अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – ५

The History of Agriculture in America - Part- 5

शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी शेती संदर्भातील प्रकल्प

4-H : या प्रकल्पाची सुरुवात २० व्या शतकाच्या सुरवातीला, अमेरिकेच्या विविध राज्यांमधे साधारणपणे एकाच वेळी झाली. या मागचा उद्देश, public schools मधलं शिक्षण अधिकाधिक प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक स्वरूपाचं व्हावं आणि एकंदर शिक्षणाची ग्रामीण भागाशी योग्य सांगड घातली जावी, असा होता. वर उल्लेखलेल्या Land Grant Universities ची सुरुवात होऊन ३०-४० वर्षांचा काळ उलटला होता. विद्यापीठांची शेती संशोधन केंद्रे कार्यरत झाली होती. परंतु त्या शेती संशोधनाला म्हणावा तसा शेतकरी वर्गाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तथापि शेतकी तज्ञांच्या एक गोष्ट लक्षात येऊ लागली होती, ती म्हणजे शेती संशोधनाबाबत तरूण वर्गाचं चाळवलं गेलेलं कुतूहल. या तरूणांना हाताशी धरून त्यांच्या मनावर या नवीन संशोधनाचे महत्व बिंबवले, तर ही तरूण पिढी जुन्या जाणत्या वडीलधार्‍यांचं मन वळवू शकेल, अशी या तज्ञांना खात्री वाटत होती. या विचारातून, ग्रामीण तरुणांसाठी सुरू झालेले हे उपक्रम म्हणजे नवीन शेती तंत्रज्ञान वडीलधार्‍या शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रभावी साधन बनले.

१९०२ साली ओहायो राज्यामधे अशा एका उपक्रमाची सुरुवात झाली . हा उपक्रम म्हणजे 4-H प्रकल्पाचा जन्म समजला जातो. (4 H = Head, Heart, Hands and Health). सुरवातीला या प्रकल्पामधे मुला मुलींचे वेगवेगळे गट असायचे. १९४८ साली या उपक्रमाअंतर्गत काही अमेरिकन मुलं युरोपला गेली आणि काही युरोपियन मुलं अमेरिकेला आली. यातून शेतीच्या प्रत्यक्ष अनुभवाची देवाण घेवाण करण्याच्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९५० च्या दशकापासून, 4-H प्रकल्प ग्रामीण भागापुरता मर्यादित न राहता थोडयाफार शहरी भागांमधे देखील पसरू लागला.

आज या प्रकल्पामधे साधारणपणे ६५ लाख मुलांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे लहानपणापासूनच मुलांना एक वेगळेच वळण लागते. या लहान वयातदेखील आपण अशा एखाद्या देशव्यापी उपक्रमाचा एक भाग आहोत, ही भावनाच मोठी स्फूर्तीदायी ठरते. लहानपणापासूनच आपले पालक आणि शाळेतील शिक्षक यांच्या शिवाय इतर मोठ्या माणसांशी कसे बोलावे, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा कसा घ्यावा, याचं बाळकडू मिळतं. या उपक्रमामधे मुलं स्वत:च स्वत:च्या वासराची, शेरडाची किंवा डुकराच्या पिल्लांची काळजी घ्यायला शिकतात. त्या जनावरांचे खाणे, पिणे, त्यांची निगराणी, त्याला प्रदर्शनासाठी सजवणे, वगैरे गोष्टी मुलंच करतात. या सर्वामुळे मुलं लवकर स्वावलंबी होतात. प्रदर्शनामधे आपल्या जनावराला घेऊन जायचे, त्याला रिंगणात घेऊन इतर स्पर्धकांच्या बरोबरीने उभे रहायचे, शेकडो, हजारो प्रेक्षकांच्या पुढयात आत्मविश्वासाने वावरायचे, तज्ञांना आपल्या जनावराला पारखू द्यायचे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, या सर्वातून मुलं चटपटीत होतात आणि त्यांच्यात भलताच आत्मविश्वास येतो.

FFA (Future Farmers of America) – अमेरिकेचे भविष्यकालीन शेतकरी ही एक शेतकरी क्षेत्रातील तरुणांची संघटना आहे. तिची स्थापना १९२८ साली झाली. आज या संस्थेचे ५ लाखाहून अधिक सभासद आहेत. ही मुख्यत: हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी असलेली संघटना आहे. अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांमधे मिळून या संघटनेच्या सुमारे ७००० शाखा आहेत. ज्या मुलांना पुढील आयुष्यात शेतकी क्षेत्रात काही काम करायचं आहे, अशा मुलांसाठी ही संघटना हा एक मोठाच आधारस्तंभ आहे. अशा मुलांना शेतकी क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाचा फायदा व्हावा, त्यातून मुलांचे अनुभवविश्व समृद्ध व्हावे, त्यांच्यातून उद्याच्या शेतकी क्षेत्रातील अग्रणी तयार व्हावेत, ह्या हेतूने ही संघटना काम करते. शेतकी तज्ञ, मुलांचे पालक, शेतकी क्षेत्रातील विविध कंपन्या, एकत्र येऊन, ह्या मुलांच्या शेतीविषयक जिज्ञासेला खतपाणी घालून, त्यांना विविध प्रकारे प्रोत्साहन देऊन, मार्गदर्शन करून, अमेरिकेचा भावी शेतकरी वर्ग तयार करतात. हल्ली हा कार्यक्रम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न ठेवता त्यात मिडल स्कूलच्या विद्यार्थ्यांना देखील सामावून घेतलं जातं. त्यामुळे मुलं या संघटनेत लवकर दाखल होतात आणि अधिक काळ कार्यरत रहातात. वर्षातून एकदा होणारं FFA चं संमेलन हे अमेरिकेतलं सर्वात मोठं विद्यार्थी संमेलन असतं. या संमेलनात शेतकी क्षेत्रातील २४ विविध शाखांमधे (डेअरी, पोल्ट्री, खतं, बी-बियाणं वगैरे ) मुलं स्पर्धात्मकरित्या भाग घेतात.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....