नवीन लेखन...

डॉ. रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपूरी

उर्दु कवी, लेखक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपूरी यांचा जन्म २८ ऑगस्ट १८९६ गोरखपूर, उत्तरप्रदेश येथे झाला.

फिराक गोरखपूरी हे जात्याच अती बुद्धीमान होते. त्यांच्या घरी काही पंडितांचा राबता असल्याने ती बीजे त्यांच्या मनात पुर्वीपासूनच पेरली गेलेली होती. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी वर्डस्वर्थ, टेनीसन, तुलसी, कबीर, मीरा यांच्या साहित्याचा प्रगाढ अभ्यास केला. स्वामी रामतीर्थ यांचे वेदान्तावरील, विवेकानंदांची अनेक भाषणे यांचा अभ्यास केला. तत्वज्ञान व अध्यात्म हे त्यांचे मुख्य विषय! या सर्वाचा परिणाम म्हणजे बीए ची परिक्षा पास होताना जेव्हा झाकिर हुसेन उत्तर प्रदेशात तिसरे आले तेव्हा फिराक गोरखपुरी चवथे आलेले होते. त्यांचा दबदबा तर होताच, पण वरील सर्व अभ्यास झाल्यानंतर त्यांची स्वतःची अशी जी कविता निर्माण होऊ लागली होती तिच्यामधील विचार पाहून घरचे, आजूबाजूचे, सहाध्यायी इतकेच काय तर प्रोफेसर्सही अवाक होऊ लागले होते. मात्र, महान व्यक्तीमत्वांचे वैयक्तीक आयुष्य जसे बहुतेकवेळा दु:खीच असते तसे फिराकसाहेबांचेही होतेच!

१९१८ साली बीए पास होऊन सार्‍या उत्तर प्रदेशात गाजलेल्या फिराक साहेबांचे १९१४ सालीच लग्न झालेले होते. आणि त्यांची पत्नी हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे विदारक दु:ख होते. मध्यस्थाने फसवून हे स्थळ आणलेले होते. पत्नी काहीशी वेडीच म्हणावी लागेल. तिला लिहिता वाचता तर यायचे नाहीच, पण ती अत्यंत कुरुपही होती व काहीही न करता नुसती बसून राहायची. याहीपेक्षा अधिक म्हणजे तिचा चेहरा पाहून जणू काही येथे कुणाचा तरी आत्ताच मृत्यू झाला असावा की काय असे वाटावे इतके अभद्र भाव चेहर्‍यावर घेऊन ती सतत वावरायची.

आपण फसवले गेलो आहोत हे फिराक यांना समजलेलेच होते. तिला त्यांनी हाकलून देण्याचाही प्रयत्न केला. काही जणांच्या मध्यस्थीमुळे व करुणा आल्यामुळे तो निर्णय मागे घेतला. त्यांना एक मुलगा झाला. हा मुलगा दिसण्यात व बुद्धीमध्येही अगदी आईवर गेला. इतका, की वर्गात त्याला मुले चिडवून हैराण करायची. इतक्या मोठ्या विद्वानाचा मुलगा इतका मागासबुद्धीचा कसा असे म्हणून! शेवटी त्या मुलाने वैतागून अठराव्या वर्षी आत्महत्या केली. दरम्यान फिराक यांना दोन मुलीही झाल्या. मात्र, त्यांचे व्यक्तीगत आयुष्य ही त्यांच्यासाठी नेहमीच एक अत्यंत दु:खद आणि काळजी देणारीच बाब राहिली.
अचानक एक दिवस ते आपल्या जन्मगावी म्हणजे गोरखपूरला आलेले असताना त्यांना कुठेतरी तो मध्यस्थ भेटला. मध्यस्थाने कबूल केले की पैशाच्या लोभाने त्याने ते स्थळ त्यांच्या गळ्यात मारलेले होते व त्याला व्यवस्थित माहीत होते की ती स्त्री कुणाच्याही घरात देणे योग्य नाही. फिराक साहेबांना त्याने सांगीतले की आपण मला केवळ माफच करा व पाहिजे तर दुसरा विवाह करा. पण आता, इतक्या वर्षांनंतर दुसरा विवाह करणे शक्यच नव्हते. त्यांचे वयच पन्नास होते.

या पत्नीमुळे फिराक साहेबांच्या मनावर इतका परिणाम झालेला होता की त्यांचे कॉलेजचे एक वर्षही वाया गेलेले होते. त्या वर्षी ते एक रात्रही शांततेने झोपू शकले नाहीत. तब्येतीवर झालेला परिणाम पाहून त्यांना बनारसच्या त्र्यंबक शास्त्रींचे उपचार करून घ्यायची वेळ आली. जीवावरचे संकट टळले.
बीए मध्ये संपूर्ण यु पी मध्ये विख्यात झाल्याचे सुख नशीबात येत तोच वडिलांचे निधन झाले. मोठे भाऊ या नात्याने त्यांना सर्वच भावंडांची जबाबदारी घ्यावी लागली. त्यात अनेक अडचणि आल्या. पन्नास हजार रुपयांचे कर्ज त्या जमान्यात फिटवावे लागले. मात्र हे सगळे करत असताना दोन गोष्टी सातत्याने घडत होत्या. एक म्हणजे त्यांची शायरी असीम बहरत होती, गाजत होती आणि दुसरे म्हणजे फिराक साहेबांचा स्वभाव अत्यंत परखड, स्पष्ट असा होऊ लागला होता. ते आता प्रत्येक माणसाशी स्पष्टच बोलू लागलेले होते..

याचाच परिणाम असा झाला की १९४८ साली एक कवीसंमेलन आयोजीत केले गेले होते. ते एका राजकारणी माणसाने आयोजीत केलेले होते व त्या मागची भूमिका अशी होती की उर्दू ही देशाबाहेरील भाषा असून तिचे उच्चाटन केले जावे व हिंदीमध्ये अधिकाधिक शायरी रचली जावी. त्या संमेलनाला फिराक यांना बोलावण्यात आले. फिराक यांच्याकडे नेमका तेव्हाच एक उर्दू शायर आला. ते त्यालाही चल म्हणाले. तो घाबरला व म्हणाला ‘तेथे तर माझी उर्दू शायरी पाहून मला हाकलूनच देतील’! पण फिराकसाहेबांना त्याची शायरी व तिचा दर्जा ज्ञात होता. ते त्याला घेऊनच गेले. फिराक साहेबांची वेळ आली तशी त्यांनी आपली एक हिंदी कविता ऐकवली व अचानक प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आपल्या त्या मित्राचा उल्लेख केला व त्याला स्टेजवर पाचारण केले. आता आला का प्रॉब्लेम्? अनेकांना माहीत होते की हा उर्दू शायर आहे. इतकेच काय तो राजकारणीनेता स्वतःच स्टेजवर बसून प्रमुख पाहुणा झालेला होता. तो उर्दू शायर बिचकत बिचकत वर आला व फिराक साहेबांनी त्याच्या हातात माईक देऊन त्याला फर्माईश केली. सगळेच चुळबुळू लागले. त्या माणसाने ज्या क्षणी त्याची शायरी सादर करायला सुरुवात केली… सुरुवातीला सन्नाटाच पसरला… आणि क्षणार्धातच…वाहवा .. वाहवा… अशी दाद मिळू लागली. सभागृह दणाणून गेले. काही वेळाने तो शायर आभार मानून उतरत असतानाच राजकारणी माईक हातात घेऊन म्हणाला…

‘हिंदी कवींसाठी तुम्हा लोकांच्या मुखातून एकही प्रशंसोद्गार निघत नाही… आणि या उर्दू शायराला मात्र इतकी दाद???”? त्याबरोबर फिराक साहेबांनी तो माईक चक्क स्वतःच्या हातात ओढून घेतला आणि म्हणाले.. “त्या हिंदी कविता सुमार होत्या… त्यांना दाद मिळणेच शक्य नव्हते… ही उर्दू शायरी उच्च दर्जाची आहे.. याला दाद मिळालीच पाहिजे.. कवितेच्या क्षेत्रात राजकारण आणणार्‍यांचा निषेध करून मी सभात्याग करत आहे. फिराक गोरखपुरींनी गझल, नझ्म व समीक्षा असे मिळून एकंदर ९ पुस्तके लिहीली. फिराक गोरखपुरी यांनी ४०,००० हूनही अधिक शेर लिहिले होते.

जवाहरलाल नेहरुंचा निकटचा सहवास लाभलेल्या फिराक यांना उर्दू भाषेसाठीचे पहिलावहिले ज्ञानपीठ पारितोषिक,गालिब अ‍ॅकॅडमी पुरस्कार, उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार,पद्मभूषण पुरस्कार, सोविएत लॅन्ड नेहरू पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले.

फिराक गोरखपूरी यांचे निधन ३ मार्च १९८२ रोजी झाले.

संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..