नवीन लेखन...

इंद्रधनुषी रंग नदीचे…

पावसाळा संपत आला की पक्षपंधरवाड्याची सुरुवात होते.खेड्यापाडयातून पितरांच्या सर्वत्र वावरणा-या भुकेलेल्या आत्म्यांना दरवर्षी पिंडदान करून तृप्त करण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.शेवटी ही पिंडे नदीकाठावर कावळ्याच्या प्रतिक्षेत ठेवली जातात किंवा नदीच्या पाण्यात मासे खातील यासाठी अलगद सोडली जातात.

त्यानंतर सुरु होते ती घराची स्वच्छता व शुद्धता करणे,घराच्या भिंती मातीच्याच असायच्या त्या मातीनेच सारवून स्वच्छ करायच्या.पावसाळाभर पावसाने धिंगाणा घातलेला असायचा.पावसांचे पाणी भिंतीवरून ओघळून त्या खराब दिसू लागायच्या.त्यांना मायेने सारवल्यावर लख्खं होऊन जायच्या.सारवण्यासाठी पांढरी माती पाण्यात कालवली जायची तिचा एक सुवास संपूर्ण घ्रभर पसरायचा.या घमघमणा-या मातीच्या सुगंधाने घर शुद्ध आणि स्वच्छ होत असे.त्यासाठीच तर पोरंसोरं शाळा बुडवून सारवतांना नाकातोंडावर, हातावर मातीचे थेंब झेलत आईला मदत करु लागायचे.मायेने भिंतीवरुन पोतरं फिरवतांना आईच्या नाका-तोंडावर सगळे मातीचे थेंब उडालेले दिसंत असले तरी श्रमातून तिचा चेहरा उजळलेला असायचा.काम करत आमचेही नाक-तोंड थेंबानी भरुन जाई अशा कामात आम्हा मुलांना खूप मजा वाटायची.आज हे सारे जुने दिवस आठवले की मनाला हलके वाटू लागते. त्यावेळी पाण्यात खेळणे,मातीत हात भरवणे यामधली गंमत आजकाल तासनतास मोबाईलवर गेम खेळत बसणा-यांना कधीच नाही कळणार.ज्यांनी हे दिवस अनुभवले खरंच त्यांचे जीवन लख्खं झाले आहे.

भिंती सारवतांना मातीचे थेंब उडाल्यामुळे तसेच घरात सतत पाणी गळून कळकट मळकट झालेली मोठमोठी भांडी नदीवर नेऊन घासायलाही खूप मजा यायची.पोरीसोरी या कामात हातभार लावायच्या.नदीच्या खळखळ वाहणा-या पाण्याच्या धारेबरोबर तांब्या-पितळेच्या भांड्यानी अशी काही कात टाकलेली असायची की त्याची चमक दूरवरुनच नजरेत भरायची.

यालाच दसरा काढणे हा शब्दप्रयोग अजूनही प्रचलित आहे.खरं तर या पाठीमागे धार्मिक-पारंपारिक तत्त्वांपेक्षाही काही शास्त्रीय गोष्टी देखील नक्कीच आहेत.त्यातून मिळणारा आनंद तर आणखी वेगळीच पर्वणी या सगळ्या गोष्टींसाठी नदीच जवळ धावून यायची.कोणीही असो कसाही असो नदीनं कधी भेदभाव नाही केला.वर्षानुवर्षे ती वाहतच आलेली आहे.अजूनही वाहतेच आहे.सर्वांच्या जीवनात इंद्रधनुषी रंग भरतेच आहे.
पावसाळाभर उन फारसे नसल्यामुळे ओलसर हवेने नरम पडलेल्या कपड्यांना,अंथरूण पांघरूणांना देखील कुबट वास यायचा.पावसाळा थांबला की अशी सर्वांची कपडे धुवायची लगबग सुरु व्हायची की आख्खी नदी बायापोरांनी दूरपर्यंत भरुन जायची.जणू काही नदीपात्राजवळ जत्राच भरलेली असायची.घरातील अंथरुणं-पांघरूणं,गोधड्या-घोंगड्यांसह,गाद्या-उशांच्याखोळा नदीच्या खळाळत्या पाण्यात मांडलेल्या दगडावर अपटू-आपटू धुतल्या जायच्या.घरातल्या पोरांबाळांसह ह्या दिवसात नदीवर भली मोठी गर्दी व्हायची.दोन्हीकडील टोक धरून अंथरूणं, पांघरूणं,गोधडी पाण्यात बुडवून गोल गोल फिरवून पिळायला आम्हाला खूप गंमत वाटायची.घट्टं पिळलेले कपडे नदी जवळच्या वाळूवर,गवतावर वाळत घातले जायचे.रंगीबेरंगी वाळत घातलेले साड्या,लुगडे,गोधडे,चादरी यामुळे नदीच्या भोवताली जणू इंद्रधनुष्याचे रंग पसरायचे. आजही नदी पाहिली की डोळ्यासमोर ते दृश्य उभे राहते की काठावरील वाळूवर वाळत घातलेल्या रंगीबेरंगी कपडयांमुळे नदीचे अवघे रंग इंद्रधनुषी होऊन जायचे.पाहतांना मन हरखून जायचे.आजूबाजूला लव्हाळ्याची हिरवळ पसरलेली असायची. वाहत्या पाण्यासोबत पोरेसोरे खेळायची.नदीचे पाणी तेंव्हा खळखळत असायचे,एवढी घाणही पाण्यात पूर्वी सोडलेली नव्हती.नितळ पाण्यातून तळाला बसलेले शंख, शिपले,वेगवेगळ्या रंगांच्या गारगोट्याही चमकत रहायच्या पाण्याखाली…

आज मात्र नदी बदलून गेली आहे.नदीचे हे रंग बेरंग होतानां पाहून मनाच्या आनंदणा-या स्मित रेषा पुसट होऊन पांढ-याफट्क होत चालल्या आहेत.पूर्वीचे नदीचे रुप किती मनोहारी असायचे.नदी म्हणजे सौंदर्याची खाण असायची,बालगोपाळांना वात्सल्याने अंगाखांद्यावर मिरवत नेणारे पाणीदार ठाण असायची.प्रत्येकाला तिची जाण असायची नव्हे तीच सर्वांना जीव की प्राण असायची म्हणूनच तर तिच्या मध्ये पूर्वी एवढी घाणही नसायची.लोक नदीमध्ये दिवे पौर्णिमेला नदीची पूजा करुन दिवे सोडायचे.नदीलाच देव मानायचे.अडीपडीला नदीच यायची मदतीला लोकांच्या !
नदी म्हणजे खरोखर काय असते ! तहानेने व्याकूळ झालेल्या वासराची गाय असते.सुपीक मातीचा घास वाहून आणणारी पिकांची माय असते.मातकट वासाच्या गढूळलेल्या रेंद्यावरची दुधाळ अशी साय असते. कधी संपूर्ण काठ स्वच्छ करणारा उपाय असते.तर कधी पात्रात भरुन संथ होऊन शांतपणे वाहणारा आनंदमयी अभिप्राय असते.

नदी म्हणजे पसरलेल्या वाळूचा लांबच लांब पट्टा किंवा हिरव्या हिरव्या लव्हाळ्यांनी वेढलेला वट्टा.नदी म्हणजे सरकत्या जिन्यासारखा लांबचलांब वेलबुट्टा किंवा चिंचेला वळसा घालणारा मातीचा कट्टा.नदी म्हणजे तर असतो हिरवाईच्या अंगावर उमटलेला विलक्षण असा चट्टा.थोडा खट्टा थोडा मिठ्ठा !

नदीच असते जन्म आणि नदीच मृत्यू असते,अख्खे जीवनसुद्धा असते नदीच ! पूर्वी नदीमुळेच तुमच्या आमच्या जीवनाला उतरायला घाट मिळायचे.कधी वाहणारे पाण्याचे पाट मिळायचे,तर कधी नदीला वाहत येणारे फाटे सतराशे साठ येऊन मिळायचे.कुठे रुप नदीचे सपाट असायचे तर कुठे तिचे रुप रौद्र आणि आफाट असायचे.

डॉ.संतोष सेलूकर,परभणी
मो.7709515110
Mail- Santosh.selukar@gmail.com

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 26 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..