नवीन लेखन...

वीरगाथा – मेजर प्रदीप ताथवडे

समाजसेवा आणि देशसेवेच्या प्रेरणेने तसेच खाकी वर्दीच्या आकर्षणाने अनेक धाडसी तरुण पोलीस दलात आणि सैन्यात दाखल होत असतात. महाराष्ट्रातून अनेक शूरवीर तरुण पोलीस आणि सैन्यदलात भरती होऊन विशेष उल्लेखनीय सेवा देत असतात. त्यातील काहींनी भारतमातेच्या संरक्षणासाठी प्राणार्पणही केले आहे. यातीलच एक विशेष नाव म्हणजे ‘मेजर प्रदीप रामचंद्र ताथवडे’.

प्रदीप ताथवडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर पाबळ गावचे रहिवासी. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९६३ रोजी श्री रामचंद्र कृष्णराव व श्रीमती कुसुम ताथवडे यांच्या पोटी झाला. प्रदीप यांना मिलिंद हे मोठे बंधू आणि सुषमा ही धाकटी बहीण होती. दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा अनुभव असलेल्या मामांकडून त्यांना सैन्याधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. शाळेत अभ्यासात बऱ्यापैकी असणारे प्रदीप कमी बोलत पण जे बोलत ते विचारपूर्वक असे. त्यांच्या स्वभावात धाडस, विनम्रता, जिज्ञासा, चिकाटी, करारीपणा, रांगडेपणा या गुणवैशिषट्यांचा अनोखा संगम होता. गावातल्या शाळेतील प्राथमिक शिक्षणानंतर घरच्यांच्या संमतीने ते पाचवीपासून साताऱ्याच्या सैनिकी शाळेत दाखल झाले आणि त्यांचा सैन्यात दाखल होण्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास चालू झाला.

१९७४ ते १९८० या काळात त्यांच्या लष्करी जीवनाचा पाया या शाळेत घातला गेला. शाळेत त्यांना अभ्यासाबरोबरच सर्व खेळांत भाग घेणे आवडायचे. फुटबॉल हा त्यांचा सर्वात आवडीचा खेळ होता आणि ट्रेकिंगची विशेष आवड होती. अकरावीनंतर त्यांची पुणे, खडकवासला येथील प्रतिष्ठेच्या नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये निवड झाली. तेथील तीन वर्षांचा खडतर अभ्यासक्रम उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेहराडून येथील ‘मिलिटरी अकॅडेमी’ मध्ये प्रवेश घेतला. एक वर्षांनंतर तेथील उच्च दर्जाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना जून १९८४ मध्ये सैन्यात कमिशन्ड ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळाली आणि त्यांनी लहानपणापासून बघितलेले सैन्याधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

त्यांची पहिली पोस्टिंग ‘जम्मू काश्मीर लाइट इनफन्ट्री रेजिमेंट’मध्ये झाली. ही रेजिमेंट निडर वृत्तीचे सैनिक आणि त्यांनी लढलेल्या अनेक विजयी लढाया यांसाठी ओळखली जाते. तिथली पोस्टिंग प्रदीपना बरेच काही शिकवणारी आणि त्यांच्या धाडसी स्वभावाला खतपाणी घालणारी होती. त्यानंतर त्यांची सियाचीन, नागरोटा, पुंछ, पतियाला, दिंडीगुल, अंदमान निकोबार, दोडा, राजस्थान अश्या अनेक ठिकाणी पोस्टिंग किंवा प्रशिक्षण निमित्ताने भ्रमंती झाली. १९८७ साली भारताची सियाचीनवरील ताब्यावरून पाकिस्तानशी चकमक झडली आणि भारताने शेवटी सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण मिळवले. सियाचीनमधील पोस्टिंग ही अतिशय आव्हानात्मक मानली जाते. कारण ही जगातली सर्वात उंच रणभूमी आहे आणि हिवाळ्यात तेथील तापमान उणे ६० अंश एवढे खाली जाऊ शकते. याठिकाणी काम केल्याचा अभिमान प्रदीपना होता परंतु तेथील प्रत्यक्ष युद्धात सहभागी होऊन पराक्रम गाजवता न आल्याची खंत ते अनेकदा मित्रपरिवारात बोलून दाखवत. जिथे नियुक्ती असे तिथे आपल्या सैनिकी कर्तव्याबरोबरच सामाजिक उपक्रम आणि क्रीडास्पर्धांमध्ये त्यांचा उत्साही सहभाग असे.

सन २००० पर्यंत १६ वर्षांच्या सेवेनंतर त्यांची उत्कृष्ट सेवेमुळे मेजर पदापर्यंत पदोन्नती झाली. या कालावधीत त्यांना अनेक सैनिकी कारवायांचा अनुभव आला. त्यातील प्रमुख म्हणजे १९९९ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांच्या तुकडीने हिजबुल मुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जून २००० मध्ये प्रदीप यांची तुकडी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात तैनात करण्यात आली होती. तेथे सातत्याने दहशतवाद्यांचा उपद्रव असल्याने प्रदीप यांच्या तुकडीला कायम युद्धजन्य परिस्थितीत वावरावे लागे. अश्यात १७ जूनला प्रदीप यांना गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळालीकी पाकिस्तानातून आलेला दहशतवाद्यांचा एक गट पूंछ जिल्ह्यातील शहापूर गावात लपला आहे. प्रदीप त्यावेळी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी अतिरेक्यांविरोधात तात्काळ मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला.

प्रदीप पथकाचे नेतृत्व करत लगेचच संशयित भागात पोहोचले. तिथे एका झोपडीत पाच दहशतवादी लपून बसले होते. त्या झोपडीभोवती प्रदीप यांच्या तुकडीने घेराव घातला आणि दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यानंतर प्रदीप आणि सहकाऱ्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला. लगेचच पालिकडूनही जोरदार गोळीबार सुरू झाला. या धुमश्चक्रीत तीन अतिरेकी पळून जाताना दिसले. प्रदीपनी लगेच त्या दिशेने फायरिंग केले आणि दोन अतिरेकी ठार झाले. तिसरा मात्र कुठेतरी निसटला होता, त्याचा शोध घेत असतानाच तो पाठीमागून आला आणि त्याने मेजर ताथवडे यांना पॉईंट ब्लॅंक रेंजवर गोळ्या घातल्या. त्यांच्या पोटात आणि मांडीवर गोळ्या लागल्या तरी ते प्रतिकार करत राहिले. एवढ्यात मेजरच्या सहकाऱ्यांना तिसऱ्या अतिरेक्याला ठार करण्यात त्याला यश आले. तोपर्यंत प्रदीपना प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. पण सगळे दहशतवादी मारले किंवा पकडले जाईपर्यंत आपल्या लोकांना येथेच थांबण्याचा इशारा देत, त्यांनी कारवाईचे संचालन सुरूच ठेवले. जखमी असूनही त्यांनी आपल्या जवानांच्या सुरक्षिततेची खात्री केली. नंतर जेव्हा उर्वरित दहशतवादी मारले गेले तेव्हा इतर सैनिकांनी मेजरना फिल्ड अॅम्ब्युलन्स युनिटमध्ये दाखल केले. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने भारतमातेचा हा निडर सुपुत्र वीरगतीस प्राप्त झाला.

हुतात्मा ताथवडे यांनी अत्यंत उच्च दर्जाचे धाडस व नेतृत्व दाखवून भारतीय सैन्याच्या थोर परंपरेचे पालन करत देशसेवेत आपले प्राण अर्पण केले. मेजर ताथवडे यांचे सहकारी मेजर शॉन ओ’ब्रायन त्यांचा मृतदेह घेऊन पुण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा प्रतिष्ठितांसह सामान्यजनांची मोठी गर्दी उसळली. प्रदीप यांचे मोठे बंधू मिलिंद यांनी प्रदीपजींचा एक वर्षाचा मुलगा सागर याच्यासोबत अंत्यसंस्कार केले तेव्हा साऱ्याच उपस्थितांचे डोळे पाणावले. हुतात्मा प्रदीपना त्यांच्या असाधारण शौर्य, अतुलनीय लढाऊ वृत्ती आणि सर्वोच्च बलिदानासाठी शांततेच्या काळातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार “कीर्ती चक्र” मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्याचा स्वीकार त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते केला. प्रदीपजींच्या सन्मानार्थ पुण्यातील कर्वेनगर भागात एका सार्वजनिक उद्यानाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. बागेच्या प्रवेशद्वारावर मेजर ताथवडे यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. पुणे महापालिकेने एका मोक्याच्या ठिकाणच्या बसथांब्यालादेखील त्यांचे नाव दिले आहे.

पुण्यात कोथरूडमध्ये त्यांचे आधी स्मारक होते, मात्र त्यांच्या मूळ गावातही स्मारक व्हावे अशी गावकऱ्यांची इच्छा होती. त्यानुसार १८ डिसेंबर २०२० मध्ये केंदूर येथे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी सैनिक आणि ग्रामस्थ, पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांची वीरपत्नी लीनता, मुलगा सागर, मुलगी भाग्यश्री, आई-वडील, भाऊ बहीण असा सगळा परिवार उपस्थित होता. शिवाय त्यांचे सैन्यातले काही सहकारी आणि शाळा, कॉलेज, शेजारपाजारचे अनेक मित्रही हजर होते. पोलीस, सैन्य अश्या सर्व प्रकारच्या सशस्त्र दलातील वीरांमुळेच आमच्यासारखे सामान्यजन दिवाळीसारखे सर्व सण समारंभ वर्षभर निश्चिंतपणे साजरे करू शकतो. यासाठी सशस्त्र दलांतील सर्व बंधू-भगिनींचे त्रिवार आभार. हुतात्मा प्रदीप यांच्या श्रेष्ठ बलिदानाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने भारतमातेच्या आणि महाराष्ट्राच्या या महान सुपुत्राचे कृतज्ञ स्मरण.

जय हिंद !!

(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)

गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 32 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना अनेक दिवाळी अंक, हिंदुस्थान पोस्ट साप्ताहिक यांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..