नवीन लेखन...

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ६

 

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

सोमवार 7 मार्च 22

सकाळी प्रसन्न चित्ताने जाग आली. आदल्या दिवशी स्मिता काकूंनी सांगून ठेवले होते. बरोबर 7 वाजता तयार होऊन खाली उतरा. आणि पिठापुर मंदिरात जे काही दान धर्म, अभिषेक आदी विधी करण्यासाठीचे सामान घ्यायचे असेल ते बरोबर ठेवा.

सकाळी चहा मिळेल का? अशी विचारणा झाली. तर शांतपणे काकूंनी सांगितलं. ५.३० वाजता रूम मध्ये चहा येईल. इतक्या पहाटे चहा कसा मिळेल? असं मी विचारलं तर म्हणाल्या, मीच करणार आहे चहा. दुपारचा पण मीच केला होता. कधी गुपचूप पटकन चविष्ट चहा / कॉफी करुन गुप्ताजींतर्फे पाठवलं कळलं पण नाही. सकाळच्या अमृततुल्य चहाची चव आठवली. 23 लोकांचा चहा करणं ते सुध्धा काही गाजा – वाजा न करता. विशेष आहे. असो. दुसर्या दिवशी बरोबर 5.30 वाजता चहा हजर! चहा घेऊन आणि आवरून आम्ही तयार झालो. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या पादुकांवर लेपन झाले की ते गंध आणि भस्म बाहेर प्रसादासारख वाटतात. खूप रांग असते ते घ्यायला. मला अरु ताईने, ते तिच्यासाठी आणायला सांगितलं होतं. मी सगळ्यांसाठीच घेऊयात असे ठरवले. स्मिता काकूंनी तिथे प्लास्टिकच्या छोट्या डब्या मिळतात, त्यात ते गंध घे, असं सांगितलं होतं.म्हणून मी घरून डब्या नव्हत्या घेतल्या.

आदल्या दिवशी दर्शन झाल्यावर, इथे नारळ का इतके बांधलेत असं विचारताच, काकूंनी सांगितलं की, कुटुंबातील सदस्यांच्या नावाने संरक्षणासाठी एक नारळ बांधतात. त्याने गुरुदेव त्यांचे रक्षण करतात. ‘हे विश्वची माझे घर’ मानलं तर किती नारळ बांधावे लागतील? अशा मनात येणाऱ्या माझ्या शंकेला, ‘मी सर्वांसाठी मिळून एक नारळ बांधूयात असे ठरवले’, आणि पूर्ण विराम दिला. नारळ ही तिथे मिळतात असे कळले. तर आता मी ठाण्याहून आणलेले उपरण, सुका मेवा, वाळ्याच अत्तर, केशर डबी, डाळिंब आणि संक्षिप्त गुरूचरित्र असं बरोबर घेतलं. ७-७.१५ ला सगळे खाली जमले. नेहमी प्रमाणेच गाडीत बसलो. त्यामुळे ड्रायव्हर लोकांना सोयीचं झालं. सगळे आलेत का कोणी मागे राहिलय हे कळायला.
आता गाड्या निघाल्या….. अनघा लक्ष्मी मंदिराकडे! त्याला अनघ दत्त मंदिर असेही म्हणतात.स्मिता काकूंनी दिलेल्या माहितीनुसार इथे अनघा लक्ष्मीची मूर्ती आहे, दत्तगुरूंबरोबर. मला थोडं आश्चर्य वाटले. दत्तगुरू आणि देवीची मूर्ती शेजारी शेजारी. ते तर कडक योगी/ ब्रह्मचारी.

मागे एकदा आमच्याकडे तुळशीच्या कुंडीत आपोआप औदुंबराचे झाड आले. ते रोप भराभर मोठे व्हायला लागले. म्हणून मी ते तिथून काढून मोठ्या कुंडीत लावले. आणि मी खूप खूष झाले की औदुंबर आपल्या घरी आला. रोज पाणी घालणं, नमस्कार करणं चालू होते. पण माझी चुलत बहीण अरूताई म्हणाली, दत्ताचा वास आहे तुझ्या घरात. पण खाली अंगणात लाव ते झाड. संसारी रहाट गाड्यात दत्तगुरुची अवहेलना होऊ शकते. दत्तगुरू कडकं योगी आहेत. तर घरात ते झाड नको ठेवू. म्हणून ते सोसायटी मध्ये खाली, आधीच एक जे औदुंबर चे झाड होते तिथे नेऊन लावले.

त्यामुळे मी जरा गोंधळले की ह्या मंदिरात दत्तगुरु शेजारी देवीची मूर्ती कशी?

तर त्याची आख्यायिका अशी आहे की, अनुसूया मातेला आपली सून बघायची इच्छा होती. पण दत्तगुरु पडले ब्रह्मचारी. म्हणून त्यांनी मातेला आपल्या पुढील जन्मातील जोडीदाराचे दर्शन घडवले ह्या ठिकाणी.

आणि म्हणून तिथे दत्तगुरूंबरोबर अनघा लक्ष्मीची मूर्ती आहे.

ती नवलाईची गोष्ट ऐकून आमची उत्सुकता वाढली. गाड्या एका छोट्या रस्त्यावर थांबल्या. सगळे उतरले. आई सुध्धा उतरली, कारणं जास्त चालणं नव्हतं आणि पायऱ्या पण नव्हत्या.
आजू बाजूला नारळ, केळीची झाडे, एका बाजूला पाणवठा, आणि आसपास मोकळेपणाने चरणाऱ्या गायी. एकंदरीतच दत्तगुरूंचे अस्तित्व दर्शविणारे प्रसन्न वातावरण!
मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, फरसबंदीचे बांधकाम, का नाही इथे लक्ष्मी वासणर? म्हणतात ना, हात फिरे तेथे लक्ष्मी वसे…

आम्ही आत गेलो, तिथे एका टेबल वर दोन-तीन जण, ओटीचे सामान, तांदूळ , फुले असं विकायला बसली होती. मागे लागणं नाही, अव्वाच्या सव्वा दर नाहीत. तुम्ही स्वतःहून घेतलात तर हसतमुखाने सामान विकणार. कुठे ही व्यापारीकरण जाणवलं नाही मला.

काकूंनी सांगितले, इथे तांदूळ दान केले आणि त्यातले थोडे तांदूळ घरी आणले, की घरात बरकत रहाते. आमच्या गौरी गणपतींचे विसर्जन झाले की, आई/काकू पण आम्हा सगळ्या चुलत बहीण- भावांसाठी गौरीच्या ओटीत असलेल्या तांदुळाच्या पुड्या पाठवते. घरात बरकत रहाते, हीच भावना असते. आणि खरोखर देवीच्या कृपेने सर्वजण सुखी-समाधानी आहेत. त्याची आठवण झाली मला.

इथे देवीची ओटी पण भरावी असे म्हणतात. खरं तरं मी इतकं सगळं मानणारी/ करणारी नव्हते. पण त्या लोकांना हातभार लागेल आणि सगळे घेत आहेत तर आपणही घ्यावं, नुकसान तर काही नाही ह्या भावनेने, आम्ही ओटीचे सामान आणि तांदूळ घेतले. सर्व सामुग्री घेऊन मुख्य गाभार्याजवळ आलो आणि मूर्ती बघताना बाकी सगळं विसरलो. तुकतुकीत काळ्या पाषाणातील दत्तगुरुंची मूर्ती आणि शेजारी अनघा लक्ष्मी. ती ही तितकीच सुंदर!

खूप सुरेख मूर्ती, त्यावर योग्य प्रमाणात फुलांचे हार, गाभार्यात समईचा मंद उजेड आणि धूप-दीपचा सुगंध. खूप छान वाटले. मग नमस्कार करून ओटी गुरुजींकडे सुपुर्द केली आणि बाजूला तांदूळ वाहण्यासाठी जागा होती. ओंजळीमधे तांदूळ घेऊन ओटी भरतात तसे वहायचे. त्यातलेच मग चार दाणे परत घ्यायचे घरात ठेवायला.

सर्वांचे दर्शन आणि ओटी, तांदूळ दान इत्यादी विधी झाले. तोपर्यंत ८.४५ वगैरे होऊन गेले होते. आता काकू आणि गुप्ताजी थोडी घाई करायला लागले, ‘चला लवकर मूळ मंदिरात जाऊन अभिषेक/लेपन विधी सुरू होण्यापूर्वी पावत्या फडायाच्या आहेत. गर्दी असू शकते पावती फाडण्यासाठी’.मग सगळे पटकन गाडीत बसले.

पण काकूंनी सांगितले आता आपण कुंती – माधव मंदिरात जाऊ. ते मुख्य मंदिराच्या अगदी जवळ आहे. तिथून पण लवकर निघू. मग आम्ही कुंती माधव मंदिरात गेलो. तिथे कुंती मातेने श्रीकृष्णाची भेट घेतली होती. पण त्याबद्दल अजून जास्त माहिती नाही कळू शकली.

मंदिरात प्रवेश केल्यावर गाभार्यात समोर मोठ्ठी उभी काळ्या पाषाणातील माधवाची मूर्ती. आणि पुढ्यात जरा लहान आणि थोडी डाव्या बाजूला कुंती मातेची लोभस मूर्ती. कुंती मातेला विविध, रंग-बिरंगी फुलांच्या माळांनी सजवले होते. डोक्याभोवती फुलांची महिरप!

आणि श्रीकृष्णाच्या गळ्यात भला मोठ्ठा, पायापर्यंत रुळणारा, भरगच्च ताज्या तुळशीपत्रांचा हार…काय दिसतं होतं ते रुप…’तुळसी माळा गळा … कर ठेवुनी कटी…’ शब्द आपसूक ओठांवर आले. फक्त इथे हात कटीवर नव्हते. पण रुप तितकच मोहक होतं. मनापासून नमस्कार करून गाड्या मुख्य मंदिराकडे निघाल्या.

५-७ मिनिटात आम्ही मंदिरात पोहचलो. मग आत जाऊन आधी दर्शन घेतले. आईला कालच्या सारखे स्टूल दिले बसायला. मग ऑफिस मध्ये गेले. तिथे आमच्या, माझ्या बहीण भावांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पावत्या फडाल्या. आणि परत सभा मंडपात येऊन बसले.

तेवढ्यात लक्षात आलं की आपण ते वस्त्र, इत्यादी सामान गुरुजींकडे दिलच नाही. पटकन उठून ते सर्व मनोभावे त्यांच्याकडे सुपुर्द केलं. आणि परत जागेवर येऊन बसले.
बाहेर मोठे स्क्रीन असतात की जेणेकरून मागे बसलेल्यांना पादुका व अभिषेक विधीचे दर्शन होईल.

पण मी जिथे बसले होते, तिथून मला डायरेक्ट समोर पादुका दर्शन होत होते. त्यातून माझ्या पुढची तीन माणसे उठून दुसरीकडे गेली. मी आता अगदी पहिली. खूप जवळून आणि सुंदर दर्शन होत होते.

आज आमचा विशेष योग होता. एक तर आज सोमवार होता आणि पादुका स्थापना दिन होता आज. त्यामुळे आज सहस्त्र रुद्राभिषेक होणार होता.

आपण जेंव्हा पावती घेतो तेंव्हा तिथे नाव आणि गोत्र सांगायचे असते. मग अभिषेक करताना प्रत्येकाच्या नाव आणि गोत्राने करतात. पण इतकी नावे असतात आणि इतके भराभर ते म्हणत असतात की आपल्याला आपलं नाव येऊन गेलं की नाही काही काळत नाही. अर्थात ते महत्त्वाचे नसते. आपलं सगळं लक्ष समोर पादुकांवर असते. इकडे अभिषेक सुरू झाला आणि पूजा विधी सुरू झाले. आधी पंचामृताने अभिषेक झाला. पूजा विधी चालू होती आणि माझ्यासमोरच आम्ही दिलेलं अत्तर आणि केशर लेपनात मिसळलं. आणि पादुकांवर घालण्यासाठी तयार केलं. अगदी कृत-कृतश्च भारत च समाधान मिळालं. हा पूर्ण विधी बराच वेळ चालतो. आधी मूळच्या पाषाणातील पादुका, मग त्यावर चांदीच्या पादुका मग वर सोन्याच्या. सगळे विधी ह्या तिघांवरही होतात.

मी मूळ पादुकांवरचे विधी पाहिले आणि बाहेर आले. आईलाही जरा फ्रेश व्हायचे होते आणि काही तरी खाऊन तिला गोळ्या घेणे भाग होते. म्हणून तिला घेऊन, फ्रेश होऊन काल ज्या कट्ट्यावर बसली होती त्या कट्ट्यावर बसवले. आता खाण्याची काही सोय होती य का ह्या विचारात असतानाच स्मिता काकूंनी हाक मारली. त्या तिथेच जरा पुढे बसल्या होत्या. शेजारी भली मोठ्ठी प्लास्टिक बॅग. त्यातून त्यांनी साबुदाणा खिचडीचे पॅकिंग, प्लेट आणि स्पून काढले. ‘हा घ्या, नाष्टा करून घ्या..’ किती हे सुंदर नियोजन. आईला पाणी आणून दिले आणि नाष्टा, गोळ्या घ्यायला सांगितल. काकूंशेजारी आईला बसवून मी वाचन करायला गेले.

जिथे औदुंबराचे झाड होते, तिथे आजू-बाजुला मोकळा परिसर होता. बरेच जण तिथे गुरूचरित्र वाचत बसले होते.मी ही त्यातल्या त्यात झाडाजवळची जागा बघून, संक्षिप्त गुरूचरित्र पोथी उघडली. गुरुदेवांचे स्मरण केले आणि नमस्कार करून वाचायला सुरुवात केली.

एक अध्याय झाला आणि माझ्या पुढ्यात साधारण एक फुटावर एक पांढरा कुत्रा येऊन बसला. मान वळवून एकटक मी काय म्हणत आहे, ते ऐकत होता. मी तशी प्राणी-मात्रांपासून लांब असते. इथेही आधी एक क्षण घाबरले. पण त्याच्या डोळ्यांत मला इतके प्रेम, ममता दिसली.काल जशी दत्तगुरुच्या डोळ्यांत दिसली तशी अगदी! मग माझी भीती गेली.
मी माझे वाचन सुरू ठेवले. लोकं जशी दर्शनाला येत होती.तशी औदुंबराला प्रदक्षिणा घालत होती. एक-दोघे जण माझ्या आणि कुत्र्याच्या मधून गेले. तेवढा पण व्यत्यय त्या कुत्र्याला सहन झाला नसावा. तो उठून मला अक्षरशः चिकटून बसला आणि माझ्याकडे अस बघू लागला जसं काही म्हणत आहे, ‘पुढे वाच मी ऐकतोय’. ह्या अनन्यसाधारण अनुभूतीने माझ्या अंगावर शहारे आले. आणि मी आनंदाने पुढे वाचू लागले.

— यशश्री पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..