नवीन लेखन...

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ५

Country Music in America - Part 5

आपल्या शेताचं कौतुक, आपल्या ट्रॅक्टरचं कौतुक, आपल्या जुन्या मोडक्या गंजलेल्या पिकअप ट्रकचं कौतुक, हे सगळं ऐकलं की अगदी आपल्याकडच्या

जुन्या गाण्यांची आठवण होते. त्यात इथे गाण्याचे व्हिडिओज असतात. टी.व्ही.वर कंट्री म्युझिकचा स्वतंत्र चॅनल असतो. त्यामुळे त्याच्यावर लोकप्रिय

गाण्यांचे व्हिडिओज पाहिले की गाण्यातल्या शब्दांना वेगळाच अर्थ येतो. त्यातली शेतं, माळरानं, छोटी गावं, गावातले लोक पाहिले, की हे सगळं

आपल्या आजूबाजूचंच आहे हे पटकन उमगतं. कदाचित शहरात राहणार्‍यांना ते इतकं अपील होणार नाही. पण आमच्यासारख्या गावाकडेच राहणार्‍यांना

त्याचा संदर्भ चटकन जाणवतो आणि भावतो. मग ती गाणी ऐकताना आणि टी.व्ही.वर बघताना, आपल्या जुन्या मराठी चित्रपटांतील गाणी आठवायला

लागतात. शेतातल्या मोटेचं पाणी काढणारा कामकरी, आपल्या ढवळ्या पवळ्या खिल्लारी बैलांच्या पाठीवर मायेने हात फिरवणारा शेतकरी, बैलगाडीत

बसून आठवड्याच्या बाजाराला निघालेलं कुटुंब, जात्यावर दळण दळणारी वयस्कर आई किंवा आजी, सोप्यावर झोपाळ्यावर बसून सुपारी कातरणारे

आजोबा, पहाटेला मंदिरात चाललेली काकड आरती, अशी सगळी आपल्याच आयुष्यातली, आसपास पाहिलेली किंवा सिनेमात जिवंत झालेली दृष्यं

डोळ्यांसमोर गर्दी करू लागतात. विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले जुने प्रसंग, शब्द, स्पर्श, चवी पुन्हा जिवंत होतात.

आपल्या ‘रेड नेक’ पणाचं कौतुक करायचं म्हणजे थोडी शहरवासियांबरोबर तुलना आलीच. मग आम्ही आपले कसे साधे आहोत, आम्हाला काही

brand name च्या वस्तू मोठमोठ्या आलिशान दुकानांतून घ्याव्या लागत नाहीत, आम्ही कसे दिवसभर उन्हा तान्हात राबत असतो, आमचे छंद

कसे रगेल, रंगेल आणि मर्दानी आहेत, हे वर्णन प्रामुख्याने येतं. त्यात गावाकडची माणसं म्हणजे हट्टी कट्टी. मग शहरी चाकरमान्यांच्या

जीवनशैलीचा, त्यांच्या नाजूकपणाचा उपहासानं उल्लेख करणं ओघाने आलंच. शहरी बाबू चकचकीत बूट घालून, झकपक कपडे करून, सुबकशा गाडीत

बसून भले मोठ्या अद्ययावत इमारतीमधे कामासाठी जात असेल पण त्याला गवताचे भारे उचलून ट्रकवर टाकता येतील का? किंवा एखाद्या नाठाळ

खोंडाला दोरीचा फास टाकून जेरबंद करता येईल का? किंवा लाकडाचे मोठाले ओंडके फोडून शेकोटीसाठी ढलप्यांची रास करता येईल का? अशी

आव्हानात्मक तुलना असते. आणि मग त्यातूनच, एकंदरीत शहरी स्त्रियांना देखील आमच्यासारखे गावरान मर्दानी पुरुषच जास्त आवडतात असं सूचित

केलं जातं.

कंट्री म्युझिकमधे राहून राहून येणारा दुसरा विषय म्हणजे धार्मिकता. तसे गावाकडले लोक शहरवासियांपेक्षा अधिक धार्मिक, जुन्या वळणाचे, रूढी

परंपरा जपणारे, अगदीच कर्मठ नसले तरी बरेचसे सनातनी मताचे. त्यामुळे चर्चचा आयुष्यावर मोठाच प्रभाव. त्यातून चर्च म्हणजे नुसतं ठेवणीतले

कपडे घालून रविवारी किंवा प्रसंगवशात डोकं झुकवायला जाण्याचं ठिकाण एवढंच नाही. गावाकडल्या लोकांच्या आयुष्यात चर्च म्हणजे जीवनाचं एक

अविभाज्य अंग. चर्चचं अस्तित्व दैनंदिन जीवनाला सर्वस्वी व्यापून उरलेलं. ‘आम्ही गाववाले आणि आमची एक ओळख म्हणजे चर्चचं आमच्या

जीवनात असलेलं स्थान’, एवढाच उल्लेख करून कंट्री म्युझिक थांबत नाही. कंट्री म्युझिकच्या सुरावटीतून व्यक्त होताना, चर्च हे केवळ दैनंदिन,

सामाजिक नित्यकर्मांचं स्थान न रहाता ते अधिक गहिरं होत जातं. येशुचं बलिदान, त्याची करुणादायी मूर्ती, त्याच्या पायाशी शरण जाता सर्व पापांतून

मिळणारी मुक्ती, या सार्‍यांवरची नितांत श्रद्धा कंट्री म्युझिकमधे पाझरत असते.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..