नवीन लेखन...

अष्टविनायका तुझा महिमा कसा

गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल.

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांकात श्री रविप्रकाश कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख.. साभार)


चित्रपटसृष्टी ही एक अजब दुनिया आहे. इथे पडद्यावर दिसतं ते सगळं खोटं असतं असं म्हणतात. पण पडद्याच्या मागे इतक्या गोष्टी घडत असतात की त्याचा पत्ता लागणंसुद्धा कठीण असतं. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींना चित्तचक्षुचमत्कारिक असंच म्हणावं लागेल. श्रीगजाननाच्या बाबतीत इतक्या चित्रविचित्र गोष्टी आहेत आणि त्याचे आकर्षण सर्वसामान्यांना असल्यामुळे या विषयावरती सिनेमावाल्यांनी चित्रपट नाही काढले तरच नवल होते. त्यामुळे गणपतीविषयक चित्रपट, श्री गणपतीविषयक गाणी गणेशोत्सवाचं निमित्त करून प्रदर्शित होत असतात. अर्थात् चित्रपटात दरवेळी नावीन्य आणायचा सिनेमावाल्यांचा प्रयत्न असतो असाच एक प्रयत्न म्हणजे श्री. शरद पिळगांवकर यांचा अष्टविनायक चित्रपट.

गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल.

अष्टविनायक चित्रपटाच्या बाबतीत अनेक घडामोडी सांगता येतील. खरं तर अष्टविनायक आणि मराठी समाज याचं नातं खूप जवळचं. लग्न कार्यात जे मंगलाष्टक म्हटलं जातं त्यामध्ये अष्टविनायकांची नावे घेतली जातात जसे….

स्वस्ति श्रीगणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धीतम
बल्लाळ मुरूड विनायक मढ चिंतामणी थेवरम्,
लेण्याद्री गिरिजात्मक सूवरद विघ्नेश्वर ओझरम्
ग्रामे रांजणसंस्तितो गणपतीः कुर्यात् सदा मंगलम्

त्यामुळे अष्टविनायकाची भले सगळी नावं नाही सांगता येणार पण अष्टविनायक म्हणजे गणपती हे वेगळं सांगावं लागत नाही. त्यामुळे सिनेमाच्या नावातच सिनेमा काय असेल हे कळले पाहिजे ही अट पूर्ण झाली.

• दुर्गम यात्रा

अष्टविनायकाची सर्व स्थाने महाराष्ट्रातच आहेत. त्यात देखील पुणे, नगर आणि रायगड या जिल्ह्यात आहेत. एक काळ असा होता अष्टविनायकची यात्रा एक दिवसात जो कोण पूर्ण करेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणांचे पुण्य लाभेल अशी श्रद्धा होती. कारण त्यावेळी अष्टविनायकचे मार्ग सगळेच बिकट होते. वाहनांची पण तशी सोय नव्हती पण रस्ता तिथे एस.टी. अशी सुधारणा होताच रस्तेदेखील सुधारले. त्यामुळे खाजगी वाहनांना हा प्रवास सोपा झाला. या सगळ्या गोष्टींमुळे २४ तासात अष्टविनायक यात्रा सहज शक्य होऊ लागली आणि अष्टविनायकाकडे भाविक लोकांचा आणि प्रवाशांचा ओघ वाढला. हे २४ तास तरी कशाला आपण दोन-अडीच तासात अष्टविनायकची यात्रा पडद्यावर दाखवून लोकांची गर्दी खेचू शकतो असा सुविचार कदाचित शरद पिळगांवकर यांच्या मनात असेल देखील!

तयारी:

चित्रपटाची तयारी सुरू झाली. नायकाच्या भूमिकेत विक्रम गोखले आणि नायिकेसाठी विक्रम गोखले यांच्या पत्नीची निवड शरद पिळगांवकर यांनी केली. पण ही योजना फिसकटली. कारण विक्रम गोखले यांच्या जाचक अटी. आता प्रश्न आला नायक म्हणून कोणाची निवड करावी? त्यासाठी शरद पिळगांवकर आपल्या मुलाशी म्हणजेच सचिनशी चर्चा करू लागले. तेव्हा सचिन म्हणाला, ‘मी करतो ही भूमिका.’ त्यावेळी सचिन हिंदी चित्रपटसृष्टीत खूपच बिझी होता. त्यामुळे शरद पिळगांवकर म्हणाले, ‘अरे, तुला वेळ मिळणार आहे का.’ ‘मी जमवतो.’ सचिन म्हणाला, ‘पण माझी एक अट आहे.

होकार-नकार:

‘आता तुझी काय अट?’ शरद पिळगांवकर.

‘अष्टविनायकाच्या गाण्याच्या शूटिंगसाठी प्रत्येक ठिकाणी मी येणार. कटिंग पेस्टिंग करून गाणं तयार करायचं नाही.’

‘ठीक आहे. मंजूर’ – शरद पिळगांवकर.

हिरो नक्की झाला. आता शोध नायिकेचा. भक्ती बर्वेपासून अनेक नावं पुढे आली पण ते जमेना. मग एकदा सचिनच्या आईने नांव पुढे केलं – वंदना पंडित.

कोण ही वंदना पंडित? ती त्यावेळी दूरदर्शनवर बातम्या देत असे. तिच्याशी संपर्क साधला गेला पण तिचं लग्न ठरलं असल्यामुळे ती चित्रपटात काम करणार नाही असं उत्तर आलं.

‘पण लग्नाआधीच शूटिंग पूर्ण केलं तर? काम करणार?’ शरद पिळगांवकर.

होकार मिळाला!

फक्त याच चित्रपटात काम करणार हे सांगायला वंदना पंडित विसरली नाही.

वसंतराव देशपांडे यांना चित्रपटात वंदनाच्या वडिलांच्या भूमिकेसाठी घ्यायचं ठरलं. त्यामागे ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकात गाजलेली त्यांची भूमिका होती. पण वसंतराव यांनी नकार दिला.

कुणाला कसं राजी करायचं हे शरद पिळगांवकर यांना चांगलंच ठाऊक होतं. वसंतराव देशपांडे तयार झाले.

गाणी-नाट्य…

‘आली माझ्या घरी ही दिवाळी’, ‘दाटून कंठ येतो…’ अशी गाणी रेकॉर्डसुद्धा झाली.

पण पुन्हा अडचण आली. सगळं अडलं एका गाण्यासाठी. त्याशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकत नव्हता आणि एक वेगळ्याच नाट्याला सुरुवात झाली. मध्यरात्र उलटून गेली असेल. शरद पिळगांवकर थेट दादरच्या रामनिवासच्या इथे आले.

‘अहो खेबुडकर, खेबुडकरऽऽऽ’ अशा हाका खालूनच मारायला लागले.

त्यावेळी जगदीश खेबुडकर एका वेगळ्या सिनेमाच्या तयारीसाठी रामनिवासमध्ये उतरले होते. एवढ्या रात्री आपल्याला कोण हाक मारतोय हे पाहण्यासाठी खेबुडकर गॅलरीत आले. पिळगावकर यांना पाहताच ते खाली आले.

‘काय पिळगांवकर? काय काम आहे? ‘
‘चला गाडीत बसा. सांगतो.’
अष्टविनायकाचं महत्त्वाचं गाणं आहे ते तुम्हीच आता करायचं आहे.’
‘पण अष्टविनायकची गाणी शांताबाई आणि नांदगावकर यांची आहेत ना?’ खेबुडकर म्हणाले.

‘हो’ पिळगावकर म्हणाले, ‘पण हे अष्टविनायकाचं महत्त्वाचं गाणं त्यांच्याकडून हवं तसे होत नाही आहे ते तुम्हीच करणार याची मला खात्री आहे.’ पिळगांवकर म्हणाले.

‘अहो पण मला अष्टविनायकची काही माहिती नाही. मी कधी गेलेलो पण नाही.’ खेबुडकर.

‘त्याची नका काळजी करू,’ असं म्हणत पिळगांवकर यांनी एक छोटीशी अष्टविनायकची माहिती असलेली पुस्तिका खेबुडकर यांच्या हातात दिली. तोपर्यंत गाडी पिळगांवकर यांच्या घरी पोहोचली. गाडीतून उतरताना पिळगांवकर म्हणाले, ‘हे आजच्या रात्रीत काम व्हायला पाहिजे. उद्या रेकॉर्डिंग आहे.’ असं म्हणून दोघे घरात शिरले. तो समोर संगीतकार अनिल-अरुण आणि गायक चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश वाघमारे ही मंडळी होतीच. मग पिळगांवकर म्हणाले, प्रत्येक गणपतीचं वर्णन लोकसंगीताच्या बाजाने करायचं आहे. तेव्हा आता सुरू करा. जगदीश खेबुडकरांनी कधीही तमाशाचं तोंड बघितलं नव्हतं तरी त्यांनी अस्सल लावणी लिहिली होती. त्यांनी हे पण आव्हान स्वीकारायचे असं ठरविले. परमेश्वराचे स्मरण केले आणि कागदावर श्रीकार टाकला.

कुडी झाली देऊळ छान,
काळजाचं सिंहासन,
मधोमध गजानन, रिद्धी सिद्धी उभ्या ललना,
जय गणपती, गुणपती गजवदना!!

सुरुवात तर झकास झाली बघता बघता खेबुडकरांच्या लेखणीतून शब्द झरू लागले.

शेवटी – आठवा गणपती आठवा:

पालीगावच्या बल्लाळेश्वरा आदी देव तू बुद्धी सागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख सूर्य नारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाल डोळ्यात हिरे
चिरेबंदी या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा

गाणं पूर्ण झालं होतं. सकाळ झाली होती.

मग पिळगांवकर म्हणाले, ‘चालीत म्हणून दाखवा. मग अनिल-अरुण यांनी चालीत थोडं मागे पुढे केलं. संपूर्ण गाणं तयार झालं. सकाळी नऊ वाजता प्रभादेवी येथील बॉम्बे साऊंड येथे रेकॉर्डिंग चालू झालं. वेगवेगळे गायक ठरले होते. अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मल्लेश वाघमारे असं प्रत्येक जणांचं कडवं रेकॉर्ड होत होतं. पण आयत्या वेळी एक गायक येऊ शकला नाही. क्षणभर प्रश्न पडला आता काय करावं. तोच शरद पिळगांवकर म्हणाले, ‘खेबुडकर, आता तुम्हीच म्हणायचं’ आणि खेबुडकरांनी खडा आवाज लावला

सातवा गणपती राया, महड गावाची महसूर
वरदविनायकाचं तिथं एक मंदिर,
मंदिर लई सादसूदं जसं कौलारू घर,
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर,
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मार्ग आहे तळं,
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यांनी बांधलं तिथं देऊळ,
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो,
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो,
चतुर्थीला गर्दी होऊ रात्रंदिवसा!!

गाणं झकास झालं. सचिन आणि वंदना यांना घेऊन शूटिंग पार पडलं. चित्रपटाची ट्रायल ठरली.

आपापल्या संमिश्र प्रतिक्रिया देऊन मंडळी पांगली.

सचिन मात्र गप्प गप्प होता. पण शेवटी न राहवून तो वडिलांना म्हणाला, मी एक सुचवू का?

‘बोल.’ शरद पिळगांवकर म्हणाले.

अष्टविनायकचं शेवटचं गाणं सोळा मिनिटांचं आहे आणि हाच खरा क्लायमॅक्स आहे.’ सचिन सांगू लागला. ‘हे गाणं संपल्यानंतर प्रेक्षकांना थोपवणं कठीण आहे. लोक उठणार, तेव्हा मला असं वाटतं. शेवटच्या कडव्याला शरद तळवलकर आणि रमेश भाटकर आनंदाची बातमी घेऊन येतात. सगळं या वैभव देवकृपेमुळे परत मिळालेलं असतं. मी नास्तिक होतो, तो आस्तिक होतो, गजाननासमोर डोकं ठेवतो इथे सिनेमा संपला पाहिजे.’

सचिनचं बोलणं संपताच त्याच्या वडिलांनी म्हणजे शरद पिळगावकर यांनी टाळी वाजवून दाद दिली आणि ते म्हणाले की, ‘येसss, हाच क्लायमॅक्स पाहिजे. आपण नव्याने शूटिंग करू.

मग नव्याने क्लायमॅक्स चित्रित झाला.

अर्थात् प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला गर्दी करून भरभरून दाद दिली. चित्रपट रौप्यमहोत्सवी झाला आणि सचिनला या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. तर अशी ही अष्टविनायक चित्रपटाची चित्तरकथा वळणावळणानी जाणारी !

तर अष्टविनायकाचा महिमा असा देखील…

— रविप्रकाश कुलकर्णी, डोंबिवली

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून साभार)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..