
मोगलाईत कल्याण नामक गावी मनोहर नाईक हरकुडे नावाचे एक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. हे महान दत्तोपासक होते. त्यांची धर्मपत्नी बयाबाई हीदेखील महासाध्वी स्त्री होती. मनोहर नाईकांनी एका सत्पुरुषाच्या सांगण्यावरून निजामाची मोठ्या हुद्द्याची नोकरी सोडली व त्या दांपत्याने दत्तसेवेला आपले उर्वरित आयुष्य वाहून टाकले. अशी सोळा वर्षे कडकडीत तपश्चर्या झाल्यावर एके रात्री प्रभू दत्तात्रेयांनी स्वप्नात येऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी ‘आपणांस तुमच्यासारखा पुत्र व्हावा’ असा वर मागितला. त्याप्रमाणे मार्गशीर्ष शु. १४ शके १७३४ या दिवशी दत्तात्रेयांनी ‘माणिकप्रभू’ या नावाने त्यांच्या घरी जन्म घेतला.
सर्व दत्तावतारात माणिकप्रभु हे फार ऐश्वर्यसंपन्न असे राजयोगी होते. लहानपणापासूनच त्यांच्या अंगावर सोने, मोत्ये, हिरे, माणके व पाचू यांचे बहुमोल दागिने असत. तसेच त्यांना सांभाळण्यास दहा पाच अरब व रोहिले शिपाई असत. माणिकप्रभु नवसाला पावतात अशी त्यांची बालपणापासूनच ख्याती झाल्यामुळे दर गुरुवारी हजारो लोक त्यांच्या दर्शनाला येत!
प्रभूंनी कोणाकडून ब्रह्मकर्माची संथा घेतली नाही किंवा ते एखाद्या शाळेतही गेले नाहीत. परंतु चतुर्वेद व षट्शास्त्रे यांत पारंगत असलेल्या विद्वानांचीही त्यांच्यापुढे शास्त्रार्थ करण्याची प्राज्ञा नव्हती! श्रीज्ञानदेव अशा जन्मसिद्ध ज्ञानी पुरुषांच्या संबंधी लिहितात- मोटकी देहाकृती उमटे। आणि निज ज्ञानाची पहाट फुटे। सूर्यापुढे प्रकटे। प्रकाशु जैसा।। तैसी दशेची वाट न पाहता। वयसेचिया गावा न येता। बाळपणीच सर्वज्ञता। वरी तयाते।। तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे। मनचि सारस्वते दुभे। मग सकळ शास्त्रे स्वयंभे। निघती मुखे।। (अ. ६-५२, ५३, ५४)
हे वर्णन माणिकप्रभूंच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. प्रभूंना बालपणापासूनच वाक्सिद्धी प्राप्त होती. ते जे बोलत ते खरे होत असे. बालपणापासूनच घनघोर अरण्यात जाऊन दिवसाचे दिवस ते तपश्चर्या करीत असत. त्यांच्या वडिलांच्या देहावसानानंतर त्यांच्या मामाने त्यास बळेच एके ठिकाणी चौकीवर नोकरीस ठेवले. परंतु प्रभूंनी दुसऱ्याच दिवशी चौकीचे दप्तर, कलमदान व झोपडी यांना आग लावून दिली व ती राख कपाळाला लावून पुन्हा अरण्याचा रस्ता धरला.
त्यानंतर बरेच अलौकिक चमत्कार करून ते भालकी गावाजवळील अरण्यांतील एका गुहेत वर्षभर समाधी लावून बसले. वर्ष संपल्यावर हजारो लोक प्रभूंच्या दर्शनासाठी तेथे आले. प्रभूंच्या धाकट्या बंधूंनी, तात्यासाहेबांनी गुहेच्या तोंडावरील शिळेची पूजा-आरती करून शिळा बाजूला केली, तो आत प्रभूंची दैदिप्यमान तेजःपुंज मूर्ती आसनावर बसलेली दृष्टीस पडली! तेव्हा जमलेल्या हजारो लोकांनी ‘भक्त कल्पद्रुम गुरु सार्वभौम श्रीमद्राजाधिराज योगिराज महाराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमत संस्थापित श्रीसद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय’ अशी गर्जना करून प्रभूंच्या दिव्य शरीरावर हजारो फुलांची वृष्टी केली!
प्रभूंच्या हजारो लीला प्रसिद्ध आहेत. एकदा काही मुसलमानांनी प्रभूंना बाटविण्याचे ठरवून त्यांना आपल्याकडे भोजनाचे आमंत्रण दिले. प्रभूंनी त्यांचे कपट तेव्हाच ओळखले. परंतु बाह्यात्कारी तसे न दाखविता ते आनंदाने भोजनास बसले. मुस्लीम नवाबाने प्रभूंना बाटविण्यासाठी गोमांसमिश्रित अन्न तयार केले होते. परंतु भोजनाचे वेळी खान्यावरील चादर दूर करताच गोमांसाच्या जागी हजारो जाईजुईच फुले दिसून आली. त्यामुळे सर्व मुसलमान वरमले व त्यांनी प्रभूंची क्षमा मागितली. साक्षात जगदंबेने प्रभूंना झोळी व योगदंड दिला होता. त्यामुळे प्रभूंच्या भंडारखान्यात कधी कसलीच तूट पडत नसे. हजारो माणसे नित्य जेवत होती. परंतु स्वतः प्रभू मात्र भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करीत असत! प्रभूंचे रूप पाहताच त्यांचेविषयी पूज्यभाव निर्माण होई. वर्ण सावळा, आजानुबाहू, प्रसन्न व दयार्द्र मुखकमल, शांत व हृदयस्पर्शी मुद्रा, नेत्रांत दिव्य तेज, मधुर व मोहक भाषण, अखंड आनंदाकार मूर्ती असा हा मनोहर दत्तावतार झाला.
एकदा शृंगेरीचे जगद्गुरू शंकराचार्य प्रभूंना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या स्वागताची तयारी प्रभूंनी दोन महिने अगोदर चालविली होती. त्यांना भेट देण्यासाठी साठ हजार रुपये किमतीचा चाफेकळीचा एक रत्नखचित हार प्रभूंनी मुद्दाम बनवून घेतला होता. तसेच एक लाख रुपये किमतीचा एक रत्नजडित सोन्याचा मुकुटही तयार केला होता. चौघडे, वाजंत्री, ताशे वाजत होते. बंदुकांच्या फैरी झडत होत्या. त्यापूर्वी प्रभूनी जगद्गुरूंचा मान राखण्यासाठी सर्वांना आज्ञा केली होती, की कुणीही त्यांचे देखत आमचा ‘सकलमतस्थापित भक्तकार्य’ असा गजर करू नये. कारण स्वामी आमचे गुरु आहेत. परंतु मंडळींनी भान न राहून तशी गर्जना केलीच. परंतु त्याचवेळी अचानक बंदुकीच्या चारशे फैरी झडल्या व ती गर्जना त्या आवाजात लुप्त झाली! जगद्गुरूंना बसण्यासाठी प्रभूंनी जे सिंहासन तयार केले होते त्यावर सव्वालक्ष रूपये रोख पसरण्यात आले होते. जगद्गुरूंनी अडीच महिने त्या ठिकाणी राजेशाही पाहुणचार घेतला.
प्रभूंनी यासाठी एकंदर पाच लक्ष रुपये खर्च केला.
आपल्या समाधीची जागा प्रभूंनी कुणाच्या नकळत अपरात्री स्वतःच तयार केली होती. मार्गशीर्ष शु. ११ शके १७८७ हा आपला निर्वाण दिवस प्रभूंनी अगोदरच ठरविला होता. निर्वाणापूर्वी त्यांनी गुपचूप यथाशास्त्र संन्यास ग्रहण केला. त्यांच्या समाधीची वार्ता त्यांच्या शिष्यांनी एक दिवस कशीबशी गुप्त ठेवली, परंतु दुसऱ्या दिवशी ती सर्वत्र फुटली व एकच हलकल्लोळ उडाला! कित्येकांनी तर समाधी उघडून एकदा तरी प्रभूंना पाहण्याचा हट्ट धरला. शेकडो लोकांनी दुःखातिशयामुळे आत्महत्याही केल्या! समाधीच्या वेळी प्रभूंचे वय अवघे पंचेचाळीस वर्षांचे होते. प्रभूंनी ‘कल्पतरू’ नावाचा एक ग्रंथ लिहिला असून त्यांनी रचिलेली अनेक पदेही प्रसिद्ध आहेत.
बाबा सबनीस हे प्रभूंचे एकनिष्ठ सेवक होते. अक्कलकोटचे स्वामी प्रभूंना भेटण्यासाठी आले असता प्रभूंच्या मांडीला मांडी लावून त्यांचे शेजारी बसले. त्यावेळी ‘हे तुमचे गुरु’ असे सांगून प्रभूंनी सबनिसांना म्हटले, थोडे दिवसात अक्कलकोटी। ब्रह्मांडनायक अनंतकोटी। विराजतील जगदुद्धरणा -साठी। खूण दृढ पोटी द्विजा धरी रे।।
-लेखन: कै. वि. के. फडके.
सौजन्य साभार: श्रीगजानन आशिष –
दिवाळी अंक १९९३


Leave a Reply