
कार्यकाळ: १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१
जन्म: १ जुलै १९२७
मृत्यू: ८ जुलै २००७
पंजाब प्रश्न सामंजस्याने सोडवावा, सरहद्दीवरील रहिवाशांना ओळखपत्रे द्यावीत तसेच काश्मीर प्रश्नही चर्चेनेच सुटू शकेल, असे त्यांचे मत होतें. चंद्रशेखर यांनी समन्वयवादी भूमिका घेऊन देशात सुव्यवस्था व शांतता या प्रश्नांना प्राधान्य दिले.
ओजस्वी वक्तृत्वाने संसद गाजविणारे चंद्रशेखर यांना भारताचे आठवे पंतप्रधान म्हणून कामकाज करण्याचा मान मिळाला. चंद्रशेखर सदानंद सिंह असे त्यांचे पूर्ण नाव. प्रजासमाजवादी पक्षाचे सरचिटणीस असताना त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यांनी ‘डायनॅमिक्स ऑफ सोशल चेंज’ हे भारतीय अर्थशास्त्रावरील पुस्तक लिहिले. काही काळ त्यांनी ‘यंग इंडियन’ या साप्ताहिकाचे संपादनही केले. अशोक मेहतांमुळे चंद्रशेखर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भारतीय राजकारणातील ‘तरुण तुर्क’ म्हणून ते. ओळखले जात. ‘गरिबी हटाव’ ही त्यांचीच अभिनव कल्पना होय. इंदिरा गांधींच्या काही निर्णयाविरुद्ध चंद्रशेखर यांनी ‘यंग इंडियन’ साप्ताहिकातून टीका केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीस पाठिंबा दिला. देशात आणीबाणी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. आणीबाणीनंतर चंद्रशेखर जनता पक्षात सामील झाले. त्यांना जनता पक्षाचे अध्यक्षपद देण्यात आले. हे पद त्यांनी दीर्घकाल सांभाळले. त्यांनी कन्याकुमारीपासून राजघाटापर्यंत सुमारे ४२३० किलोमीटरची पदयात्रा काढून जनतेशी संपर्क साधला. व्ही.पी. सिंह यांचे सरकार गडगडल्यानंतर चंद्रशेखर यांच्या नेतृत्त्वाखाली ५८ खासदारांनी पक्षातून बाहेर पडून समाजवादी जनता दलाची स्थापना केली. काँगेस व अण्णा द्रमुक या पक्षांच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. मात्र पुढे काँग्रेसने पाठिंब्याची शाश्वती न दिल्यामुळे चंद्रशेखर यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
Leave a Reply