चिनी कोलदांडा

चीन आणि पाकिस्तानसारखे विश्वासघातकी देश शेजारी म्हणून लाभले हे भारताचे मोठेच भौगोलिक दुर्दैव आहे. त्यांच्याशी भारताने कितीही चांगले संबंध प्रस्थापित केले.. कशीही जवळीक साधली. तरीही त्यांचं शेपूट काही सरळ होत नाही. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, हेच या दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरण राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत याचं पुन्हा प्रत्यंतर आलं. भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘जैश-ए-महंमद’ या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रयत्नात चीनने पुन्हा एकदा कोलदांडा घालून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामासह देशातल्या कित्येक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या मसूदला जागतिक दहशतवादी ठरविण्यासाठी भारताने गेली १० वर्षे सातत्याने प्रयत्न केले. फ्रान्सच्या पुढाकाराने यंदा भारताने केलेला हा चौथा प्रयत्न होता. या वेळी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशांनी मसूदविरोधात भारताच्या ठरावास पाठिंबा दिला. रशियानेदेखील भारताचीच बाजू उचलून धरली होती. पण, एन वेळी चिनी अजगराने त्याचे खरे स्वरूप पुन्हा दाखवले. नकाराधिकाराचा वापर करून चीनने मसूदला पर्यायाने पाकिस्तानला आणि एक प्रकारे दहशतवादालाच अभय दिले, असे म्हणावे लागेल. त्यामुळे, दहशतवादाची पाठराखण करणारी चीनची ही भूमिका जागतिक समुदायाने गंभीरपणे घेतली पाहिजे. एका आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला वाचविण्यासाठी एकदा देश चार वेळा नकाराधिकार वापरून सुरक्षा परिषदेतील बहुमताचा अनादर करत असेल तर या नकाराधिकारालाही नाकारण्याचा विचार आंतरराष्ट्रीय परिषदेने करण्याची गरज आहे.

पाकिस्तानसोबतची मैत्री आणि भारताचा द्वेष या एकमेव कारणासाठी चीनने मसूद अझर प्रकरणी भारताच्या प्रयत्नात खोडा घालून पाकिस्तानचे रक्षण केले आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने २००९ ला पहिला प्रयत्न केला होता. तेंव्हाही चीनने नकाराधिकार वापरत आपली अडेलतट्टू भूमिका घेतली होती. त्यानंतर २०१६ आणि २०१७ मध्ये पुन्हा हा पर्यंत केल्यावरही चीनने आपला हेका सोडला नाही. आता सर्व देशांचा पाठिंबा असतानाही एकट्या चीनने मसूद प्रकरणी भारताला विरोध केला. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याच्या आधीच चीनने बीजिंगमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अझरबाबत अधिक पुरावे देण्याची मागणी भारताकडे केली. वास्तविक मसूद प्रकरणी सर्व पुरावे भारताने अनेकदा जागतिक समुदायासमोर मांडले आहेत. १९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर भारताला मसूद अझर ला सोडावे लागले होते. तेंव्हापासून भारतावर होणार्या प्रत्येक दहशतवादी हाल्यात तो संशयित म्हणून समोर येत आहे .२००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्यात मसूद अझर ची प्रमुख भूमिका होती. तेंव्हाही पुरावे देण्यात आले होते. पठाणकोट हल्ल्यातही मसूदचा हात असल्याचे पुरावे जगासमोर ठेवण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील मसूदचा हस्तक्षेप तर जगाने मान्य केला आहे. त्यामुळे यावेळी विरोधी सूर लावण्याचे चीनला काहीच कारण नव्हते. परंतु तरीही चीनने खोडा घातला. यामागे भारतद्वेष हेच कारण आहे.

सीमारेषावरून भारत आणि चीन मध्ये पाहिल्यापासूनच वाद आहे. आजवर‘हिंदी-चिनी भाई-भाई’ च्याकितीही वलग्ना केल्या गेल्या असल्या तरी भारत हा देश चीनच्या डोळ्यात कायम खुपत असतो. त्यातूनच आक्टोबर 1962 ला भारत आणि चीन यांच्यात युद्ध झाले होते. त्याकाळी भारत चीनसमोर बराच कमकुवत होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत आपल्या मूलभूत गरजांसाठी त्याकाळी संघर्ष करत होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या पाच दशकात भारताने मोठी प्रगती केली आहे. 1962 सालानंतर भारताने आपले लष्करी सामर्थ्य प्रचंड वाढवले. अण्वस्त्र सज्जतेसह अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रेही भारताने गेल्या काही वर्षांत विकसित केली आहेत. आशिया खंडात चीनने ज्या प्रमाणात प्रगती केली त्यात भारत कुठेही मागे राहिलेला नाही. आज चीन महासत्ता बनण्याचे स्वप्न बघत असेल तर भारतही त्याच स्पर्धेत आहे. त्यामुळेच चीनकडून वेगवेगळ्या कुरापती सातत्याने काढल्या जातात. साम्राज्यविस्तराचा भुकेला असलेला चीनला आपल्या वाटेत भारत हाच मोठा अडसर वाटतो त्यामुळे त्याचा भारतद्वेष नेहमी उफाळून येत असतो. यामागे अर्थकारण हेससुद्धा एक कारण आहे. चीनने आशिया खंडात मोठी गुंतवणूक केली आहे. पाकमध्येही चीनची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळेच चीनला पाकप्रेमाचा उमाळा फुटत असतो. अर्थात, कोणत्या देशाचे परराष्ट्र धोरण कसे असावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र एका आंतराष्ट्रीय मुद्यावर यावेळी चीनने समजूतदारपणची भूमिका घ्यायला हवी होती.

दहशतवादाचा ब्रह्मराक्षस आज संपूर्ण जगाच्या पाठीवर बसला आहे. कुठलाही देश आता तिथल्याच जनतेसाठी सुरक्षित उरलेला नाही. त्यामुळेच दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जगातील बहुतांश देश आता एकवटल्याचे दिसतात. मात्र चीनसारख्या देशाचे डोळे अजूनही उघडलेले नाही. केवळ आपल्या स्वार्थासाठी चीन दशतवादविरोधी लढ्यात खोडा घालत आहे. याची दखल संपूर्ण राष्ट्रांनी घ्यायला हवी. पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन बनले असल्याचे सर्वश्रुत असताना दहशतवादला पोसणाऱ्या एका देशाची मदत करून आपण दहशतवादालाच प्रेरणा देतो आहोत, याचेही भान चीनला राहिले नाही काय? अर्थात, यामागे चीनचा भारतद्वेष असेल. मात्र हा मुद्दा एकट्या भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. दहशतवाद सर्वच देशांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे दहशतवादला प्रतिबंध घालण्याच्या या लढाईत जो कुणी आडवा येईल त्याला आडवा करण्यासाठी जागतिक समुदायाने पाऊले उचलावीत, ही अपेक्षा आहे. चीन भारताचा कधीच मित्र नव्हता. यापुढीही तो होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या नाड्या आवळण्यासासाठी भारतानेही धोरणी पाऊले उचलण्याची गरज आहे. शांततेचा जप करून भारतात तणाव वाढिवण्याचे चीन आणि पाकिस्तानचे मनसुबे आहेत, ते हाणून पाडण्यासाठी भारताने सज्ज राहायला हवे..!

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 34 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…