नवीन लेखन...

खेळ मांडियेला

खेळ हा मानवी जीवनाचा एक मूलभूत भाग आहे. खेळाच्या माध्यमातून आपण आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा बोध घेत असतो. टीम वर्क, खेळातील शिस्त, सातत्य, वेळेचं गणित, खिलाडू वृत्ती अशा हजारो गोष्टी म्हणजे आयुष्याच्या कल्पवृक्षावरच्या सोनेरी फांद्या सतत आयुष्य उजळत ठेवणाऱ्या. पण हा कल्पवृक्ष साधण्यासाठी मूळही मातीमध्ये घट्ट रुजलेलं असावं. आपण इथे सगळ्यांचा आवडता खेळ क्रिकेट ह्याबद्दल बोलू या.

आज पाहिलं तर, शैक्षणिक प्रगतीबरोबरच गरज आहे ती खेळाकडे एका सकारात्मक नजरेने पाहायची. आपल्या आसपास अनेक मुलं आणि मुलीदेखील आहेत ज्यांना क्रिकेट ह्या खेळात करिअर घडवायचं आहे. त्यासाठी ते आणि त्यांचे पालक, मुलांच्या लहान वयापासूनच सतत प्रयत्नशील होताना दिसत आहेत. खेळात असलेली आरोग्यसंपदा जर लहान वयापासूनच मुलांना समजली तर कोणतीच मैदानं कधीच ओस पडणार नाहीत. मात्र आपण ज्या मार्गावरून क्रमण करत आहोत तिथल्या आपला गाईड तेवढ्या ताकदीचा असायला हवा.

क्रिकेट हे करिअर म्हणून निवडताना आपण याचाही विचार केला पाहिजे की, देशासाठी खेळताना काही मोजकेच खेळाडू मुख्य टीममध्ये निवडले जातात. मग करोडो लोकसंख्या असलेल्या देशात लाखो मुलं क्रिकेटसाठी धडपडत आहेत त्या सगळ्यांचं पुढे काय? तर हीच मुलं आधी खेळत असल्याकारणाने त्यातील काही उत्तम प्रशिक्षित होऊ शकतात. काही उत्तम पंच, काही उत्तम फिजिओ, काही खेळातला प्रशासकीय भाग सांभाळू शकतात. अशा अनेक शाखा अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत जिथे मुलांना खेळाच्याच क्षेत्रात बरंच काही करता येतं. आणि अशी ह्या क्षेत्राची दालनं आता विस्तीर्ण असल्यामुळे अर्थार्जनाची द्वारं खुली आहेत. त्यामुळे खेळ हा फक्त शालेय व महाविद्यालयीन जीवनाचा एक भाग न राहता, करिअरचा उत्तम पर्याय होऊ शकतो.

खेळाचं क्षेत्र हे एक सतत वाढणारं क्षेत्र आहे. अनेक खाजगी कंपन्यांमुळे अनेक खेळांना प्रोत्साहन मिळत आहे. ह्यातूनच आयपीएल अथवा कबड्डी, बॅडमिंटन, हॉकी लीग सुरू झाल्या आहेत. तेव्हा भविष्यातही अनेक संधी उपलब्ध होतील.

आपल्याला प्रशिक्षक म्हणून करिअर करायचे असेल सर्वप्रथम एक चांगला, यशस्वी प्रशिक्षक कसा असावा ते बघायला हवे.

प्रशिक्षक नक्की असावा तरी कसा?

खेळ मग तो कोणताही असो, त्याचं बीजांकुर आणि परिपक्वता ह्यासाठी खऱ्या अर्थाने हातभार लागतो तो खेळातल्या गुरुचा म्हणजेच प्रशिक्षकाचा, ‘गुरुविण नाही नर नारायण’ ह्याप्रमाणे एक उत्तम प्रशिक्षक एक उत्तम खेळाडू घडवत असतो. प्रशिक्षक हा फक्त खेळापुरताच मर्यादित नको तर, आयुष्य घडवणारा हवा. प्रसिद्ध बास्केटबॉल प्रशिक्षक जॉन वुडन असं म्हणायचे – A good coach can change a game, A Great coachcan change a life.

एका उत्तम प्रशिक्षकाला शिस्त आणि स्वातंत्र्य ह्यातील पुसटशा रेषेचा अंदाज असायला हवा. खेळाडूचं खेळण्याचं तंत्र कसं असावं ह्याबरोबरच त्याची मैदानातील वागणूक, त्याचं इतर खेळाडूंबरोबर नातं, सामन्यानंतर त्याच्यामध्ये तयार होणारी मानसिकता आणि आकाश गाठताना जमिनीवर पाय ठेवल्याची जाणीव ह्या सगळ्याकडे प्रशिक्षकाचं बारकाईने लक्ष असायला हव. ह्यासाठी उत्तम प्रशिक्षक हा स्वतः मैदानावर खेळून अनुभव घेतलेला एक चांगला खेळाडू असायला हवा. कारण आपण स्वतः जोपर्यंत खाचखळग्यांना सामोरे जात नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा रस्ता कठीण आहे की सोप्पा ते कळत नाही. क्रिकेटमध्येदेखील हे खाचखळगे आधीपासूनच प्रशिक्षकाला स्वानुभवाने ज्ञात असतील तर नक्की कुठे थांबायचं, कुठे आपला वेग कमी करायचा हे तो खेळाडूला उत्तमरीत्या समजावू शकेल.

कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात प्रशिक्षकाचा प्रवेश कधी झाला पाहिजे?
कोणत्याही काळात पूर्वतयारी ही महत्त्वाची. त्याप्रमाणे प्रशिक्षक हा सुरुवातीपासूनच आपला पाया मजबूत करणारा असायला हवा. असे एका आयुष्यात, एखाद्या खेळात त्या खेळाडूचे अनेक प्रशिक्षिक असू शकतात आणि त्यांचं प्रत्येकाचं योगदान तितकंच महत्त्वाचं असतं. खेळाडूला एका उत्तम प्रशिक्षकाचा पाठिंबा असेल तर खेळांमध्ये हरणं आणि जिंकणं हे दोनच टप्पे उरत नाहीत तर आयुष्य समृद्ध कसं करावं, त्यासाठी योग्य वेळेला कोणती योग्य पावलं उचलावीत, एक गोष्ट हातातून निसटली म्हणून निराश न होता पुढे प्रवास कसा करावा, मानसिकरीत्या खंबीर कसं राहावं, विजयाने भारून न जाता विजयाचं सातत्य कसं राखावं, संघाला बरोबर घेऊन कसं खेळत राहावं, इतर खेळाडूंच्या खेळतंत्राचं निरीक्षण करून त्यातून काय उत्तम घ्यावं असे अनेक बदल एका उत्तम प्रशिक्षकामुळे आपल्या आयुष्यात घडतात. आपल्यातले चांगले/वाईट सगळे गुण आपल्याला हक्काने सांगणारा आणि त्यावर काम करणारा प्रशिक्षक मिळणं हे आज गरजेचं आहे. म्हणूनच क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर सचिन तेंडुलकरसुद्धा एकटा घडत नाही. त्याला एक उत्तम खेळाडू म्हणून घडवण्यासाठी, अनेक उत्तमोत्तम प्रशिक्षक कारणीभूत असतात. घडवणाऱ्या हजारो हातांशिवाय एखादं शिल्प सुंदर आकार घेत नाही. एखादा सामना जिंकवून दिल्यावर भारंभार कौतुक करणाऱ्या मंडळीमधून एक उत्तम प्रशिक्षक आपल्याला अलगदपणे बाहेर काढतो आणि ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, असं म्हणत पुढची तयारी करायला पुन्हा मैदानात पाठवतो. तो खरा प्रशिक्षक.

क्रिकेट हा तांत्रिक आणि मानसिक ह्या दोन्ही धावपट्ट्यांवर एकाच वेळी खेळला जाणारा खेळ आहे. आपल्याला दोन्हींचा मेळ घालता आला पाहिजे. खेळाडू आणि त्याचा प्रशिक्षक ही एक उत्तम टीम असायला हवी. खेळाच्या क्षेत्रात नावलौकिक कमावणं हे दिसताना नशिबाचा भाग असला तरी तो कठीण परिश्रम, सातत्य, मेहनत ह्याशिवाय साधता येणार नाही. जस्टीन ली लॅगर (माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि प्रशिक्षक) ह्याला जेव्हा एका सामन्यातून वगळण्यात आलं तेव्हा त्याला आपले जुने प्रशिक्षक ग्राहम हाऊस ह्यांचे उद्गार आठवले.

“जिथे येणाऱ्या संधी आणि पूर्वतयारी ह्यांची भेट घडते तिथे नशीब जन्माला येतं. आणि ते नशीब जन्माला घालण्यासाठी आपल्या क्षेत्रात आपण केलेली पूर्वतयारीच आपल्याला मदत करू शकते. तू जितकी जास्त तयारी करत राहशील तितक्या संधी जन्म घेत राहतील आणि नशीब आपलं काम करत राहील.’

एक खेळाडू, एक प्रशिक्षक म्हणून तुमचे विचार प्रगल्भ असतील, त्यादृष्टीने तुम्ही सातत्याने प्रयत्न करत असाल तर खेळही तुमचाच आणि विजयही तुमचाच !

– सर्वेश दामले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..