नवीन लेखन...

क्रांतिवीर देशभक्त भार्गव महादेव उर्फ बाबा फाटक

क्रांतिवीर देशभक्त बाबा फाटक यांचा जन्म दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिक्षुकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. वडील महादेव उर्फ बाळशास्त्री, आई गंगा व भावंडे कै. वेणू, गोपाळ,वासुदेव व विष्णू ही सगळीच मंडळी देशप्रेमी. नाशिक येथे इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा खून करणारे अनंत कान्हेरे बाळशास्त्रीचें स्नेही मित्र. टिळकांवर तर फाटक घराण्याची अपार श्रद्धा. त्यामुळे बाबांच्या मनावर लहानपणीच देशभक्तीचे व स्वातंत्र्य संग्रामाचे संस्कार झाले आणि त्यांच्या कार्याला सदैव पाठिंबाही मिळाला.

बाबांचे शिक्षण इंग्रजी मधून १ली पर्यंत राष्ट्रीय शाळेत झाले. टिळक गेल्यावर दापोलीकरांनी टिळक विद्यालय ही राष्ट्रीय शाळा सुरु केली होती, जी केवळ पाच वर्षे चालली आणि बंद पडली. बाबांना अभ्यास खरतर मनापासून आवडत न्हवता; पण टिळकांच्या नावाने शाळा सुरु झाल्याने त्यांनी शाळेत जाण्याचा निर्णय घेतला.

पुढे धार्मिक, अध्यात्मिक व राजकीय शिक्षण वाई येथील त्यांचे गुरु परमपूज्य स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या सान्निध्यात राहून घेतले आणि संस्कृतचे अध्ययन काशीस जाऊन केले. १९३० साली प्रभातफेरी व मिठाच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि त्यात बाबांना २ महिने तुरुंगवास व २० रु. दंडाची शिक्षा झाली. हा त्यांचा पहिला तुरुंगवास. त्यावेळी त्यांचे वय साधारणतः २०-२२ वर्षांचे होते. हा सत्याग्रह सहभाग त्यांनी वाईतील ‘नारायणशास्त्री मराठे’ यांच्या मार्गदर्शनाखाली राहून घेतला होता. नारायणशास्त्री गांधीचे कट्टर अनुयायी होते. म्हणूनच गांधी विचारांचा पगडा बाबांवर देखील बसला .

२८ डिसेंबर १९३१ रोजी बाबांना गांधींचे प्रथम दर्शन घेण्याचा योग आला. त्यावेळी बाबा मुंबईत होते आणि नेमके गांधीजी इंग्लंडहून मुंबईस परतले होते. अपोलो बंदरावर एका उंच झाडावर चढून त्यांनी गांधीचे दर्शन घेतले. त्यानंतर आझाद मैदानावर जाऊन गांधीची सभा ऐकली. गांधीच्या साधेपणाने आणि प्रभावी भाषणाने बाबा भारावून गेले. १९३२ मध्ये ब्रिटिश सरकार विरोधी प्रचार व गव्हर्नर विरुद्ध बुलेटिन्स वाटल्याबद्दल अनुक्रमे ६ महिने सक्तमजुरी व १०० रु. दंड आणि १ वर्ष सक्तमजुरी व १०० रु. दंड अशी शिक्षा झाली. या शिक्षेदरम्यान रत्नागिरी तुरुंगात त्यांची सेनापती बापट व आप्पासाहेब पटवर्धन यांच्याशी भेट झाली. त्यांच्या सहवासात राहून बाबांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले.. बाबा तिथे आप्पासाहेबांसोबत संडास सफाई व मैला वाहण्याचे कार्य करीत होते.

त्यातून भंगी काम हे हीन कार्य नसून किती श्रेष्ठ कार्य आहे हे बाबांना उमजले. १९४० साली युद्ध विरोधी प्रचार केल्याबद्दल १ वर्ष १० महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. १९४२ साली बेळगाव तुरुंगात स्थानबद्ध करून ठेवण्यात आले. त्यानंतर मात्र बाबांनी केवळ अहिंसक लढाई न लढता सशस्त्र क्रांती करायचे ठरवले. त्यांनी पोस्टाच्या तारा तोडल्या, टपाल लुटले, पिस्तुले, तलवारी, बॉम्बचा संग्रह केला. त्यासाठी त्यांना ७ वर्षांची शिक्षा झाली. असे वारंवार खटले व तुरुंगवास यामुळे फाटकांच्या घरातील जवळपास सर्व पैसा संपला. दंडाची वसुली करण्यासाठी ब्रिटिश सरकारने मालमत्ता व घरातील भांड्या-कुंड्यांचा लिलाव केला. तरीही देशसेवेचे असिधाराव्रत घेतलेले बाबा चळवळीचे काम वाटेल ती किंमत मोजून करायला तयार होते. ते वेषांतर वगैरे करून चळवळीचे काम करत असल्याने सरकारने त्यांना पकडण्यासाठी ५०००रु. चे बक्षीस ठेवले होते. बाबांना पू. सेनापती बापट, पू. अप्पासाहेब पटवर्धन, पू. विनोबाजी. पू. साने गुरुजी, देशभक्त नानासाहेब गोरे, देशभक्त एस. एम. जोशी अश्या थोरांचा सहवास लाभला.

त्यांच्या मार्गदर्शनाने उच्चवर्णीय असून देखील मैला वाहणे, मृत जनावरांची कातडी काढणे, कातडी कमावणे, त्यापासून चपला व चामड्याच्या वस्तू बनवणे अशी हलक्या प्रतीची व गलिच्छ मानली जाणारी कामे त्यांनी केली. दापोलीत गोसेवा चर्मालय सुरु केले. बाबा हे पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते होते म्हणून त्यांनी जातीभेद पाळला नाही, अंधश्रद्धा पाळल्या नाहीत. अडखळला जाऊन ते हरिजनांत राहिले. त्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून विहीर खणली. हरिजनांचे केस न्हावी कापत नाही म्हणून न्हाव्यासमोर आपली मान कधीच वाकवली नाही; स्वतःचे केस स्वतः कापले. पिंजारीकाम हे केवळ मुस्लिम समाजाचे मानले जात असल्यामुळे त्याचे प्रशिक्षण घेतले व दारावर ‘कोकणचा पिंजारी’ अशी पाटी लावली.

दापोलीतील आणि पर्यायी देशातील अधिकाधिक जमीन लागवडी खाली यावी यासाठी बरेच प्रयत्न केले. रासायनिक खताला विरोध करून सेंद्रिय खतांचा अवलंब व्हावा यासाठी अथक परिश्रम घेतले. दापोलीतील ए. जी.हायस्कुल चे नाव लोकमान्य टिळक व्हावे यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. अशा प्रकारे त्यांनी स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर सुराज्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले.’ स्वतःच्या घामाचं अमृत शिंपून नरकाचं तीर्थ बनवणारा हा व्यक्ती’ म्हणून सेनापती बापट बाबांना ‘नरकतीर्थ’ म्हणत असत. संघर्षमय जीवन जगताना बाबांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही, भय बाळगले नाही, प्रत्येक आव्हानांना सडेतोड सामोरे गेले, परंतु गांधीजींचा खून आणि साने गुरुजींची आत्महत्या त्यांच्या इतकी जिव्हारी लागलेली की, बाबांच्या मनात आत्महत्येचा विचार डोकावला होता.

त्यावेळी सेनापती बापट, विनोबा भावे व नारायणशात्रीनी त्यांची समजूत काढली. बाबांनी ती दोन दुःखे मोठ्या कष्टाने पचवली. सेवाधर्म चालू ठेवला. स्वातंत्र्यप्राप्ती साठी बाबांनी केलेली धडपड आणि त्यांचे समाजसुधारणेचे काम लोकांच्या लक्षात असावे म्हणून कवी वसंत (आबा ) विष्णुशात्री पणशीकर यांनी बाबांवर कविता लिहिली. द्वारकानाथ लेले यांनी ‘एकला चलो रे’ ही कादंबरी लिहिली आणि साने गुरुजींनी देखील काहीस्तुतीपर लेख लिहले होते. १५ ऑगस्ट १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते बाबांना ‘ताम्रपट व सन्मानपत्र’ मिळाले. त्यांना ‘दलितमित्र’ म्हणून गौरविण्यात आले. या थोर देशभक्त व समाजसुधारकांचे ५ सप्टेंबर १९८१ साली निधन झाले.

-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..