अमेरिकेतील छोटी गावे – भाग ५

Gavakadchi America Small Towns in America Part 5

अगदी छोट्या गावातील रेस्टॉरंट्स देखील घरगुती वळणाची. त्यांच्या ना झगमगत्या पाट्या, ना ड्राइव्ह थ्रू, ना चटपटीत वेशातली वेटर मंडळी. आतमधे बाकडी देखील साधी. भिंतीवर बहुदा गावाकडचं दृश्य दाखवणारं एखादं चित्र फ्रेम करून लावलेलं. कुठे घरगुती कलाकुसरीचे काही नमुने लावून ठेवलेले किंवा त्या गावचेच जुने ५०-१०० वर्षांपूर्वीचे काळे-पांढरे फोटो फ्रेम करून लावलेले. कुठे हरणांची शिंग भिंतीवर लावलेली तर कुठे जुन्या शेतकी अवजारांचा शोभेच्या वस्तूंसारखा उपयोग केलेला. अतिथी म्हणजे रोजचेच, आसपासचे रहिवासी. सगळे एकमेकांच्या वर्षानुवर्षे ओळखीचे. मग कुठे चार-सहा आजी आजोबा, रोजचा अड्डा जमवल्या सारखं एखादं टेबल अडवून तासन्‌ तास गप्पा मारत बसतात, तर कुठे कामाच्या रगाड्यातून वेळ काढून, बकाबका बर्गर आणि सॅंडविचेस खाऊन परत फार्मकडे वळणारे तरूण घाईघाईत एकमेकांची विचारपूस करत असतात. कुणाला दुधाच्या पडत्या भावाची काळजी असते तर कुणी दिवसेंदिवस महाग होत जाणार्‍या जनावरांच्या खाद्यामुळे बेजार झालेला असतो. कुणाला कापणीचा हंगाम तोंडावर आल्यामुळे आपला combine harvestor वेळेवर दुरुस्त होईल का याची चिंता असते तर कुणाला फार्मवर गायी लवकर गाभ धरत नाहीत म्हणून काय उपाय योजावेत याची विवंचना असते. वेट्रेस म्हणजे देखील गावातलीच एखादी मध्यमवयीन बाई, घरखर्चाचा गाडा ओढत, चार मुलं आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणारी असते. त्यातून कधी एखादी मुलगी वेट्रेस म्हणून नव्यानेच दिसली तर बसलेल्या आजी आजोबांच्या घोळक्यातून “अग्गो खालच्या आळीतल्या दामू फणशाची ना तू ? रत्नांग्रीला ना गो जाणार होतीस कालेजला?” अशा आशयाची आपुलकीची विचारपूस होते.

छोट्या गावांमधे बर्‍याचदा आपलं स्वत:चं वर्तमानपत्र असतं, ते देखील आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारं. जेमतेम ४-६ पानांच्या या पेपरात स्थानिक घडामोडींना मोठं महत्व दिलेलं असतं. अर्थात देशाचं राजकारण किंवा तत्कालीन जागतिक घडामोडींवर विद्वत्तापूर्ण भाष्य करण्याचा ही वर्तमानपत्र कधी फारसा आव देखील आणीत नाहीत. अशा या छोट्या वर्तमानपत्रांमधे, मध्यपूर्वेमधल्या स्फोटक परिस्थितीपेक्षा गावातल्या स्कूल बोर्डाच्या मीटींगला अधिक महत्व असतं. चीनमधल्या भयंकर भूकंपापेक्षा गावाबाहेरच्या ओढ्याला आलेल्या पूराची चिंता अधिक असते. वॉशिंग्टन डी.सी.मधे चाललेल्या अनेक देशांच्या शिखर परिषदेपेक्षा गावातल्या टाउन हॉलमधे चाललेल्या चर्चे बद्दल अधिक जिज्ञासा असते. आणि न्यूयॉर्क यॅंकीज आणि बॉस्टन रेड सॉक्स मधल्या बेसबॉल मॅचपेक्षा गावातल्या शाळेतल्या मुलींच्या मॅचला अधिक प्रसिद्धी मिळते. आठवड्यातून एकदाच येणार्‍या या पेपरची लोक मोठ्या आतूरतेने वाट पहातात. गावातली आसपासची दुकानं त्यात आपल्या मालाच्या जाहिराती छापतात. कुठे कुणाच्या जुन्या शेतकी अवजाराची जाहिरात केलेली असते, कुणाच्या फार्मवरची डुकरांची पिल्लं विकायला झाली असतात, कुठे गावातला मुलगा राखीव सैन्यदलात दाखल झाल्याबद्दल त्याचं कौतुक असतं, तर कुठे कुणा आजीबाईच्या पाककृतीला शेजारच्या गावाच्या जत्रेत बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन असतं. ह्या छोट्या गावांची क्षितीजं फारशी मोठी नसतात. त्यांच्या छोट्या विश्वापलीकडे त्यांना फारसं बघायचं नसतं. त्यांची सुख दु:ख, त्यांची स्वप्नं आणि आकांक्षा पंचक्रोशीच्या बहुदा आतच असतात. या त्यांच्या चिमुकल्या जगाची दखल घेण्याचं काम, ही स्थानिक वर्तमानपत्रं इमानेइतबारे करत असतात.

छोट्या गावांमधल्या फायर ब्रिगेड खात्यामधे पगारी कर्मचारी नसतात; सारेच स्वयंसेवक. कुणी शेतकरी, कुणी लाकडाच्या वखारीत काम करणारा, कुणी दगडाच्या खाणीतला कामगार, तर कुणी दुधाचा ट्रक चालवणारा. या सगळ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलेले असते. थोड्याश्या मोठ्या गावामधे एखाद्या जुन्या गॅरेजमधे एक दोन फायर ब्रिगेडचे बंब ठेवलेले असतात. अगदी छोट्या गावात ते देखील नसतात. या कर्मचार्‍यांचे पोशाख देखील जुनेच असतात. पैशाची तशी वानवाच. स्थानिक ग्रामपंचायती कडून थोडी फार मदत मिळते. मग उन्हाळ्यामधे ही छोट्या गावातली फायर ब्रिगेडची कर्मचारी मंडळी बार्बेक्यू करतात. गावाजवळच्या एखाद्या मैदानावर तात्पुरते तंबू उभारले जातात. शेकोट्यांवर बीफ, पोर्क, चिकन भाजलं जातं. गावातले आजूबाजूचे रहिवासी, मित्रमंडळी आवर्जून येऊन खाण्यावर ताव मारतात. खेळ, खाणं पिणं, मुलांसाठी करमणूक या सार्‍यांबरोबरच, फायर ब्रिगेडला आवश्यक असे पैसे देखील गोळा केले जातात.

 

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…