नवीन लेखन...

मराठी उद्योजक रावसाहेब गोगटे

बेळगावचे मराठी उद्योजक बाळासाहेब महादेव ऊर्फ रावसाहेब गोगटे यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंबू गावी झाला.

गोगटे कुटुंब मूळचे बेळगावचे. रावसाहेब गोगटे यांचे वडील त्या काळातील एल.एम.अँड एस. डॉक्टर होते. गंमत म्हणजे बुद्धिवान असणाऱ्या रावसाहेबांच्या वडिलांनी आपली डॉक्टरकी सोडून एक पिठाची गिरणी सुरू केली. हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. आजही ती गिरणी छोट्या स्वरूपात चालू आहे. रावसाहेबांनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कराड आणि जळगाव, चाळीसगाव, बेळगाव येथे पूर्ण केले. ते पूर्ण केल्यावर त्यांनी मुंबईत कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. रावसाहेबांच्या तरुण वयात त्यांच्या डोळ्यांसमोर किर्लोस्कर, वालचंद, हिराचंद, जमशेटजी टाटा ह्या औद्योगिक- क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्ती आदर्श म्हणून होत्या. त्या सर्वांच्या जाहिराती सतत पाहत असताना त्यातला National Industrialist ह्या उल्लेखाने वा त्या आयडिऑलॉजीने रावसाहेबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. उद्योगातून श्रीमंत होणं हा काही गुन्हा नाही. हे त्यांना त्या वेळी उमगलं. वकील झाल्यानंतर संस्थानिकांच्या हद्दीत भराव्या लागणाऱ्या जकातीबाबतचे दक्षिण महाराष्ट्रातील मोटारमालकांचे गा-हाणे सोडवण्यासाठी त्यांनी बेळगाव-मुंबई- दिल्ली अशा अनेक वाऱ्या करून तो प्रश्न सोडवला. पुढे त्यांचा वकिलीचा व्याप वाढल्यावर त्यांनी कामाकरता देशात आणि परदेशात संचार केला. त्यामुळे त्या प्रवासात विविध थरांतील लोकांशी त्यांचा परिचय झाला. त्या परिचयांतून नव्या कल्पना, नवे प्रकल्प मूर्त स्वरूपात आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आणि त्यांनी उद्योगाकडे वळायचं ठरवलं. आपला वकिलीचा व्यवसाय सोडून उद्योगाकडे वळण्याची रावसाहेबांच्या अंतर्मनातील प्रेरणा कदाचित त्या पिठाच्या गिरणीनेही त्यांना दिली असावी. आरंभीच्या काळात मोटार वाहतूक, आईस फॅक्टरी असे उद्योग करता करता योगायोगाने रावसाहेब अचानक खाणीच्या व्यवसायाकडे वळले. सावंतवाडीजवळील रेडी येथील लोखंडाची खाण त्यांनी सुरू केली. तशा प्रकारच्या खाणीच्या उद्योगात श्रमाबरोबर नशिबाची अनुकूलता लागते. माती खणणे आपल्या हाती असते, पण तेथे लोह सापडणे निसर्गाच्या मर्जीत असते. सुदैवाने रावसाहेबांच्या नशिबाने त्यांना हात दिला. ती रेडीची लोखंडाची खाण त्यांच्या उद्योगसमूहाची गंगोत्री सिद्ध झाली. रेडी येथील खाणीतून निघालेले लोखंड जपानला निर्यात होऊ लागले. खाणीतील लोखंडाची ने-आण करण्यासाठी व त्याच्या निर्यातीसाठी आपण स्वावलंबी असावे म्हणून त्यांनी कृष्णा व कोयना या दोन मोठ्या बार्जेस विकत घेतल्या आणि किनाऱ्यावरून वाहतूक सुरू केली. पण त्यात भयंकर समस्या निर्माण झाल्या. परदेशातून आलेल्या व किनाऱ्यापासून कित्येक मैल आत समुद्रात नांगरलेल्या बोटी भरण्याकरिता बांधलेले तराफे संपूर्ण कुचकामी ठरले. त्यात लाखोवारी नुकसान झाले. तरीही खाणीतून मिळत गेलेल्या पैशाच्या आधारावर रावसाहेबांनी अनेक उद्योग सुरू केले. आणि ते भरभराटीस आले. पुढे त्यांनी ‘Gas plants’चा उद्योग सुरू केला, त्यात त्यांना पुन्हा लाखांचा फटका बसला. मात्र त्यांनी मोठ्या जिद्दीने हार न मानता पूर्ण अभ्यासानिशी ‘गोगटे सॉल्ट्स अँड केमिकल्स’ हा एक महत्त्वाकांक्षी संकल्पित प्रकल्पाचा गोगटे सॉल्ट्स हा विभाग मुंबई उपनगराबाहेर असणाऱ्या नालासोपारा रेल्वे स्टेशनजवळ सुरू केला. अभिमानाची गोष्ट म्हणजे ती मिठागरे महाराष्ट्रातील सर्वात मोठी व तंत्रदृष्टया परिपूर्ण अशी ठरली. त्या मिठागरामुळे त्यांची भरभराट झाली. त्यातून त्यांनी तारापूरला ‘गोगटे स्टील ‘आणि चंद्रपूर जिल्ह्यात ‘गोगटे पेपर मिल’ हे उद्योग सुरू केले. एका उद्योगधंद्यातून दुसरा उपधंदा-जोडधंदा अशी उद्योगधंद्याची साखळीच त्यांनी निर्माण केली. जिद्द, अविरत प्रयत्न, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा यांच्या बळावरच ते हे सारे करू शकले आणि एक मोठे उद्योजक बनू शकले. म्हणूनच उद्योगक्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. तरुण वयात मोठा उद्योगसमूह स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आणि तेच ध्येय मनात ठेवून सातत्याने चाळीस वर्षं अहोरात्र मेहनत घेऊन गोगटे पेपर्स, गोगटे सॉल्ट, गोगटे इंजिनिअरिंग अँड मेटल्स लि., गोगटे स्टील इत्यादी विविध उद्योग रावसाहेबांनी उभे केले.

या सर्व उद्योगधंद्यांतून त्यांना यश मिळाले ते औद्योगिक परिस्थिती अजमाविण्याची, त्या त्या क्षेत्रातील चढउताराचा अभ्यास करण्याची व योग्य निर्णय घेण्याची बौद्धिक शक्ती त्यांच्याकडे होती. शिवाय रावसाहेबांपाशी त्यांच्या उद्योगात प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टींत गोगटे या आडनावाबद्दलचा जाज्वल्य अभिमान ही एक जबरदस्त शक्ती होती. त्यांनी उभ्या केलेल्या महत्त्वाच्या उद्योगांच्या नावात प्रारंभी गोगटे हे नाव कटाक्षाने जोडलेले आढळते. त्यामुळेच एक ब्राह्मण आडनाव महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे दिसू लागले. रावसाहेबांनी उभ्या केलेल्या सर्व व्यवसायांत त्यांना यश जरी मिळाले होते, तरी त्याबरोबर अनंत अडचणीही त्यांना आल्या होत्या. ह्या अडचणी कधी आर्थिक स्वरूपाच्या असत, तर कधी मानसिक स्वरूपाच्या. मात्र अत्यंत समतोल वृत्तीने त्यांनी सर्वांना ताँड दिले. कामासाठी आज इथे, तर उद्या तिथे असे सारखे त्यांना करावे लागे. त्यातूनही त्यांनी आपल्या कुटुंबीयांचे स्वास्थ्य बिघडू दिले नाही. ते कायम कुटुंबवत्सल राहिले. बघता बघता ते उत्कर्षाची पायरी चढत गेले. उद्योग करताना त्या क्षेत्रातील एखादी पदवी, अभ्यासक्रम खूप आवश्यक असतो, हे त्यांना नेहमी पटायचे. कारण व्यवसाय म्हटलं की रीसर्च, थिअरी आणि त्यातला सराव खूप आवश्यक असतो. त्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं की आपल्याकडे व्यवसायासंबंधी पदवी असती, तर आपण आणखीन प्रगती करू शकलो असतो आणि व्यवसायातले टक्केटोणपे तरी निश्चित कमी झाले असते. व्यवसायात भांडवल उभं करणं आणि नव्या उद्योगासाठी ते डोळसपणे गुंतवणं हाच ऐश्वर्याचा सर्वात चांगला विनियोग आहे, या मताचे ते होते. पुढे त्यांना त्यांच्या कर्तृत्वावरच बेळगाव आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्षपद मिळाले. त्यांची कर्तबगारी देशातील बड्या उद्योगपतींना आणि सरकारलाही पटली. त्यानंतर त्यांनी ‘टाटा’च्या स्वदेशी मिलचे संचालक, राष्ट्रीकृत ‘पंजाब नॅशनल बँके’चे डायरेक्टर, ‘महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरश’चे डायरेक्टर अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आणि आपला असा ठसा पूर्ण देशात उमटवला.

यशवंतराव चव्हाण हे त्यांचे शाळेतील वर्गमित्र होते. त्यांच्याशी त्याची मैत्री शेवटपर्यंत अखंड राहिली. त्याशिवाय मोरारजी देसाई, बाळासाहेब खेर, अण्णासाहेब लट्ठे या जवळच्या मित्रांमुळे राजकारणात जाण्याची रावसाहेबांना ऊर्मी यायची, मात्र यशवंतरावांच्या सल्ल्याने उद्योग- क्षेत्रातच टिकून राहिले. मात्र त्यांनी राजकारणात भाग न घेता प्रसंगोपात सर्वच राजकीय पक्षांना अर्थसाहाय्य केले. माणसाजवळ संपत्ती जरी असली, तरी समाजाचाही त्यात काही भाग असतो, ही जाणीव त्यामागे होती. मात्र हे अर्थसाहाय्य करताना त्यांनी राजकारणी लोकांकडून कोणतीही अपेक्षा मात्र ठेवली नव्हती. नाहीतर ‘आवळा देऊन कोहळा’ काढणाऱ्यांची संख्या कमी नसते. राजकीय पक्षांना, होतकरू व्यक्तींना, विविध सामाजिक संस्थांना दान देताना ते दान त्यांनी गुप्त, ‘उपकार कधी न बोले’ या स्वरूपाचे ठेवल्याने त्याचे मोल करणे कठीण आहे.
वैयक्तिक जीवनात रावसाहेब रसिक होते. त्यांना वीररसातील नाटकं खूप आवडायची. शिवाय त्यांना शास्त्रीय संगीतही आवडायचे. बालगंधर्वांच्या मुंबईत झालेल्या दैवदुर्लभ सत्काराचे पौरोहित्य रावसाहेबांनी केले होते. हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, सी रामचंद्र, सुवासिनी मुळगावकर ह्या व्यक्ती रावसाहेबांच्या निकटवर्तीयांतील होत्या. व्यावसायिक जीवनाची सुरुवात त्यांनी ऑनेस्टी, सिन्सिरिटी, इंडस्ट्री अँड कॅरेक्टर या चौसूत्रावर केली. म्हणूनच ते इतके यश मिळूनही चौकटीबाहेर तसूभरही सरकले नाहीत. त्यातच त्यांच्या जीवनाचे यश आणि रहस्य सामावले आहे. म्हणूनच ते वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनात यशवंत व भाग्यवंत ठरले.

रावसाहेब गोगटे यांचे निधन २६ फेब्रुवारी २००० रोजी झाले.

मनोज आचार्य

संकलन : संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..