‘माहितीयुद्धा’त जबाबदार भारतीय म्हणून वागण्याची गरज

बदलत्या काळात युद्धनीती बदलत गेली आहे. प्रत्यक्ष सीमेवर लढल्या जाणार्‍या पारंपरिक युद्धांखेरीज आज सायकॉलॉजिकल वॉरफेअर, इन्फर्मेशन वॉरफेअर या नव्या युद्धनीतींचा वापर शत्रूराष्ट्रांकडून होत आहे. सध्या माहितीयुद्ध सुरू झालेले दिसून येत आहे. अलीकडेच भारताच्या वैमानिकाला पकडून त्याचे व्हिडिओ पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले. भारतियांनी पाहता पाहता त्यांना सोशल मीडियावर फिरवले. पण अशा प्रकारचे व्हिडिओ, माहिती फॉरवर्ड करताना, प्रसारित करताना प्रत्येक नागरिकाने त्याची सत्यता तपासण्याबरोबरच त्याच्या परिणामांचा विचार करायला हवा. यासाठी स्वनिर्बंधांची एक चौकट आखून घ्यायला हवी.

माहिती युद्ध सोशल मीडिया आणि टीव्हीवर जोरात सुरू


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

मिराज विमानांच्या साहाय्याने भारताने पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक २ आणि त्यानंतर पाकिस्तानने केलेला विमानहल्ल्याचा प्रयत्न यानंतर भारतामध्ये आणखी एक वेगळ्या प्रकारचे युद्ध सुरू झाले. त्याला ‘माहिती युद्ध’ किंवा `इन्फर्मेशन वॉरफेअर३ म्हणता येईल.  याचा फायदा पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जास्त होत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय सैन्य, आपल्या सरकारसाठी तसेच सामाजिक हितासाठी हे युद्ध फायदेशीर ठरत नाहीये. काश्मीरमध्ये चाललेले हे युद्ध आता एक क्रिकेटसारख्या सामन्याच्या समालोचनासारखे सुरू झाले आहे. प्रत्येक टीव्ही अँकर बॉल बाय बॉल कॉमेंट्री देण्याचा प्रयत्न करत आहेत. तथाकथित, काही अंशी चुकीच्या, अधिकृत स्रोत नसलेल्या  आणि कमी माहितीवर  तज्ज्ञांना बोलण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे बहुतेक तज्ज्ञांकडून होणारे विश्लेषण हे चुकीच्या किंवा कमी माहितीवर आधारित होत असल्याने समाजाचे नुकसान होत आहे.

व्हॉटसअॅप, फेसबुक आदी सोशल मीडिया हा 70 टक्के घरांमध्ये पोहोचल्यामुळे प्रत्येक घर हे एखाद्या वॉर कंट्रोल रुमसारखे बनले आहे. अनेक भारतीय आपापल्या परीने या माहितीयुद्धामध्ये चुकीच्या पद्धतीने भाग घेण्याचा किंवा घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियामुळे – खास करून व्हॉटसअॅपमुळे प्रत्येक युजर पत्रकार-संपादक-व्हिडिओ जर्नालिस्ट -अँकर झालेला आहे. येणारी माहिती खातरजमा न करता किंवा त्याच्या परिणामांची पर्वा न करता पुढे ढकलली जात आहे. म्हणूनच हे युद्ध कसे लढले जावे आणि या युद्धासाठी काही नियम असावेत का हे जाणून घ्यायला हवे.

माहिती युद्धासाठी  नियम असावेत

सर्वांत प्रथम आपल्या सर्व देशबांधवांनी पाकिस्तानकडून अथवा पाकिस्तानी टीव्ही माध्यमांकडून प्रसारित करण्यात येणारे व्हिडिओ फॉरवर्ड करताना विचार करायला हवा. अलीकडेच पाकिस्तानने आपला एक वैमानिक  पकडला. यासंदर्भातील व्हिडिओमध्ये त्याला मारहाण करताना दाखवण्यात येत आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ आपण प्रसारित करता कामा नयेत. कारण या व्हिडिओमधील सदर वैमानिकाची मुलाखत ही त्याच्यावर प्रचंड दबाव आणल्यानंतरची आहे. अशा व्हिडिओंचे प्रसारण झाल्यामुळे त्या वैमानिकांच्या कुटुंबियांचे, मित्रमंडळींचे आणी सध्या सैन्यात असलेल्यांचे मानसिक खच्चीकरण होउ शकते. म्हणूनच प्रत्येक भारतीयाने आजच्या परिस्थितीत सोशल मीडियावापरताना डूज अँड डोण्टस् लक्षात घेऊन हे माध्यम वापराबाबतचे काही स्वनिर्बंध घालून घेणे गरजेचे बनले आहे.

पूर्वीच्या काळी युद्धाच्या काळामध्ये संपूर्ण देशातील माध्यमांवर सेन्सॉरशिप आणली जायची.  राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात जाणारी कुठलीही महत्त्वाची बातमी प्रसारित करण्यास वर्तमानपत्रांना परवानगी नसायची. काय प्रसिद्ध करायचे आणि काय नाही यावर सरकारचे नियंत्रण असायचे. पण आज टीव्ही मीडिया आणि सोशल मीडियाचा अतिप्रसार झाला आहे.  यामध्ये कार्यरत असणारे घटक अशा स्वरुपाच्या नियमांचा किंवा संकेतांचा अनेकदा विचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे देशाचे आणि सैनिकांचे नुकसान होते. म्हणूनच सैन्याला आणि देशाला मदत करायची असेल तर आपणा सर्वांना काही नियमांचे, संकेतांचे पालन करावे लागेल.

नेत्यांच्या गैरविधानांचा  पाकिस्तानकडुन आंतरराष्ट्रीय पातळीवर वापर

गेल्या आठ दिवसांत घडलेल्या घडामोडींच्या काळात काही भारतीय नेत्यांनी, संस्थांनी उलटसुलट विधाने केली. पुलवामा हल्ला सरकारनेच केला इथपासून बालाकोटामधील एअर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्या अशी मागणी करण्यापर्यंत अनेक वक्तव्ये करण्यात आली.  काहींनी इम्रान खान हा शांततेचा दूत आहे, असे सांगतानाच त्याला शांततेचे नोबेल पारितोषिक देण्याची भाषा केली. अशी विधाने अनेक वेळा टीव्ही चॅनेल्सवर आणि सोशल मीडियावर केली जातात. पण अनेकांना याची कल्पना नसते की याच विधानांचा वापर पाकिस्तान अत्यंत खुबीने आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरावे म्हणून करत आहे. सुरुवातीपासूनच पाकिस्तान पुलवामाचा हल्ला हा आम्ही केलेला नाही असे सांगत आला आहे. त्याला भारतातील संधीसाधू आणि बेजबाबदार विधाने करणार्यांमुळे आयते कोलित मिळाले आहे.  इम्रान खान शांततेचा दूत आहे असे म्हणणे याचा दुसरा अर्थ भारत हा हिंसाचाराचा समर्थक आहे, असे मान्य करणे आहे. त्यामुळे सध्याच्या माहिती युद्धात आपण जबाबदारीचे भान बाळगले पाहिजे.

भारतियांचे भारत विरोधी लेख

अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून अनेक भारतीयांनी भारत पुलवामाच्या हल्ल्यानंतर कारवाई करण्यास सक्षम नाही, भारताकडे ती ताकद नाही, भारतात युद्धज्वर वाढवला जात आहे आणि  पाकिस्तान हा शांतता मागणारा देश आहे. अशा आशयाचे वातावरण तयार केले. या तथाकथित तज्ज्ञांच्या व्हिडिओचा वापर करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे.

काय करायला हवे?

सध्याच्या परिस्थितीत वायूदल, नौदल, दूरदर्शन आणि एएनआय, पीटीआय यांच्याकडून आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवावा. याखेरीज अन्य स्रोतांकडून जर काही माहिती प्रसारित केली जात असेल तर त्याची खातरजमा होईपर्यंत किंवा अधिकृतपणाने त्यावर शासनाकडून किंवा लष्कराकडून प्रतिक्रिया येईपर्यंत वाट पहावी. कुठलीही पोस्ट टाकताना हा संयम बाळगायला हवा. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गोपनीय असणार्या अथवा महत्त्वाच्या असणार्या विषयावर सोशल मीडियावरुन चर्चा करणे टाळावे. उगाचच अतिरिक्त ज्ञान देऊन शत्रुला आयती माहिती मिळण्याची संधी देऊ नये. वेगवेगळ्या ग्रुप्सवर अनेक अफवा पसरवल्या जातात. तसा प्रकार दिसून आल्यास त्याबाबत सजग नागरिक म्हणून आपण पुढाकार घेऊन तो रोखण्याचा प्रयत्न करावा. आज आपला शत्रू अत्यंत चलाख बनला आहे. भारतीयांमधील मेसेज फॉरवर्ड करण्याची उतावीळता त्याने हेरलेेली आहे. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी शत्रू अनेक हुशार युक्त्याही वापरतो आहे. त्यामुळेच अनेकदा सोशल मीडियावर येणारे फोटो किंवा व्हिडिओ हे फेरफार केलेले, मॉर्फिंग केलेले असतात. कित्येकदा त्यावर आपल्या सरकारी एजन्सीचे नावही टाकलेले असते. म्हणूनच अधिकृत प्रतिक्रिया येईपर्यंत अशा प्रकारचे फोटो-व्हिडिओ फॉरवर्ड करू नयेत. सैन्याविषयीची, सैन्यताकदीविषयीची कुठलीही माहिती सोशल मीडियावरुन पसरू नका.

काही तज्ज्ञ आपल्याकडे असणार्‍या माहितीचा फायदा कळत-नकळतपणे शत्रूला करून देत आहेत. तो टाळला जायला हवा. सैन्याने काय करावे हे ठरवण्यास सैन्य आणि सैन्यातील अधिकारी पदावरील व्यक्ती समर्थ आहेत.

जबाबदार भारतीय म्हणून कार्य करण्याची गरज

दुसरी गोष्ट म्हणजे देशद्रोही भाषा करणार्‍या कोणत्याही ग्रुपला जॉईन होऊ नये. तसेच आपल्याला अशा प्रकारची माहिती आढळल्यास त्याविषयीची माहिती पोलिसांना अथवा संबंधित यंत्रणांना द्यावी. आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालेले नाही. पण पाकिस्तानच्या कुरापती पाहता जर भविष्यात युद्ध झाले किंवा पाकिस्तानच्या आगळिकीमध्ये  आपले काही नुकसान झाले तर त्याविषयीची माहिती उगाचच सर्वत्र पसरवू नये. कारण त्यातून जनमानसात नैराश्येचे वातावरण तयार होऊ शकते. काही वेळा त्यातून प्रक्षोभही निर्माण होतो. म्हणूनच आपल्या नेतृत्त्वावर आणि सैन्यदलांवर विश्वास ठेवून राहायला हवे.

देशभक्त नागरीक म्हणून आज सर्वांनी स्वतःवर सेल्फ सेन्सरशिप लादून आपण एक जबाबदार भारतीय म्हणून कार्य करण्याची अपेक्षा आहे. आज बदलत्या काळात अपप्रचार हीदेखील एक युद्धनीती झालेली आहे. त्यामुळेच या माहितीयुद्धामध्ये अत्यंत सजगतेने वर्तन करण्याची अपेक्षा प्रत्येक भारतीयाकडून आहे. ही वेळ जबाबदार नागरिकांची एकजूट दाखवण्याची आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..