वाभिमान जागृत करुन समाजात सुधारणा घडवून आणावी असा त्यांचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी विश्वकर्मा कुलोत्पन्न हे ब्राह्मणच आहेत असे ठासून सांगितले. त्यामुळे अनेकांचा कुलाभिमान जागृत होऊ लागला. मात्र या ग्रंथाला माहितीचे एकत्रित भांडार जरी म्हणता आले तरी या ग्रंथचे स्वरुप बऱ्याच अंशी एकांगीच राहिले.

म्हणूनच शिल्पकारांच्या सामाजिक स्थिती – गती सोबतच त्यांच्या कला नैपुण्याचा इतिहासाधारे यथोचित परामर्श घेणे आवश्यक वाटते. त्यासाठी ‘विश्वकर्मा शिल्प-कारागीर समाज’ एका अधिछत्राखाली आणून त्यांचे भारतीय समाजाप्रति योगदान स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

विश्वकर्मा शिल्पकार शास्त्र, विद्या, कला, तंत्र आणि औचित्य यात परिपूर्ण आहे, स्वत:च शास्त्र निर्माण करणारा आहे आणि स्वतःच श्रमणारा आहे. निर्माण क्षमता अंगी असण्याचा सार्थ अभियानही त्याच्या कार्यकृतीतून दिसून येतो. हे सारे यतार्थतेने मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. तरीही कांही न्युन – अधिक झाल्याचा दोष स्वत:वर घेऊन हे लेखन वाचकाप्रती समर्पित करीतो आणि त्या नाम-अनाम शिल्पकारांना ज्यांनी भारतीय संस्कृतिच्या संवर्धनात आपले रक्त आटविले, आपली परिणत प्रज्ञा पणास लावली, त्यांना वंदन करतांना योगेश्वरप्रसाद ‘योगेश’ यांच्या कवितेच्या काही ओळी मी येथे उद्धृत करतो –

शृंगार जिसे कहती दुनिया,

जिस पर यह जग ललचाता हो !

ब्रह्मा की रचना मे भी तूम,

नुतन जग के निर्माता हो !

तेरे अनुचर विज्ञान कला,

सबमे तेरा है मधूर प्यार !

लो नमस्कार मम बारबार,

हे कलाकार हे शिल्पकार !!

हा माझा प्रयास वाचकांना, समाजसंघटकांना व अभ्यासकांना प्रेरणा देऊ शकला तर नक्कीच माझ्या परीश्रमाचे सार्थक झाले असे समजेन.

या पुस्तकाच्या लेखन कार्यात मला जेथून मदत मिळाली त्यात प्राज्ञ पाठशाला मंडळ वाई, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन ग्रंथालय. हिंदु धर्म संस्कृती वाचनालय नागपूर, गो. ग. जोशी प्रतिष्ठान ग्रंथ संग्रहालय नागपूर, रा. सं. तु. नागपूर विद्यापीठाचे प्राच्य विद्या शाखेचे ग्रंथालय, ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूरचे ग्रंथालय यांचे ग्रंथपाल/ व्यवस्थापक यांचे आभार मानतो. तसेच ‘रा. सं. तु. नागपूर विद्यापीठाचे प्रा.भा. इ.स. आणि पुरातत्व विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रशेखर गुप्त यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे ऋण मी विसरु शकत नाही. त्याच प्रमाणे माझे कुटुंबियाचे सहकार्याविना कार्य पुर्ण होऊ शकले नसते. तसेच डिझाईन पॉईन्ट कार्ड्स, नागपूर चे श्री. संजय पझारे यांनी सुबक छपाई करुन दिली याबद्दल त्यांचेही आभार मानतो.

डॉ. चक्रपाणि चोप्पावार
बल्लारपूर
भ्रमणध्वनी – ९८२३६७८२०९

विश्वकर्मा समाजाची निर्मिती कशी झाली हे समजून घेण्यासाठी प्रस्तुत लेखकाचे ‘विश्वकर्मा वंश’ हे पुस्तक वाचावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..