नवीन लेखन...

क्रांतीकारक लेनिन

लेनिन यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह असे होते. सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशालिस्ट बोल्शेविक पार्टीचे (नंतरच्या सोव्हियेत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. लेनिन कुशाग्र बुद्धिमत्तेचा साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनिय व नेत्रदिपक आहे.

वोल्गा नदी किनाऱ्यावरील सिम्बिर्स्क (नंतरचे उल्यानोवस्क) या गावी २२ एप्रिल १८७० रोजी लेनिनचा जन्म झाला. त्यांचे वडील इल्या निकोलायेविच उल्यानोव्ह हे आधी शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते नंतर ते शाळा तपासनीस झाले, तर आई मारिया अलेक्सांद्रोव्हना या एका सुविद्य घराण्यातील होत्या. लेनिन सहा भावंडातील तिसरे अपत्य होते. उल्यानोव्ह कुटुंब सुसंस्कृत, सुखी कुटुंब म्हणून परिचित होते. इल्या निकोलायेविच यांना खूप मान होता, तत्कालीन उमराव वर्गात त्यांची गणना होत होती. लेनिनच्या बालपणीचा काळ आरमात व उदार वातावरणात गेला. इतर भावंडांप्रमाणेच लेनिनही हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात होते. शिक्षणातील शेवटच्या परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी सुवर्णपदक पटकाविली होते. १८८६ साली वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांचे दिवस पालटले. १८८७ मध्ये त्सार (मराठी झार) तिसरा अलेक्सांद्र याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून लेनिन यांचा मोठा भाऊ अलेक्सांद्र याला फाशीची शिक्षा झाली आणि मोठी बहीण ऍना हिला तुरूंगवासाची शिक्षा झाली. या घटनेचा मोठा आघात लेनिनवर झाला.

शालेय शिक्षणानंतर लेनिन कायदा व अर्थशास्त्र शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दाखल झाले. पण तेथील मुलांनी लेनिनच्या भावाच्या फाशी विरोधात केलेल्या निदर्शनाच्या आरोपामुळे लेनिनसह ४५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून लेनिनकडे पाहण्यात येऊ लागले. त्यामुळे इतर विद्यापीठातही लेनिन यांना प्रवेश नाकारण्यात आला. वयाच्या १८ व्या वर्षी लेनिन आपल्या आई आणि भावंडांसह समारा येथे राहिले.

समारा येथील वास्तव्यात लेनिन यांना पुस्तके मिळवून वाचून काढण्याचा नाद लागला. याच काळात कार्ल मार्क्स यांचे दास कपिताल वाचण्यात आल्याने समाजवादच रशियाच्या समस्यांवर तोडगा असल्याचे त्यांचे मत झाले. कायदा, तत्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, सामाजिक व राजकीय समस्या, मार्क्सवाद अशा विविध विषयांवर चौफेर वाचन आणि प्रभावी भाषणशैली यामुळे लेनिन समाजवादी गटाचे प्रमुख कार्यकर्ता बनले. तर दुसरीकडे लेनिन यांच्या आईच्या प्रयत्नांमुळे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून परीक्षा देण्याची मुभा लेनिन यांना देण्यात आली. चार वर्षांचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करीत लेनिन ही परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे हे लेनिन यांचे ध्येयच बनले. त्यांनी समाजवादाचा प्रसार करण्यास सुरूवात केली. आपल्या समर्थनासाठी समविचारी लोकांच्या शोधात लेनिन काही महिने युरोपमध्ये इतरत्र राहिले. १८९३ पासुन त्यांनी लेख लिखाणास आरंभ केला. हळूहळू त्यांचे लेख जहाल होवू लागले. १८९५ मध्ये लेनिन रशियात परतल्यावर एक वृत्तपत्र काढण्याचे व त्याचे गुप्तपणे वाटप करण्याचे त्यांनी ठरविले. जेमतेम पहिला अंक निघाला आणि गुप्तहेरांनी लेनिन यांना अटक केली. लेनिनवर राजद्रोहाचे आरोप ठेवण्यात आल्याने त्यांना १८९७ साली सायबेरियात तीन वर्षांच्या शिक्षेसाठी पाठविण्यात आले. त्याकाळी सायबेरियाची शिक्षा जुलमाची नव्हती. लेनिन यांनी या काळात भरपूर वाचन, लेखन, अन्य कैद्यांशी चर्चा करण्यात घालविला. १८९८ साली लेनिन यांची जुनी सहकारी नादेझ्दा कृपस्काया हिलाही सायबेरियात शिक्षेसाठी पाठविण्यात आले. लेनिन यांनी नादेझ्दाशी तेथेच विवाह केला.

सायबेरियात असतांनाच लेनिन यांनी रशियातील भांडवलशाहीचा विकास नावाचा ग्रंथ लिहिला. शिक्षा संपल्यानंतर लेनिन यांनी रशिया बाहेर राहण्याचे ठरविले. रशियाच्या बाहेर राहून एखादे वृत्तपत्र काढून त्याचे वाटप गुप्तपणे व प्राभावीपणे व्हावे असे लेनिन यांना वाटत होते. त्याप्रमाणे डिसेंबर १९०० मध्ये सुप्रसिद्ध इस्क्रा (रशियन ठिणगी) नावाचे नियतकालिक लेनिन यांनी सुरू केले. यामुळे समाजवादी गटात लेनिनचे महत्त्व वाढतच गेले. मार्क्सवादाला जोड देत आणि त्यात सुधारणा करत लेनिन यांनी लेनिनवाद वर पुस्तक लिहिले. १९०३ साली रशियन सोशल डेमोक्रटीक पक्षाचे दुसरे अधिवेशन लंडन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात लेनिन आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षातील ज्येष्ठ नेते प्लेखानोव्ह, मार्तोव्ह यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्यामुळे पक्षात फुट पडली.

लेनिन यांना पाठिंबा देणार्याो बहुमतवाले बोल्शेविक तर उरलेले अल्पमतवाले मेन्शेविक म्हणून ओळखले जाऊ लागले. तेव्हा आपला पक्ष कडक शिस्तीने चालवावा असे आदेश लेनिन यांनी आपल्या पाठिराख्यांना दिले. १९०५ साली लेनिन रशियात परतले. त्याच वर्षी त्सारने ऑक्टोबर घोषणा करून जनतेच्या काही मागण्यांना मान्यता दिली. लेनिन सारख्या नेत्यांना रशियात राहणे कठीण जात असल्याने त्यांनी १९०६ साली रशिया पुन्हा सोडले. १९०६ ते एप्रिल १९१७ या काळात लेनिन रशिया बाहेरच राहिले. १९१७ साली समाजवाद्यांनी २४-२५ ऑक्टोबरला क्रांती घडवून आणली, त्या क्रांतीचे मुख्य नेते लेनिन होते. इतिहासात या क्रांतीस ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते. मार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले. क्रांती घडवून आणली, त्सारला संपविले. नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित केली. नव्या सरकारचे कामकाज कसे असावे याची रूपरेषा आखली.

लेनिन यांनी १९१७ आणि १९१८ मध्ये रशियन प्रजासत्ताकाचे अध्यक्षपद, १९१८ ते १९२४ या काळात रशियन सोव्हिएत फेडरेटिव्ह सोश्ॉलिस्ट रिपब्लिकचे अध्यक्षपद आणि १९२२ ते १९२४ या काळात सोव्हिएत युनियनचे अध्यक्षपद भूषविले.

लेनिन यांना पहिल्यांदा मार्च १९२२ मध्ये पक्षाघाताचा झटका आला. यातून सावरत असतांनाच त्यांना डिसेंबर मध्ये दुसरा झटका आला. यामुळे लेनिनचे डाव्या बाजुचे शरीर निकामी झाले. सावरण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच लेनिन यांना पक्षाघाताचा तिसरा झटका आला आणि त्यातच २१ जानेवारी १९२४ या दिवशी लेनिन यांचे निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..