
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले ओडिशा राज्य म्हणजे इतिहास, परंपरा, कला, आध्यात्म आणि निसर्गाचा अद्भुत संगम. बंगालच्या उपसागरात मिसळणारा वारा, हजारो वर्षांची वारसा जपणारी मंदिरे, आदिवासी लोक-संस्कृती आणि समुद्र किनाऱ्यांची शांतता – असे हे ओडिशा पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देणारे गंतव्य आहे.
या भागात आपण शोधूया ओडिशाच्या चार महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांची सुंदर ओळख – पुरी, भुवनेश्वर, गोपाळपूर आणि चिल्का सरोवर.
१) पुरी – श्रीजगन्नाथाची नगरी

पुरीचा उल्लेख झाला, की पहिल्यांदा आठवण होते जगन्नाथ मंदिराची. भारतातील चार धामांपैकी एक, हे मंदिर शतकानुशतके लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दरवर्षी होणारी रथयात्रा ही भारतातील सर्वात भव्य आणि पवित्र उत्सवांपैकी एक मानली जाते. भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या विख्यात मूर्ती हजारो भक्तांच्या उपस्थितीत मंदिरातून बाहेर काढल्या जातात आणि रस्त्यांवरून ज्या भव्य रथावरून त्यांची मिरवणूक होते, तो अविस्मरणीय क्षण असतो.
पुरीचा समुद्रकिनारा हा पर्यटकांसाठी एक वेगळाच आनंद. सोन्यासारख्या मऊ वाळूवरून पसरणारा अथांग सागर आणि मंद वारा, प्रवाशांसाठी मन:शांतीचा सोहळा असतो.
थोड्याच अंतरावर असलेला कोणार्क सूर्य मंदिर म्हणजे दगडात कोरलेली कविता. रथाच्या स्वरूपात बांधलेले हे युनेस्को वारसास्थळ भारतीय शिल्पकलेचे अपूर्व उदाहरण आहे.
२) भुवनेश्वर – मंदिरांचे शहर

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर हे “मंदिरांचे शहर” म्हणून ओळखले जाते. येथे शेकडो प्राचीन मंदिरे असून त्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे लिंगराज मंदिर. शांत वातावरण आणि सुंदर वास्तु कला यामुळे येथे ध्यानधारणा आणि अध्यात्मिक चिंतनासाठी भक्तांची गर्दी असते.
भुवनेश्वरच्या जवळच असलेले नंदनकानन राष्ट्रीय उद्यान हे वन्यजीव प्रेमींसाठी स्वर्गच. पांढरे वाघ, दुर्मीळ पक्षी आणि विविध प्रजातींची फुले व वृक्ष येथे आढळतात.
३) गोपाळपूर – शांततेचा समुद्रकिनारा

पुरी आणि भुवनेश्वरच्या गर्दीनंतर प्रवासाला थोडा ब्रेक देण्यासाठी गोपाळपूर-ऑन-सी हा सर्वोत्तम पर्याय. येथील किनारा शांत, शिस्तबद्ध आणि निसर्गाच्या जवळ जाणारा आहे. हा किनारा olive ridley turtles या दुर्मिळ कासवांच्या प्रजातींसाठीही प्रसिध्द आहे. दरवर्षी हजारो कासवे येथे अंडी घालण्यासाठी येतात. निसर्गातील हा चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून अभ्यासक आणि निसर्गप्रेमी ओडिशाकडे आकर्षित होतात.
४) चिल्का सरोवर – पक्षी आणि जलजीवनाचे राज्य

चिल्का सरोवर हे आशियातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचं सरोवर असून, पक्षी निरीक्षण करणाऱ्यांसाठी हे स्वर्ग आहे. हिवाळ्यात येथे येणारे स्थलांतरित पक्षी फ्लेमिंगो, डॉल्फिनचे खेळ पाहणे आणि बोटींग हा अनुभव मनात कायमचा घर करून जातो.
येथील स्थानिक मासेमारी संस्कृती आणि मंदिरांचे अवशेष या परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्पर्श देतात.
सांगता
ओडिशा हे फक्त एक पर्यटन ठिकाण नाही तर एक संपूर्ण अनुभव आहे, जेथे धर्म, इतिहास, समुद्राची शांतता, कला आणि निसर्ग एकमेकांत मिसळून पर्यटकांना समृद्ध करतात.
मार्मोरिस प्रवासगाथाच्या पुढील भागात आपण आणखीन एका अद्भुत गंतव्याची सफर करू. तोपर्यंत प्रवास करत राहा, शोधत राहा.
लेखिका: नीलम पुजारी
संस्थापक – Marmoris Tours
संपर्क: +91- 8237810590
ई-मेल: info@marmoristours.com


Leave a Reply