(पूर्वप्रसिद्धी – ‘अग्रलेख’ दिवाळी अंक २०२४)
हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या बेहलोल खानाच्या शेकडो सैनिकांच्या फौजेवर, आपल्या जीवाची पर्वा न करता अवघ्या सहा सैनिकांसह चालून जाणारे प्रतापराव गुजर यांची शौर्यगाथा मराठीजनांना पिढ्यानपिढ्या रोमांचित व प्रेरित करत आली आहे. ह्या वेड्या पराक्रमावर कुसुमाग्रजांनी रचलेल्या “म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात” या वीररसयुक्त गीताने तर ही वीरगाथा अजरामर केली आहे. आत्ताच्या आधुनिक युगातही असे काही वेडे वीर जन्म घेतात जे देशप्रेम आणि पराक्रमाच्या वेडाने भारित होऊन, आपल्यासारख्या जनसामान्यांच्या संरक्षणासाठी शत्रूच्या गुहेत निधड्या छातीने चालत जातात. असाच एक आपल्या शेजारच्या कानडी मुलूखातील कोंकणी-मराठी योद्धा म्हणजे ‘लेफ्टनंट कर्नल श्री. अजित भांडारकर’.
मुंबईत एका कोंकणी कुटुंबात अजित भांडारकर यांचा जन्म ३१ डिसेंबर १९६० रोजी श्री. वासुदेव आणि सौ.शकुंतला भांडारकर यांच्या पोटी झाला. अजित यांना दोन मोठे भाऊ होते आणि त्यापैकी एक ‘अरुण’ यांनी देखील लष्करात कर्नल म्हणून कर्तव्य बजावले. अजित यांचे बालपण बंगळुरू येथे गेले, जेथे त्यांना सैनिकी जीवनाची ओढ निर्माण झाली. नवव्या वर्षी ते जुन्या शाळेतून विजापूरच्या ‘सैनिकी शाळेत’ दाखल झाले, जिथे योग्य पारख करून सर्वोत्कृष्ट ९० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाई. येथेच त्यांच्या भावी लष्करी जीवनाची जडणघडण झाली. शाळेत ते सुस्वभावी, आदर्श आणि हुशार अष्टपैलू विद्यार्थी म्हणून ओळखले जात असत. शाळेच्या बहुतेक उपक्रमांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले आणि शाळेचा कॅप्टन म्हणून त्यांची निवड झाली. ‘सैनिक स्कूल कॅप्टन’ हे एक प्रतिष्ठेचे पद असते कारण ५०० हून अधिक विद्यार्थ्यांपैकी केवळ एकाला हा सन्मान मिळतो.
चांगल्या गुणांनी दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या अजितनी पुढील ध्येय स्पष्ट असल्याने ‘यूपीएससी’ तर्फे ‘एनडीए’ प्रवेशाची परीक्षा दिली. ही परीक्षा देखील चांगल्या प्रकारे पास केल्याने खडकवासला, पुणे येथील ‘एनडीए’ मध्ये प्रवेश मिळाला. तेथे तीन वर्षांचा अभ्यासक्रम उत्तम प्रकारे पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘इंडियन मिलिटरी अकॅडेमी’, डेहराडून येथे प्रवेश घेतला. तेथे एक वर्षाचा अभ्यासक्रम पुरा झाल्यावर त्यांना ‘मद्रास रेजिमेंट’च्या ‘१८ मद्रास म्हैसूर’ या युनिटमध्ये कमिशन देण्यात आले. यानंतरही सैनिकी क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा ते पुरी करत राहिले. १९८२ मध्ये त्यांनी श्रीनगर येथील ‘हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल’मध्ये ‘माउंटेन वॉरफेअर कोर्स’ मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर १९८३ मध्ये बेळगावच्या इन्फंट्री स्कूलमध्ये ‘यंग ऑफिसर्स कोर्स’ आणि ‘कमांडो कोर्स’ पूर्ण केला. तर प्रतिष्ठित ‘आर्मी स्कूल ऑफ मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, बंगळुरू’ येथून ते ‘ड्रायव्हिंग अँड मॅनेजमेंट ऑफिसर्स कोर्स’ पास झाले. नंतर १९८५ मध्ये तरुण कॅप्टन म्हणून त्यांनी बेळगावच्या इन्फंट्री स्कूलमध्ये ‘ज्युनिअर स्टाफ कोर्स’ला प्रवेश घेतला जो तीन महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण केला.
या सर्व प्रशिक्षणांमुळे सैन्यातील कौशल्यपूर्ण नेता बनण्याच्या दृष्टीने ते अधिक सक्षम झाले. दरम्यान काही काळ त्यांनी आपल्या रेजिमेंटमध्ये फील्डवर कामाचा अनुभव घेतला. भारतीय लष्करातील कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान अद्ययावत करण्यासाठी सतत प्रशिक्षण देण्याच्या धोरणानुसार, अजितना १९८७ मध्ये ‘बटालियन सपोर्ट वेपन्स ऑफिसर्स कोर्स’साठी बेळगावच्या इन्फंट्री स्कूलमध्ये पाठवण्यात आले. ६ महिन्यांच्या या कोर्सनंतर त्यांना १९८८ मध्ये ‘आर्मी वॉर कॉलेज’, महू (मध्य प्रदेश) येथे ‘ज्युनिअर कमांड कोर्स’साठी प्रशिक्षित करण्यात आले. आपल्या कामात सतत प्रगती करत असतानाच कौटुंबिक आघाडीवरही पुढे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि १९९० मध्ये कॅप्टन अजितनी ‘शकुंतला’ यांच्याशी विवाह केला. अर्थात त्यापूर्वी भावी पत्नीला आपल्या कामाचे स्वरूप, त्यातील व संसारात येऊ शकणाऱ्या अडचणी आणि आयुष्यातील संभाव्य धोके यांची पूर्ण कल्पना दिली. काही वर्षांतच त्यांना निर्भय आणि अक्षय नावाचे दोन पुत्ररत्न प्राप्त झाले.
ज्या मद्रास रेजिमेंटमध्ये अजित यांची पोस्टिंग होती ती आपल्या शूर सैनिकांसाठी आणि असंख्य युद्ध सन्मानांसाठी ओळखली जाते. या रेजिमेंटच्या लौकिकाला साजेशी कामगिरी आपल्याकडून व्हावी असे अजितना सारखे वाटे व त्यासाठी स्वत:मध्ये सतत सुधारणा करत भरपूर मेहनत घेत असत. वरिष्ठदेखील त्यांच्या कामगिरीवर खूश असत, ज्यामुळे त्यांना भारताच्या विविध भागात विविध कार्यक्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. चेन्नईतील ‘थंबरम’ येथील प्रतिष्ठित ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी’मध्ये ‘डायरेक्टर -स्टाफ’ म्हणून तीन वर्षे त्यांची नेमणूक झाली. तेथे पदवी पूर्ण केलेल्या ‘जेंटलमन कॅडेट्स’ना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचे काम ते करीत. यानंतर ते कोहिमा कंपनीचे प्रभारी होते आणि त्यांनी ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन बोर्डा’च्या तीन बॅचचे प्रशिक्षणही घेतले. एप्रिल १९९१ मध्ये मेजर म्हणून त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित ‘मिलिटरी इंटेलिजन्स स्कूल अँड डेपो’ येथून ‘इंटेलिजन्स स्टाफ ऑफिसर्स’ कोर्स पूर्ण केला. पुढील पदोन्नतीसाठी पात्र होण्यासाठी मेजर अजितनी पहिल्याच प्रयत्नात ‘डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कोर्स’ची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे जून १९९३ मध्ये ‘डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज’, वेलिंग्टन, तामिळनाडू येथे ४९ व्या कोर्समध्ये प्रवेश घेतला. “दक्षिण आशियातील अणुपर्यावरण, ‘एनपीटी’ आणि आण्विक पर्याय” या विषयावर शोधनिबंध सादर केल्यानंतर तिथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडताना ‘एम.एससी इन डिफेन्स स्टडीज’ने सन्मानित करण्यात आले. बटालियनचे नेतृत्व करण्यासाठी ‘वरिष्ठ कमांड कोर्स’ पूर्ण करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे अजितनी मार्च १९९८ मध्ये आपला ‘वरिष्ठ कमांड कोर्स’ पूर्ण केला आणि जून १९९८ मध्ये अजितना ‘लेफ्टनंट कर्नल’ पदावर बढती मिळाली.
अजित यांनी आपल्या सेवेच्या कारकिर्दीत विविध आव्हानात्मक मोहिमांमध्ये भाग घेतला आणि पुणे, इंदूर, सिक्कीम, तामिळनाडू, दिल्ली अश्या वेगवेगळ्या प्रदेशांत काम केले. भारत-चीन सीमेवर आणि लष्कराच्या मुख्यालयात सेवा बजावल्यानंतर त्यांना जम्मूतील सुरनकोट येथे ‘२५ राष्ट्रीय रायफल्स’चे ‘सेकंड-इन-कमांड’ म्हणून तैनात करण्यात आले. ‘२५ आरआर बटालियन’ हे जम्मू-काश्मीर भागात दहशतवादविरोधी कारवाईसाठी तैनात असे. कारगिल युद्धात भारताकडून पराभव पत्करल्यानंतरही पाकिस्तानच्या छुप्या कारवाया आणि पाकच्या पाठिंब्याने काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या आगळिकी चालूच होत्या. अजित यांच्या तुकडीला अश्या कारवायांना सतत सामोरे जावे लागे. असेच ३० ऑक्टोबर १९९९ रोजी अजित यांच्या युनिटला पुंछ जिल्ह्यातील फैजलाबाद गावात काश्मिरी दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली. या माहितीचे योग्य विश्लेषण करून परिस्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आणि अजित यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाच शस्त्रसज्ज, कट्टर दहशतवादी भेकडांप्रमाणे निरपराध नागरिकांमध्ये आश्रय घेऊन गावात लपून बसल्याची खबर होती. त्यांचा खात्मा करण्याच्या उद्देशाने अजित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गावाला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. अजित यांच्या शोधाला लवकरच यश मिळाले आणि एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा सापडला. अजितनी आपल्या टीमला योग्य मार्गदर्शन केले आणि नाल्याच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यात यश मिळवले. अजितनी त्यांचा पाठलाग करत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. इतक्यात नाल्यात लपून बसलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याने अंदाधुंद गोळीबार करून अजितना गंभीर जखमी केले. जखमी असूनही अजितनी पुढे जाऊन दहशतवाद्यांवर ग्रेनेड फेकला. त्यानंतर आणखी पुढे सरकत त्यांनी आणखी एका दहशतवाद्याला गोळ्या घातल्या. अजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या धाडसी कारवाईमुळे पाचही कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दुर्दैवाने गंभीर जखमी झालेले अजित या जीवघेण्या हल्ल्यात वाचू शकले नाहीत आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले. या चकमकीत त्यांच्यासोबत आणखी तीन जवान शहीद झाले. अश्या प्रकारे अजित यांची शेवटची मोहीम त्यांच्या धाडसाची आणि समर्पणाची साक्ष ठरली. शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या अजितनी आपले जीवन देशाच्या रक्षणासाठी समर्पित केले.
या अतुलनीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल भांडारकर यांचा सैन्यदलाने व सरकारने योग्य सन्मान करत त्यांना मरणोत्तर “शौर्य चक्र” प्रदान केले. काही वर्षांनी अजित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची शाळा ‘सैनिक स्कूल,विजापूर’ येथे त्यांच्या शाळासोबत्यांनी एक गेट बांधले ज्याला ‘अजित द्वार’ असे नाव दिले. या गेटचे उद्घाटन श्रीमती शकुंतला यांच्या हस्ते आणि त्यांच्या दोन शूर मुलांच्या उपस्थितीत करण्यात आले. भांडारकरांच्या हौतात्म्याच्या वेळी अवघ्या ७ व ५ वर्षांचे असणारे हे दोन्ही सुपुत्र शौर्य आणि देशसेवेचा वडिलांचा अमर्याद वारसा पुढे चालवत आहेत. मोठा मुलगा ‘निर्भय’ हा ‘ओटीए चेन्नई’मधून उत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांच्याच युनिटमध्ये ‘कॅप्टन’ म्हणून रुजू झाला आहे, तर ‘अक्षय’ हा इंजिनिअर म्हणून पदवी घेतल्यानंतर भारतीय नौदलात ‘सब लेफ्टनंट’ पदावर दाखल झाला आहे. अजित यांच्या दोन भावांपैकी एक श्री. अरुण हे भारतीय लष्कराच्या ‘ईएमई कोअर’मधून निवृत्त कर्नल आहेत आणि श्री. अनिल हे उद्योजक असून दोघेही बेंगळुरूमध्ये स्थायिक आहेत.
अजितजींच्या पश्चात त्यांची सुविद्य पत्नी शकुंतला या सध्या माजी सैनिक आणि वीर परिवाराच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी तन-मन-धन अर्पून काम करत आहेत. त्यासाठी स्थापन केलेल्या ‘मेटामॉर्फस फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या त्या सहसंस्थापक आणि संचालक आहेत. अजित यांच्या ६० व्या जयंतीला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शकुंतला यांनी ‘द सागा ऑफ अ ब्रेव्हहार्ट – लेफ्टनंट कर्नल अजित व्ही भांडारकर’ हे चरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. भारतातील शौर्याचा सन्मान करण्यासाठी ‘मेटामॉर्फेस फाऊंडेशनने ‘लेफ्टनंट कर्नल अजित व्ही भांडारकर स्मृती पुरस्कारा’ची स्थापना केली आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, माजी सैनिक, सशस्त्र दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना मेटामॉर्फेस फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘द सागा ऑफ अ ब्रेव्हहार्ट’ हा भांडारकरांवरील माहितीपट दाखवला जातो.
सैन्य व देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे अजित कौटुंबिक पातळीवरही आपले कर्तव्य तेवढ्याच निष्ठेने पार पाडत. वृद्ध माता-पित्यांची सेवा करणारा विनयशील पुत्र, आदर्श पती, प्रेमळ पिता आणि लाडका भाऊ या सर्व भूमिका ते चोख निभावत. आज त्यांचे सर्व कुटुंबिय त्यांच्याच आदर्श पायवाटेवरून मार्गक्रमणा करत आहेत असेच म्हणावे लागेल. अजित यांची कर्तव्याप्रती अतूट बांधिलकी आणि परमोच्च त्याग यांनी अनेकांच्या हृदयावर अमिट ठसा उमटवला आहे. त्यांचे हौतात्म्य आणि शौर्य हे, सैनिक आणि नागरिकांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे. या वर्षी ३० ऑक्टोबरला त्यांच्या बलिदानाला २५ वर्षे पूर्ण होत असताना, देश आणि समाजासाठी प्राणाहुती देणाऱ्या अजित यांच्यासारख्या असंख्य वीरांसाठी या दिवाळीत प्रत्येकाच्या घरी एक तरी दिवा लागावा हीच अपेक्षा. जय हिंद!!
(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)
– गुरुप्रसाद दि पणदूरकर


Leave a Reply