खेळण्यातला लाकडी ट्रक घेऊन धावत येणाऱ्या सावलीला बघून बाबा थांबला . डोक्यावरचे मक्याच्या कणसांचे पोते खाली ठेवले आणि घाम पुसत उभा राहिला . सावलीने त्या पोत्यातली तीन कणसे ट्रकमध्ये ठेवली आणि दोरीने बांधलेला ट्रक घेऊन ती निघाली . बाबा तिथेच थांबलेला बघून तिने कमरेवर हात ठेवले आणि ठसक्यात म्हणाली , ” दमतोस ना म्हणून म्हणते एकट्याने काम करू नको , आता मी करते मदत . तू ये हळूहळू. ”
बाबा हसला .
आणि ती खेळण्यातला ट्रक ओढत निघाली .
तिच्या पाठून बाबा निघाला .
त्याने खांद्यावरच्या फडक्याने डोळे टिपले .
तिच्याकडे कौतुकाने पाहत निघाला .
वय जास्त नव्हतं , जेमतेम पाच वर्षाची होती . पण समज विलक्षण होती .
आपल्या कुवतीनुसार बाबाला , आईला मदत करत राहायची .
” मी केलेल्या भाकरीने बाबाचं पोट भरतं . मग तुझं का नाही भरत ?”
ती आईला विचारायची .
तिनं केलेल्या लहानशा वाटीएवढ्या भाकऱ्या आई बघायची आणि पदरात तोंड लपवून हसत रहायची .
बाबा मात्र मुद्दाम ढेकर द्यायचा .
” सांग ना ”
ती हट्ट धरायची .
” सावली , अगं कसं सांगू तुला , तू उद्या सासरी गेलीस की तुझ्या बाबांचं पोट कसं भरेल या विचारानं , मला काळजी वाटते . तू गेलीस की बाबांना भाकऱ्या करून कोण देणार ?”
पाच वर्षाची लहानगी सावली विचारात पडायची . म्हणायची , ” मग मी लग्नच करणार नाही .”
आई , बाबा हसत रहायची …
बाबाला सगळं आठवलं .बाहेरच्या पायरीवरून उठून तो आत आला . समोर खिडकीत तो जुना ट्रक तसाच ठेवलेला होता .
सावलीने तो खिडकीला बांधून ठेवला होता .
जाताना म्हणाली होती ,
” लहानपणी मी तुला याच ट्रक मधून मदत करायची . ती आठवण राहायला हवी म्हणून राहू दे . ”
तो ट्रक बघून त्याला हुंदका अनावर झाला .
आईनं बाबाचे डोळे पुसले .
आणि स्वतःच्या डोळ्याला पदर लावला .
त्यादिवशी सावलीनं विचारलं होतं,
” माझं सावली हे नाव कुणी ठेवलं ? ”
” आम्ही दोघांनी .”
बाबानं लगेच उत्तर दिलं .
” तू आमची सावली व्हायला हवी म्हणून नाव हे ठेवलं .”
” मग मला सावलीसारखं वागायलाच हवं . आता मी पुढं शिकतच नाही . तुमची सावली होऊन राहीन घरात .”
” खरंच ?”
बाबानं विचारलं .
” की तुझं पुढचं शिक्षण देण्यात आम्ही कमी पडणार आहोत , हे तुला कळलं ?”
आता सावलीच्या डोळ्यात पाणी आलं .
” मी ऐकलंय काल सगळं . तू आणि आई बोलत होता , ते ऐकू येत होतं शासनानं कितीही मदत केली तरी पुढच्या शिक्षणाला बरेच खर्च असतात . ते कसे भागवायचे म्हणून तुम्ही दोघं रडत होता . ते ऐकलंय मी . म्हणूनच म्हणते , नको पुढचं शिक्षण . आहे त्या शेतात राबून भागवू . ”
” असं नको म्हणू . मी आज काही तजवीज करता येते का बघतो . पण तू शिकायला हवं . ”
तो विषय तिथेच थांबला .
आणि संध्याकाळी पाय ओढत येणाऱ्या बाबाला बघून ती काय समजायचे ते समजली .
” पण मला समजत नाही , मला शिकवायचा एवढा अट्टाहास का तुमचा ?”
” तू हुशार आहेस , समजूतदार आहेस , एकुलती एक आहेस . तुला तुझ्या पायावर उभं रहायचं तर शिक्षण नको ? ”
” तुम्हा दोघांना काय म्हणायचं आहे ते कळतंय मला . मी माघार घेते . शिकते पुढे . पण जेव्हा मिळणाऱ्या मदतीव्यतिरिक्त अन्य खर्चासाठी तुम्हाला तोशीस पडणार असेल , त्यासाठी चार लोकांकडे हात पसरायला लागणार असतील , त्यादिवशी मी शिक्षण सोडून देईन आणि तुमची सावली बनून राहीन .”
तिनं सांगितलं . बाबानं ते मान्य केलं .
पण तशी वेळच आली नाही .
बारावीत गेल्यावर अचानक स्थळ म्हणून मागणी आली आणि केवळ नारळ आणि मुलगी द्या , असं सांगितलं , तेव्हा बाबानं जास्त विचार केला नाही . शिवाय सावलीला जितकं शिकायचं आहे , तितकं शिकवू असं सांगितल्यावर , सावलीचा विरोध मावळला .
तिनं होकार दिला . लग्न साधेपणाने करण्याचंही मान्य केलं .
लग्नापूर्वी तिनं आईबाबाला सांगितलं .
” माझं एक स्वप्न आहे . एक एकरभर जागा मी बघून ठेवली आहे . त्यात तीन खोल्यांचं एक टुमदार घर आहे . तुम्ही तिथे राहावं असं माझं स्वप्न आहे . त्या जागेत विहीर आहे . काहीना काही पिकवून तुमचा चरितार्थ चालावा असं वाटतंय . बघू या कसं जमतंय ते . आपली जमीन हायवे साठी जाणार आहे , त्याचे पैसे मिळाले की ती जागा घेऊ. मी जमीन मालकाशी बोलून ठेवलं आहे . तो थांबायला तयार आहे .”
आईबाबांच्या डोळ्यात पाणी आलं.
आणि तिचा अभिमान पण वाटला .
लग्न होऊन ती सासरी आली .
आणि तिच्या लक्षात आलं .
आपण फसलो .
घरात काम करायला एक बाई म्हणून तिला आणलं होतं .
शेती करायला , वावरात कामाला माणसं होती . पण घरासाठी एक गुलाम हवा होता , तो त्यांनी आणला होता . तिनं सुरुवातीला समजावून सांगितलं , मग विरोध करायला सुरुवात केली . पण कशाचाच उपयोग झाला नाही . उलट मारझोड , अपमान वाट्याला आला .
त्याही परिस्थितीत तिला वाटलं, जावं बाबाकडे , सांगावं त्याला . पण नंतर तिच्या लक्षात आलं. बाबाला जास्तच त्रास होईल . आई कुढत बसेल . त्यापेक्षा सहन करायचं . सोसायचं . केव्हातरी संधी मिळेल तेव्हा सासरच्या माणसांना स्वभाव बदलायला भाग पडायचं .
तशी संधी आली .
त्या दिवशी सासरची सगळी माणसं अचानक चांगली वागू लागली .
तिला शंका आली .
पण नंतरचे सलग दोन दिवस सगळे चांगले वागत आहेत हे बघून तिची शंका दूर झाली .
त्या रात्री नवऱ्याने लग्नानंतर पहिल्यांदाच तिला स्पर्श केला .
ती मोहरुन गेली .
पण त्याच्या शब्दांनी ती आक्रसून गेली .
तिला जवळ घेत तो म्हणाला …
” चैन आहे बुवा एका माणसाची . हायवेला गेलेल्या तुझ्या बाबाला चाळीस लाखाचा मोबदला मिळणार आहे म्हणे उद्याला . मग काय करणार तुझा बाबा इतक्या पैशाचं ?”
ती बघत राहिली . सावध झाली . आक्रसली . त्याच्या मिठीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न करू लागली .
” उद्या माहेरी जायचं . आणि रुपये चाळीस लाख घेऊन यायचं . मी सोडायला येतो तुला .”
ती पुन्हा सावध झाली .
संताप अनावर झाला होता .
पण तिनं स्वतःवर नियंत्रण ठेवलं .
तिच्या सगळं लक्षात आलं . मागणी घालून केलेलं लग्न , नारळ आणि मुलगी मागणं , साधेपणाचा आव आणणं , शिकण्याची संधी देण्याचं आमिष … सगळं लक्षात आलं तिच्या .
तिनं क्षणार्धात निर्णय घेतला .
गोड हसली .
” चाळीस लाख माहेरून आणायचे , इतकंच ना . त्यासाठी तुम्ही कशाला येता , मी एकटी जाते . सगळी प्रोसिजर पूर्ण करायला दोन दिवस तरी जातील . त्यापेक्षा दोन दिवसांनी मला न्यायला तुम्ही या . रक्कम मोठी असल्यानं मला आधार होईल तुमचा . ”
ती म्हणाली . तो बघत राहिला .
” लक्षातच आलं नव्हतं . तू उद्या एसटीनं जा , परवाच्या दिवशी मी न्यायला येतो . पण मी घरी नाही येणार , स्टँडवर थांबतो आपली कार घेऊन .”
तिनं हो म्हणून सांगितलं.
आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे ती निघाली .
घरी आल्यावर तिनं बाबाला घाई केली .
” जमिनीचा मोबदला बँकेत अकाउंटला जमा झालाय ना ?”
बाबानं पासबुक तिच्या हाती दिलं .
” आता मी काय सांगते ते दोघांनी ऐका . मी मागे म्हटली होती ती जमीन आणि घर आजच खरेदी करू या . पंधरा लाख पोस्टात ठेवू तुमच्या नावानं , त्याच्या व्याजावर तुमचं भागेल . पाच लाखात घर , वावर येतंय . आणि उरलेली रक्कम मला हवीय. मी ती आपल्या गावातल्या अनाथ विद्यार्थिनींच्या संस्थेला देणगी म्हणून देणार आहे . त्याच्या व्याजातून तिथल्या मुलींचं शिक्षण सहज पूर्ण होईल . त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील .”
तिनं आईबाबाला जास्त बोलू न देता दोन दिवसात सगळी कामं मार्गी लावली . घर , वावर ताब्यात घेतलं . चार तास खपून घर हवं तसं सजवून दिलं .
” हा माझा खेळण्यातला ट्रक इथे खिडकीला बांधून ठेवते . आठवण म्हणून .”
ती गोड हसली आणि दोघांच्या कुशीत शिरली .
संध्याकाळी ती निघाली . आईबाबा घर , अगदी डोळे भरून पाहून घेतलं . आणि रिक्षेनं स्टँडवर आली .
नवरा कार घेऊन आला होता . ती गाडीत बसली . गाडी सुरू केल्यावर त्यानं विचारलं .
” चाळीस लाख कुठं आहेत ?”
तिनं पर्स मधला घडी केलेला चेक दाखवला .
तो खुश झाला. गाडी हायवेला लागली .
अचानक त्याला शंका आली .
पाय मोकळे करण्याच्या निमित्तानं त्यानं गाडी साईडला थांबवली .
” दे इकडे तो चेक ”
ती गाडीच्या खाली उतरली आणि पर्स मधून कोरा चेक त्याच्या हाती दिला .
तो बघता क्षणी त्याचा संताप अनावर झाला ,
” फसवलस काय आम्हाला . आता बघतोच तुझ्याकडे .”
तो गाडीत बसला आणि ती गाडीत बसण्यापूर्वीच त्यानं गाडी पाठी घेतली . आणि प्रचंड स्पीडनं गाडी तिच्या अंगावर घातली .
रस्ता निर्मनुष्य होता .
त्यानं पुन्हा गाडी पाठी घेतली आणि पुन्हा पुन्हा …
सावली केव्हाच निष्प्राण झाली होती .
तो सुसाट वेगानं निघून गेला .
तिच्या पर्स मधलं आधार कार्ड पोलिसांना मिळालं आणि ओळख पटली .
मात्र तिनं लिहिलेलं पर्स मधलं पत्र गायब झालं होतं .
सासरच्या घरी जरा जास्तच आकांत झाला होता .
आणि पोलिसांनी बातमी सांगितल्यावर आलेल्या आईबाबांना तिचं निष्प्राण कलेवर बघायला मिळालं होतं .
स्मशानात सावलीची सावली विरत जात होती .
आणि आईबाबांच्या मनात आठवणीतील सावली दाटत चालली होती .
हायवे सुरूच होता .
आणि नव्या घरातल्या आईबाबाचा आकांत गहिरा होत जात होता .
( काल्पनिक )
डॉ . श्रीकृष्ण जोशी
८९५१९०६७०१
———————-
कथा आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .
आपल्या या लहानशा कृतीने अनेक सावल्यांना भान येऊ शकेल .
Leave a Reply