नवीन लेखन...

कृतज्ञता

कृतज्ञता ही कदाचित एकमेव अशी भावना असेल जिचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव येतोच पण ती अभावानेच व्यक्त होते. एकतर आपण इतरांना गृहीत धरत असतो आणि त्यात काय मोठं? ते त्या व्यक्तीचं कामच आहे. त्यासाठी त्याला पगार मिळतो, मग वेगळं कौतुक /कृतज्ञता यांची गरज काय? किंवा आपण बर्‍याच गोष्टींवर आपला हक्क मानत असतो. अशावेळी या ना त्या कारणाने कृतज्ञता राहूनच जाते.

खरंतर कौतुक ही कृतज्ञतेच्या अलीकडची पायरी! तीही आपण आत्ता आत्ता ओलांडतोय. फार कंजूष असतो आपण कौतुक करतानाही! शेफारून जाईल तो/ती अशानं असा आमच्या लहानपणी श्रेष्ठींचा सर्वसाधारण दृष्टिकोन असायचा. त्या मनोवृत्तीत आजही फारसा फरक पडला असावा असं वाटत नाही. आमच्या संस्थांमध्ये झापायचं सर्वांसमोर आणि पाठीवर थाप मात्र एकांतात असं सूत्र सदैव आढळतं (प्रत्यक्षात खरंतर या उलट असायला हवं.) आपल्याकडे “मान सांगावा जनात” अशा अर्थाची म्हणही आहे. कृतज्ञता म्हणजे बरंच काही आपल्याला मिळतं – जाणता /अजाणता, मागून किंवा न मागता त्याची नोंद आणि पोच!

सहज लक्षात येईल की न मागता मिळालेल्या गोष्टींची यादी लांबलचक आहे आणि ती सतत वाढणारी आहे. मुळात त्याची जाणीवही कधीकधी नसते. “थँक यू गॉड, फॉर एव्हरीथिंग” अशी प्रार्थना असो किंवा शाळेतील “देवा तुझे किती सुंदर आकाश! सुंदर प्रकाश सूर्य देतो!” अशी कविता असो, अजाणत्या वयातील हे व्यक्त होणं निर्हेतुक असतं पण लहानपणापासून कृतज्ञतेचेी धडे देणारेही असतं. सोप्या शब्दात एखाद्याचे आभार मानायचे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची. मात्र जेव्हा आपण आपल्याला मिळालेल्या वरदान किंवा आशीर्वाद यांची यादी करायला लागतो, तेव्हा त्यांची नोंद घेणे जितके आवश्यक असते तितकेच त्यांची न विसरता पोच देणेही अभिप्रेत असते. ती भावना त्या व्यक्ती/संस्थेपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे असते.

पोस्टात जशी रजिस्टरला पोचपावती किंवा कुरियरसाठी पी ओ डी (प्रुफ ऑफ डिलिव्हरी) संकल्पना असते ना तसेच हे! काहीवेळा समोरच्याला ते अभिप्रेत असते आणि आपण चुकलो/विसरलो तर ते बोलून दाखविले जाते – विशेषतः आपल्या पाठीमागे!

कृतज्ञतेबाबत संशोधन अलीकडील महत्वाचे आणि लक्षवेधी संशोधन ठरले आहे कारण त्याचे स्थान इतके दिवस जरा कोपर्‍यात होते. कृतज्ञतेबाबत ती एक भावना, एखाद्याचा स्वभाव, नैतिक मूल्य, सवय, व्यक्तिमत्वाचा भाग किंवा जुळवून घेण्याची प्रवृत्ती असे विविध प्रकारे वर्णन करता येईल. ती बरेचदा सुप्तावस्थेत असणारी गोष्ट असते. माझ्या परिचयातील एका महिलेने तिचा एक अनुभव सांगितला – सांगलीत अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीचे पाणी शहरात पसरले होते. तिचे घर नदीकाठावरील गावभागात! उंबरठ्यापर्यंत नदीचे पाणी आल्यावर तिने काय करावे? चक्क जिच्या पाण्यावर आजवर भरण पोषण झालंय ती कृष्णा नदी कधी नव्हेतर आज माझ्या घरी आली आहे म्हणत तिने नदीची ओटी भरली. आपल्या संस्कृतीत हे असं परंपरेने चालत आलेलं शहाणीव भरलेलं आहे. मला स्वतःला ही कृती आणि त्यामागचा विचार खूप भावून गेला.

दुसरा एक असाच किस्सा – आमच्या घराजवळ नव्याने मंगल कार्यालय सुरु झाले आणि त्यानंतर रात्रंदिवस आवाज/गदारोळ यामुळे आम्ही वैतागून गेलो. वारंवार त्या मालकाला भेटून विनंती केली पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा बिल्डिंगमधील एक महिला म्हणाली – ” अहो, पूर्वी आमचं घर स्मशानभूमीजवळ होतं. रात्रंदिवस प्रेतयात्रा घरावरून जायच्या. मुलं घाबरून जायची. आम्हांलाही प्रसन्न वाटायचं नाही. आता येथे निदान कार्यालयाच्या निमित्ताने मंगल सूर कानी पडतात, त्या जोडप्याच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनेचे साक्षीदार होताना छान वाटतं आणि नकळत शुभेच्छा ओठांवर येतात.”
मला वाटतं – हे जुळवून घेणं आणि सकारात्मकतेचे बोट न सोडणं महत्वाचं असतं! प्राप्त परिस्थितीबद्दल कृतज्ञ राहणं आणि त्यातूनही चांगलं शोधणं हीच कृतज्ञता. अशा प्रसंगातून कृतज्ञतेची अवस्था आणि गुणवत्ता आपण जपली पाहिजे. मग –

१)आयुष्याने काहीतरी हिरावून घेतले असं कधीच वाटणार नाही.
उलट
२)इतरांचा आपल्या जडण घडणीतील वाटा आपणांस सहज मान्य होईल.
३)साध्या -साध्या प्रसंगातून आनंद शोधायची सवय लागेल. (जे बहुतांशी काहीही खर्च न करता सहजी उपलब्ध असतात.)
४)कृतज्ञ भावनेने किती उन्नयन होतं याचा स्वतःला अदमास लागेल.

थोडक्यात जगाकडे, आसपास घडणार्‍या घटनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलून जाईल. आयुष्यातील चांगलं शोधणं आणि त्याबाबतीतलं सदैव जागरूक असणं अधिक महत्वाचं! म्हणजे कृतज्ञता परस्पर संबंधांपलीकडे जाते आणि जीवनाचा सर्वंकष परीघ कवेत घेते. आयुष्याचा, विचारांचा, कृतींचा प्रवाहच बदलून टाकण्याची क्षमता कृतज्ञतेत असते, अशी मान्यता आता वाढीला लागली आहे आणि कृतज्ञता हा मानवी व्यक्तिमत्वाचा महत्वपूर्ण आणि अत्यावश्यक हिस्सा आहे असा विचारप्रवाह आता रुजला आहे.

ती मोजता येते का किंवा या भावनेचं मूल्यमापन (संख्यात्मक आणि गुणात्मक) कसे करता येईल यावर आता संशोधन सुरु आहे. कृतज्ञता या संकल्पनेचे काही घटक असे असू शकतात- १)सकारात्मकतेचे व्यक्तिगत अनुभव आणि त्यांची तीव्रता २)इतरांचे कौतुक (छोट्या मोठ्या कर्तृत्वाबद्दल/कामगिरीबद्दल) ३)प्रत्येकाकडे काय चांगले आहे, त्या व्यक्तीचे बलस्थान कोणते यांवर भर ४)चांगल्याचे दर्शन (व्यक्तीत/भवतालामध्ये) झाल्यावर होणारी पहिली प्रतिक्रिया ५)कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पद्धती (शाब्दीक, लेखी, त्वरित किंवा योग्य वेळी) ६)सामाजिक परिप्रेक्ष्य. याठिकाणी चार गोष्टींवर अधिक विचार करणे आवश्यक असते – १)कृतज्ञता आणि इतर व्यक्तिगत गुण यांच्यातील नाते २)स्वास्थ्याचे वेगवेगळे निकष ३)कृतज्ञतेचे सामाजिक संदर्भ आणि त्याचे संभाव्य परिणाम ४)मनोवस्था.

कृतज्ञ असणे खालील लक्षणांवर (शारीरिक आणि मानसिक) प्रभाव टाकते आणि त्यावर मात करण्यास मदत करते – नैराश्य, चिंता, भीती, व्यसनाधीनता, मादक पदार्थांची पकड, वखवखीची प्रवृत्ती! कृतज्ञतेचं दुसरं अंग म्हणजे भावनिक समतोल! कृतज्ञ माणसं आयुष्यात संतुष्ट असतात, त्यांचे आयुष्य अधिक अर्थपूर्ण असते आणि ते जीवन पूर्णांशाने जगतात. कृतज्ञता आणि दान करण्याची सवय तसेच कृतज्ञता आणि दयाळू वृत्ती यांच्यातही घनिष्ठ नाते असते. कृतज्ञ व्यक्तीचा देण्याकडे अधिक कल असतो. अर्थात कृतज्ञता नात्यांच्या गुणवत्तेवरही भाष्य करते. रोजचे उदाहरण म्हणजे गुरु-शिष्य नाते! शिष्यांची(विद्यार्थ्यांची) काही शिक्षकांबद्दलची कृतज्ञता शब्दातीत असते आणि गुरु त्यांच्या साठी परमेश्वर असतो. विद्यार्थ्यांचे जीवन बदलून टाकण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असते, त्यालाच आपण “घडविणे” असे सामान्यतः म्हणतो. त्यासाठी मात्र मोजमाप नाही.

कृतज्ञतेमधील एक कप्पा क्षमाशीलतेचाही असतो. कृतज्ञता आणि क्षमाशीलता एकत्र आले की नाते अधिक घट्ट आणि दीर्घायुषी बनते. त्यामुळे परस्परांमधील विचारभिन्नता कमी होते, विना अट स्वीकाराला सुरुवात होते. हे सगळं शेवटी सकारात्मकतेत येऊन थांबतं. कृतज्ञतेचा प्रभाव ताण -तणाव कमी करणे (कारण भांडणाची कारणे कमी होणे), झोपेची गुणवत्ता सुधारणे (झोपेवरील हुकूमत आणि विचारांचे चयापचय), आयुष्याचे स्थितिस्थापकत्व (लवचिकपणामधून)स्थिर करणे अशांमध्ये परिणामकारक ठरला आहे. त्यामुळे नित्य समतोलत्व जपायला मदत होते.

कृतज्ञ माणसे ऐहिक गोष्टींबाबत फारशी आग्रही नसतात, त्यांच्यात आस्थेचे (समानुभूती) प्रमाण अधिक असते, अशी मंडळी आध्यात्मिकतेकडे अधिक झुकलेली पाहावयास मिळतात. त्यामुळेच की काय, अनोळखी व्यक्तींनाही मदत करण्यासाठी त्यांचा हात पुढे येतो. कृतज्ञ व्यक्तींवर आघातांचा कमी परिणाम होतो आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यांवर मात करण्याइतपत ते खंबीर असतात. इतरांनी केलेल्या उपकारांची /मदतीची त्यांना जाण असते आणि योग्यवेळी ते त्यांची परतफेड करतात. आनंद, सुख आणि कृतज्ञता हे भाव अंतर्गत साखळीने जोडलेले असतात. सकारात्मकता हे त्याचे वर्तनातील दृश्य स्वरूप! जीवनातील तृप्ती आणि आशावाद हे कृतज्ञतेचे महत्वाचे निर्देशक. त्यामुळे कृतज्ञ व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो. सुरुवातीला आपण पाहिलं तसं कौतुकामुळे हुरूप येतो ,चांगले कार्य पुन्हा करण्याकडे कल वाढतो. सकारात्मक भावना आभार आणि कृतज्ञतेकडे झुकतात. कृतज्ञता हा प्रेमाचाच आविष्कार मानला जातो. याचे मूळ कारण म्हणजे प्रेमाचा पाया विश्वास असतो.

एका संशोधनानुसार मानवी व्यक्तिमत्वाचे पाच घटक प्रामुख्याने त्या व्यक्तीच्या जडणघडणीस कारणीभूत असतात- बहिर्मुखता, समजूतदारपणा, मनमोकळा स्वभाव, सदसदविवेक बुद्धी (आतला आवाज) आणि हळुवारपणा! २००९ साली या पाच घटकांचा कृतज्ञतेवर काय परिणाम होतो याबाबत संशोधन प्रसिद्ध झाले. त्यात असे मान्य करण्यात आले की मानसिक आरोग्य (आयुष्याचे ध्येय, स्वस्वीकार, घट्ट नाती आणि व्यक्तिगत वाढ) कृतज्ञता आणि वरील पाच घटक एकमेकांवर सकारात्मक परिणाम करतात. आयुष्याबद्दल तक्रारी अनेकजण सदा सर्वदा करीत असतात – हवं ते मिळालं नाही म्हणून, जे मिळालं ते उशिरा मिळालं, इतरेजन कसे अधिक भाग्यवान आहेत वगैरे वगैरे! तक्रारींची ही यादी कितीही वाढविता येईल.

प्रश्न असा आहे कृतज्ञ व्यक्ती अशा बाबींकडे कसं बघतात? त्यांचा दृष्टीकोन कसा असतो? तक्रारी करणार्‍यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसे असते? अभ्यास असा सांगतो की कृतज्ञ व्यक्ती अशा तक्रारखोरांना अडचणीच्या काळी मदत करतात ,भावनिक आधार देतात. या दोन्ही गटातील (कृतज्ञ आणि तक्रारखोर) मंडळींनी दैनंदिनी लिहून, जीवनाचे आभार मानले आणि किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यात सामंजस्य आणि जीवनाची जाण निश्चित वाढीला लागते. अर्थात तुम्ही जीवनानुभवांचे आकलन कसे करता यावरही सारे अवलंबून असते.

खालील पाच उदाहरणांवरून हे मांडता येते – १)कृतज्ञतेमुळे निद्रानाशाचा त्रास कमी होतो. झोपेची वेळ वाढविता येते आणि विनासायास झोप येते. २)शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. अगदी अलीकडचे (२०१८ सालचे) संशोधन म्हणते की कॅन्सर, एचआयव्ही ग्रस्त रुग्णांचा उपचाराला प्रतिसाद सुधारतो आणि रोगमुक्तता होण्यास कृतज्ञतेमुळे कमी वेळ लागतो. स्वयंप्रतिकार शक्ती वाढते आणि वेदनांची तीव्रता कमी होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मानसिक समस्या कमी उद्भवतात.
३) प्रत्यक्ष पुरावा नाही पण कृतज्ञतेमुळे मनुष्य दीर्घायुषी होतो असं मानायला जागा आहे. कारण शेवटी कृतज्ञता सकारात्मक विचार आणि आशावादाशी निगडित असते.
४)कृतज्ञतेमुळे ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते. चैतन्य आणि जोम यांच्यात वृद्धी झाल्याने शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते.
५)शारीरिक व्यायाम आणि हालचाली यांना कृतज्ञता साथ देते.

कार्यस्थळावरील कृतज्ञतेचे महत्व – या विषयावर संशोधन आणि साहित्यही फारसे उपलब्ध नाही. पण संस्थेच्या कार्यप्रणालींमध्ये, सामाजिक उत्तरदायित्वांमध्ये कृतज्ञता हा घटक समाविष्ट असतो. उदाहरणार्थ सध्याच्या कोरोना आपत्तीत संस्था विविध प्रकारे (आर्थिक आणि इतर माध्यमांमधून -उदा. रक्तदान शिबिरे) यथाशक्ती आपले उत्तरदायित्व निभावताना दिसताहेत. किंबहुना जेव्हा जेव्हा आपत्ती (मानव निर्मित – बॉम्बस्फोट किंवा नैसर्गिक – भूकंप, महापूर) येतात तेव्हा तेव्हा कृतज्ञतेचे दर्शन होते. त्यामुळेच खूप संस्थांच्या मूल्य यादीत कृतज्ञता हे मूल्य आढळते. मात्र याचा अर्थ देणगी अथवा पक्षपात (झुकते माप) एवढ्यापुरता सीमित नसतो. तर ती अंशतः परतफेड असते. संस्थेतील कृतज्ञतेचे मोजमाप करण्यासाठी एक चाचणी तयार करण्यात आली आहे. कृतज्ञता ,आकस (चीड )आणि कौतुक याबाबत ही चाचणी २००३ साली विकसित करण्यात आली. त्यामध्ये ४४ विधानांना मान्य /अमान्य असा प्रतिसाद अपेक्षित आहे. उदाहरणादाखल काही विधाने – १) आयुष्य आनंदित करण्यासाठी मला ज्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत तशा त्या राम /मिलिंद/वैभव लाही उपलब्ध आहेत. २) सूर्यास्त किती देखणा असतो नाही? दरवेळी मी अगदी स्तिमित होतो. ३) मी अनेक बाबतींमध्ये इतरांपेक्षा उजवा असलो तरी मला आजवर माझ्या लायकीप्रमाणे काहीही मिळालेलं नाही. मात्र विधानांना प्रतिसाद देत असताना या तिन्ही भावनांची तीव्रता, वारंवारिता आणि कालावधी विचारात घेणे गरजेचे आहे.

संख्याशास्त्रानुसार – १) कृतज्ञता ही आयुष्यातील पहिल्या पाच महत्वाच्या घटकांमध्ये येते. २)आभार मानायची सवय आणि दैनंदिनी लिहिण्याची सवय आयुष्य बदलून टाकते. ३)झोपेत ८ टक्क्‌यांपर्यंत वाढ, हालचालींमध्ये(सक्षमतेमध्ये) १९ टक्क्‌यांपर्यंत वाढ, शारीरिक वेदनांमध्ये १० टक्क्‌यांपर्यंत घट शक्य होते. ४)नैराश्याच्या लक्षणांमध्ये ३० टक्क्‌यांहून अधिक घट ५)रक्तदाबावर नियंत्रण (विशेषतः सिस्टॉलीक) हे फायदे वाचून तुमचे मत निश्चित बदलेल. आणि तुम्ही पुनर्विचार करण्यास सुरुवात कराल.

सरतेशेवटी विनासायास मिळालेल्या शरीराबद्दल योग तज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांनी १९८८ साली विद्यापीठाच्या एका शिबिरात मानवी शरीराचे अमर्याद मूल्य याबाबत दिलेली माहिती खाली देत आहे- १)आपले डोळे दिवसातून कोणत्याही आकाराचे दोन लाखांहून अधिक रंगीत फोटो काढीत असतात. स्टुडियोत एका प्रतीसाठी किती रुपये द्यावे लागतात? २)आपल्या मुठीएवढा हृदय पम्प चोवीस तास अव्याहत जीवनभर चालत असतो. बाजारातील पंपाचे मूल्य आणि त्याचे आयुष्य किती असते? ३)एक अष्टमांश किडनीवर आपण आरामात आयुष्य काढू शकतो, पण आपल्याजवळ दोन किडनी असतात. (आणि म्हणूनच आवश्यकता भासल्यास त्यातील एक आपण दान करू शकतो.) असे अमूल्य जीवन मोफत मिळाल्याबद्दल आपण किती कृतज्ञ असायला हवे, नाही कां? आणि वेळोवेळी आभाराची पोचही द्यायला हवी. लाभलेल्या प्रत्येक टेकूची जाण आणि त्याबद्दल हात जोडून आभार मानणे एवढे हे सोपे आहे.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..