नवीन लेखन...

मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

‘मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू’ अशी सार्थ पदवी प्र. के. अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली ते मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म विदर्भातील अकोला येथे २९ जून १८७१ रोजी झाला.

त्यांचे वडील अमरावती इथे शिक्षक होते. कोल्हटकर यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण अकोला इथे झालं. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १८९१ मध्ये बी. ए. आणि १८९७ मध्ये एल.एल.बी. पूर्ण केलं. बी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच त्यांच्यातील समीक्षक डोकावू लागला. त्यांनी लिहिलेलं ‘विक्रम-शशिकला’ या नाटकाचं समीक्षण ‘विविधज्ञानविस्तार’ या मासिकात १८९२ मध्ये प्रकाशित झालं. १८९२-१९०२ या दहा वर्षांच्या काळात त्यांना अकरा समीक्षणात्मक दीर्घ लेख लिहिले. हे लेख लिहिताना त्यांना विनोदाची उकळी फुटत असे, पण समीक्षेचं गांभीर्य विचारात घेऊन ते स्वत:स आवर घालत. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र विनोदी लेखनालाच सुरुवात केली.

१९०२ मध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी ‘साक्षीदार’ हा पहिला विनोदी निबंध लिहिला. तो ‘विविधज्ञानविस्तार’च्या ऑगस्ट-सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला. त्यांनी विनोदी लेखनासाठी ‘सुदामा’ हा मानसपुत्र निवडला. सुदामा, बंडूनाना आणि पांडूतात्या या तीन पात्रांचा समावेश असलेलं त्यांचं ‘सुदाम्याचे पोहे’ ‘विविधज्ञानविस्तारा’तून प्रसिद्ध झालं. या विनोदी लेखनाने त्या काळात अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली आणि खळबळही माजवली. विनोदाचा वापर शस्त्राप्रमाणेही करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं. या विनोदी लेखनात उपरोध, उपहास, कोटी, अतिशयोक्तीबरोबरच स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोदही आढळतात. या विनोदी लेखसंग्रहाला ‘अठरा धान्यांचे कडबोळे’ व पुढे त्यालाच ‘साहित्यबत्तिशी’ अर्थात ‘सुदाम्याचे पोहे’ नाव देण्यात आलं. ज्येष्ठ नाटककार मा.राम गणेश गडकरी यांनी मा.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना आपलं गुरू मानलं होतं.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं नाटककार म्हणून असलेलं महत्त्वही निर्विवाद होते. त्यांनी एकूण बारा नाटकं लिहिली. ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’चे त्या काळातील ते एकमेव नाटककार होते. ‘वीरतनय’ (१८९६), मूक नायक (१९०१), गुप्तमंजूषा (१९०३), मतिविकार (१९०७), प्रेमशोधन (१९०८), वधूपरीक्षा (१९१४), जन्मरहस्य (१९१८), परिवर्तन (दुसरी आवृत्ती १९२३), सहचारिणी (१९१८), शिवपावित्र्य (१९२४), श्रमसाफल्य (१९२९) आणि मायाविवाह (१९४६) ही त्यांची बारा नाटकं होत. कथा, स्वभावरेखन, संवाद, पदं या नाटकाच्या घटकांत कोल्हटकरांनी नावीन्य आणलं. रहस्यपूर्ण, गुंतागुंतीचं कथानक विणताना त्यात त्यांनी स्त्रीशिक्षण, मद्यपाननिषेध, प्रीतिविवाह असे सुधारणाविषय, तसेच पुनर्विवाह, केशवपन, भ्रूणहत्या असे सामाजिक विषय आणले. नाटकातील प्रणयाला त्यांनी विनोदाची जोड दिली. श्लेष, चमत्कृती, उपहास, विडंबन या विविध विनोदप्रकारांचा समावेश त्यांनी नाटकाच्या संवादांत केला. त्यांच्या नाटकांमुळे मराठी नाटकाला दिशा व चालना मिळाली. ‘वीरतनय’ या पहिल्या नाटकात त्यांनी उर्दू आणि गुजराती चालीची पदं घातली. हा अभिनव व धाडसी प्रयोग होता. त्यांच्या प्रत्येक नाटकातील संगीतामध्ये वैचित्र्य व विविधता असे.

कोल्हटकरांनी कादंबरीलेखनही केलं. ‘दुटप्पी की दुहेरी’ (१९२५) आणि ‘श्यामसुंदर’ (१९२५) या दोन कादंब-या त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘आत्मवृत्त’, काही कथा आणि ‘गीतोपायन’ (१९२३) हा कवितासंग्रहही प्रसिद्ध आहे.

नाट्यसमीक्षणाने त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि नाट्यसमीक्षक म्हणून नाव कमावलं. सूक्ष्म विवेचकबुद्धी, मर्मग्राही विश्लेषण आणि भारतीय व पाश्चात्य साहित्यविचारातील वैदग्ध्य व नीती या तत्त्वांचा स्वीकार करणारी समावेशक समीक्षादृष्टी यामुळे कोल्हटकरांची समीक्षा विचारप्रवर्तक ठरली. पंचवीस नाटकांची समीक्षा करून नाट्यसमीक्षेच्या प्रांतात त्यांनी मोलाची कामगिरी केली.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे १ जून १९३४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4181 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..