सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांच्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याबद्दल एक विशेष आठवण सांगितली!!

जरी “सुन्या सुन्या” हे गाणे “उंबरठा” चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबाना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबाना सांगीतले कि गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले. १-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक हि गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले “कुछ सुंझ नाही राहा है तो क्या लिखू!!!”( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत). ४ दिवस झाले पण नो चेंज !! जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या कारण हॉटेलचे बिल वाढतंय आणि चित्रपटाचे बझेट कमी. पण भट साहेब जैसे थे !! ७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या “मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला ” बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले “ठीक है , मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हू ”

बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेल चे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले ” आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल “. बाळासाहेबांनी हॉटेलचा बिल भरला आणि ट्याक्षि बोलाविली. टॅक्सीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले त्या हॉटेल वाल्याकडून एक कागद आण. बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर … शब्द होते

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांद रात् आहे!!

सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला. बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले. त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांनी १५००० रुपयांचा चेक फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते म्हणाले “यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे”. भट साहेब तसेच निघून गेले. पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.

कालांतराने जब्बार पटेल यांनी “उंबरठा” हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले “हे गाणे वापरू या का?” भट साहेब म्हणाले “तुम्हारी इच्छा”. ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले. फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला. शब्द होते…

कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
कुणीतरी आरश्यात आहे

पटेलांनी भटांना सांगितले की तो “कुणीतरी” शब्द नको मला कारण ती एक विवाहित स्त्री आहे (चित्रपटाची नायिका). लोक काय म्हणतील?

परत गाडी अडकली. बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले “तुम अपना काम करो. मेरे काम मे दखल अंदाजी न करो”.

रेकॉर्डिंग ची वेळ आली. भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात. चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते . इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले कि एका शब्दाची अडचण आहे. त्या लगेच म्हणाल्या “अरे काय कठीण आहे त्यात. “कुणीतरी ” ऐंवजी “तुझे हसू” घल. त्या क्षणाला सुरेश भटांनी “वाह , शांता वाह ” असे उदगार काढले. शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले.

कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरश्यात आहे

एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि अजरामर गाण्याचा जन्म झाला .

हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.

अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान. अजरामर चाल आणि अजरामर आवाज. एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदया वरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ……….

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2285 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…