अमेरिकेतील छोटी गावे – भाग ६

Gavakadchi America Small Towns in AMerica Part 6

छोट्या गावांमधे, पशुसंवर्धन हा बर्‍याच कुटुंबांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. मुलं जन्मापासूनच गायींच्या, वासरांच्या, डुकरांच्या, शेळ्यामेंढ्यांच्या आसपास वावरत असतात. दोन तीन वर्षांची मुलं, आई-वडिलांबरोबर घरच्या फार्मवर जाऊन छोट्या छोट्या साधनांनी लुडबुड करत काम करायचा प्रयत्न करतात. दुसरी तिसरीपासूनच ही मुलं “4 H” सारख्या कार्यक्रमांमधे सहभागी होतात. पालकांच्या, शिक्षकांच्या देखरेखीखाली ती लहान वासरं, डुकरं, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या हाताळायला शिकतात. ह्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एखादं वासरू किंवा डुकराचं पिल्लू वाढवणं, त्याला साफसूफ करून त्याची निगराणी ठेवणं, त्याचे केस विशिष्ट प्रकारे कापणं, त्यांना ठरावीक पद्धतीने उभं रहायला किंवा चालायला शिकवणं, हे सारं करायला शिकतात. उन्हाळा सुरू झाला की वेगवेगळ्या काउंटीजच्या जत्रांचे वेध लागायला लागतात. अशा जत्रांमधे 4 H कार्यक्रमाअंतर्गत ही मुलं आपली जनावरं दाखवण्याच्या स्पर्धांमधे मोठ्या उत्साहाने भाग घेतात. या जत्रा आणि स्पर्धा या कुटुंबांसाठी मोठ्या महत्वाच्या असतात. सारं कुटुंब जणू झपाटल्यासारखं होऊन जातं. अशा स्पर्धांमधे बक्षीस मिळवणं म्हणजे मोठंच मानाचं असतं. त्यातून काउंटी किंवा विभागीय स्पर्धांतून पुढे जाऊन राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमधे जायला मिळणं म्हणजे जणू स्वर्गालाच हात टेकणं.

एप्रिल, मे महिन्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली की खेळांची मैदानं ओसंडून वाहायला लागतात. थंडीच्या सहा महिन्यांत घरा दारात बंदिस्त होऊन पडलेली मुलं, माणसं बाहेर मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशाचं उबदार सुख अनुभवायला आसुसलेली असतात. छोट्या गावांमधे करमणुकीला फारसा वाव नसल्यामुळे सायकली चालवणे हा एक लहान मुलांचा आवडीचा विरंगुळा असतो. तरूणांमधे त्याचंच रूपांतर मोटार सायकली चालवण्यात होतं. गावातल्या एकुलत्या एक मध्यवर्ती रस्त्यावर, मोठ्ठ्याने आवाज करत मोटार सायकली चालवत, हे तरूण समवयस्कांमधे रमून जाण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी त्याच त्या मध्यवर्ती रस्त्यावर मोटारींची परेड काढून शेवटी एखाद्या कट्ट्यावर बसून गप्पांचा अड्डा जमवला जातो. याच सुमारास (जून जुलैपासून) गावातल्या रस्त्याच्या कडेला आसपासचे शेतकरी आपल्या बागेतली फुलं किंवा शेतातले टोमॅटो, कणसं, किंवा इतर ताजा भाजीपाला घेऊन आपल्या पिक-अप ट्रक्स लावून विकायला बसतात.

मिडवेस्ट आणि त्याच्याही पश्चिमेकडच्या काही राज्यांतली काही छोटी गावं तर एवढ्या दूर दूर अंतरावर आहेत की कल्पना करणं अवघड व्हावं. कामानिमित्ताने नेब्रास्का, साऊथ डकोटा, नॉर्थ डकोटाच्या काही भागांमधे फिरलो तेंव्हा याची प्रचिती आली. या राज्यातल्या काही भागांमधे, जिथे रॅंचेस (प्रचंड मोठाली चराऊ कुरणे) आहेत तिथे मानवी वस्तीच्या खाणाखुणा धुसर होत जातात. अशा ठिकाणच्या काही रस्त्यांवर ३०-४० मैल अंतरांपर्यंत मधे वस्ती लागत नाही. या प्रदेशामधे फिरताना गाडीचा पेट्रोल टॅंक अर्धा जरी भरलेला असला तरी जेंव्हा गॅस स्टेशन दिसेल तेंव्हा पेट्रोल भरून टाकणे हेच शहाणपणाचं ठरतं. अशा ठिकाणी गाडीतलं पेट्रोल संपणं म्हणजे काय दिव्य असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. अशा ठिकाणी रस्त्यावरच्या रोड साइन्स वगैरे काही नसतात. फक्त लाकडी फळकुटं खांबांवर ठोकून त्यावर अमुक रॅंच तमक्या दिशेला आहे एवढंच लिहिलेलं असतं. काही रॅंचेसवर मी गेलोय ते चक्क १५-२०,००० एकरांचे होते. अशा रॅंचवर गेलं की जिकडे बघावं तिकडे नुसतं अफाट माळरान. मधे झाडी, पाणवठे वगैरे सारं काही. रस्त्याचं नाव नाही. रॅंचेसवरच्या माहितगार माणसाबरोबर त्यांच्या गाडीनं गेलं तर ठीक नाहीतर २०,००० एकर जमिनीवर ३००० गायींचा ठावठिकाणा लागायलाच मुळी मुश्किल ! या अशा रॅंचेसवर गायींना पाणी पिण्यासाठी चक्क मोठ मोठाले तलाव केलेले असतात. या प्रचंड मोठ्या रॅंचेसवर या गायी रानोमाळ भटकत, चरत असतात आणि वन्य श्वापदांसारख्या, तहानेच्या वेळेला या पाणवठ्यांवर येत असतात. अशा मोठ्या रॅंचेसवर गायींच्या बरोबरीने इतर वन्य प्राणी देखील आश्रय घेऊन असतात. बर्‍याचदा हरणांचे कळप दृष्टीस पडतात तर काही पाणवठ्यांच्या आश्रयाने बदकं आणि गीजचे थवे गुजराण करताना आढळतात.

रॅंचवरच्या फार्महाऊसवर बहुदा पुरुष मंडळीच वास्तव्य करून असतात. त्यामुळे ह्या फार्महाउसेसमधे, त्यांच्या गॅरेजेसमधे, अस्सल पुरुषी अस्ताव्यस्तपणा ठायी ठायी विखुरलेला असतो. बीयरचे कॅन्स आणि बंदुका इतस्तत: पडलेल्या असतात. चिखलाचे बूट, मळलेले कपडे इतस्तत: भिरकाऊन दिल्या ठिकाणी पडलेले असतात.बर्‍याच रॅंचेसपासून शाळा खूप दूर असल्यामुळे अनेक रॅंचर्स जवळपासच्या बर्‍यापैकी मोठ्या गावात देखील एखादं घर बाळगून असतात. बहुदा बायका आणि मुलं अशा गावातल्या घरी रहातात. मुलं आठवडाभर शाळेत जाऊन शनिवार-रविवारी रॅंचवर ये जा करतात. अशा निर्जन ठिकाणी वैद्यकीय सोयी मिळणं देखील दुरापास्त. वेळ पडलीच तर आसपासच्या (६० ते १०० मैलांवरच्या) ठिकाणाहून एखादं हेलीकॉप्टर मागवावं लागतं. इथे तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णाला हेलीकॉप्टरमधून जवळच्या हॉस्पिटलमधे नेणं ही सामान्य बाब आहे.

आमच्या कंपनीचे पशुवैद्यकीय आणि इतर कर्मचारी गायींमधे भृण प्रत्यारोपण (embryo transfer) करण्याच्या निमित्ताने अशा दुर्गम भागातील रॅंचेसवर बरेचदा जातात. अनेकदा अशा ठिकाणी मोटारीने जाणं म्हणजे फारच जिकीरीचं काम असतं. अशा वेळी छोट्या विमानातून (पायलट आणि दोन किंवा तीन जण दाटीवाटीनं बसतील अशा) जाणं येणं फारच सोईस्कर ठरतं. इथे बहुतेक छोट्या गावांमधे अगदी छोटेसे विमानतळ असतात. अर्थात त्यावर केवळ पिकांवर औषधांची फवारणी करणारी विमानंच उतरू शकतात. अशा विमानांतून या शेता-माळरानांच्या अफाट हिरव्या समुद्रावरून एक ठिपका होऊन उडणं हा मोठा रोमांचक अनुभव असतो.

 

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....