नवीन लेखन...

प्रतिकृती (कथा)-भाग-२

आमच्या गावात गोविंदभट नावाचे एक कीर्तनकार होते. रामनवमी, हनुमान जयंती, कृष्णाष्टमी अशा निरनिराळ्या धार्मिक प्रसंगी आणि एरवीही, आठवड्यातून एक-दोन वेळा गावातल्या राममंदिरात गोविंदबुवांचं कीर्तन असायचंच. बरेच वेळा मी आईबरोबर कीर्तनाला जात असे. म्हणजे आईच मला घेऊन यायची. हे बुवा आमच्या वाड्यावरसुद्धा घरच्या देवांची पूजा करायला रोज सकाळी यायचे. बुवांची आणि माझी चांगली गट्टी जमायची. तर सांगायचा मुद्दा लहानपणी मी आईबरोबर देवळात कीर्तनाला जायचो. बुवांची कीर्तन सांगायची पद्धत खूप मजेशीर होती. मी अगदी रंगून जायचो त्यांच्या कीर्तनात. कथा रंगात आली की बुवा नाचायला लागायचे आणि मध्येच म्हणायचे, “आणि बरं का महाराज- काय सांगू देवाची करणी! अहो, तुकोबारायांसाठी साक्षात वैकुंठातून विमान आलं महाराजा! आणि बघता बघता घेऊन गेलं की त्यांना-सदेह वैकुंठाला! बोला – जय जय पांडुरंग हरी जय जय-” आणि बुवा तंबोरा वाजवत नाचायला लागायचे. खूप गंमत वाटायची.

कधी बुवा सांगायचे, “आणि काय सांगू राजेहो- देवांची आणि राक्षसांची अशी तुंबळ लढाई झाली सांगू – अहो, तो महाबली राक्षस काही देवांना दाद देईना. अहो, त्याच्या रक्ताचा थेंब भुईवर पडला रे पडला की त्यातून दुसरा राक्षस हजर, पुन्हा लढायला! राजेहो, देवांची अगदी पळता भुई थोडी झाली! त्यांनी देवाधिदेवाचा धावा सुरू केला आणि काय सांगू महाराजा? जय जय पांडुरंग हरी-”

मी डोळे मोठे करून, ओठांचा चंबू करून ते चमत्कार ऐकायचा! घरी येताना मी आईला विचारायचो- “आई खरंच का गं वैकुंठातून विमान आलं तुकोबारायांना न्यायला?”

ती म्हणायची, “बाज्या अरे तुकोबा देवमाणूस! देवाचा लै लाडका. त्याचं पुण्यं मोठं बाबा. म्हणून आलं विमान त्यांच्यासाठी!” दुसऱ्या दिवशी गोविंदबुवा घरी पूजेला आले की मी त्यांना विचारायचो, “बुवा, तुकोबारायांना न्यायला विमान आलं, राक्षसाच्या रक्ताच्या थेंबातून पुन्हा राक्षस निर्माण झाला हे खरं का हो?”

ते म्हणायचे, “अहो बाजीराव, श्रद्धावान लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि इतर लोक ही ‘पुराणातली वांगी’ म्हणून हसण्यावारी नेतात आणि सोडून देतात, पण कुणीही याच्यामागे काही शास्त्रीय आधार आहे का- याचा शोध घेत नाही.

‘बुवा, शास्त्रीय आधार म्हणजे काय हो?” मी उत्सुकतेने विचारायचो.

“बाजीराव, शास्त्रीय आधार म्हणजे या गोष्टी खऱ्या आहेत का उगीच गप्पा आहेत याचा शास्त्राच्या आधाराने शोध घ्यायचा. संशोधन करायचं, अहो असाच विचार करून माणसाने विमानाचा शोध लावलाच की नाही? तर बाजीराव, तुम्हाला सांगतो अहो या पुराणातल्या गोष्टी म्हणून सोडून न देता त्यावर संशोधन करून नवे नवे शोध लावले पाहिजेत. आपण मात्र काहीच करत नाही.”

“बुवा, मला येतील का हो असे शोध लावता?”

“हो, येतील की! का नाही येणार? पण बाजीराव त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभ्यास करावा लागेल. अहो, शास्त्र आता खूप पुढे गेलं आहे. तुम्ही खूप शिका बाजीराव. तुम्हाला पण असे नवे नवे शोध लावता येतील.”

बुवा मला नेहमी असं उत्तेजन देत. त्यावर मी खूप विचार करायचो आणि त्यातूनच मला आपणही काहीतरी मोठा शोध लावावा असं वाटू लागलं. विशेषतः शास्त्र विषयाची आवड निर्माण झाली.

पुढे याची परिणती शाळेत बायलॉजी (जीवशास्त्र) हा माझा अत्यंत आवडीचा विषय होण्यात झाली. एका पेशीपासून अगणित पेशी निर्माण होतात आणि त्यातून सृष्टीच्या सर्व सजीव-निर्जीवांची उत्पत्ती, निर्मिती चालू असते हे मला अगदी अद्भुताहूनही अद्भूत वाटू लागलं. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर तर मी रात्रंदिवस लॅब/लायब्ररीमध्येच घालवत असे. रक्ताच्या थेंबातून पुनर्निमिती ही गोष्ट माझ्या मनात अगदी खोलवर रूतून बसली होती आणि याच गोष्टीवर संशोध करायचं ही मी मनाशी खूणगाठ बांधली होती. ते माझं स्वप्नच झालं होतं म्हणा ना!

जीवशास्त्राची उपलब्ध सर्व पुस्तकं, शोधनिबंध, मासिकं, प्रबंध आणि सर्व आधुनिक संशोधन मिळवून वाचणं, त्यावर मनन-चिंतन करणं हा मला एक ध्यासच लागला. आई एक भजन नेहमी म्हणायची- ‘असा धरि छंद जाई तुटोनिया भवबंध!’ तसं मी सगळं विसरून फक्त हा एकच ध्यास घेतला होता.

खूप लहान वयात मी पीएच.डी. केली आणि ह्युमन जीनोम’ किंवा ‘मानवी गुणसुत्रं’ या विषयावरीला माझा प्रबंध खूप गाजला. मेरीलँड युनिव्हर्सिटी, अमेरिका येथून मला स्कॉलरशिप मिळाली आणि या विषयावर संशोधन करण्यासाठी मला बोलावण्यात आलं. त्यावेळी माझं वय फक्त बावीस वर्षांचं होतं. ही दुर्मिळ संधी होती आणि ती सोडणं मूर्खपणा ठरला असता. एकच अडचण होती. माझी आई मला परदेशात पाठवायला अजिबात तयार नव्हती. शेवटी आबांनी आणि मोठ्या भावाने आणि वहिनीने खूप समजावलं तेव्हा मोठ्या नाखूषीने तिने मला परवानगी दिली आणि मी मेरीलँड युनिव्हर्सिटी, अमेरिकेत दाखल झालो.

विद्यापीठाची भव्य इमारत, विलोभनीय परिसर, अद्ययावत साधनसामग्री, अत्यंत समृद्ध प्रयोगशाळा, अप्रतिम ग्रंथालय, ‘ह्यूमन जीनोम’ (मानवी गुणसुत्र) यावर उपलब्ध असलेले सर्व अद्ययावत आणि आधुनिक ज्ञान व या शास्त्रासाठी आयुष्य झोकून दिलेले विद्वान प्राध्यापक आणि त्यांचं मार्गदर्शन यामुळे माझं संशोधन चांगल्या प्रकारे आणि उत्साहाने सुरू झालं. काळ वेळ कशांचही भान मला राहिलं नाही.

अत्यंत गुप्त असं संशोधन आम्ही हाती घेतलं होतं. प्राण्यांचं क्लोनिंग म्हणजे प्राण्यांच्या पेशीपासून हुबेहूब तसाच प्राणी निर्माण करणं यावर बरेच संशोधन झालं होतं आणि एका प्राण्यापासून दुसरा तसाच प्राणी निर्माण करण्याचं तंत्र यशस्वीही झालं होतं, पण असा प्राणी निर्माण करून त्याची मूळ प्राण्याप्रमाणे प्रतिकृती निर्माण होण्यासाठी, त्याला नैसर्गिकरित्या जेवढा कालावधी लागला होता तेवढाच प्रतिकृती निर्माण होण्यासही लागत होता. शिवाय हे प्रयोग फक्त प्राण्यांवरच करण्यात आले होते.

आम्ही मात्र आमचं संशोधन मानवी क्लोनिंग म्हणजे माणसाची प्रतिकृती निर्माण करणं यासाठी करत होतो पण अत्यंत गुप्तपणे! कारण या कल्पनेला जगभर अत्यंत विरोध होता. कारण अशी निर्मिती शक्य झाली तर त्याचे फायदे-तोटे काय असतील याचा अंदाज करणं अत्यंत कठीण होतं आणि त्यात भावनांची गुंतागुंत होण्याचाही संभव असल्यामुळे त्याला खुलेआम मान्यता मिळणं अशक्यच होतं. तसंच हे संशोधन एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या हाती लागलं तर त्याचे केवढे भयंकर परिणाम होतील याच्या नुसत्या विचारानेच जिवाचा थरकाप होत असे.

अशावेळी मला ती पुराणातली गोष्ट आठवायची. रक्ताच्या थेंबाथेंबातून राक्षस निर्माण होऊ लागले आणि त्याचा बंदोबस्त करणं प्रत्यक्ष देवांनाही अशक्य होऊन बसलं. म्हणजे अणुशक्तीचा शोध हा मानवजातीसाठी शाप की वरदान हा जो जटिल प्रश्न अखिल मानवजातीस पडला आहे तसाच प्रश्न या क्लोनिंगमुळे निर्माण होईल की काय अशी भीती आम्हाला पडली होती. तथापि शास्त्रज्ञांचं काम हे नवीन नवीन संशोधन करणं हेच आहे आणि त्याच्या फायद्या-तोट्याचं गणित करत बसलं तर कोणतंच संशोधन पुढे जाणार नाही हा विचार बलवत्तर ठरला. अणुशक्तीचा वापर संहारासाठी करायचा का समृद्धीसाठी याचा विचार सुजाणा शक्तीने करावा ते शास्त्रज्ञांचं काम नाही हा विचार प्रभावी ठरला. त्यानुसार आम्ही आमचं गुप्त संशोधन नेटाने चालू ठेवलं.

मेरीलँड युनिव्हर्सिटीत येऊन मला आता जवळजवळ दहा वर्ष झाली होती. आमचं संशोधन शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलं होतं. तोच मला घरून ताबडतोब परत ये असा फोन आला. आई खूप सिरियस आहे आणि तिने सारखा तुझा ध्यास घेतला आहे असा निरोप होता. मधून मधून परत घरी ये, एकदा येऊन भेटून जा अशी पत्रं येत होती. पण मी तिकडे दुर्लक्ष करत असे. पण आता मात्र आईच्या भेटीची ओढ लागली आणि अगदी नाईलाजाने घरी परतण्याचा निर्णय घेतला. सगळे सहकारी, प्राध्यापक नाराज झाले पण इलाज नव्हता. मी शक्यतो लवकर परत येईन असं सांगून विद्यापीठाचा निरोप घेतला.

-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ’ या कथासंग्रहातून)

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..