नवीन लेखन...

मोर्चा

अनघा दिवाळी 2021 मध्ये प्रकाशित झालेली दिर्घ कथा.


गारेगावच्या बाजारपट्टीत आता वर्दळ वाढू लागली होती. गारेगाव आता कात टाकीत होतं. सगळ्याच वस्तू वानाची दुकानं वसू लागल्यानं आजुबाजूच्या खेड्यांचा बाजारहाट गारेगावलाच होऊ लागला होता.

साळीमचे गंपूशेठ गारेगावच्या बक्करशेठच्या दुकानांतून शेती अवजारं घेऊन आपल्या घोडागाडीतून आपल्या घरी निघाले होते. घोड्यांच्या टापांनी आणि त्यांच्या गळ्यातल्या घुंगरांनी चांगला ताल धरला होता. गंपूशेठ आपल्याच विचारांत तरंगत होते. काही म्हणा पण सालं आदरतिथ्य करावं ते या मिया लोकांनीच! काय मधाळ, लज्जतदार भाषा! त्यात आपण गेला की बक्करशेठ गल्ला सोडून आपल्याला मजल्यावरच्या मुक्कामी घेऊन जाणार हॉटेलचा नाही, खास घरचा चहा, नाश्ता खिलवणार आणि त्यांची बायको. ती तर आपण गेल्यावर पुंगट वगैरे बाजूला करीत. आप तो ईद के चाँद निकले, वा अखादा तशाच अर्थाचा शेर कवित स्वागत करणार. आणि मग मस्त पानाचा विडा देणार, मग चहा नाश्ता आणि पुन्हा पानाचा विडा. घाई करण्याचं विसरूनच जायचं. रक्षाबंधनाप्रसंगी राखी बांधणार आणि भाऊबिजेला भेट मागून घेणार आणि आठवणीत राहील अशी भेट देणार. या दोन्ही दिवशी आपलं त्यांच्याकडं जाणं कधी चुकत नाही.

या विचारांत गंपूशेठ वाळीम गावच्या खाडीकिनाऱयावर येऊन पोहोचले होते. वाळीम खाडी किनाऱयावर वीस पंधरावीस झोपड्या वसल्या होत्या. आठ-दहा मुसलमानांच्या होत्या. बाकी आदिवासी आणि  तत्सम जातीच्या होत्या. त्यातले पुरुष मच्छिमारी बोटीवर मजूर म्हणून काम करायचे आणि बायका मासळी निवडून देणे, वाळत टाकणे, अशी काम करीत त्या बदल्यांत त्यांना कुटर मासळी मिळत, ती मासळी त्या सुकवीत आणि विकत असत.

त्या झोपड्यात मध्येच करीम चाच्याची झोपडी होती. करीमचाचा आता पासष्टीच्या पुढे गेला होता. चांगला खलाशी तर तो उमेदीत होताच पण वडिलांकडून त्याने हकिमीची इलमपण प्राप्त केली होती. गोड, मधाळ बोलणं आणि अपार श्रध्दाळू स्वभाव यामुळे करीमचाचा सर्वांचाच श्रध्देचा माणूस होता. त्याच्या दव्याबरोबर त्याच्या दुव्याचाही असर व्हायचा जणू! डॉक्टरकडच्या उपचाराने बरे न होणारे व्याधीग्रस्त लांबलांबून करीम चाच्याला शोधित यायचे. परिसरातले तर दुखलं खुपल्याच्या तक्रारी घेत करीमचाच्याकडे येत. श्रध्दाळूना व्यवहार जमत नाही. तसा करीमचाच्याला कधी तो जमला नाही. काही काही पेशंट भेटीगाठी आणित, त्यांच करीम चाच्याला कोण

अप्रूप वाटे. मुलगा सून आणि तो. बायको वारली होती. आता तो त्याच्या व्यवसायात बुडायला मोकळा झाला होता.

झोपडीजवळ गंपूशेठ आले आणि करीमचाचा अशी हाक दिली. टांगा थांबला, लगाम न खेचताच. कारण घोड्यांनाही तो परिपाठ झाला होता.

करीमचाचा बाहेर आला नेहमीच्या सवयीने दोन्ही घोड्यांच्या मानेवर थोपटले. घोड्यांनीही फुर्रर्र करीत दाद दिली.

काय चाललंय करीम चाचा?

“कुछ नही गंपूशेठ, ये दोन तीन जन दवा के वास्ते आये हैं। और वो सुकुर पटेल हे उनकी तबियत ठिक नहीं है।”

“काय झालंय सुकूर पाटलाला? पहाडा सारखा तर माणूस.”

“पेट की बिमारी है। वजह मालूम झालाय, सांजची त्याची दवा त्यांनी बंद केली असती तर जलदी असर झाला असता.”

गंपूशेठ गडगडाटी हसले. “अरे भाई, सुकूरपाटील रंगेल माणूस. तो काय संध्याकाळी  कोरडी घालवणा! करीमचाचा तू आहेस म्हणून बरं आहे बाबा, लोकांनी नाही ते शोक करायचे आणि अंगाशी आल्यावर तुझ्याकडे धावायचं!”

“मेरी क्या बहादुरी, उपरवालेकी है मेहेरबानी.” करीमचाच्यानी दुव्यासाठी हात पसरले आणि आकाशाकडे नजर वळवली.

गंपूशेठचा टांगापुढे निघाला होता.

वाळीमच्या रस्त्यावर सजल्या लोकांची नेहमीपेक्षा जास्त वर्दळ दिसली.

“अरे हतिफ भाई, काय आहे गावात?”

“सलाम गंपूशेठ! वो बारक्याशेठ, शादी है ना सुनके बचीकी, पानगुलाबके वास्ते गया था!”

“अरे बरं झाला बाबा सांगितलंस ते, मी विसरुनच गेलो होतो. माझा आहेर राहून च गेला असता.”

गंपूशेठनी टांगा बारक्याशेठ कडच्या लग्नमंडपाकडं हाकलला.

रात्रीचे जेवण आटोपून गंपूशेठ आराम खुर्चीवर विडा लावीत बसले होते. मुलगा बाळशेठ ओटीवर आला.

“काय म्हणाले तुझे मामा?”

मामा म्हणाले की, ‘‘वस्ती वाढते आहे. धंदे वाढताहेत दुकानदारीत पड.”

“आपला चांगला शेतीचा धंदा आहे तो सोडून हा पडण्याचा धंदा मामानी सुचवला. वाह! छान! कसलं दुकान टाकायचं ठरवतोय?”

मामा म्हणाले. “घरबांधणी सर्वत्र वाढलीय. कड्या, कोयंडे, बिजागऱया, रंग, औजारं असं दुकान बरं चालतं. मामा होलसेलर कडून क्रेडीटवर माल मिळवून देईल म्हणाले.”

“ठीक आहे. आपला नाक्यावरच गाळा बंद पडुन आहे त्याचं भाग्य उजळेल.”

“नाही, मामा म्हणाले गारेगावला टाक दुकान गारेगाव चांगली बाजारपेठ आहे.”

“अरे तेथे आधीच दुकानं आहेत आपल्या गावात नाही दुकान, दुकान टाकलं की गावची, आजुबाजूची येतील इथेही खरेदिला. शिवाय गावातल्या गावात तुला भरपूर वेळही मिळेल.”

“पण बाबा मामा म्हणताहेत.”

“हो, हो, मामा म्हणताहेत तेच बरोबर! ठीक आहे.”

बाळशेठनी मोटारसायकल काढली नी पडला बाहेर.

या पिढीला आता बापाचा सल्ला नाही चालत तो देण्यात आपलाच मुर्खपणा होतो. ते आत जाऊन बिछान्यावर पडले. शेती वाडीत नाही गोडी दुकानी तरी लागो. म्हणत ते झोपेच्या आधिन झाले. तिसऱया दिवशी अशीच वेळ. गंपूशेठ पान लावीतच बसले होते.

“बाबा  माझ्या मित्रांनी गारेगावच्या टिळकरोडवर चौकाजवळ दुकानासाठी जागा शोधलीय.”

“अरे त्या चौकाजवळ बक्करशेठचं याच मालाचं जुन्यापासून दुकान आहे. तू आडव्या रस्त्यावर जरा बाजूला टाक म्हणजे बरं.”

“बाबा हल्ली एकाच मालाची हारीने दुकानं टाकण्याचा ट्रेड निघालाय. शहरात सोन्याचांदीच्या दागिन्यांची, चपला बुटांची जवळ जवळ दुकानं काढतात.”

“अरे त्या शोकाच्या वस्तू. त्यांची प्रत्येकाची घडण वेगवेगळी असते. तुमच्या मालाचं तसं नाही.”

“बाबा स्पर्धेत उतरल्याशिवाय यश नाही. मीत्र म्हणतात ही जागा मोक्याची आहे.”

“हो! हो! मित्र म्हणत असतील तर ते बरोबरच असणार!” गंपूशेठनी बोलणं थांबवलं.

दुसऱया दिवशी सकाळीच गंपूशेठ बक्करशेठच्या घरी पोहोचले.

“आईये गंपूशेठ, बडे सुबह आना हुआ, कोई तबियतका तो मामला नही है ना?”

“नाही रे बाबा, आमचा बाळ म्हणतो त्याला दुकानदारीत पडायचं आहे.”

“वाह। अच्छी बात, तुम्हारे सालीममे वैसी दुकाने कमतीही है।”

“सालीमला नही इथे गारेगावला.”

“बहुत अच्छा, हमे कुछ काम बताओ, कायकी दुकान डालने की?”

“हेच, तुझं आहे त्याच सामानाचं, त्याच्या मामाचं तालुक्याला दुकान आहे. तो म्हणे मदत करणार आहे.”

बक्करशेठ जरा गप्प झाला. मग म्हणाला,  “दुकाने तो निकलतीही रहती है, आपका बच्चा डाल रहा है अच्छी बात है।”

चहा, नास्ता झाला. इतर फारसं न बोलता गंपूशेठ निघाले वाळीमच्या झोपडपट्टीजवळ टांगा थांबला, तेव्हा ते भानावर आले. बक्करशेठ नाराज तर नाही ना होणार, अशी त्यांना वाटणारी खंत शमली होती. बक्करशेठच्या दिलदार स्वभावाची आणखी एक झलक त्यांना मिळाली होती.

टांगा थांबल्याच्या आवाजाने करीमचाचा बाहेर आला.

“गंपूशेठ, आज आवाज नही दिया?”

“अरे आज रात्री झोप नाही लागली. पोटातही गडबड वाटते काही दवा दे बाबा.”

“कुछ खानेमे खराबी हुयी या मनकी शांती की वजह है।”

“मनाचंच समज आणि दे औषध.”

करीमचाचाने औषधाची पुरचुंडी देत घेण्याची रीत सांगितली. गंपूशेठनी दहा रुपयांची नोट त्याच्या हातात कोंबली आणि तांगा हाकलला.

“अरे नही नही गंपूशेठ इतने नही…” करीम शेठचे शब्द मागे पडत होते.

बाळशेठच्या दुकानाचा मूहुर्त होता. त्याचे काही मित्र आले होते. गंपूशेठही आले. ब्राह्मणाने बाळशेठला पुजेला बसवून काही विधी केला. परिचित, निमंत्रीत आले होते. गंपूशेठ स्वत चहा पाणी घेतल्यानंतर मूहुर्त म्हणून उगाच काहीतरी स्वतच खरिदीत होते. बक्करशेठ बायकोला घेऊन आले. बधाई दिली. चहापाणी घेऊनही तेही गेले. दुकान तर समोरासमोरच होती. मध्ये केवळ रस्ता.

आता फारसं कोणी नव्हतं. गंपूशेठ म्हणाले, “बाळा या इतक्या झगझगीत पाट्या कशाला, मालचोख भाव ओक, आज रोख उद्या उधार, कामाशिवाय थांबू नये, कामाचे बोलावे, अरे याने गिऱहाईकांना नाही बरं वाटत. ही गरज सौम्य बोलून सांगता येते.”

“असू द्या बाबा, मला फालतू बोलायला आवडत नाही. तुम्हाला माहीत आहे ना. उधारीत दुकानं बुडतात. मामा बजावून म्हणाले आहेत.”

गंपूशेठ गप्प झाले म्हणाले, “निघतो मी.” गंपूशेठ घरी जेऊन झोपले तेव्हा उशीरा कधीतरी बाळशेठ घरी आला होता.

बाळशेठचं दुकान चालू झालं होतं. उशिरा झोपायच्या सवयीमुळे बाळशेठ उशिरा उठत, पुष्कळ वेळा उठवावंच लागे. मग धावपळत आवराआवर, इतर बाजारपेठ चांगली गजबलेली असे आणि बाळशेठचं दुकान नंतर उघडे. लांबून येत होता ना तो.

तुरळक गिऱहाईक येई. काहींची खरेदी, काहींची भावाची चौकशी असे बाळशेठला मोबाईलवर व्हाट्सअॅपचा मोठा शोक. त्यांत तो रंगून जाई. खुप हँसी मजाक चाले. गिऱहाईक येई. मोबाईलवरचं बोलणं थांबण्याची वाट पाही आणि सरळ बक्करशेठच्या दुकानी जाई. तो भानावर येई मग त्याला वाटे बक्करशेठ तर खुणा करून बोलावित नसेल?

संध्याकाळी मित्र येत. नवं दुकान आहे. बसेल हळूहळू जम. धीर धरण्यांत लाभ आहे. वगैरे समजावीत. गिऱहाईक नाही चल. इथे माशा मारण्यापेक्षा चहा मारु म्हणून त्याला बाहेर काढीत. मग अधीमधी बारमध्येही जाणं होई.

नवं दुकान म्हणून बाळशेठकडं गिऱहाईक येई पण भावांत की बोलण्यातून जमल्याने ते बक्करशेठच्या दुकानी माल खरेदी करी. बक्करशेठचे बरेच उधारीचे खातेदार होते. त्यांची वर्दळ त्यांच्या दुकानी कायम असे. शिवाय ते पुढे मागे करीत बक्करशेठ दुकानी आलेल्याला विन्मुख परत पाठवीत नसत.

बाळशेठ आणि मित्रांत बक्करशेठ विषय कायमचाच असे. त्यांत ठरलेकी बक्करशेठचा दुकानाचा नोकर फोडायचा.

दीडपट पगाराचं आश्वासन देऊन त्याला फोडला. केशव बाळशेठच्या दुकानी रूजू झाला. बक्करशेठनी त्याला पाहिलं ते बाळशेठच्या दुकानी आहे.

“बाळशेट, केशव हमारा नौकर है, आज तुम्हारी दुकान में कैसा?”

तो नोकरी मागायला आला. मी नोकरी दिली.

“मगर उसने मुझे बोलना मंगता है ना। और किसीका आदमी रखना है तो उससे पुछके रखनेका इस बझार का उसुल है।”

“मला तो उसुल वगैरे काय ते नाही माहीत.”

“उसके उपर मेरा पैसा बकाया है।”

देईन “ठीक आहे त्याने नीट नोकरी केली तर पगारातून कापून तुम्हाला. मला आणखी बोलायला फुरसत नाही. तुम्हाला हवं तर जा पोलिसांकडं.”

बक्करशेठ गप्प झाले. केशवकडे पहात ते म्हणाले. “केशव तुने बईमानी की है, बहुत भुगतनी पडेगी.”

तेथून ते दुकानी परतले.

गंपूशेठच्या बहिणीचा मुलगा चंद्रकांत याला साळीमच्या हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी लागली आणि त्याने गंपूशेठकडेच मुक्काम ठोकला होता. तो जातीय संघटनेचा सच्चा सैनिक म्हणवून घेत होता. कडवे ध्येयवादी क्रांतीकारक ही त्यांची दैवतं होती. मुसलमानांनी या देशाचं वाटोळं केलं. भारताची फाळणी झाली. हे त्याच्या जिव्हारी लागलं होतं. अतिरेकी कारवायामुळे तर तो अंतरयामी खवळून होता. त्याने साळीममधले या आपल्या विचाराने बरेच मित्र जोडले होते. भाषेवर त्याचं प्रभुत्व होतं. साळीमला त्याने संघाची शाखा सुरू केली होती. आणि हिंदुत्वाचं जोरदार वारं तयार केलं होतं. बाळशेठ कडून त्यात बक्करशेठवरच्या संशयाची भर पडत होती.

गंपूशेट आतून पार खचून गेले होते. हा उमदा मनाचा माणूस आतल्या आत कुढत होता. अरे हिंदू काय. मुसलमान काय त्यातला वाईट तो वाईटच. आणि चांगला तो चांगलाच. धर्म माणसं घडवतो यावर त्यांचा विश्वास नव्हता. आता बक्करशेठना तोंड दाखवायला त्यांना धीर होत नव्हता. गारेगावला जायचंच  त्यांनी बंद केलं होतं.

हसन टेम्पोवाला त्या बाजारपेठेत होलसेलरकडचा माल आणून देई. त्या दिवशी त्याने बाळशेठ कडची डिलीव्हरी दिली आणि तो डिलीव्हरीसाठी बक्करशेठच्या दुकानी गेला तर एक छोटा खोका नव्हता. चुकून तो बाळशेठकडे उतरल्याची त्याला खात्री वाटली. ती बाळशेठच्या दुकानी आला.

“बाळशेठ बक्करशेठका एक खोका गलतिसे तुम्हारे दुकान मे उतरा है। जरा देखो तो.”

“अरे बाबा चोर आहोत का आम्ही तुझा खोका उतरवून घ्यायला.”  बाळशेठ खेकसला.

“कौन बोला चोर? अरे गलतीसे उतरा है बोला. आप जरा देखिये तो।”

‘आता मला वेळ नाही. नंतर बघतो. सापडला तर देईन.’

“अरे भाई, बक्करशेठ की डिलिव्हरी देना है। रूक नही सकता, जरा देखिए अभिच.” तेवढ्यात बाळशेठचे दोन मित्र दुकानी आले.

“काय रे, काय भानगड आहे?” एकानं विचारलं.

“काही नाही रे, हा टेम्पोवाला म्हणतो बक्करशेठचा खोका माझ्या दुकानी उतरलाय, म्हटलं मग बघून देतो तर कटकट करतो आहे.”

“क्या रे तेरे को समझता है ना क्या बोला, जाव अभी बादमे आना।” म्हणत त्याला ढकलीत दुकानाबाहेर काढलं.

हसन तसा पोहोवलेला जिगरबाज माणूस होता त्यानं हंगामा सुरु केला. रस्त्यावरची, बाजूच्या दुकानातली मंडळी जमली. बक्करशेठ स्वत आहे. म्हणाले, ‘रहने दो खोका झगडा नही मंगता. तू चल अभी.’

“अरे बक्करशेठ रहने दो क्या बोलता है। क्या हमने रख्खा है तुम्हाला खोका। ठीक बात करना नही  तो महंगा पडेगा।”

बक्कारशेठ सारख्या चांगल्या माणसाला असा दम दिल्याने हसन ड्रायव्हरने सरळ आव्हानंच दिले.

नशिब तेवढ्यात पोलिसांची व्हॅन तेथून चालती होती. गर्दी आणि झगडा ऐकून इन्स्पेक्टर आणि पोलिस गर्दीत शिरले, त्यांना पाहून हसनने त्यांना सलाम ठोकला हसनचे इन्स्पेक्टर परिचित असावे.

“जा दुकान मे खोका है क्या देख,” इन्स्पेक्टर म्हणाले.

हसन दुकानात शिरला. खोका घेऊन बाहेर आला. म्हणाला, “देखो इस पर बक्करशेठ का नाम है।”

“साहेब साळेमच्या गंपूशेठचा मुलगा आहेत. टेंम्पोवाल्याने तो खोका उतरवला बाळशेठला माहीत नव्हतं म्हणून…”

“अरे मग शोधून बघू द्यायचं ना. गंपूशेठच्या मुलाकडून हे अपेक्षित नाही. बापाची इज्जत राखा, काय?”बाळशेठ खाली मुंडी घालून होता.

“साहेब पुन्हा नाही चूक होणार. आम्ही लक्ष ठेऊ.” मित्र म्हणाला.

“ठीक आहे” म्हणत साहेब निघाले, व्हॅन निघून गेली.

बाळशेठच्या दुकानी स्मशान शांतता, कोणीच काही बोलत नव्हतं. “चला आता, दुकान चालविण्याचा आत मूड राहणार नाही, करु या बंद.”

संध्याकाळी बाळशेठनी, बक्करशेठनी काय चालबाजी केली. ड्रायव्हरला हाताशी धरुन खोका उतरविला आणि माझ्यावरच चोरीचा आळ घातला. वगैरे कांगावा करण्यास सुरूवात केली. गंपूशेठनी घाईघाईने पानाचा विडा तोंडात घातला. काही न बोलता ते अंगणात शतपावलीला उतरले. चंद्रकांत आणि बाळशेठ यांची बराच काळ खलबतं चालली होती.

बाजारात आता बाळशेठची जरा एकाकीच अवस्था झाली होती. इतर दुकानदार त्याच्याशी अगदीच कोरडे शब्द वापरू लागले होते. एका मित्राने सुचवलं, दसरा येतोय महिन्याभरात. या मार्केटमध्ये गरबा चालू करावा. दसऱयाला कोणी नाकारणार नाही बाळशेठनी जरा जास्तच वर्गणी द्यावी. मग बाजारात आपोआपच खेळीमेळीचं वातावरण निर्माण होईल.

ठरलं, मार्केटमधली हौशी, टग्गी पोरं शोधली, त्यांच्या मनात भरवलं, त्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. काहींच्या सह्यांनी त्या संबंधी पत्रक काढलं. जमले त्यांची बैठक झाली. गरबा भरविणे, त्यासाठी सजावट, साहित्य, जबाबदाऱया वाटून घेतल्या. खर्च फारसा नव्हता. प्रत्येक दुकानदाराने एकावन्न रुपये आणि ऐच्छिक देणगी ठरली. बाळशेठनी सर्वात जास्त देणगी दिली. रात्री सर्वांना कॉफी आणि दसऱयाला प्रसाद असे आश्वासन दिले. पोरांचं मंडळ नेमलं गेलं आणि सोपवली गेली.

संध्याकाळी घरी बाळशेठ, चंदू यांची चर्चा झाली. चंदूनेही साळीममध्ये गरबा सुरू करण्याचं ठरवलं.

गारेगावच्या बाजारातला गरबा  खूपच थाटात सुरू होणार होता. बाळशेठच  गरबा  कमेटीचा अध्यक्ष होता. त्याचे मित्र त्याला मार्गदर्शन करीतच होते. पहिल्या दिवशी फटाके लावून गरबा प्रारंभ करण्याचा लगेच निर्णय घेतला आणि चंदुशेठनी फटाक्याच्या माळा, अॅटमबॉम्ब वगैरे आणले. जेवणं वगैरे झाल्यावर रात्री दहाला गरबा सुरु करण्याचं ठरलं होतं. पण काही उत्साही मंडळ नऊ वाजताच जमली होती. साडेनऊ झाले. बाळशेठनी ठरवलं आता फटाके लावून जागृती करूया. पोरांना फटाके दिले. त्यांनी चारही रस्त्यावर फटाके अंथरले. मधल्या चौकात गरबा रंगणार होता.

सुचना दिली आणि फटाक्यांचे बार उडू लागले. बाळशेठ आणि बक्करशेठची दुकानं समोरासमोर रस्त्याच्या दोन बाजूला होती. तेथेही फटाक्याची माळ त्यांना बाँब लावून पसरली होती. कोणाच्या ध्यानी मनीही नव्हते. झालं काय. बक्करशेठ मुसलमान होता पण काही हिंदूच्या सणात तोही सहभागी होई. दसरा म्हणून त्यानेही त्याच दिवशी दुकान बंद झाल्यावर शटरला ऑईलपेंट लावला होता. रंगाऱयाच्या हातून तेथे थोडा रंग सांडला होता. पुढची अख्खी रात्र होती. रंग सुकेल म्हणून रंगाऱयाने सांडलेला रस्त्याकडेचा रंग पुसला नव्हता. माळीतला एक फटाका त्या रंगावर उडाला आणि फुटला. तसा रंगाने पेट घेतला आणि ज्वाळा दरवाज्याला लागून दरवाजा पेटला.

आग, आग लागली अशी बोंबाबोंब सुरू झाली. वरच्या गच्चीतून बक्करशेठ, बायको, मुलं गरब्याची गम्मत पाहत होती. त्यांनी खाली आग लागल्याचं दिसलं. त्यांच्या घरच्यांनी वरुन पाण्याचा मारा सुरु केला. खालून सारे पाण्याचा मारा करीतच होते.

बक्करशेठ फार घाबरले. गरब्याचा पुढारी बाळशेठ होता हे त्यांना माहीतच होतं. त्यांनी मुद्दाम असं केलं असावं का? नोकर केशव, मालाचा खोका ही प्रकरणं आधी झालेलीच होती. त्यांनी पोलिस स्टेशनला फोन लावून आपली भीती कळविली. पोलिसांची गाडी आली.  इन्स्पेक्टर बक्करशेठकडे गेले त्यांनी घटना दाखविली. बाळशेठच्या बाबतीतल्या दोन आधीच्या बाबींही कानावर घातल्या. तुम्ही सकाळी या पोलिस स्टेशनला असे सांगून इन्स्पेक्टर निघाले.

तेथे गरबा रंगला होता. त्यांना पोलिस आल्याचे माहीत ही नव्हते. इन्स्पेक्टरनी तेथे जाऊन चौकशी सुरू केली. त्यातून कळलं गरबा यंदाच सुरू झाला आहे. बाळशेट त्याचा पूढारी आहे. इतक्या लोकांचा जमाव आणि उत्साह लक्षात घेऊन इन्स्पेक्टर म्हणाले, ‘रस्त्यावर असा सार्वजनिक कार्यक्रम करतांना पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे. तुम्ही उद्या सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशनला या.’ असे म्हणून पोलीस निघून गेले.

दुसऱया दिवशी सकाळीच बक्करशेठ पोलिस स्टेशनला गेले. इन्स्पेक्टरनी त्याचा जाबजबाब घेतला. म्हणाले, ही एनसी म्हणून नोंदवून घेतो. कारण हे कोणी मुद्दाम केलेले नाही. अपघाताने झालेले आहे. आम्ही लक्ष ठेवू जा तुम्ही.

बक्करशेठ निघून आले. सकाळी त्यांच्या दुकानी बाजूचे दुकानदार आले. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आणि हे अपघातानं झालं आहे. मुद्दाम नाही कोणी केलं वगैरे समज काढली.

सकाळी नाश्ता करतांना बाळशेठनी सारी घटना गंपूशेठना सांगितली, पोलिसांनी बोलावल्याचंही सांगितलं.

गंपूशेठ खूप अस्वस्थ झाले. त्यांना स्वतलाच लाजिरवाणे वाटू लागले. बक्करशेठ सारखा आपला दिलदार मित्र. आपल्या नात्याचा सत्यानाश केला दिवट्याने.

त्यांनी टांगा काढला. बक्करशेठच्या दुकानी ते दाखल झाले. त्यांना पाहताच बक्करशेठनी उठून त्यांना मिठी मारली. त्यांना वर घेऊन गेले. बक्करशेठच्या बायकोने नेहमीप्रमाणे स्वागत केले. फार दिवसांनी आले म्हणून प्रेमळ राग व्यक्त केला.

गंपूशेठनी दोन्ही कान पकडून माफी मागणं सुरु केलं. बक्करशेठनी त्यांचे हात हाती घेत त्यांना सांगितलं. ‘धंद्यात समज गैरसमज होत राहतात. ते मी आणि बाळशेठ पाहून घेऊ. तुम्ही दखल नाही घ्यायची, आपला रिश्ता कायम राहिला पाहिजे.’ अशा अर्थाने खूप समाजावलं. त्यांचा पाहुणचार झाला.

ते खाली आले. गंपूशेठची नजर समोर बाळशेठच्या दुकानावर गेली. दुकान बंदच होतं आणि कट्ट्यावर केशव बसून होता.

“बक्करशेठ, केशव तिकडे का बसून?” गंपूशेठ केशवाला बक्करशेठ दुकानी कित्येक वर्ष पहात होते.

“बाळशेठने उसको रख्खा है अभी”

“का? त्याला दुसरा माणूस मिळाला नाही.”

“जाने दो, उससे कोई फरक नही पडा.”

“काय म्हणावं या मुर्खपणाला ….” म्हणत ते पायऱया उतरले आणि टांग्यात बसले. टांगा चालू लागला.

आज ते खुपच विमनस्क होते. ‘हा चंदू आल्यामुळे बाळ जास्ती बहकला असावा काय? नाही नाही! पोटी ते ओठी आणि पिण्डी ते ब्रह्मांडी तसं आहे.’

आणि चंदू भाचा आहे. त्याला कसं दुखवता येईल. प्रत्येकाची समज, विचार वेगवेगळे असतात. ते का बदलता येतात. टांगा थांबला. अरे करीम चाचाचा महल आला तर!

नेहमी ते टांग्यात बसूनच करीम चाच्याशी बोलायचे. आज ते खाली उतरले तोच करीमचाचा झोपडी बाहेर आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन ते करीमचाच्यांच्या चक्क झोपडीत शिरले.

“वाह, असा आहे तर तुझा महल।” ते सहज उद्गारले.

“या माणसाला कसं आणि कोठे बसवणार? करीम चाचा गोंधळून गेले होते. गंपूशेठनी ते ओळखलं असावं का बरं। ते बोलून गेले.” “पुन्हा येईन दोन खुर्च्या घेऊन येईन. एक तुला आणि एक मला.”

“अजी साब आपके पाँव इस झोपडे पे लगे तो और क्या चाहिऐ!”

“तू बैस दवा खलवित, मी निघतो.” म्हणत ते बाहेर पडले.

बाळशेठ पोलिस स्टेशनला गेला होता. त्याला इन्स्पेक्टर येईपर्यंत तेथेच बसवून ठेवले होते. तो मनातून वैतागला होता. म्हणाला, ‘मी दुकानी जाऊन पुन्हा येतो.’ पण साहेबांनी तुम्हाला थांबायला सांगितलंय. पोलिस स्टेशनच्या आर्डरलीने त्याला सांगितले. त्याचा इलाज घटला. आपण बाळशेठ आणि गंपूशेठचे चिरंजीव हे विरुध्द इथे गळून पडल्याचे त्याला जाणवले.

इन्स्पेक्टर साहेब आले. ते इतर कामं मार्गी लावीत राहिले. मग त्यांनी बाळशेठची केस हाती घेतली.

बक्करशेठचा नोकर फोडणे, खोका प्रकरण आणि आता लागलेली आग, गरब्याची न घेतलेली परवानगी यांचा पाढा इन्स्पेक्टरांनी वाचला. बाळशेठला उत्तर काय द्यावी. सुचत नव्हतं. कारण बक्करशेठचा नोकर फोडणं, खोक्यासाठी वाद घालणं त्याचं चुकलं होतं आणि नवा मुद्दा, दसऱयासाठी फटाके कुठं लावतात. ते तुम्ही मुद्दाम नाही का केलं यासाठीही त्यांच्यापाशी उत्तर नव्हतं. बाळशेठ लाचार बनून होता. बाजारातलं कुणीही त्याच्या बरोबर नव्हतं. पण नशीब त्याचा एक मित्र हजर झाला. इन्स्पेक्टरनी त्यालाही सुनावलं. तो बाहेर आला. पाकिटांत हजार रुपये घातले. ते टेबलावर सरकवीत त्याने माफी मागितली. इन्स्पेटर उठून बाहेर गेले. पोलिसाने ते पाकिट बाहेर नेलं. मग इन्स्पेक्टर म्हणाले. “जा आता, आमची डोकेदुखी नका वाढवू.” आणि ते बाहेर पडले.

रोज रात्री गरबा छान रंगत होता. रात्री दोन दिवस पोलिसांनी तेथे भेटी दिल्या.

साळीमचाही गरबा छान रंगत होता. तेथेही मध्यंतरात गंपूशेठच्या पत्नी भाच्याचं कौतूक म्हणून चहा देत असे. त्यावेळी चंद्रकांत भारतीय संस्कृती, भारताची महानता यावर विचार मांडी. भाषणाचा त्याचा शेवट देशाला. संस्कृतीला मुसलमानांनी भ्रष्ट केल्याचे दाखले देत होई. साळीमला दोन न्हावी आणि एक खाटीक इतकीच मुसलमानांच्या घरं होती आणि त्यांना कोणी वेगळे वगैरे समजतच नसत. पण आता मुसलमाना विरोधात मन कलुषित होत होती.

बक्करशेठच्या तक्रारीमुळे बाळशेठला पोलिसस्टेशनला कसा त्रास झाला याचा उहापोह बाळशेठ आणि चंद्रकांत यांच्यात झाला. बाजारात बाळशेठची पत वाढायला हवी याचा चंद्रकांत विचार करीत होता. तसेच तेथेही बक्करशेठ आणि कोणी मुसलमान असतील त्यांच्यावरही दबाव वाढवायला हवा याबाबतीत त्यांना सुचलं.

दसऱयाला साळीमहून जनजागरण मोर्चा काढून गारेगावला जायचं आणि तेथे एकत्रित प्रवचन आणि प्रसादवाटप करायचं. बाळशेठ आणि विशेषत त्यांचे मित्र यांना ही योजना आवडली. साळीमला चंद्रकांतने तर गारेगावला बाळशेठ आणि मित्रांनी तयाऱया केल्या.

दसऱयाचा दिवस उजडला. दुपारची वेळ होती. करीमचाचा लोकांची औषध तयार करीत  होता आणि सकीनाचा, त्याच्या सुनेचा, कण्हण्याचा आवाज वाढू लागला. तिचे दिवस पूर्ण झाले होते. बाळंतपणाच्या वेणा सुरु झाल्या होत्या. करीमचाच्यांनी तिच्यासाठी चाटण बनवलं. तिला चाटवलंस म्हणाला,“मै हूँ बेटा डर मत. थोडा सहना तो पडेगाही ना।” तो बाहेर आला औषधाचा हडपा काढून बसला. ती पुन्हा जोरजोराने वेदना देऊ लागली. “हाय अल्ला अब सहा नही जाता, मर जाऊंगी, कोई कुछ तो करिये।”

एरवी धीराचा करीमचाचा पण आता कोसळला। घाबरला।

“अरे अब्दुल्ला, अरे अब्दुल्ला” तो शेजाऱयाला मारू लागला.

अब्दुल्ला आला. म्हणाला, “क्या चाचा?”

अरे भाई सकिनाकी हालत है। तेरे बिदीको जरा उसके पास भेज। और हमारा हनीफ खालिहानमे सुकी मछली बटोरने गया है। जाके उसे बोल बायजाक्काको जल्दी बुलाया है।

“मेरी बीबी बहार गयी है कामपर, मै हनीफ को अभी भेजता हुँ।” अब्दुल्लाने सांगितल्यावर आभी घरी जावं का? हनीफ क्षणिक विचारात पडला. पण लगेच त्याने निर्णय घेतला तो साळीमकडे धावत सुटला.

साळीमला मोर्चाची तयारी झाली होती. हातात फलक घेऊन घोषणा देत मोर्चा मार्गस्थ झाला. समोरून हनीफ आला. रस्त्याकडेला उभा राहिला. काय का आज यहजुलूस है? हां हां दशहरा है। तो स्वतशीच बोलला. हा बघा लांडा इथे उभा आहे. मोर्यातलं कोणी तरी बोलत.

मोर्चा पुढं सरकल्यावर हनीफने धूम ठोकली. बायजाक्काच्या अंगणात जाता जाताच तो तिच्या नावाने हाक मारू लागला. बायजाक्का बाहेर आली. हनीफ थापा टाकीत होता. तिने त्याला बसवलं ती त्याच्यासाठी पाणी आणायला गेली. तिला आठवलं सकिनासाठी येते म्हणून तिने शब्द दिला होता. पाणी न पिताच हनीफ म्हणाला. बायजाक्का अब्बूने अभिके अभीच बुलाया है। सकिनाकी हालत बहुत बुरी है।

बायजाक्का पेचात पडली. मुसलमानाविरुध्द भाषणं, घोषणा तिने ऐकल्या होत्या आणि मुसलमानासाठी आपण जायचं का?

“हनीफ, माझी तब्ब्येत बरी नाही, तु सकिनाला गारेगावला सरकारी दवाखान्यात जा घेऊन.”

“बायजाक्का अभी ऐसे टाईमपे कैसे ले जा सकूँ? तुमने तो जिम्मा लिया था। भरोसा दिला। वादा किया था।”

“हो रे बाबा पण आता मी तरी काय करू?”

हनीफने ताडलं बायजाक्का येण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांने पाण्याचा तांब्या तसाच  ठेवला. हाय अल्ला सकिनाको बचाव म्हणत त्याने आकाशाकडे बघत दुव्यासाठी हात पसरले आणि तो तसाच मागे वळला. बायजाक्का घरात गेली पण पार बेचैनीने हैराण झाली. तिला काही सूचेना. साळीम आणि वाळीमचं गरीब दुबळं तिच्या धीरावर विश्वास ठेऊन असायचं. अनेकांना तिने जीवावरच्या संकटातून वाचवलेलं. करीमचाचा इतकंच श्रध्देनं गरीब दुबळी तिच्याकडं पहात.

झटक्यात ती बाहेर आली. दार ओढलं आणि जमेल तितक्या लगबगीने ती निघाली. देवा माफ कर मला, चुकले मी, सकिनाला वाचव, ती करूणा भाकत होती.

मोर्चा ज्या दिमाखात निघाला होता ते पाहून गंपूशेठ हवालदिल झाले होते. हे लोक गारेगावात काही हैदोस तर नाही ना घालणार? बक्करशेठची तर नाही ना कुरापत काढणार? त्यांनी टांगा जोडला ते निघाले गारेगावकडे. रस्त्यात बायजाक्का घाईघाईने जाताना दिसली. त्यांनी टांगा थांबवून तिला टांग्यात घेतलं. तिने सकिनाबद्दल सांगितलं. ‘चला हे कामतर झालं.’ टांगा काढल्याचं त्यांना समाधान वाटलं. पुढे गेले तर हनिफ लडखडत चालला त्याला टांग्यात घेतला. त्यांनी इशारा केला घोड्यांनी गती वाढविली.

वाळीम वरुन मोर्चा गेला. वाळीमचे लोक काय भानगड म्हणून एकमेकांना विचारीत होते. हिंदू जागरण म्हणजे काय कशासाठी? त्यांना प्रश्न पडला होता. कारण हिंदू आणि मुस्लिम धर्म विसरुन वाळीममध्ये एकमेकांत मिसळून गेले होते.

सकिनाने जोराने किंकाळी मारली आणि सारे शांत झाले. करीमचाचा काय ते समजला. साफ गोठून गेला. कितीवेळा गेला त्याला स्मरलं नाही. पण अचानक ट्याहाँ ट्याहाँ आवाज आला. थोड्याच वेळात सकीनाचं कण्हणं ऐकलं आणि करीमचाच्याने अल्लाला लाख लाख शुक्रिया अदा केल्या.

मोर्चा त्याच वेळी करीमचाचाच्या झोपडीजवळून चालला होता. करीमचाचा आपल्याच संकटात इतका होता की त्याला मोर्च्यातल्या घोषणांही ऐकू आल्या नाहीत. मोच्यातल्या कुणीतरी सिगारेट पेटविली आणि काडी बाजूला टाकली. ही करीमचाचाच्या झोपड्यांच्या कुडाजवळ पडली. काडीला जाळ नव्हता पण ठिणगी होती. कुडाच्या कोरबाड झालेल्या पात्यांना तेव्हडीही धग पुरेशी झाली. वाऱयाने फुंकर मारायचं काम केलं आणि कुडानेपेट घेतला. क्षणात आग पसरली. आणि तेवढ्यात गंपूशेठचा टांगा झोपडीजवळ पोहचला.

आग, आग धावा धावा करीत सर्वांनी टांग्यातून उड्या घेतल्या. गंपूशेठ करीमचाचाला बाहेर काढण्यासाठी पुढून आत शिरले तर वरची जळती झापं खाली पडली. आणि पुढचा रस्ता बंद झाला. पुढून आग लागलेली म्हणून हसन आणि बायजाक्का मागून गेले. दार बंद म्हणून त्याने लाथा मारून कुडाला भगदाड पाडलं. त्यानं सकीनाला आधार देत उठवलं पण तिच्यात त्राण नव्हता. ती खाली कोसळली आणि थकलेला हनीफ तिच्यावर कोसळला. बाळ हातात घेतलेली बायजाक्का त्यांच्यावर कोसळली. पाठोपाठ जळतं छप्पर त्यांच्यावर कोसळलं. करीमचाचाच्या झोपडीची आता होळी झाली होती.

आग वाऱयाने झोपडपट्टीत पसरली. ताड ताड आवाज करीत मागून झोपडी आगीच्या लपेटात जाऊ लागली. हिंदूची झोपडी मुसलमानाची झोपडी असा भेदभाव ती काही करत नव्हती.

मोर्चात “भारत माता की जय।” नारे होत होते. “हम होंगे कामयाब…” गीत गायले जात होते. मोर्चा जोशात चालला होता.

— आर.के.सावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..