
श्रीअप्रबुद्ध यांच्या मते मात्र श्रीगुरूंचा जन्म शके १३८० बहुधान्य संवत्सरी कुंभ राशीस चंद्र असता झाला व त्यानंतर साठ वर्षे अवतारलीला करून शके १४४० मध्ये श्रीशैल्यावर बहुधान संवत्सरी ते गुप्त झाले. (पहा: श्रीगुरुचरित्र कामत प्रतींतील अप्रबुद्ध यांची पुष्पांजली.) श्रीगुरूंच्या जन्मकाळासंबंधी ‘निस्संदिग्ध’ असा कोणताच पुरावा उपलब्ध नसल्यामुळे विद्वानात असे मतभेद होणे अपरिहार्य आहे.
श्रीनृसिंहसरस्वतींचे पूर्वाश्रमीचे नाव ‘नरहरी’ असे होते. त्यांच्या जन्मानंतर (पौष शु. द्वितीया) ते रडण्याऐवजी प्रणवोच्चार करू लागले. त्यामुळे गावातील लोकांना मोठे आश्चर्य वाटून नरहरीच्या दर्शनासाठी सारा गाव त्यांच्या माता-पित्यांच्या घरी म्हणजे अंबाभवानी व माधव यांच्या घरी गोळा झाला. परंतु घरी लोटलेली ही जत्रा पाहून त्यांच्या माता-पित्यांस आनंदाबरोबर दुःखही झाल्यावाचून राहिले नाही. त्यांची आई म्हणाली, ‘आमुचे मनींची वासना। तुवा पुरवावी नंदना। तुझे बोबडे बोल आपणा। ऐकवावे पुत्रराया।।’
एवढ्या नवससायासाने झालेला, अग्नीच्या स्फुल्लिंगाप्रमाणे तेजस्वी असा हा पुत्र नुसता प्रणवोच्चारच करतो त्याअर्थी तो मुका तर निपजणार नाही ना, अशी त्या जन्मदात्रीस घोर चिंता पडली. परंतु तेवढ्यात नरहरीने खुणेने सांगितले, की मौंजीबंधन झाले म्हणजे हे मौनव्रत आपणांस सोडता येईल.परंतु पुत्राचे अलौकिकत्व पटूनही माता-पित्यांचा संशय दूर होईना. तेव्हा बाल नरहरीने एक लोखंडाची वस्तू हस्तस्पर्शाने सोन्याची बनवून माता-पित्यांचा संशय दूर केला. त्यानंतर यथाकाल त्यांचे मौंजीबंधन झाले व हा मुका मुलगा गंभीर वाणीने वेदघोष करू लागला. हे ऐकून सारी सभा चित्रासारखी तटस्थ झाली! माता-पित्यांचा आनंद तर गगनात मावेना!
परंतु हा आनंदही अल्पकाळच टिकला. आईने मुंजीच्या वेळी भिक्षा मागण्याचा उपदेश केला होता. ती आज्ञा प्रमाण मानून श्रीगुरूंनी आईचा निरोप मागितला व तिच्या मस्तकावर हात ठेवून तिला पूर्वजन्मीच्या वृत्तान्ताचे स्मरण दिले. पूर्वजन्मी अंबाभवानीने (अंबिकेने) श्रीपाद श्रीवल्लभांना ‘तुमच्यासारखा पुत्र मला होऊ दे’ असा वर मागितला होता व दत्तात्रेयांनी त्या वराची पूर्ती या जन्मी केली होती. हे पूर्वस्मरण होताच अंबाभवानीने श्रीगुरूंच्या पायांवर लोळण घेतली. त्यानंतर आईच्या आग्रहास्तव तिला दोन पुत्र होईपर्यंत घरीच वास्तव्य केले व त्यानंतर हाती जगदुद्धाराचे कंकण बांधून श्रीगुरूंची दिव्य मूर्ती एका शुभदिनी घराबाहेर पडली.
नंतर श्रीक्षेत्र काशीस कृष्णसरस्वतींना गुरु करून त्यांच्याकडून त्यांनी संन्यासधर्माची यथाशास्त्र दिक्षा घेतली. या आश्रमांतील त्यांचे नाव ‘नृसिंहसरस्वती’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर नृसिंहसरस्वतींनी ज्ञानयज्ञ सुरू करून अनेक मुमुक्षूंना मोक्षाचे ज्ञान दिले. अनेक मार्गभ्रष्टांना सन्मार्गावर आणले. काही दिवस काशी येथे राहून आपल्या शिष्यवर्गासह ते बद्रीवनास गेले. त्यानंतर भूमी-प्रदक्षिणा करीत करीत ते कलकत्त्याजवळ गंगासागरास गेले व यात्रा करीत प्रयागास आले. त्यानंतर एकवीस वर्षांनी ते पुन्हा मातापित्यांना व बंधूभगिनींना भेटण्यासाठी कारंज्यास प्रकट झाले.
श्रीनृसिंहसरस्वतींनी केलेले अनेक चमत्कार दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ जो ‘गुरुचरित्र’ त्यात विस्ताराने वर्णन करण्यात आले आहेत. तथापि त्यांचे चमत्कार हे केवळ ‘चमत्कारांसाठी चमत्कार’ नव्हते. त्यामागे लोकोद्धाराची तळमळ होती. यवनांनी केलेल्या दक्षिण भारतातील अत्याचारांमुळे वैदिक संस्कृती नष्ट होण्याचीच वेळ आली होती. अशा वेळी ती संस्कृती टिकवून धरण्यास योग्य अशी निर्भय वृत्ती त्यांनी हिंदूंच्या मनात निर्माण केली. त्यांचा शिष्य सायंदेव एका यवनाकडे नोकरीला होता. हा यवन प्रतिवर्षी एक ब्राह्मणाला ठार करीत असे. (त्या सायंदेवाच्या उल्लेखावरून त्या काळच्या यावनी जुलुमांची वाचकांना कल्पना येईल). एका वर्षी सायंदेवाची पाळी आली व त्याने यातून सुटण्यासाठी श्रीगुरूंची करुणा भाकली. श्रीगुरूंनी त्याला अभय देऊन यवनाकडे जाण्यास सांगितले परंतु त्या यवनाने सायंदेवाचा घात करण्याऐवजी सन्मान केला!
ब्राह्मणवर्गाचा सर्वांगीण अधःपात पाहून श्रीगुरूंना उद्वेग वाटला. त्या वेळच्या ब्राह्मणवर्गाची स्थिती हीन दिशेला पोहोचली होती याचे गुरुचरित्रात पुढील वर्णन सापडते. या भरत खंडात। पूर्वी होते पुण्य बहुत। वर्णाश्रमी आचरत। होते लोक परियसा।। या कलियुगांभीतरी। कर्म सांडिले द्विजावरी। लोपले वेद निर्धारी। गौप्य जाहले क्षितीसी।। कर्मभ्रष्ट झाले द्विज। म्लेच्छापुढे बोलती वेदबीज। सत्त्व गेले याची काज। मंदर्माति झाले जाण।। श्रीगुरूंनी अशा मूढ ब्राह्मणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली तसेच चमत्कारांद्वारे अंधश्रद्धांच्या मनात परमेश्वरा-विषयी श्रद्धा निर्माण करून त्यांना भक्तिमार्गाची गोडी लावली. अशा प्रकारे वर्णाश्रमधर्माला आलेली अवकळा नाहीशी करून वर्णाश्रमधर्म सुस्थापित करण्याचे महान कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. संसारी मनुष्याने जगात कसे वागावे याबाबत श्रीगुरूंचा उपदेश पुढीलप्रमाणे आहे. ‘औट घटकेच्या लाभलेल्या अत्यल्प आयुष्यातही ईश्वरभक्तीची मंगल प्रभा फाकेल आणि ईश्वरकृपेने जीवनाचे सोने होईल अशी वागणूक असावी. देहाच्या उखळात मनाच्या मुसळाने विवेकाचे तांदूळ कांडले, की हळूहळू विवेकदिप्तीने चित्त शुद्ध होईल, लक्षात ठेवा आणि कुणालाही शरीराने, मनाने आणि वाणीने दुखवू नका!’
-लेखन: कै. वि. के. फडके.
सौजन्य साभार: श्रीगजानन आशिष –
दिवाळी अंक १९९३
Leave a Reply