
दत्तसंप्रदाय: उपनिषदकालापासून भारतीयांच्या जीवनांत उपासना मार्गाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आणि या उपासनेच्या विविध प्रकारांतूनच वेगवेगळ्या संप्रदायांचा उगम झालेला दिसून येतो. त्यांपैकी दत्तसंप्रदाय हा सर्वांत प्राचीन व लोकाभिमुख असा लोकप्रिय संप्रदाय आहे.
उपनिषद्कारांनी ‘विश्वगुरू’ म्हणून यथार्थपणे गौरविलेले प्रभू दत्तात्रेय हे या संप्रदायाचे आराध्य दैवत असून सरस्वती गंगाधरांनी १५ व्या शतकात लिहिलेला श्रीगुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ हा या संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ आहे. श्रीअप्रबुद्ध लिहितात, ‘चरित्राची फक्त भूमिका घेऊन लोकशिक्षणाच्या उद्देशाने रचलेले आद्य वाङ्मय श्रीगुरुचरित्र हेच आहे.’ ‘स्वे स्वे कर्मण्यभिरतः’ असा श्रीनृसिंह सरस्वतींचा कटाक्ष असल्यामुळे ‘कर्मकाण्ड, ज्ञानकाण्ड’ या कांडातून ब्राह्मणवर्गाच्या आचारधर्माची महती सरस्वती गंगाधरांनी सांगितलेली आहे. कारण ब्राह्मण हा वैदिक धर्माचा जणू कणा आहे. श्रीमद्शकंराचार्यांनी देखील ‘ब्राह्मणत्वस्य। ही रक्षणेन रक्षितः स्यात् वैदिको धर्मः’ असा ठाम सिद्धान्त सांगितलेला आहे.
दत्तसंप्रदाय हा श्रीदत्तात्रेयांच्या इतकाच पुरातन आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. श्रीदत्त हे ‘योगनाथ’ असल्यामुळे योगाला या संप्रदायात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. दत्तार्जुन आणि दत्तालर्क संवादामध्ये श्रीदत्तात्रेयांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगांचे स्वरूप स्पष्ट केले आहे. या मार्गाचे यथार्थ ज्ञान होण्यास सद्गुरूची आवश्यकता आहे व स्वतः श्रीदत्तात्रेय हेच ‘विश्वगुरू’ असून सांप्रदायिकांना सद्गुरूंची भेट घडवून देण्याचे कार्य ते गुप्तपणे करीत आहेत असा सांप्रदायिकांचा विश्वास आहे.
श्रीसमर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘आधी अध्यात्म श्रवण। मग सद्गुरुपादसेवन। पुढे आत्मनिवेदन। सद्गुरु प्रसादे।। आत्मनिवेदनापरी । निखळ वस्तू निरंतरी। आपण आत्मा हा अंतरी। बोध जाहला।।’ सद्गुरूचा महिमा अपार असून त्याच्या प्रसादाने भक्ताला ‘आत्मबोध’ होतो आणि आत्मबोध हेच दत्तोपासनेचे व दत्तसंप्रदायाचे साध्य आहे.
दत्तसंप्रदायात मोक्षप्राप्तीसाठी सगुणोपासनेचा मार्ग सुचविण्यात आलेला आहे. दत्त-अनसुया संवादात श्रीदत्त अनसूयेस सांगतात, ‘जन्मोनि साधिजे हे स्वाहत। सगुणभक्तिसी व्हावे रत। ईश्वर आहे सर्वगत। त्यापदी नत होईजे।।’ अशा प्रकारे सगुणभक्तीचे महत्त्व या संप्रदायात विशेष आहे. शांडिल्यसूत्रात भक्ती या शब्दाची व्याख्या ‘सा परानुरक्तिरीवरे’ अशी सांगितलेली आहे. याचा अर्थ परमेश्वराचे सर्व गुण समजून आल्यानंतर त्याच्याविषयी जी अनुरक्ति किंवा प्रेम निर्माण होते तीच किंवा तिच्यातूनच भक्तीचा उदय होतो आणि हा भक्तीचा मार्ग दत्तसंप्रदायाने चतुर्वर्णासाठी मोकळा करून दिलेला आहे.
हा संप्रदाय समन्वयवादी असल्यामुळे त्यात हरी-हरांचा, शैव-वैष्णवांचा किंवा हिंदू-मुसलमानांचा भेद नाही. ‘कठीण दिवस योगधर्म म्लेंच्छजाय क्रूरकर्म’ अशी देशाची चमत्कारिक परिस्थिती आहे. जनार्दन स्वामींनी शुक्रवारच्या ऐवजी गुरुवार हा सुटीचा दिवस करून घेतला किंवा चांद बोधले याचा शिष्य शेख महंमद याने भक्तियोगावर मराठीत ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला या गोष्टी समन्वयनिदर्शक नाहीत असे कोण म्हणेल? माणिकप्रभु किंवा अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांनी देखील हिंदू-मुस्लीम असा भेदभाव न करता दत्तसंप्रदायाचे हे उदात्त तत्त्व नेटाने आंगिकारल्याचे दिसून येते.
या संप्रदायात संन्यासाश्रमाला विशेष महत्त्व आहे व श्रीनृसिंह सरस्वतींसारख्या अलौकिक विभूतींनी या आश्रमाचे महत्त्व वाढविण्याचे महान कार्य केलेले आहे. तथापि केवळ आध्यात्मिक क्षेत्रांपुरतेच या संप्रदायाचे कार्य मर्यादित नसून सामाजिक, राजकीय व भौतिक क्षेत्रातही नेत्रदीपक असे कार्य दत्तसंप्रदायाने करून दाखवून लोकमानसात आदराचे स्थान प्राप्त करून घेतले आहे. श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांच्या समर्पक शब्दात सांगावयाचे तर ‘प्रवृत्तीची गंगा, निवृत्तीची यमुना आणि ज्ञानाची सरस्वती यांचा सुंदर त्रिवेणी संगम या संप्रदायात झाला आहे.’ आता श्रीदत्तात्रेयांच्या १) श्रीपादश्रीवल्लभ २) श्रीनृसिंह सरस्वती ३) श्रीमाणिकप्रभु ४) श्रीअक्कलकोटचे स्वामी समर्थ या इतिहासकाळातील चार प्रमुख अवतारांची थोडक्यात ओळख करून घेऊ.
-लेखन: कै. वि. के. फडके.
सौजन्य साभार: श्रीगजानन आशिष –
दिवाळी अंक १९९३
Leave a Reply