नवीन लेखन...

महावीर जयंती

भगवान महावीर यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा आणि बंधुभावाची शिकवण दिली. ती शिकवण आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. चिंतनशील विचारवंत म्हणून ते ओळखले जात. राजघराण्यात जन्मलेल्या महावीरांनी ऐहिक सुखाचा कधी मोह केला नाही की आकर्षण ठेवले नाही. भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर होते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व ५९९, म्हणजे आजपासून २६१२ वर्षांपूर्वी बिहारमधील वैशाली येथे झाला.

त्या काळात उत्तर आणि पूर्व भारतात गंगा नदीच्या खोऱ्यात छोटी-छोटी गणराज्ये होती, त्यांना महाजनपद या नावाने ओळखले जाई . त्यातील प्रमुख आठ महाजनपदांचा मिळून एक संघ होता, त्याला वज्जीसंघ असे नाव होते. वज्जी संघामध्ये वृजी, लिच्छवि, ज्ञातृक, उग्र, भोग, इक्ष्वाकू, कौरव, विदेह अशा आठ कुळांचे प्रमुख होते. महावीरांचे आजोबा (आईचे वडील) चेतक हे या वज्जीसंघाचे प्रमुख होते, तर महावीरांचे वडील सिद्धार्थ हे विदेह जनपदाचे प्रमुख होते. चेतक लिच्छवि कुळाचे तर सिद्धार्थ हे ज्ञातृक कुळाचे होते. वज्जी संघाची आणि लिच्छविंची राजधानी वैशाली येथे होती, तर विदेह महाजनपदाची राजधानी मिथिला येथे होती.

वज्जी संघाच्या दक्षिणेस गंगा नदी, उत्तरेस नेपाळचा उत्तर भाग, पश्चिमेस मल्ल आणि कोशल ही महाजनपदे आणि पूर्वेस कोशी व महानंदा या नद्या होत्या. महावीर २८ वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील स्वर्गवासी झाले. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. पुढील १२ वर्षे त्यांनी साधना केली. त्यापुढील ३० वर्षे उत्तर भारताच्या विविध भागात धर्मोपदेश केला. साधनेची १२ वर्षे आणि उपदेशाची ३० वर्षे अशा एकूण ४२ वर्षांच्या काळात भगवान महावीरांनी कोठे-कोठे आपले चातुर्मास केले आणि कोठे कोठे विहार केले याची माहीत विविध प्राचीन जैन आणि बौद्ध ग्रंथामधून आपल्याला मिळते.

गृहत्याग केल्यावर भगवान महावीर वैशालीचे उपनगर असलेल्या कर्मारग्राम या ठिकाणी आले. हे लोहारांचे आणि मोल-मजुरी करणा-यांचे गाव होते. तेथे ते एका लोहाराच्या कर्मशाळेत (कारखान्यात) राहिले. साधनेच्या बारा वर्षात त्यांनी एकाच ठिकाणी रहाणे पसंत केले नाही. ते वेगवेगळ्या प्रदेशात विहार करत राहिले. कधी बंगालच्या आदिवासी भागात, तर कधी मगध प्रदेशात, कधी आजच्या उत्तर प्रदेशात तर कधी वैशालीच्या परिसरात. या काळात ते जंगलात, उद्यानात, यक्ष मंदिरात, चैत्यगृहात, झोपडीत, खेड्यात, शहरात राहिले. साधनेची १२ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना केवलज्ञान झाले. त्यानंतर त्यांनी लोकांना उपदेश करायला सुरवात केली.

पुढील ३० वर्षे त्यांनी उत्तर भारताच्या विविध भागात विहार करून जनतेला उपदेश केला. या संपूर्ण ४२ वर्षांच्या काळात ते फक्त पावसाळ्यात चार महिने एकाच ठिकाणी थांबत. या चार महिन्यांना चातुर्मास म्हंटले जाते. उरलेल्या आठ महिन्यात ते सतत विहार करत असत, कोणत्याही एका ठिकाणी ३ दिवसांपेक्षा जास्त काळ थांबत नसत. त्यांचा संपूर्ण विहार अनवाणी, पायी चालत होत असे. त्यांनी कोणतेही वाहन वापरले नाही. मात्र नदी ओलांडण्याकरता ते नावेत बसल्याचे उल्लेख आहेत.

भगवान महावीरांचे एकुण ४२ चातुर्मास १३ वेगवेगळ्या ठिकाणी झाले. सर्वाधिक ११ चातुर्मास मगधेची तत्कालीन राजधानी राजगृह येथे झाले. मगध सम्राट श्रेणिक बिम्बिसार आणि त्याची राणी चेलना हे दोघेही भगवान महावीरांचे परम अनुयायी होते. राजगृहीच्या खालोखाल आपली जन्मभूमी असणा-या वैशाली येथे भगवान महावीर यांचे ६ चातुर्मास झाले. विदेह जनपदाची राजधानी असणा-या मिथिला येथेही त्यांचे ६ चातुर्मास झाले. ही मिथिलानगरी नेपाळमध्ये असून आता तिला जनकपूर या नावाने ओळखले जाते.

वैशालीजवळील वाणिज्यग्राम येथे महावीरांचे ६ चातुर्मास झाले, तर नालंदा येथे ३, चंपा आणि भद्दियानगर येथे २ चातुर्मास झाले. इतर फारशा प्रसिद्ध नसलेल्या ६ ठिकाणी त्यांचा एक-एक चातुर्मास झाला. असे दिसून येते की महावीरांचे बहुतेक सर्व चातुर्मास मुख्य करून बिहार आणि जवळपासच्या भागात झाले. याउलट त्यांचा विहार मात्र विस्तृत प्रदेशात झाला. साधनेच्या ११व्या वर्षात त्यांनी वाराणसी, श्रावस्ती, कौशांबी या सध्याच्या उत्तर प्रदेशातील नगरींना भेट दिली होती, आणि त्यानंतरही अनेकदा आजच्या उत्तर प्रदेशातील अनेक नगरांमधून विहार केला होता. जैन साहित्यात महावीरांनी विहार केलेल्या सध्याच्या उत्तर प्रदेशातील पुढील नगरांची/ प्रदेशाची नावे येतात: अहिछत्रा, काकंदी, कांपिल्य, कौशल जनपद, हस्तिनापूर, कौशल-पांचाल, साकेत, काशी जनपद, सुरसेन जनपद, शौरीपूर, मथुरा वगैरे. यावरून महावीरांचा विहार आजच्या उत्तर प्रदेशाच्या पश्चिम टोकापासून पूर्वेकडे बंगाल पर्यंत, आणि नेपाळपासून झारखंड पर्यंतच्या विस्तृत प्रदेशात झाला होता असे दिसून येते. या संपूर्ण काळात महावीरांना लाखोंच्या संख्येने अनुयायी मिळाले. त्यांच्या अनुयायांमध्ये वेगवेगळ्या जनपदांचे प्रमुख, वेगवेगळ्या राज्यांचे राजे होते, तसेच अनेक विद्वान ब्राम्हण होते. याशिवाय समाजातील सर्व थरातील लोक भगवान महावीरांचे अनुयायी बनले.

महावीरांच्या प्रसिद्ध अनुयायांमध्ये कुंभार, लोहार, मातंग, चांडाळ अशा विविध समाज घटकातील व्यक्ती होत्या. पावा ही मल्लांच्या दोनपैकी एका महाजनपदाची राजधानी होती. इ.स. पूर्व ५२७ मध्ये भगवान महावीर यांचे पावा या ठिकाणी कार्तिक अमावास्येच्या पहाटे निर्वाण झाले. महावीरांच्या अंत्यसंस्कारास मल्ल, लिच्छवि, काशी, कौशल अशा अनेक महाजनपदांचे राजे आले होते. याप्रसंगी त्यांनी निर्वाणाचा हा दिवस दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवे लावून साजरा करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे दिवाळी या सणाची सुरवात झाली.

४२ वर्षांमध्ये महावीरांनी पायी चालत जे अंतर पार केले ते लाखो किलोमीटर होते. आजही अनेक जैन साधू आपल्या आयुष्यात लाखो किलोमीटर पायी चालत असतात, पण महावीरांच्या काळात हे जरा अवघडच होते, कारण त्या काळात भारतात घनदाट जंगले होती, आणि जंगली प्राण्यांचा मुक्त वावर मोठ्या प्रमाणात होता. निर्जन प्रदेशही मोठ्या प्रमाणावर होते.

संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4181 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..