नवीन लेखन...

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ३

The Wild-Life in America - Part 3

एकोणिसावं शतक सुरू झालं त्यासुमारास अमेरिकेचे स्थूल मानाने तीन विभाग होते. एक म्हणजे पूर्व किनारपट्टी, जी पूर्णपणे प्रस्थापित आणि बहुतांशी सुरक्षित होती, दुसरा म्हणजे ऍपेलेशियन पर्वतराजीपासून पश्चिमेला मिसीसीपी नदीपर्यंतचा प्रदेश, जो गेल्या शे – सव्वाशे वर्षांतल्या धाडसी लोकांच्या मोहीमांमुळे परिचित होऊ लागला होता आणि तिसरा म्हणजे मिसीसीपीच्या पलीकडचा प्रचंड मोठा असा (गोर्‍या लोकांना) पूर्णपणे अनभिज्ञ असा प्रदेश. १८०३ साली राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी फ्रेंच्यांशी करार करून (लुईसीयाना प्रदेशाचा खरेदी करार) हा मिसीसीपीच्या पलीकडचा ८२८,००० चौरस मैलांचा प्रदेश विकत घेतला. या एका घटनेने, एका फटक्यात अमेरिकेचा विस्तार दुपटीने वाढला.

या धाडसी लोकांमधे बीव्हरच्या केसाळ कातड्याचा धंदा करणारे खूप होते. बीव्हर हा पाण्यात किंवा काठावर रहाणारा मुंगुसासारखा प्राणी आहे. त्याची झुपकेदार शेपटी आणि केसाळ कातड्याच्या टोप्या युरोपात फार प्रचलित होत्या. बीव्हरला पकडण्यासाठी थंडीचा मोसम फलदायी ठरायचा. ह्या मोसमात बीव्हर चिखल, काटक्या गोळा करून आपली पाण्यातली घरं तयार करतात. हे लोक पाणथळी जागी फिरून बीव्हरची अशी घरं धुंडाळून काढायचे. मग संध्याकाळच्या उतरत्या उन्हात या बीव्हरच्या घराच्या आसपास हे लोक सापळे लावायचे आणि मग भल्या पहाटे, उजाडायच्या आधीच त्या जागी परतून सापळ्यात अडकलेले बीव्हर पकडून मारायचे. जागच्या जागीच त्यांची कातडी सोलून काढली जायची. बीव्हरच्या गुबगुबीत शेपट्या खरपूस भाजून त्यावर ताव मारला जायचा. कडाक्याच्या थंडीचे थोडे महिने आणि जून ते सप्टेंबर या उन्हाळ्याच्या महिन्यात (जेंव्हा बीव्हरच्या कातडीची फर कमी व्हायची) तेंव्हा ही बीव्हरची शिकार बंद असायची.

जूनमधे, जमवलेल्या कातड्यांचा गठ्ठा घेऊन हे लोक एखाद्या साधारण मोठ्या ठिकाणी एकत्र यायचे. या अशा ठिकाणी आठवडाभर जत्रेसारखेच वातावरण असायचे. शहरांतून येतांना व्यापारी आपल्या बरोबर अनेक वस्तू घेऊन यायचे. मग हे फासेपारधी आपल्या जवळच्या बीव्हरच्या वाळवलेल्या कातड्यांच्या बदल्यात या दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घ्यायचे. हा आठवड्याभराचा काळ भरपूर दारू ढोसण्यात, जुगार खेळण्यात आणि एकंदरीत मौजमजा करण्यात जायचा. ह्या फासेपारध्यांच्या एकाकी आणि खडतर आयुष्यात हेच थोडे दिवस इतर मनुष्यप्राण्यांच्या सहवासात आणि मौजमजा करण्यात जायचे.

एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या तीन-चार दशकांपर्यंत पश्चिमेचा बराचसा भूभाग धांडोळला गेला होता. रॉकी पर्वतराजी, सिएरा नेवाडाचे वाळवंट, मिसुरी, स्नेक, कोलोरॅडो नद्यांच्या शाखा, उपशाखा छोट्या छोट्या बोटीमधून पालथ्या घातल्या गेल्या होत्या. ग्रॅंड कॅनयनचे भव्य दिव्य रूप, अफाट पसरलेल्या ग्रेट प्लेन्सवरचे लाखालाखांचे कळप, निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेले वरदान गोर्‍या लोकांच्या डोळ्यांपुढे हळूहळू उलगडत जात होते. वेगवेगळ्या इंडीयन जमातींची जान पहेचान होत होती. हळू हळू या धाडसी गोर्‍या लोकांनी चोखाळलेल्या बिकट वाटांच्या वहीवाटा होऊ लागल्या. दिवसेंदिवस पश्चिमेकडे सरकणार्‍या लोकांचा लोंढा वाढू लागला. एकेकाळच्या अनभिज्ञ, अज्ञात प्रदेशात, प्रस्थापित वस्ती होऊ लागली. या शिकारी, फासेपारधी, डोंगरदर्‍या पालथं घालणार्‍या आणि अज्ञाताचा वेध घेण्याच्या ध्यासापायी संकटांना कवळू पाहणार्‍या धाडसी लोकांचं अद्भूत, अनोखं विश्व नाहीसं होऊ लागलं. १८४८ साली कॅलिफोर्नियात सोनं सापडल्यापासून तर या पश्चिमेकडच्या प्रस्थानाला पूर आला. १८६९ साली रेल्वेमार्ग पश्चिमेला पॅसिफिक महासागरापर्यंत पोहोचला. एकेकाळी पायी किंवा घोडागाड्या, बैलगाड्यांतून होणारा पश्चिमेकडचा खडतर प्रवास आता सुकर आणि सुलभ होऊ लागला. पूर्व किनारपट्टीपासून पश्चिमकिनारपट्टीपर्यंतचा हा खंडप्राय देश रेल्वेमार्गाच्या माध्यमातून जवळ आला आणि अमेरिकेच्या जीवनातला आधुनिकतेचा एक नवा अध्याय सुरू झाला.

क्रमशः …. 

— डॉ. संजीव चौबळ 

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..