नवीन लेखन...

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ३

 

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

जेवण झाल्यावर थोडा वेळ मेघना काकू आणि काकांशी गप्पा मारुन आडवे झालो. रात्री २-२.३० ला विजयवाडा जंक्शन येतं. तिथे ट्रेन टर्मिनस आहे.तिथून गाडी दुसऱ्या दिशेने विशाखापट्टणमकडे जाते. म्हणजे ज्या दिशेने तुम्ही आला आहात त्याच दिशेने ती परत जाते. माहीत नसणारे कन्फ्युज होऊ शकतात.नरेनने आम्हाला हे आधीच सांगितले होते. त्यामुळे ते बघायची उत्सुकता होती. पण गाडी आधीच लेट होती आणि आधे-मध्ये सिग्नल मिळून ३ तास उशिराने धावत होती. ह्या हिशोबाने ५.३० ला विजयवाडा अपेक्षित होतं.
दीदी काही वर्ष हैदराबादला राहत होती आणि आम्ही प्रत्येक सुट्टीत तिच्याकडे जात असू. त्यामुळे सिकंदराबाद च्या अलीकडची सर्व स्टेशन्स तोंडपाठ होती. सिकंदराबाद जवळ येत होतं तशी ती लिंगमपल्ली, कुकटपल्ली, निजामपल्ली, हायटेक सिटी, बेगम पेठ ही सगळी स्टेशन्स लागली आणि आम्हाला हैदराबादचे जुने दिवस आठवत होते. मग आम्ही थोड्या जुन्या आठवणी काढून गप्पा मारत बसलो. सिकंदराबाद आले तेव्हा बारा-साडेबारा वाजले होते. त्यानंतर मात्र आम्ही निद्रेच्या अधीन झालो.

सकाळी जाग आली तेंव्हा विजयवाडा नुकतंच गेलं होतं. आई जागी होती. गाडी चांगली 15 मिनिटे तिथे थांबली होती. चहा/कॉफी वाले येऊन गेले.पण नंतर येतील असे समजून आईने चहा घेतला नाही. मी उठल्यावर आवरून आम्ही फ्रेश झालो. आणि चहाची वाट बघत बसलो. एक चहावाला आला नाही ट्रेन मध्ये. समोसे,भेळ सगळं येऊन गेलं पण चहा कॉफी काही मिळालं नाही. मध्ये कुठलं मोठ स्टेशनही नव्हतं की स्टॉल वर जाऊन घेऊन येता येईल. थोड्यावेळाने गुप्ताजीनी नाष्टा आणून दिला. तो खाल्ला.
पण चहाशिवाय दिवस सुरू झाला असं वाटतच नव्हतं. आमच्या बरोबरच्या दोन मुलांनी पण आमच्यासाठी खूप प्रयत्न केले चहा मिळवण्याचे. पण नो लक!

एखाद्या स्टेशनवर स्टॉल दिसायचा पण तो लांब असायचा. दोन मिनिटाच्या हॉल्ट मध्ये उतरून चहा घेणे शक्य नव्हते. हळू हळू गाडी एकेक स्टेशन घेत पुढे चालली होती. आता एकूण चार तास लेट होती गाडी.

चहा न मिळाल्यामुळे जरा मरगळ आली होती आणि तेवढ्यात गोदावरीच्या विस्तीर्ण पात्राने मनाची मरगळ क्षणात दूर केली.केवढ ते विस्तीर्ण आणि लांबवर पसरलेले पात्र. आमची गाडी जवळपास तीन ते चार मिनिटे त्या पाण्यावरून जात होती. यावरूनच नदीच्या लांबीची कल्पना यावी. डोळे भरून ते दृश्य बघितले.आणि गाडी गोदावरी स्टेशन मध्ये शिरली. तिथेही चहा मिळाला नाही.

किती अथांग आणि भव्य दृश्य होतं ते! ही अथांगता आणि भव्यता निसर्गच आपल्याला शिकवत असतो. पण एका चहासाठी आडून स्वतःचा खुजेपणा जास्तच जाणवतो. गाडीचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि मन अधीर झाले. पुढचा मोठा स्टॉप राजमुंडरी होता. तिथे आमच्या शेजारी असलेले दोघेजण उतरले. त्याच्यानंतरचा स्टॉप सामलकोट होता, जिथे आम्ही उतरणार होतो. ’ गाडी पिठापुरला थांबते पण मग आपण सामलकोटला का उतरायचे?’ असा एक प्रश्न माझ्या मनात डोकावला. माझ्या प्रश्नाचे निरसन स्मिता काकूंनी खूप छानपणे केलं. ‘ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरणार होतो ते काकीनाड्याला आहे. तिथून पिठापूर आणि इतर काही पर्यटन स्थळे जवळ आहेत. म्हणून आपण सामलकोटला उतरून काकीनाड्याला जाणार आहोत. अशी माहिती त्यांनी दिली. काकीनाड्याला राहण्याची जास्त चांगली सोय आहे असेही त्यांनी पुढे सांगितले. तर शेवटच्या अधीर प्रतीक्षेनंतर फायनली बाराच्या सुमारास सामलकोट स्टेशन आले.

आम्ही सामलकोटला उतरलो, तेव्हा बाराचे टळटळीत ऊन डोक्यावर होते. आठ वाजता पोहोचणारी गाडी बारा वाजता पोचली होती. गाडी एक नंबर प्लॅटफॉर्मवरच आली होती. तरीही आम्ही उतरलो तिथंपासून बाहेर पडण्याचे गेट थोडे लांब होते. भर दुपारच्या उन्हात आई कशी काय चालणार? अशी शंका मनात आली पण तीही खूप जिद्दीची होती. तिच्या मानसिक ताकदीने तिला बळ दिले आणि ती हळू हळू चालत गेटपर्यंत आली.

मला मानेचा थोडाफार त्रास आहे. मानेचे स्नायू ताणले गेले की, डोकेदुखी, चक्कर येणे हे प्रकार होतात आणि मग मला पुढचे दोन तीन दिवस झोपूनच काढावे लागतात. प्रचंड उकाडा, ऊन, वजन उचलणे, चहा वेळेवर न मिळणे या पैकी कुठल्याही छोट्या निमित्ताने माझ्या मानेचा त्रास एरवी ट्रिगर होतो. त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. कारण आता या सगळ्यात गोष्टी माझ्या सोबत घडत होत्या. एक छोट निमित्त पुरल असतं पूर्ण ट्रिप स्पॉईल करायला. पण दत्तगुरूंनी सुरुवातीलाच आम्हाला संकेत दिले होते, ‘तुम्ही पुढे चला! मी तुमच्या पाठीशी आहे.’ त्यामुळे पूर्ण प्रवासात मला या कुठल्याही गोष्टीचा कसलाही त्रास झाला नाही.

स्टेशनच्या बाहेर आलो तर बरेच लोकं एका ठिकाणी उभे होते. तो आमचाच ग्रुप असावा. कारण स्मिता काकू तिथे उभ्या होत्या. बाहेर तीन गाड्या उभ्या होत्या. गुप्ताजींनी सर्वांचे सामान पटापट तीन गाड्यांच्या टपावर टाकले. अजून पूर्ण कोणाशी ओळख नव्हती. पण जशी एकेक गाडी पुढे येत होती, सर्वजण चढत होते. आम्ही आमच्या पुढ्यात आलेल्या एका गाडीत बसलो.

आता ओळख-पाळख करून घेण्यास सुरुवात झाली. आमच्या समोरच्या सीटवर तीन सख्या मैत्रिणी बसल्या होत्या. सुषमा, स्मृति आणि सुरेखा. सुषमाचे मिस्टर राजेंद्र भोसले हे देखील आमच्याच गाडीत फ्रंट सीटवर होते. ते कल्याणचे होते. शेजारी अमिता सडेकर होत्या. त्या डोंबिवलीच्या होत्या आणि स्मिता काकूंच्या बिल्डिंग मध्येच राहात होत्या.
सर्वजण खूप फ्रेंडली आणि मन मोकळे होते. राजेंद्र दादांनी तर मला त्यांची लहान बहीणच मानले. ‘लहान बहिणीला कोणी ताई हाक मारतं का’ असे सांगूनही त्यांनी शेवटपर्यंत मला यशश्री ताई अशीच हाक मारली. हा आमच्या संस्कारांचा एक भाग आहे असे त्यांनी मला सांगितले. मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटला.

लगेचच अशी मैत्री झाली की जन्मोजन्मपासून आम्ही ओळखत आहोत. गाडीत चहाचाही विषय निघाला. सर्वांना चहा अगदी डेस्परेटली हवा होता. वाटेत कुठे चहाची टपरी दिसली तर आपण चहा घ्यावा असेही ठरले.

‘अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा घोषवारा करून आमच्या गाड्या निघाल्या. आता गाड्या छोट्या रस्त्यावरून धावत होत्या. आजूबाजूला पूर्ण हिरवळ होती. कुठे शेती, कुठे झाडी तर कुठे फुललेली बाग अशी निसर्गाची मुक्त हस्ते हिरव्या रंगाची उधळण डोळे आणि मन शांत करीत होती. साधारण अर्ध्या तासात आम्ही काकीनाड्याला हॉटेलमध्ये पोहचलो.

हॉटेलमध्ये राहण्याची सोय होती. तिथे रिसेप्शनमध्ये सर्वजण सामान घेऊन बसले. हॉटेल खूप सुंदर, स्वच्छ होतं. आम्हाला स्मिता काकूंनी एक एक करून यादीप्रमाणे रूम अलोट केली आणि असेही सांगितले कि आता आपल्याला आधी चार तास उशीर झाला आहे तर आपण एकच तास विश्रांती घेऊ आणि लगेच आवरुन खाली येऊ. कारण नंतर जेवण मिळणार नाही. आधीच्या प्रोग्राम प्रमाणे आम्ही एखा दे पर्यटन स्थळ आधी बघून मग जेवण करून पुढच्या स्थळांना भेटी देणार होतो. आता आधी जेवायला जायला लागेल. मला तर इतर स्थळे बघण्यापेक्षा पिठापुरला जावे असे फार वाटत होते. पण पिठापुरला संध्याकाळी जाऊ असे काकूंनी सांगितले. आधी जेवण आणि मग दर्शन म्हणजे ‘आधी पोटोबा मग विठोबा’ असे काहीतरी काहीसे गमतीशीर विचार माझ्या मनात आले.

तत्पुर्वी इथे कुठे चहा मिळेल का अशी आम्ही विचारणा केली. स्मिता काकूंनी शांतपणे सांगितले तुम्ही रूमवर जा लवकरच तुम्हाला चहा पोहोचवण्यात येईल. गुप्ताजींनी लगेच किती चहा आणि कॉफी याची यादी बनवली. एकदाच बनवली, ती त्यांना शेवटपर्यंत लक्षात राहिली.

आम्ही सर्व सामान घेऊन रूम मध्ये आलो. रुम कसली एक मोठा प्रशस्त फ्लॅट होता. बाहेर व्हरांडा, मोठा हॉल, हॉलमध्ये सोफा, टेबल, सर्विंग टेबल होते. हॉलच्या एका बाजूला मोठी बाल्कनी, डाव्या हाताला किचन, स्टोअर रूम आणि उजव्या हाताला दोन बेडरूम्स. त्याही चांगल्या मोठ्या! त्या दोन बेडरूम पैकी एका बेडरूममध्ये मी आणि आई आणि दुसऱ्या बेडरुममध्ये अमिता सडेकर आणि राजेंद्र सडेकर असे आम्ही एका फ्लॅटमध्ये होतो. आमच्या समोरच्याच फ्लॅटमध्ये आमची नुकतीच ओळख झालेल्या तीन सख्या मैत्रिणी आणि राजेंद्र दादा होते.

आम्ही रूममध्ये एसीमध्ये थोडे थंड झालो. फ्रेश होऊन आंघोळी करून तयार झालो. तितक्यात सुंदर घरगुती चवीचा चहा आला. चहा घेतल्यावर तर अजूनच फ्रेश वाटले.
आता भूकही लागली होती. बरोबर एक तासांनी सर्व जण खाली उतरले. ज्या गाडीतून आम्ही आलो शक्यतो तीच गाडी ठेवावी असे ठरले. आमच्याबरोबर अमिता ताई सडेकर होत्या आणि त्यांचे मिस्टर नेमके दुसऱ्या गाडीत होते. त्यामुळे त्या दुसऱ्या गाडीत गेल्या आणि स्मिता काकू आमच्या गाडीत आल्या. त्यामुळे आम्हाला खूप छान छान माहिती मिळत होती. बाकी सुषमाताई, सुरेखाताई, स्मिताताई आणि राजेंद्र दादा आमच्या बरोबर होते. आमचे छान फॅमिली सारखे रिलेशन तयार झाले.

दहा मिनिटातच गाडी एका चांगल्या रेस्टॉरंट समोर थांबली. हॉटेलचे नाव होते ‘सुबय्या गिरी हॉटेल’. ते हॉटेल काकीनाडा मध्ये खूप फेमस आहे आणि तिथे जेवणही खूप चांगले मिळते. कारण नरेन नेही आम्हाला तेच हॉटेल सुचवले होते. तिथेही खूप सुरू सुंदर सोय काकूंनी आधीच करून ठेवली होती. कारण बाहेर वेटिंग असूनही आम्हाला वेगळीकडे जेवायला लगेच जागा मिळाली. जेवण अतिशय सुरेख होतं. तीन चार प्रकारचे भात, त्यात चित्रांन, लेमन राईस, इमली राईस, साधा भात, सांभार, तीन चार प्रकारचे भाज्या, पापड लोणचे सर्व काही होते आणि सर्व खूप टेस्टी होते.

आत्तापर्यंत गाडी लेट झाल्यामुळे आणि चहा न मिळाल्यामुळे जो काही थोडाफार त्रास झाला असेल, तो सगळा भरून निघाला. हॉटेलमध्ये घरगुती सुंदर चहा आणि इकडे तसेच सुंदर जेवण करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासास निघालो.

आता आम्ही उत्सुक होतो ‘अन्नावरम’ मंदिर बघायला!

— यशश्री पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..