नवीन लेखन...

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ४

Religions in America - Part 4

भारताच्या शोधार्थ निघालेला ख्रिस्तोफर कोलंबस, १४९२ साली जेंव्हा अमेरिकेच्या खालच्या बाजूला कॅरेबियन बेटांवर पोहोचला, त्यावेळी युरोपमधे ख्रिश्चन धर्मात, कॅथलिक पंथाचाच एकछत्री अंमल होता. त्यासुमारास कॅथलिक पंथ हा कर्मठ कर्मकांडामधे आणि धर्मगुरुंच्या मनमानी कारभारामधे बंदिस्त झाला होता. सामान्य जनतेची घुसमट होत होती. या परिस्थितीचा कडेलोट होऊन, सोळाव्या शतकात मार्टिन ल्युथर, जॉन कॅल्व्हीन आणि एलरिच झ्विंगली या नवीन विचारसरणीच्या विचारवंतांनी, कॅथलिक पंथाच्या अंमलाला आव्हान देऊन, प्रॉटेस्टंट पंथाची चळवळ सुरू केली. रोमन कॅथलिक पंथाच्या मतानुसार, बायबल आणि पूर्वापार चालत आलेल्या रूढी, या दोहोंनाही सारखेच महत्व होते. त्याचप्रमाणे, जगभरच्या कॅथलिकांसाठी पोप हा येशु ख्रिस्ताचा प्रतिक रूप असून, त्याचा आदेश म्हणजे ब्रह्मवाक्य होतं. या उलट, प्रॉटेस्टंट चळवळीचा गाभा म्हणजे, केवळ बायबलचे महत्व मानणे आणि जुन्या रूढींना पूर्णपणे फाटा देणे. तसंच त्यांच्या मते, पोप झाला तरी तो देखील शेवटी एक माणूसच आणि कोणीही माणूस ख्रिस्ताचं प्रतिकरूप देखील होऊ शकत नाही. थोडक्यात, देवापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना पुजारी / पुरोहितांची मध्यस्थी मान्य नव्हती. त्यामुळे विचारसरणीतील या मूलभूत फरकांमुळे, सनातनी कॅथलिक पंथापासून फुटुन निघालेले, ते प्रॉटेस्टंट.

या प्रॉटेस्टंटांमधे पुढे बरेच फाटे पडले. मेथॉडीस्ट्स, प्रेस्बीटेरियन, एपीस्कोपोलीयन आणि लुथर्न हे त्यातले मध्यवर्ती प्रवाह. क्वेकर्स आणि शेकर्स ह्या देखील प्रॉटेस्टंटांच्याच शाखा, परंतु बॅप्टीझम (बाप्तिस्मा) मधे विश्वास न ठेवणार्‍या. बॅप्टीस्ट्स हा एक आणखी वेगळा प्रकार. त्यांना रोमन कॅथलिकांशी अजिबातच काही देणं घेणं नाही. प्रॉटेस्टंट जरी कॅथलिकांपासून फुटून निघाले असले, तरी कधी काळी ते देखील कॅथलिकच होते. त्यामुळे बॅप्टीस्ट्स स्वत:ला प्रॉटेस्टंटांपासून देखील वेगळे समजणारे. त्यामुळे त्यांची चूल कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट या दोघांपासूनही वेगळी. नुसतं प्रॉटेस्टंट असं ढोबळ लेबल लावलं, की त्याला ‘कॅथलिक नाहीत ते’, असा एक प्रकारचा नकारात्मक वास येतो. त्यापेक्षा निराळा आणि काहीसा सकारात्मक अर्थ ध्वनीत करण्यासाठी, अलीकडे प्रॉटेस्टंटांमधली एक नवीन आणि वाढती विचार धारा म्हणजे रिफॉरमिस्ट्स (reformists).

युरोपियन देशांकडे एक नजर टाकली, तर असं लक्षात येतं की स्पेन, पोर्तुगाल, इटली असे दक्षिणेकडील देश मुख्यत: कॅथलिक आहेत तर इंग्लंड आणि उत्तर युरोपातील नेदरलॅंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क हे देश प्रामुख्याने प्रॉटेस्टंट आहेत. पंधरावं शतक अस्ताला जाण्याच्या सुमारास, कॅथलिक युरोपातून निघालेल्या कोलंबसने, युरोपियन लोकांना पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या अशा एका नवीन जगाचे दरवाजे उघडून दिले. अमेरिकेचा शोध लागल्यावर, युरोपातील त्यावेळच्या सरंजामशाहीच्या जाचाला, गरीबीला कंटाळून, लोक नवीन संधी आणि नवीन आयुष्य सुरु करण्याच्या आशेने अमेरिकेकडे वळायला लागले. अमेरिकेत सुरवातीच्या वसाहती वसण्याच्या सुमारासच, युरोपात वर उल्लेखलेली प्रॉटेस्टंट चळवळ सुरू झाली होती, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळॆ, सरंजामशाहीच्या जाचातून आणि गरीबीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अमेरिकेत जाणार्‍या लोकांप्रमाणेच, युरोपातील कट्टर धार्मिक वातावरणाला कंटाळून, धार्मिक स्वातंत्र्याची वाट चोखाळू पहाणारे लोक देखील होते. थोडक्यात, अमेरिकेच्या दिशेने गलबते हाकारणार्‍या लोकांच्या दृष्टीने, अमेरिका ही नुसतीच नवीन संधीची सुवर्णभूमी नव्हती तर धार्मिक स्वातंत्र्याची देखील स्वप्नभूमी होती.

विल्यम पेन हा त्यावेळच्या इंग्लंडमधला बंडखोर तरूण. त्याकाळी इंग्लंडमधे, देशाच्या अधिकृत धर्माशिवाय इतर धार्मिक विचार मांडणे, बेकायदेशीर कृत्य मानलं जायचं. आपली बंडखॊर मतं बेधडकपणे मांडल्याबद्दल, विल्यम पेनला अनेकदा तुरुंगवास भोगायला लागला होता. वयाच्या बावीसाव्या वर्षी तो क्वेकर लोकांच्या पंथामधे सामील झाला. हे लोक धार्मिक स्वातंत्र्याचे चाहते होते. ह्या लोकांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, कुठल्याही प्रकारच्या युद्धाला असलेला त्यांचा ठाम विरोध. त्याकाळच्या युद्धपिपासू आणि समाजातल्या दुर्बल घटकांना कठोरपणे वागवणार्‍या समाजव्यवस्थेमधे, ह्या लोकांची घुसमट होत होती. निदान युद्धकैदी आणि वेडसर लोकांना तरी दयार्द्र आणि सहानुभूतीपूर्वकरित्या वागवलं जावं, या त्यांच्या मागणीला सरंजामशाही विचारसरणीमधे काही थारा नव्हता. विल्यम पेनचे वडील खूप धनाढ्य होते आणि जेव्हा त्यांचा स्वर्गवास झाला, तेंव्हा इंग्लंडच्या राजावर त्यांचे कर्ज होते. या कर्जातून मुक्त होण्यासाठी, इंग्लंडच्या राजाने, विल्यम पेनला, नवीनच उपलब्ध झालेल्या अमेरिकेमधे जागा देऊ केली. या जागेचे नामकरण झालं “पेनसिल्व्हेनिया”, म्हणजे ‘पेनचं जंगल’.

विल्यम पेनच्या दृष्टीने, पेनसिल्व्हेनिया म्हणजे क्वेकर समाजाच्या लोकांसाठी नंदनवनच होतं. त्याने या नंदनवनात केवळ क्वेकरच नाही, तर इतर लोकांना देखील, खुल्या मनानं आपापल्या धार्मिक विचारांचं मुक्तपणे पालन करण्यासाठी आमंत्रण दिलं. त्याने, अमेरिकेत नव्यानेच येऊन, वसाहती करून रहाणार्‍या लोकांमधे, या आपल्या नंदनवनाचा मोठ्या धडाक्याने प्रचार सुरू केला. त्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन, क्वेकर्स, मेनोनाइट्स, ज्यू, बॅप्टीस्ट्स, अशा निरनिराळ्या संप्रदायाचे लोक, पेनसिल्व्हेनियाकडे आकर्षित होऊ लागले. धार्मिक स्वातंत्र्याबरोबरच, पेनसिल्व्हेनियाच्या लोकांना, स्वत:च्या राज्यकारभारात भाग घेण्याचं मधाचं बोट लावायला देखील विल्यम पेनने कमतरता ठेवली नाही. या धार्मिक तसंच राजकीय स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, जर्मनी अशा विविध युरोपियन देशांतून लोकांचा रोख पेनसिल्व्हेनियाकडे वळू लागला.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..