यंदाच्या अनंत चतुर्दशीला लिहिलेल्या माझ्या काव्य लेखातील सरत्या ओळी मला पुन्हा पुन्हा आठवू लागल्या मी बाप्पाकडे काहीतरी मागावं असं म्हणून म्हटलं होतं …..
बाप्पा, तू माझे ऐकच एकदा,
न विसरता नाती, आंदोळू दे खेळ मेळावा,
निघू दे सोन्याचा धूर, दिसू दे ऐश्वर्य जगा एकदा,
घेऊ दे मोकळा श्वास तान्ह्या ते वृद्धा या भूतळी,
आता होऊ दे भरभराट रानोमाळ धनधान्याची …..
मग ये गौराईसह, करु आनंदमेळा सौख्यभरे …..
मला वाटलं बाप्पा तथास्तु म्हणेल …..
नुसताच हसला आणि उंदरावर बसून निघून गेला …..
हो, तो निघून गेला खरा पण तो तसा जाणार नव्हता. कारण देवच तो, काहीतरी देणारच. आपल्याला ते देणं समजलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे, कारण आपण कसं समजून घेणार त्याला? आपण तर मर्त्य मानव, भूतलावरील एक अतिसामान्य जीव.
पण आम्हाला त्यांना दिलं. जणू काही आपण मागावं आणि देव द्यायलाच बसलाय. मग आपण मागतो एक आणि देव देतो दोन तसं काहीसं आमच्या सर्वांच्या जीवनात घडलं. आमच्या सुनेच्या उदरात दोन अंकुर वाढू लागले होते. अंकुर वाढताना आम्ही सारे अनुभवत होतो; तो प्रत्येक क्षण, तो प्रत्येक दिवस आम्हाला ‘तो दिवस’ कधी उगवणार याची वाट पाहण्याची उत्सुकता वाढवत होता.
नव्या नवलाईचे आई-बाबा जेव्हा जेव्हा इस्पितळात तपासणीला जात तेव्हा, ते परत आल्यानंतर बाळांची झालेली प्रगती आणि त्यांची इत्यंभूत माहिती आम्हाला देताना आमचे झालेले प्रफुल्ल चेहरे आमचे आम्हालाच मोहरून टाकत होते. फक्त वाट पाहणे आमच्या हातात होते त्या दिवसाची आणि आणि तो क्षण आला …..
तो दिवस उगवला. हो ‘शरद पौर्णिमा’ होती त्या दिवशी. सकाळी लवकरच आम्ही इस्पितळाला मार्गस्थ झालो आणि केवळ आमचीच नाही तर आमच्या सर्वच नातेवाईकांची धडधड क्षणाक्षणाला वाढत होती आणि ती वेळ आली. अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटं आणि अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी ते दोघे आमच्या जीवनात शरदाचं चांदणं घेऊन अवतरले. अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आली ती अप्सरा आणि दोनच मिनिटानंतर अवतरला तो देवदूत. गणपतीनं प्रसाद दिला होता. दोन बाळं तर दिली होती पण एक मुलगा आणि मुलगी देण्याचं औचित्यही बाप्पानं दाखवलं होतं. आता जीवनात आणखीन काय हवं होतं? आपण त्याच्याकडे मागावं आणि त्यांनी त्याच्याकडे असणारं असं सर्वोत्तम दान आम्हाला द्यावं की, आमची दुबळी जोडी हे स्वीकारायला कमी पडावी. आनंद सागर लहान पडावा की गगन ठेंगणे व्हावे. मग एक एकदम आजी आजोबा झाल्याची आठवण झाली आणि माझ्या एका ताईने लिहिलेल्या खालील ओळी आठवल्या
आजी आबा झाल्यावरच ओढ जाणवते रक्ताची,
नातवंडांना कुशीत घेवून आशा पालवते जगायची …..
टक लावून वाट पहातात निजलेले बाळ उठण्याची,
हौस अगदी भागून जाते त्याच्या खेळण्यांशी खेळायची …..
गाणी गोष्टी अंगाई गात आजी रंगून जाई
दुधावरच्या सायीला जीवापाड जपत राही …..
हे सर्व होत असताना मी बराचसा भावूक झालो होतो. मी बाप होतानाचे दिवस आठवले. सौभाग्यवतीचे गरोदरपणातील ते कष्ट, त्या प्रसव वेदना आणि चि. प्रथमेशचा जन्म. सुनबाईचे सारे कष्ट आणि वेदना सारं काही दुपटीने होत्या, आम्ही सारेच तीच्या वेदनेचा दाह सहन करत होतो. कारण ती आमची आणि ते उदरातले आम्हा सर्वांचे दोन अंकुर …..
कवीवर्य शंकर वैद्य आपल्या कवितेतून म्हणतात, ‘शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलूख सारा …..’ आमच्याकडे बाळांचा एकच आवाज साऱ्या घराला घरपण (जाग) आणतात. मग ती दिवसभरातली कोणतीही वेळ असो. पळापळ तेवढीच. मग तो आवाज एकाचा असो वा दोघांचा. दूधाची वेळ असो वा शिशू आवरायची असो, तुमच्याकडून उशीर झाला तर आम्ही तुम्हाला क्षमा करणार नाही घर डोक्यावर घेण्याचा इशारा मिळालेला असतो मग समाधान होईपर्यंत शांतता प्रस्थापित होणे दुरापास्त. दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला, महिना झाल्यावर कार्तिक पौर्णिमा साजरी केली.
आज मार्गशीर्ष पौर्णिमा. आज बाळे दोन महिन्यांची झाली. नामकरण विधीला यापेक्षा चांगला दिवस कोणता?? अशा सुंदर दिवशी नामकरण विधी होणं हेही एक प्रारब्धच. या आनंदोत्सवात बाळाचा पाळणा त्यांच्या आईने दोन भागात रचला आणि गायला. तो तुमच्यासाठी …..
श्रीकांत राजे, ठाणे
Leave a Reply