नवीन लेखन...

ऑक्टोबर ०८ – ‘निन्ना’ कांगारू आणि समीर दिघे

‘निन्ना’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्‍या नील हार्वेचा जन्म ८ ऑक्टोबर १९२८ रोजी ऑस्ट्रेलियात झाला. १९४७-४८ च्या हंगामात त्याने भारताविरुद्ध मेलबर्नमध्ये १५३ धावा काढल्या होत्या. ऑस्ट्रेलियातर्फे काढल्या गेलेल्या कसोटी शतकांमध्ये हे सर्वात लहान वयाच्या खेळाडूने काढलेले शतक ठरले आहे – आज २१ वर्षे उलटून गेल्यानंतरही ! या शतकावेळी निन्नाचे वय १९ वर्षे ४ महिने पूर्ण एवढेसे होते.

पुढच्या कसोटी डावातही निन्नाने शतक काढले इंग्लंडविरुद्ध हेडिंग्लेवर. आपल्या पहिल्या १३ कसोटी डावांमधून निन्नाने ६ शतके रचली. आक्रमक डावखुरा फलंदाज, त्या काळातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आणि कामचलाऊ ऑफस्पिनर (उजव्या हाताने) ही हार्वेची संघातील भूमिका होती. ब्रॅडमनच्या अजिंक्य संघातील एकेक जण निवृत्त होत असताना १९५० च्या दशकात तो कांगारूंच्या संघातील वरिष्ठ फलंदाज होता.

१९५३ च्या इंग्लंड दौर्‍यात २,००० हून अधिक धावा काढल्याने १९५४ मध्ये विज्डेनने त्याची वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली. १९५७ मध्ये इअन क्रेग कर्णधार असताना निन्नाला उपकर्णधार बनविण्यात आले. खेळाडू म्हणून कामगिरी फारशी चांगली होत नसल्याने क्रेगने त्याला कप्तानी स्वीकारण्यास सुचविले होते पण निन्नाने त्यास नकार दिला.

१९६३ मध्ये निवृत्त होईपर्यंत तो उपकर्णधारच राहिला. ७९ कसोट्यांमधून ४८.४१ च्या सरासरीने तब्बल २१ शतकांसह ६,१४९ धावा त्याने जमविल्या. तो निवृत्त झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडून केवळ डॉन ब्रॅडमनने केलेली शतके आणि धावाच त्याच्याहून अधिक होत्या.
८ ऑक्टोबर १९६८ रोजी मुंबईत समीर दिघेचा जन्म झाला. उजवा फलंदाज आणि यष्टीरक्षक असणार्‍या समीर दिघेने राष्ट्रीय संघात निवड होण्याच्या सार्‍या आशा सोडून दिलेल्या होत्या. वयाच्या एकतिसाव्या वर्षी, तो अमेरिकेत एका अभ्यासक्रमासाठी गेलेला असताना अकस्मात्‌ त्याची भारतीय संघात निवड झाली. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत त्याने कसोटी पदार्पण केले. पदार्पणातच ग्लेन मॅग्रथ आणि जेसन गिलेस्पीला तोंड देत नाबाद २२ धावा काढत त्याने भारताचा विजय सुकर केला. या कसोटीसोबतच भारताने ती मालिका २-१ अशी जिंकली. झिम्बाब्वेच्या दौर्‍यावर जाणार्‍या संघाबाबत बोलताना गांगुलीने समीर दिघेला यष्टीरक्षणासाठी पहिली पसंती दिली जाईल असे म्हटले होते.

सलामीच्या अनेक जोड्यांमध्ये त्यालाही सलामीला पाठविण्याचा प्रयोग झाला पण तो फारसा यशस्वी झाला नाही. झिंबाब्वेच्या दौर्‍यावर विंडिजविरुद्ध काढलेल्या नाबाद ९४ धावा ही त्याची एदिसांमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..