नवीन लेखन...

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ८

 

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग – ८

द्राक्षारामचे दर्शन घेऊन ५-५.१५ पर्यंत हॉटेल मध्ये आलो. आवरुन, सामान भरुन तयार झालो आणि थोडी रेस्ट घेतली. ६.१५च्या सुमारास गाड्या काकिनाडा रेल्वे स्टेशन कडे निघाल्या. स्टेशन जवळच होते.

‘गौतमी एक्स्प्रेस काकिनाडा पोर्टपासून चालू होते. मग आपण तिथे का नाही गेलो बसायला?’ ‘तिथे गाडी दोन नंबर प्लॅटफॉर्मवर येते. सगळ्यांना सामान घेऊन चढायला कठीण जाईल म्हणून आपण काकीनाडा स्टेशनला एक नंबर प्लॅटफॉर्मवर चढणार आहोत. इथे ही गाडी बराच वेळ थांबते. तुम्ही आरामात चढू शकता’, असे काकूंनी सांगितले. इतका बारिक सारिक पण महत्त्वाचा विचार करुन केलेले आयोजन खूप आवडले.
सर्वजण आता काकीनाडा प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट बघत उभे होते. आत्तापर्यंतच्या दोन दिवसाच्या सहवासात सगळेजण एकमेकांच्या खूप ओळखीचे झाले होते आणि एकमेकांना लागेल तशी मदत करत होते. इथेही आमच्या सर्वांचे नंबर वेगवेगळ्या डब्यांमध्ये आले होते. एकमेकांना काही मदत हवी आहे का? असे विचारून सर्वजण आपापल्या डब्यांपाशी जाऊन थांबले. गाडी अगदी वेळेत आली आणि वेळेत सुटली.
आतून गाडी खूप सुंदर स्वच्छ होती. नवीन कोच होते. यावेळेसही आम्हाला लोअर बर्थ मिळाला होता.थोड्यावेळात लगेच गुप्ताजींनी जेवणाचे पॅकेज आणून दिले. दोन दिवसाच्या दगदगीमुळे सगळेजण खूप दमले होते. पहाटे पाचच्या सुमारास सिकंदराबाद येणार होते त्यामुळे लवकरच झोपावे असे ठरले.

दोन दिवसाचा प्रवास, त्यानंतर दोन दिवस पिठापुर आणि काकीनाडा येथील धार्मिक पर्यटन स्थळे बघण्याची धावपळ यामुळे दमलेले शरीर आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे पालखी सोहळा आणि अभिषेक दर्शन पाहून समाधानाने श्रांत झालेले मन! त्यामुळे लवकर झोप लागली. सकाळी सव्वा-चार – साडेचार वाजता जाग आली. गाडी अगदी वेळेत सिकंदराबादला पोहचली. शेवटचे स्टेशन असल्यामुळे उतरण्याची गडबड नव्हती. सावकाश सर्वजण उतरले. गाडी दोन नंबर प्लॅटफॉर्मवर आली होती. आम्हाला एक नंबर प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडायचे होते. प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकाला लिफ्ट होती आणि आम्ही नेमके प्लॅटफॉर्मच्या मधोमध होतो.

सामान आणि आईला घेऊन सावकाश चालत जाण्याची कसरत मी करत असतानाच, माझ्या मदतीला आमच्या ग्रुपमधले सर्वजण आलेच आणि स्मिता काकूही आल्या. स्मिता काकूंनी, ‘ तुझ्या आईला मी सावकाश घेऊन येते. तू सामान घेऊन पुढे जा.’ बऱ्यापैकी चालायचे होते पण आईने सुद्धा हळूहळू सावकाश चालत थोडे थांबत अखेर शेवटी ते पूर्ण डिस्टन्स पार पाडले. स्मिता काकूही सतत सोबत होत्या. आम्ही स्टेशनच्या बाहेर एक लक्झरी बस उभी होती त्यात सांगितल्याप्रमाणे बसलो. पंधराएक मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही एका हॉटेलपाशी उतरलो. रिसेप्शनमध्ये गेल्यावर अलॉट केलेल्या रुममधे गेलो.आवरुन ८ वाजता नाष्टा करायला, जेवण्याच्या हॉलमधे जमून तिथूनच खाली बस कडे जायचे होते.
रूम मध्ये गेलो. रूम तर चांगली होती. पण वॉश रुम स्वछ्ता अगदीच सुमार होती. आत गरम पाणीही नव्हते. तिकडचा सिक्युरिटी गार्ड प्रत्येकाच्या रुम मधे येऊन गरम पाणी चालू करण्याचे प्रयत्न करत होता. पण आमच्या बाथरूममध्ये काही गरम पाणी शेवटपर्यंत आले नाही. कदाचित महाराजांची इच्छा असावी आम्ही थंड पाण्याने स्नान करून त्यांच्या दर्शनाला जावे.

ठीक आहे! सगळ्याच वेळेला सगळ्याच गोष्टी आपल्या कम्फर्ट प्रमाणे घडतील असे नसते. देव आपली थोडी तरी परीक्षा कधी तरी बघत असतोच. त्याच्या इच्छेला मान देऊन आम्ही गार पाण्याने आंघोळी करून तयार झालो आणि आठ वाजता ब्रेकफास्ट हॉलमध्ये आलो. साउथ इंडियन पद्धतीचा इडली मेदूवडा आणि आपल्या पद्धतीचे पोहे असे तयार होते. त्याच्याबरोबर चहा कॉफी पण होतं. भरपूर पोटभर नाश्ता करून आम्ही साडेआठला बरोबर खाली बस मध्ये हजर झालो.

साधारण पावणे नऊच्या सुमारास आमची बस आता कुरवपूरकडे रवाना झाले झाली. सुरुवातीला दत्त बावनी म्हणूयात असे ठरले पण मोठी बसल्यामुळे मागचा सूर वेगळा, पुढचा सूर वेगळा पण तरीही प्रत्येकाने आपापल्या परीने दत्त बावन्नी म्हंटली. त्यानंतर बसचा ब्लूटूथ वापरून मी मोबाईलवरून एक एक करत दत्त भक्ती गीते, श्रीपाद श्रीवल्लभ यांचे सिद्धमंगल स्तोत्र अशी अनेक गाणी लावली. संपूर्ण वातावरण पवित्र आणि भक्तीमय वाटत होते. सर्वजण त्यात तल्लीन होऊन गेले. अशातच एक तास कधी संपला कळलं नाही. त्यानंतर गाण्याच्या भेंड्या खेळल्या. त्यात सर्वच जणांनी खूप उत्साहाने भाग घेतला. गाण्याच्या भेंड्या खेळता खेळता आम्ही खुपच रंगून गेलो. अधेमधे खाउच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या इकडेतिकडे देणं असे चालू होते.

आज आठ मार्च म्हणजेच ‘वूमन्स डे’ होता. गाडी एका ठिकाणी पेट्रोल भरायला थांबली. सर्वजण खाली उतरून फ्रेश होऊन आले आणि येताना पेट्रोल पंपावरचे कर्मचारी हातात चॉकलेटचा ट्रे घेऊन उभे असलेले दिसले. येणाऱ्या प्रत्येक लेडीजला ते महिला दिनाच्या शुभेच्छा करून एक चॉकलेट देत होते. आई काही कारणास्तव खाली उतरली नव्हती. त्यामुळे ते स्वत: गाडीत चढले आणि आईला ‘द यंगेस्ट वूमन इन द ग्रूप’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या. त्यांनी काढलेले फोटो आम्ही व्हाट्सअप वरून आमच्यासाठी घेतले. पेट्रोल पंपावरचे ते प्रेमळ स्वागत सर्वांना फार भावले. मग गाडीतल्या इतरांनीही आम्हाला ‘हॅपी वुमन्स डे’ अशा शुभेच्छा दिल्या.

तेवढ्यात नाशिकच्या पल्लवी कुलकर्णीने सांगितले की तिने ‘वुमन्स डे’ साठी एक स्पेशल प्रोग्रॅम लिहिला आहे. तिच्याशी बोलताना कळले की, ती नाशिकला आकाशवाणीवर बरेच प्रोग्राम करते. अँकरिंग, स्क्रिप्ट लिहिते, कविता वाचून दाखवणे, मुलाखती घेणे असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आज आमच्याबरोबर होते. वा!

तिचा कार्यक्रम ऐकायची उत्सुकता सर्वांनाच होती. मग तिने आपल्याकडच्या मोबाईलवरून ब्लूटूथ कनेक्ट करून बस मध्ये सर्वांना व्यवस्थित ऐकू जाईल अशा आवाजात कार्यक्रम ऐकवला. नारी शक्तीवर आधारीत तिने अशा तीन स्त्रियांची मुलाखत घेतली होती, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत वर मात करून स्वतःचे एक वेगळे स्थान या जगात निर्माण केलं होतं. तिघींचे ही अनुभव ऐकताना अंगावर काटा येत होता आणि त्याच बरोबर पल्लवीचे आम्हाला खूप कौतुक वाटत होते. तिनेही खूप सुंदर मुलाखती घेतल्या.

आताच तो प्रोग्राम संपला आणि सर्वांची चुळबुळ सुरू झाली. कारण जवळपास बारा वाजत आले होते. अजून किती वेळ लागेल कुरवपूर यायला असे सर्वांच्या मनात चालू असतानाच, अचानक स्मृतीताई म्हणाल्या, अरे! पेरूचा किती गोड वास सुटलाय. कोणी पेरू आणलाय का? सर्वांनी नकारार्थी माना डोलावल्या. आम्ही इकडे तिकडे बघू लागलो. कुठे पेरूचे झाड आहे का? कुठे पेरू विकणारी हातगाडी आहे का? आमची नजर चौफेर फिरत होती. आमच्या आसपास कुठली दुसरी गाडीही नव्हती. तरीही हा वास कुठून येतोय असं आम्हाला नवलं वाटतं होतं. आता सर्वांनाच पेरूचा सुमधुर वास यायला लागला. सगळ्यांनाच पेरू खायची खूप प्रबळ इच्छा झाली. पण कदाचित नुसताच भ्रम असेल असे वाटले. त्यामुळे आम्ही पेरू मिळण्याची आशा सोडून दिली.

शेवटचा अर्धा तासाचा रस्ता साधारण राहिला असेल तेंव्हा. तो रस्ता बघून मला सिद्धटेक खूप आठवण येत होती. तसाच अरुंद रस्ता, आजूबाजूला झाडी, थोडे पाण्याचे तळे, मध्येच एखादी देऊळवाडी सारखी छोटी वस्ती आणि पुढे तर तसंच नावेतून नदी ओलांडणे! श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म गणेश चतुर्थीचा आहे. त्यामुळे मी आणि श्रीपाद श्रीवल्लभ हे एकच आहोत. सिद्धटेक आणि कुरवपूर दोन्ही एकच आहेत आणि तितकेच पवित्र आहेत असंच जणू मोरया सांगत होता. गिरनारच्या वेळेलासुद्धा गुरुदेव दत्त बरोबर माझ्या मुखात सतत मोरयाचाही गजर चालू होता. देव एकच आहे याची परत प्रचिती आली.

साधारण एकच्या सुमारास आमची बस कुरवपुर मंदिर कमानीच्या बाहेरच्या पटांगणात थांबली. ऊन अगदी मी म्हणत होतं. प्रचंड उकडत होतं. सर्व लागणारे सामान घेऊन आम्ही खाली उतरलो. कमानीला नमस्कार करून आतमध्ये शिरलो. रस्त्यात पूर्ण ऊनच होते. तरीही एक क्षण चप्पल काढून श्रीपाद श्रीवल्लभांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमीची धूळ पायावर घेण्याचा मोह आवरला नाही. उजव्या बाजूला एक ओसरीवजा जागा होती. तिथे सावलीसुद्धा होती. तिथे पर्यंत आईला कसं बसं नेलं. तिला उन्हाचा प्रचंड त्रास होतो. तिचे हात,अंग तापतं, त्यामुळे तिला आधी सावलीत बसवणे गरजेचे होते. आधी आईला तिथे बसवूयात आणि मग आसपास काय आहे याची माहिती घेऊ असा विचार करून मी त्या ओसरीमध्ये शिरले. सामान आणि आईला तिथे सावलीत बसवलं. आईच्या थोडे पुढेच एक साधुमहाराज बसले होते. त्यांनी मला हाक मारली. मी तिकडे जाणे टाळले.

प्रामाणिकपणे सांगायचे तर बुवाबाजी, दांभिकपणा ह्याची इतकी ऊदाहरणे वाचली/ऐकली होती की, फिजीकल गुरु(अस्तित्वात असलेला मानवी अवतार) ह्या गोष्टींपासून मी लांब रहायला लागले. अर्थात गुरुशिवाय मोक्ष नाही तितकेच खरे आहे. आणि सगळेच ढोंगी नसतात. असो.
त्यानंतर आम्ही सर्वजण स्मिता काकूंजवळ जमलो. त्यांनी माहिती दिली की, या भागाला पंचदेव पहाड असे म्हणतात. मुख्य मंदिर नदीच्या पलिकडच्या तटावर आहे. इथे स्वामी ज्या दगडावर बसून आपला दरबार भरवायचे, लोकांची दुःखे दूर करायचे आणि जिथे त्यांनी त्यांच्या त्रिशूल रोवून ठेवला आहे आणि तो आजही तसाच आहे, असे स्थान आहे. त्याचे आधी दर्शन घेण्याचे ठरले.

आईला उन्हातून त्या मंदिरापर्यंत पोहोचणे जरा कठीण वाटत होते. त्यामुळे आई तिथेच थांबली आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आमच्यासमोर एक गोलाकार काळ्या पाषाणातील एक बैठक होती. त्यावर शेंदूर लेपित पाषाण. मधोमध ओम चितारलेला आणि डाव्या हाताला सोनेरी, चमकणारे, जरासे तिरकस रोवलेले त्रिशूल! हे त्रिशूल स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ यांनी रोवले आहे? समोरचे त्रिशूल बघताना स्वामींचे अस्तित्व जाणवत होते. आजही तिथे तितकीच पॉझिटिव्हिटी जाणवते.

त्रिशुलाच्या मागे पांढरा संगमरवरमध्ये गुरुदेव दत्तांची सुंदर मूर्ती होती. एकंदरीतच ते सर्व खूप सजीव आणि बोलके वाटत होते. बघतच राहावे असे वाटत होते आणि मनोभावे हात जोडताना डोळेही आपोआप भरून आले. आपणही इथेच राहावे असे वाटू लागले.

स्मिता काकूंनी सांगितले की, येथे मनःपूर्वक एखादी गोष्ट मागितली आणि २७ प्रदक्षिणा ह्या गाभार्याभोवती घातल्या की तुमची मनोकामना पूर्ण होते. मग आम्ही सर्वांनी मनोभावे प्रार्थना करून, मनात काही विशेष हेतू ठेवून मंदिराला सत्तावीस प्रदक्षिणा घातल्या आणि पुन्हा नमस्कार करून काकूंजवळ येऊन थांबलो. बोलता बोलता मी काकूंना म्हणाले, ‘तिथे बाहेर एक स्वामी बसले होते त्यांनी मला बोलावले. पण का कोण जाणे मी त्यांच्याकडे गेले नाही.’ तर त्या म्हणाल्या ह्या मंदिराचे महाराज आहेत त्यांचे ते शिष्य आहेत तर तू जाताना त्यांना नमस्कार करून जा. ते काही दक्षिणा साठी मागे लागत नाही. मी होकार दर्शविला. आणि आम्ही पुढे निघालो.

असं म्हणतात की कुरवपूरला गेल्यावर तिथला महाप्रसाद घेतल्याशिवाय येऊ नये. जर का कोणी महाप्रसाद न घेता निघालो, तर काहीना काही कारणाने त्यांचे जाणे रहित होऊन महाप्रसाद मिळाल्यावरच तो पुढचा प्रवासास निघू शकतो. तसंही आता जेवणाची वेळ झाली होती आणि खूप भूक लागली होती. त्यामुळे आम्ही समोरच भोजनालय होते, तेथे गेलो. त्याआधी मी परत आई बसली होती, तिथे आले तेव्हा ते स्वामी तिकडे नव्हते. ‘बघू नंतर!’असे मनात म्हणत मी आईला हाताला धरून हळूहळू मंदिरापर्यंत घेऊन आले. कारण समोरच भोजनालय होते. माझीही अशी इच्छा होती की आईने हे त्रिशूल असलेले मंदिर बघावे. ते खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणारे वाटले.

कसेबसे चालत आई मंदिरा पर्यंत पोहचली आणि तिने हि दर्शन घेतले. ते बघून तिलाही खूप भरून आले. मग समोर भोजनालयात जाऊन आम्ही तिथला महाप्रसाद घेतला. तिथे एक मराठी सेवेकरी होती. तिने आईला बसायला लगेच खुर्ची दिली. मग नंतर जागा झाल्यावर आम्ही जेवायला बसलो. पिठापूरसारखे हे ही जेवण अतिशय सुंदर होत. मला वाटतं प्रसाद ह्या शब्दातच जादू आहे. कुठलाही श्रद्धापूर्वक अर्पण केलेला प्रसाद हा सुंदरच लागतो.

महाप्रसाद घेऊन आम्ही परत त्या ओसरीकडे आलो. तिथे ते स्वामी आता मला पुन्हा दिसले बसलेले दिसले. तेथे शेजारी एक लहान रूम होती तिथे आमच्या ग्रुपमधले लोक आणि इतरीही लोक आत जाऊन दर्शन घेऊन परत येत होती. मला असे वाटले, आपण हे मंदिर बघायचे राहिलो की काय? म्हणून मीही आमच्या ग्रुपच्या पाठोपाठ आत मध्ये गेले. एका वेळेला एकच जण आत जात होता. मी आत गेले तर आत एक अत्यंत तेजस्वी स्वामी बसले होते. भगवी वस्त्रे, केसांच्या मानेपर्यंत येणाऱ्या जटा, छातीपर्यंत लांब दाढी-मिशा. एकंदरीत त्यांना बघून मला माझ्या सिद्धटेकच्या मामा आजोबांची आठवण झाली. माझी आजी (आईची आई) मोरया गोसावींच्या देव घराण्यातली होती. आईचं आजोळ त्यामुळे अर्थातच सिद्धटेक. म्हणून आम्हालाही तिथली प्रचंड ओढ होती/आहे.

मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी बराच वेळ माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. डोक्यावर हात ठेवून ते काहीतरी मंत्र पुटपुटत होते, मला ते काही कळले नाही. पण त्यांच्या डोक्यावर ठेवलेल्या हातातले वात्सल्य मात्र नक्कीच कळले.

मी ही जराशी ट्रान्समध्ये गेल्यासारखे झाले. वळून बाहेर पडणार तेवढ्यात त्यांनी बोलावले. ‘बेटी!’ असे म्हणून त्यांनी हाताने आत बोलावले आणि ते काही तरी शोधू लागले. मला कळेना त्यांना काय सांगायचं किंवा काय द्यायचं आहे. मी तिथे थांबले. मग त्यांनी त्यांच्या कपाटातून एक लॅमिनेटेड फोटो काढून माझ्या हातात दिला. आणि म्हणाले, ‘घर मे रखो! कुछ तकलीफ.. इनको बोलो’ असे तुटक तुटक मोजके दोन चार शब्द बोलून त्यांनी पुन्हा आशीर्वाद दिला आणि मी परत जायला वळले. पुन्हा त्यांनी हाक मारली आणि परत काहीतरी शोधत होते पण या वेळेस त्यांना ते काय होते ते मिळाले नाही. मीही थोड घुटमळले. मग नाईलाजाने त्यांनी जा असे सांगितले.

मलाही कळत नव्हतं काय चालले आहे आणि तो फोटोही मी काही निटसा पाहिला नव्हता. बाहेर आले, तर बाहेर स्मिता काकू उभ्या होत्या. त्यांना तो फोटो दाखवला. हे फोटोतले कोण आहेत? ज्यांनी मला फोटो दिला ते कोण? मी रोज पुजा-अर्चा, वाचन असं काही करत नाही. तर मी या फोटोचे मी काय करू? अशा अनेक शंका मी त्यांना विचारल्या. त्यांच्या म्हणण्यात आले तू खूप भाग्यवान आहेस. तुला ज्यांनी फोटो दिला, ते इथले आत्ताचे मठाधिपती. त्यांना ‘वाचासिद्धि स्वामी’ म्हणतात. प्रचंड तपाचे फळ म्हणून त्यांना वाचासिद्धि प्राप्त झाली आहे. त्यांच वय ९५ वर्ष आहे. तुला जो फोटो दिला आहे, तो इथल्या आधीच्या मठाधिपतींचा आहे. ‘विठ्ठलानंद सरस्वतींचा’. रोज पुजा नाही केलीस तरी चालेल. पण हा फोटो घरात ठेव आणि जेव्हा केव्हा तुला काही अडचण वाटेल तेव्हा यांना तुझी अडचण सांग. ते ऐकतात.

आता मी तो फोटो नीट निरखून पाहिला, तर आजोबा वाटतील असे प्रेमळ भाव स्वामींच्या चेहऱ्यावर होते. खूप दिलासा आणि आपुलकी निर्माण झाली माझ्या मनात. मनोमन मी फोटोला नमस्कार करुन आईजवळ आले.

मनात शंका होतीच. मला एकटीलाच का दिला फोटो? काय मंत्र म्हणत असावेत ते? अजून काय शोधत होते?

त्यांना पुढे आमच्या घरावर येणार्या संकटाची चाहूल आधीच लागली होती का? (ह्या बाबत जे घडले ते मी माझ्या शेवटच्या भागात सविस्तर सांगेन. खरोखरीच आम्ही गुरुक्रुपेने त्यातून सही सलामत बाहेर पडलो)

— यशश्री पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..