नवीन लेखन...

गिरनार यात्रा (भाग – ३)

सुरवातीला सगळेच अंदाज घेत घेत चढत होते. उगीच नसता उत्साह दाखवून दमायचे नव्हते. मी तर फक्त पुढची पायरी बघायची असे ठरवले होते. किती चढलो, किती राहिल्या ह्याचा हिशोब करायचा नाही असं मनाला बजावून ठेवले होते.

आमच्या बरोबर 75 वर्षांचे अरुताईचे दीर –   काशिनाथ     काका होते. आणि थोड्या लहान वैशाली काकू! त्यांचा उत्साह आणि अतूट विश्वास खरोखर कौतुकास्पद होता. वयाने सगळ्यात लहान मी आणि नरेनच होतो. बाकी सगळे 55 प्लस होते. पण त्यांची दांडगी इच्छा शक्ती, कणखर मन, चिवट शरीर आणि सगळ्यात महत्वाचे दत्तगुरु वरील अतूट श्रध्दा ह्या सगळ्या जमेच्या बाजू त्यांना ते अशक्य आवाहन पेलायला कारणीभूत होत्या.

सुरवातीच्या काही पायऱ्या उंच होत्या. तिथेच आमच्या नाकी नऊ आले. अशा 10000 पायऱ्या की काय?

अरूताई खरोखरीच आमची मोठी ताई..लहानपणापासून आम्हाला तिचा आधार वाटत होता.तोच आधाराचा हात आणि उत्साह वाढवणारे तिचे बोल आमच्या दमलेल्या शरीराला आणि फुललेल्या श्र्वासाला नवी उमेद देत होते. अर्थात नरेनची माझ्यासारखी वाईट अवस्था नव्हती. जिजाजी आणि पांढरे काका,  काशिनाथ काकांबरोबर सतत होते. नरेन मी, अरुताई, वैशाली काकू, आणि अंजुताई (अरुताईची नणंद) व अंजुताईची जाऊ भारती ताई  बरोबर सतत होता.

आम्ही 100 पायऱ्या चढलो. प्रत्येक 100 पायरी नंतर तिथे नंबर घातला आहे, त्यामुळे आत्तशिक 100 च पायऱ्या झाल्या असे मनात आले.पण परत अरुताई आणि नरेनने होतील ग, 100 च्या जागी 10000 असतील काही तासात अस प्रोत्साहन देत आमच्या ग्रुपला उभारी दिली.

तेवढ्यात आमच्या शेजारून नववरी साड्या आणि पांढर धोतर टोपी घातलेले असे बाया बाप्पे मिळून 20 एक जणांचा घोळका सटासट चढून दिसेनासा पण झाला. सगळे 50 प्लस असावेत. आम्ही अवाक!

पण सर्वांनी ठरवलं की कोण कसं चढते ते बघायचं नाही. फक्त आपल्या उदिष्टाकडे लक्ष ठेवायचं. थोडं क्षण दोन क्षण थांबत, घोटभर पाणी पीत, गोळ्या चॉकलेट्स चघळत मनातल्या मनात देवाचे नाव घेत आम्ही मार्ग क्रमण करत राहिलो.

आता पूर्ण डोंगरावर आमच्या शिवाय कोणीही नव्हतं. आजू-बाजूला झाडी, त्यातून येणारे आणि निशब्द शांततेला भेदणारे रातकिड्यांचा किर्र आवाज, पावलाखाली अचानक येवून कर कर करीत मोडणारा पाचोळ्याचा आवाज, ह्यात भर म्हणून मधेच सळ-सळ  किंवा हिस्स् असा अंगावर काटा आणणारे आवाज…!!

नाही म्हटलं तरी आम्ही थोडे घाबरलो. आता पायथ्यापासून बऱ्यापैकी वर आलो होतो आम्ही.

जिजाजी ग्रूप आणि आम्ही ह्यात आता गॅप पडली होती. वरून आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. तरीही सावधगिरी म्हणून एकमेकांना हाळ्या देणे चालू केले. त्या आवाजाने तरी जाग राहील आणि असलाच वन्य प्राण्यांचा धोका तर टळेल ह्या उद्देशाने आम्ही त्या शांततेचा भंग करत राहिलो.

डोंगराच्या एका बाजूने पायऱ्या होत्या. पायऱ्यांवर माफक उजेड होता. वर पौर्णिमेचा चंद्राचं शीतल चांदणं, अशा वातावरणात चढत असताना आम्ही पायऱ्यांवर असणाऱ्या मार्किंग पाशी थबकलो!

 

2250…दोन हजार पायऱ्या चढलो आपण?? कळलंच नाही इथेपर्यंत कसे आलो. खरोखर एक अदृश्य शक्तीच आम्हाला जणू काही नेत होती.

उजव्या बाजूला 2250 चं मार्किंग आणि डाव्या बाजूला थोड्या डोंगरातील गुहेकडे नेणाऱ्या पायऱ्या. हीच ती भ्रतृहरी गुहा..!! इथल्याच पूजाऱ्याला मागच्या आठवड्यात सिंहाने का वाघाने झोपेत ओढून नेले होते. एक सरसरून काटा आला अंगावर. इथे पर्यंत जंगली जनावर येतात? नरेन पुढे गुहेपर्यंत गेला. माझा जीव वर – खाली. तिथे फोटो काढून तो परत येई पर्यंत मी उगाचच मोठ्याने त्याच्याशी बोलत राहिले. काठी आपटत राहिले. तोपर्यंत आमचे इतर लोक तिथे पोहचले.

मग परत चालत राहिलो. कधी दमल्यासरखे वाटले की नंदाताईच वाक्य आठवत राहिले, सावकाश पण निर्धाराने चढ!

मधे 3500 पायऱ्यानंतर एका बाजूला मोठा चौथरा आणि कट्टा दिसला. तिथे एक ब्रेक घेतला आणि आमचा दुसरा ग्रूप येण्याची वाट बघत बसलो. एक 15-20मिनिटे निवांत बसून थोड फ्रेश झालो. चेहऱ्यावर पाणी मारले. एकदम लाईट खाऊ खाल्ला आणि परत आपापल्या काठ्या उचलून चालायला सुरुवात केली.

आता माझा वेग खूपच मंदावला. मी मागे पडायला लागले. नरेन पूर्ण वेळ माझ्याबरोबर होता. माझ्या जोडीने चालत होता. अरुताई सगळ्यात पुढे होती. ती पुढे थांबून आम्हाला म्हणजे मलाच प्रोत्साहन देत राहिली.

साधारण 4000 पायऱ्या झाल्या असतील अचानक अरुताईने नरेनला जोरजोरात हाक मारली. ती बऱ्यापैकी पुढे होती पण आमच्या नजरेत होती.ती चढत असताना तिला बाजूच्या झुडुपात खुसपुस ऐकू आली. ती जोरात किंचाळली आणि नरेन लवकर ये म्हणाली. नरेन दोन-दोन पायऱ्या गाळतच तिथे पोहचला. आम्ही पण जोरजोरात ओरडत मोठ्याने बोलत तिथे पोहचलो. ह्या कोलाहलात जे काही तिथे होत ते लांबवर गेल्याचं जाणवलं. संभाव्य गोष्टी टाळल्या. आता मात्र आम्ही सगळ्यांनीच एकत्र जायचं ठरवलं. कितीही वेळ लागू दे! पण एकत्रच जाऊ अस ठरलं.

जिजाजी, पांढरे काका आणि काशिनाथ काका येईपर्यंत आम्ही रेंगाळलो. आणि पुढे मागेच सावकाश चढत राहिलो. आमच्या 4000 पायऱ्या झाल्या होत्या. आणि जवळपास 3.30 वाजून गेले होते.  4000 पायऱ्यांवर जैन मंदिर आहे.

त्याच्या आधी आम्हाला गोमुख गंगा नावाचे स्थान लागले.आम्ही पहिल्या डोंगराच्या माथ्यावर होतो आता! अजून 2 डोंगर चढून उतरायचे होते.

गोमुखी गंगाची गोष्ट अशी की सौराष्ट्र मध्ये दुष्काळ कॉमन होता. खूप वर्षांपूर्वी अशाच एका दुष्काळात एक गाय त्या स्थानावर मृत्युमुखी पडली. तेंव्हा तिथल्या ऋषींनी नदीची प्रार्थना करून गंगेला आवाहन केलं आणि गंगा तिथे अवतरली आणि गायीच्या मुखातून वाहू लागली. तेंव्हापासून सौराष्ट्रात दुष्काळ पडला तरी हे पाणी कधी आटत नाही. सतत वाहत असते.अशी आख्यायिका आहे.

आम्ही त्या गंगेचे चार थेंब पाणी प्यायले आणि चेहऱ्यावरून फिरवले. त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने तन आणि मन प्रफुल्लित झाले. आम्ही पुढे जैन मंदिरा कडे निघालो.

भव्य संगमरवरी कमान आमच्या समोर होती. आम्ही आत शिरणार तोच समोर 3-4 काळे मोठ्ठे कुत्रे एकमेकांवर आणि आमच्या अंगावर भुंकत होते. ते एवढे चवताळलेल्या वाटत होते की कधीही चाल करून येतील. आम्ही 2 क्षण तिथेच थबकलो.

अचानक मला काय बुद्धी झाली, मी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणायला सुरुवात केली. सगळ्यांनी माझे अनुकरण केले. कशाचा परिणाम माहीत नाही, पण ते कुत्रे गप्प बसले आणि मागे सरकले. आम्ही शांतपणे पुढे जाऊ शकलो.

जैन मंदिर बंद होतं. तसेच पुढे जात राहिलो. आता तर खूपच थकल्यासारखे वाटत होते. अखेर शेवटी पहाटे 5 वाजता 5000 चा पल्ला गाठला. अंबाजी टुंक! (शिखर) हे माता सतीच्या ५१ शक्ती पीठापैकी एक पवित्र पीठ आहे. ते मंदिर बंद होतं. आम्ही परत येताना दर्शन घ्यावं असं ठरलं. पण आता काशिनाथ काकांना फारच त्रास व्हायला लागला होता.

त्यांचं वय आणि गुडघ्याचा ऑपरेशन ह्या इतक्या ऑड गोष्टींमध्ये ते 5000 पायऱ्या चढले हेच खूप विशेष होतं. तिथे बाहेर एका ओसरीवजा जागेवर त्यांना बसवलं. आता काय करायचं हा सगळ्यांना मोठ्ठा प्रश्न पडला. त्यांना नेणंही मुश्किल होतं आणि एकटं सोडणही मुश्किल होतं.

हा विचार करत असतानाच, खालून जंगली रस्त्यातून एक माणूस आला अचानक! तो कोण होता, तिथून कसा काय आला कोण जाणे? पण आम्हाला बघून म्हणाला, ‘तुम्ही सगळे बायका आणि ज्येष्ठ नागरिक आहात. तुम्हाला पुढे जाणं कठीण आहे. पुढे रस्ता खूप खराब आहे.पूर्ण अंधार आहे. दगड धोंडे आहेत. कसं जाणार तुम्ही? जाऊ नका. परत फिरा इथून! काकांना तर अजिबातच नेऊ नका.’

झालं माझं उरलं सूराला अवसान पण गळल. पूर्ण रात्रभर चढून आम्ही फक्त निम्म्या पायऱ्या चढलो होतो. अजून किती वेळ लागेल कोण जाणे?

काशिनाथ काकांनी इथेच थांबावं अस ठरलं होतं. आणि डोली सुरू झाली की ते डोली करून खाली जाणार असे ठरले. पण त्यांना आसपास कोणी नसताना अंधारात एकटं कसं ठेवायचं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्या आगांतुकाने आम्हाला सावध करून तो जसा आला तसा गायब पण झाला.

मी नरेन ला म्हणाले, मी चढू शकेन पुढे असं वाटत नाही.तर मी थांबते काकांच्या सोबत.

मी आणि नरेननी गाडीतच ठरवलं होत जेवढं जमेल तेवढं चढायचं. डोली वगैरे करून जायचं नाही. आणि आईने पण बजावलं होत, नसती रिस्क घ्यायची नाही. त्या क्षणी मी कमजोर पडले होते.नरेन नसता बरोबर तर कदाचित मी खरोखर थांबले असते.

पण नरेन आणि नंतर अरुताई दोघांनी मला अडवल. म्हणाले, इतकं चढू शकलीस ना? पुढे पण होईल, चल तू…!!

मग काशिनाथ काकांजवळ थोडा खाऊ, पाणी आणि बॅटरी दिली आणि त्यांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो.

80 पायऱ्या चढून गेल्यावर बाजूलाच एक चहाची बऱ्यापैकी मोठी टपरी वजा हॉटेल दिसले. त्याचा मालक नुकताच झोपेतून उठत होता. त्याने मस्त गरम गरम चहा केला आम्हाला. जिजाजी आणि नरेन खाली जाऊन काकांना हळू हळू चढवत तिथे पर्यंत घेऊन आले. आता ते त्या हॉटेल मध्ये होते आणि एकटे नव्हते. आम्ही सगळे निर्धास्त झालो.

तस आम्ही पुढे वाटचाल सुरू ठेवली होती कारण ते आरामात येऊन आम्हाला गाठू शकत होते. 5000 पायाऱ्यावर अंबाजी शिखर होते आणि 6000 पायऱ्यांवर गोरक्षनाथ शिखर!!

तिथे गोरक्ष नाथांनी घोर तपश्चर्या केली होती.  त्यांना दत्तगुरुनी प्रसन्न होऊन दर्शन दिले होते. तेंव्हा त्यांनी ‘मला तुमच्या चरण कमालांचे सतत दर्शन होवो’ अशी विनंती केली. तेंव्हापासून गोरक्षनाथचे स्थान वरती आणि त्याच्या थोडे खाली दत्तगुरु चे स्थान आहे. गोरक्षनाथ च्या मंदिरात अखंड धूनी तेवत असते.

5000 ते 6000 पायऱ्यांचा हा प्रवास अतिशय सुंदर आहे. पूर्ण प्रवासातला हा टप्पा खूप सुलभ आहे. असे म्हणतात की, अंबाजी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले की पुढचा सर्वच प्रवास लवकर आणि सुलभ होतो.

त्याचा प्रत्यय लगेच आलाही. एक तर आपण एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर डोंगर, न चढता उतरता जातो. जसं काही दोन डोंगर मधल्या ब्रीजने सांधले गेले आहेत. आधीचा अनुभव बघता ह्या पॅच मधल्या पायऱ्या लांब आणि छोट्या आहेत. सरळ रस्ता आहे. चढण अगदीच कमी. दिवसा उजेडी तर खूप छान दृश्य दिसत असणार. दोन्ही बाजूला खोलगट दरी, झाडी आणि दोन डोंगरांना संधनाऱ्या डोंगरी ब्रीज वरून आपण जात असतो.

साधारण 1000 पायऱ्यांचा पल्ला आम्ही अगदी काही मिनिटात ओलांडला होता. खूप उत्साही वाटत होते आणि आश्चर्य म्हणजे थकवा एकदम पळून गेला होता. काय जादू घडली होती कोण जाणे. आम्ही गोरक्षनाथ मंदिरापाशी पोहचलो. ते बंद होते पण तिथे अखंड पेटती धुनी असते. तिचे भस्म आम्हाला तिथल्या साधू बाबांनी प्रसाद म्हणून दिले. उजव्या हाताला एक निमुळती गुहा होती.त्याला पाप पुण्याची खिडकी म्हणतात. त्यातून तुम्ही एका बाजूने आत जायचे आणि दुसऱ्या बाजूने बाहेर आलात की तुम्ही पुण्यवान! अडकळत तर पापी! मला ही कल्पना जरा खुळचट वाटली. पण बरोबरचे सगळेच माझ्यापेक्षा जास्त अध्यात्म जाणणारे होते. त्यामुळे मी माझे विचार मनातच ठेवले. नरेन त्या गुहेत शिरला. मी त्याला टॉर्च कायम चालू ठेव असे सांगितले.उगीच साप, वटवाघूळ काही असेल तर काय सांगावं!

मी गुहेच्या दुसऱ्या टोकाला जाऊन त्याची वाट पहात थांबले आणि तो आलाच 5 मिनिटात दुसऱ्या टोकाकडून…

तो म्हणाला, काहीच प्रॉब्लेम नाही आत. तू पण येऊ शकतेस. मग मी पण त्या गुहेतून बाहेर आले. ऊगीच पुण्यवान ठरल्याचे मानसिक समाधान….!!

— यशश्री पाटील.

1 Comment on गिरनार यात्रा (भाग – ३)

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..