नवीन लेखन...

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ५

१८) मानसिक असंतुलन (Mental instability): मानसिक असंतुलन अनेक कारणांमुळे बिघडते. शारीरिक व्याधी, परावलंबित्व, आर्थिक विवंचना, अहंकार, एकटेपणा, आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव अशा कित्येक गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडते. तरुण वयात परिवरासाठी आपण घेतलेले कष्ट, त्याग, मुलाबाळांच्या संगोपानासाठी साठी घेतलेले परिश्रम यांची कुणालाच जाणीव नाही अशी काहीशी मनस्थिती या वयात होते. हे सर्व वैयक्तिक स्वभावशी निगडीत आहे. “स्वभावाला औषध नाही” ही म्हण कीती चपखल आहे हे आता आपल्या लक्षात येईल. मेंदूच्या पेशींमध्ये सिरोटोनीन नावाचे एक द्रव्य तयार होत असते. त्याची कमतरता झाल्यामुळे अनेक प्रकारचे मानसिक विकार होतात. तोंडावाटे औषधे घेऊन हे सिरोटोनीन वाढवता येत नाही. त्यासाठी नियमित व्यायाम, पहाटे सूर्यस्नान, योगाभ्यास, प्राणायाम, अभ्यंग, शिरोधारा, ध्यान, त्राटक, वेळच्यावेळी झोप, नाकात कुंकुम घृत टाकणे, उत्तम आणि आपल्याला आवडेल असे संगीत ऐकणे असे उपाय करावे. मानसिक तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी जुने विचार मनातून काढून टाकावेत आणि आपल्या लहान लहान कृत्यांनी अससपासच्या लोकांना आनंदी ठेवता येईल असे आचरण करावे. अॅंटीडिप्रेसंट औषधांचा थोडाबहुत फायदा होतो पण दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आपण स्वतः आणि आपल्या आजूबाजूचे सर्वजण कसे आनंदात राहतील याचा विचार आणि त्यानुसार आचरण करावे. हे सांगणे सोपे आहे पण अमलात आणणे फार कठीण. स्वच्छता सर्वांनाच आवडते. वस्त्र जुने झाल्यावर त्याचा वापर जसा स्वच्छता करण्यासाठी करतात तसा वापर वृद्ध मंडळींनी घरातील स्वच्छतेसाठी केला तर कोणालाही ते आवडेल आणि त्यांना एकटेपणा जाणवणार नाही. आपल्या पूर्वायुष्यात घडलेल्या आनंददायक गोष्टी इरातांना सांगाव्यात, वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपण जास्त बोललेले इतरांना आवडत नसेल तर गप्प राहून त्यांच्या बोलण्याचा आस्वाद घ्यावा.

१९) उपवासाबद्दल थोडक्यात: भारतात बरेचदा धार्मिक कारणांसाठी उपवास करण्याची परंपरा आहे. कारण कोणतेही असो, त्यामागे आपल्या पचनयंत्रणेला थोडी विश्रांती द्यावी हा मूळ उद्देश असतो. धार्मिक श्रद्धेतून उपवास केला तर त्यामागे एक वचनबद्धता असते त्यामुळे लोक ते कटाक्षाने पाळतात आणि उपवास मोडण्याची शक्यता कमी होते. नाहीतर कोणी आग्रह केला किंवा अत्यंत आवडीचा पदार्थ समोर आला तर मोह आवरत नाही आणि उपवासतली नियमितता रहात नाही. शिस्तीच्या दृष्टीकोनातून याकडे पहिले तर धार्मिक बंधन योग्यच म्हणावे लागेल. उपवासाचे अनेक प्रकार आहेत.
• प्रातःउपवास – यात सकळची न्याहारी करत नाही बाकी दोनवेळा जेवण करतात.
• अद्धोपवास – यात दिवसभरात एकवेळ जेवण करतात. बहुतेकजण रात्रीचा आहार वर्ज्य करतात.
• एकाहारोपवास – यात सकाळी पोळी खाल्ली तर संध्याकाळी फक्त भाजी खातात.
• रसोपवास – यात फळांचे किंवा भाज्यांचे रस सेवन करून उपवास करतात. अशा उपवासत दूध किंवा दुधाचे पदार्थही वर्ज्य केले जातात.
• फलोपवास – यात फक्त फलाहार सेवन करतात.
• दुग्धोपवास – यात फक्त दूध आणि दुधाचे पदार्थ सेवन करतात.
• निर्जळी उपवास – यात दिवसभरात पाणी पिणे सुद्धा वर्ज्य असते.
उपवासाचे पदार्थ हा मोठा वादाचा मुद्दा आहे. साबूदाणा हा सर्रासपणे उपवासला चालणारा पदार्थ कोणी शोधून काढला हा एक गूढ प्रश्न आहे. असो, आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून कडक उपवसाने वातदोष वाढण्याची शक्यता असते. वयाच्या वातकाळात असे उपवास करणे योग्य नाही. अद्धोपवास, अर्थात एकवेळ (रात्री) उपवास करणे योग्य आहे. काही लोक दिवसभर काही खात नाहीत मात्र रात्री पोटभर जेवतात. हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. रात्रीच्या जेवणानंतर शरीराच्या हालचाली तुलनेने खूपच मर्यादित असतात त्यामुळे अन्न पचणे कठीण होते. आठवड्यातून एक दिवस रात्रीचे जेवण टाळणे उतारवयात योग्य आहे. उपवासाबद्दल लिहिताना मनात आले की सर्व वयस्कांनी एक दिवस भाषण उपवास केला तर? एकदा दात जिभेला म्हणतो, “मी जर तुला जोरात चावलो, तर तुझे तुकडे होतील.” जीभ दाताला म्हणते, “मी एक जरी चुकीचा शब्द उच्चारला तर एकाच वेळी तुम्ही सर्व ३२ च्या ३२ बाहेर याल. विशिष्ट वयानांतर पुढच्या पिढीला आपले बोलणे आवडेलच असे नाही. म्हणून जरूर वाटल्यास भाषण उपवास करण्याची सवय लावावी. “मौनं सर्वार्थ साधनम्” या सुभाषिताचे स्मरण ठेवावे.

२०) स्नान माहात्म्य (Importance of bath):
उत्तर – शतं विहाय भोक्तव्यं सहस्रं स्नानमाचरेत्।
लक्षं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा हरिं भजेत्।।
अर्थ – शंभर कामे सोडून जेवण वेळेवर करावे. अर्थात कामाच्या व्यापात वेळी अवेळी जेवण करण्याची सवय चुकीची आहे असा अर्थ अभिप्रेत आहे. हजार कामे सोडून वेळेवर स्नान करावे. शरीर स्वच्छ ठेवण्याचे महत्व यात स्पष्ट आहे. लाख कामे सोडून दान करावे. याठिकाणी सत्कर्म अपेक्षित आहे. काऊ चिऊच्या गोष्टीमध्ये मदत मागायला आलेल्या कावळ्याला काहीतरी सांगून चिउताई पावसात भिजत ठेवले असे करू नये एवढाच अर्थ समजावा. शेवटी कोटी कामे सोडून परमेश्वराचे नामस्मरण करावे असा उपदेश या सुभाषितात दिल आहे. आपले अस्तित्व हे परमेश्वराने दिले आहे, म्हणून देवाचे स्मरण सतत असू द्यावे, अहंकार टाळावा असा गर्भितार्थ यात दिसतो. बरेच लोक विचारतात की स्नानासाठी पाणी गरम घ्यावे की थंड? स्नानाच्या बाबतीत आयुर्वेदाचा दृष्टीकोन म्हणजे शरीराचा मानेखालचा भाग धुण्यासाठी बारामहिने गरम पाणीच वापरावे. मानेच्यावर वरती डोके, डोळे असे नाजुक भाग असल्यामुळे कोमट पाण्याचा वापर करणे योग्य आहे. स्नानाची सुरुवात करताना प्रथम डोक्यावर पाणी ओतू नये, हातपाय, पाठ, पोट, कंबर अशी सुरुवात करावी आणि शेवटी चेहरा आणि डोक्याचा भाग सौम्य कोमट पाण्याने धुवावा. प्रथम डोक्यावर पाणी टाकल्यामुळे चक्कर येण्याची शक्यता असते. स्नान झाल्यानंतर (कितीही उकाडा असला तरी) लगेच पंख्याखाली किंवा वातानुकूलित जागी उभे राहू नये.

२१) शरीर संबंध (Sexual activity): आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे स्वास्थ्याचे तीन उपस्तंभ आहेत. स्तंभ म्हणजे पिलर. इमारतीच्या बांधकामात ज्याप्रमाणे पिलर त्याप्रमाणे शरीराच्या जडणघडणीत हे तीन पिलर आहेत. मुळात शरीर संबंध हा केवळ गर्भधारणेचा संकल्प असेल तेव्हाच करावा असे आयुर्वेदाचे सांगणे आहे. मात्र कलियुगात प्रलोभने किंवा निरनिराळ्या विषयांचे मोह निर्माण करणारे प्रकार इतके आहेत की मनुष्याला आपल्या नीतीमत्तेची, कर्तव्यांची आणि सारासार विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे आणि मानसिकता बदलत चालली आहे. या बाबतीत एवढंच सांगता येईल की ‘शक्यतो संयम पाळावा आणि अतिरेक होणार नाही याकडे लक्ष द्यावे’. सात धातूंपैकी शुक्र हा अंतिम आणि अतिशय श्रेष्ठ धातू आहे, त्याचे रक्षण करणे नक्कीच योग्य आहे.

-डॉ. संतोष जळूकर

वैयक्तिक सल्ल्याकरिता फोन +91 7208777773

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..