नवीन लेखन...

सुगीचे दिवस

नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.

आता भाताच्या अनेक जाती उपलब्ध आहेत.अनेक संकरित जाती विकसित झाल्या आहेत.या जातीचे पीक भरपुर येते.प्रत्येक तांदळाची एक वेगळीच चव चाखायला मिळते.परंतु अस्सल गावरान तांदूळाचा भात खाण्यात जी मजा आहे ती मात्र कशातच नाही.

पुर्वी भाताचे अनेक देशी वाण होते.खडक्या,कोळंब,तामकुडा,तांबडा रायभोग,कमवत्या,जीर, इंद्रायणी असे ते वाण होते.पीक कमी परंतू चव मात्र अप्रतिम.भात जर शिजत असेल तर त्याचा दरवळ बाहेर अंगणभर येत असे.परंतू आता संकरित वाण आल्याने गावठी वाण कमी झाले आहेत.

भात कापणीचा हंगाम सुरू व्हायच्या आधी लोक आपापल्या विळ्यांना लोहराकडुन धार लावून घेत.आमच्या शेजारीच चीमण लोहराचा भाता असे.सकाळी सात वाजल्या पासुन पंचक्रोशीतील लोकांची विळ्यांना धार लावण्यासाठी मोठी गर्दी व्हायची.संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम चालू असायचे.

गावातील वयोवृद्ध लोक भाताचे भारे बांधण्यासाठी भाताच्या पेंढ्यांचेच आळे (दो-या) वळायचे.शिवाय भात साठवण्याच्या कणगी खाली बुडाला आधार म्हणुन पेंढ्याचीच गोल चुंबळ विणायचे.काही लोक नविन कणगी तयार करायचे तर स्रीया जुन्या रिकाम्या कणगी शेणाने सारवुन वाळवुन ठेवायच्या.ही सर्व तयारी आधीच करावी लागे.

भात कापणीची जय्यत तयारी सुरू व्हायची.अगदी सकाळीच भात खाचरात जाऊन भाताचे पीक कापायला सुरूवात करायची.सुरूवातीला भात कापायला मजा वाटायची.नंतर मात्र डोक्यावरचे ऊन व सारखे वाकल्यामुळे कंटाळा यायचा.परंतू पाथ मागे राहता कामा नये या जाणीवेतुन भात कापायलाच लागले.आमच्याकडे भात कापणीला *येटाळणी* म्हणतात.

अंधार पडे पर्यत भात कापायचे.नंतर घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करायची.दिवसमर भात कापल्यामुळे अंग अंबून जायचे.अंघोळ करताना अंगावर गरम पाणी घेतल्यावर स्वर्गीय आनंद व्हायचा.

जेवण झाल्यावर मात्र लगेच अंथरूणावर पडायचे.लगेचच झोप लागायची.दुसऱ्या दिवशी मात्र उठुशीच वाटायचे नाही.सर्व अंग ठसठस करायचे.या कुशीवरून त्या कुशीवर होता येत नसायचे.परंतू नाईलाजाने उठावेच लागे.

पुन्हा सर्व आवरून पुन्हा शेतात भात कापायला जायचे.भात कापायला खाली वाकता येत नसे.इतके अंग दुखायचे.परंतू बळेच खाली वाकुन भात कापायला लागायचे.

भात कापताना अनेक विषयावर गप्पा मारत भात कापायचे.विळ्याने कुणाची बोटे कापायची.तरोट्याचा किंवा टणटणीचा पाला वाटुन त्याचा रस बोटावर पिळायचा.काथाडीने बोट बांधायचे.मग पुन्हा काम सुरू करायचे.खाचरात पाणी असेल तर मात्र खाचरात आळाशा करता येत नाहीत.सर्व भात खाचराबाहेर काढताना खुप त्रास व्हायचा.

दुसऱ्या दिवशी अंग बसल्यामुळे कालच्या इतके अंग दुखायचे नाही..

भाताची येटाळणी केल्यावर दुपारी मस्तपैकी नदीत किंवा ओढ्याच्या पाण्यात मनसोक्त पोहायचे.मासे पकडायचे.

पुर्वी ठराविक ठिकाणीच खळी असायची.एका खळ्यावर चार- पाच लोकांची भात झोडणी चालायची.एका एका खळ्यावर महिनाभर काम चालायचे.भात झोडणी झाल्यावर नाचणी. नाचणी सावा किंवा वरई,खुरासणी,हुलगा इत्यादी.धान्य असायची.परंतू आता मात्र भात सोडले तर सर्वच जवळजवळ बंद झाले आहे.

खळे तयार करताना सुद्धा मजा यायची.पहिल्या दिवशी खळ्यावर जाऊन पाच फावडी मारायची.नंतर दुसऱ्या दिवशी खळ्यावरचे सर्व गवत फावड्याने काढायचे.खड्डे भरून घ्यायचे.खळ्याच्या मध्यभागी तिवडा रोवायचा.खळ्यात पाणी मारायचे.नंतर शेण, पाण्यात कालवुन खळ्यात पसरायचे.निरगुडीच्या डहाळ्यांनी सारवायचे.झाले खळे तयार..याला शेणकाला म्हणतात.दुस-या दिवशीही अशाच पद्धतीने शेणकाला करायचा.

कापलेल्या भाताच्या आळाशा जमा करून भारे बांधायचे.हे भारे खळ्यावर घेऊन यायचे.खळ्याच्या एका बाजुला भारे उतरायचे.खळ्यात तिवड्याला लाकडी घडवंची बांधायची.

गावातील पाच दहा जण एकत्र येऊन कधी दिवसा तर कधी रात्री भात झोडतात.पुर्वी दिवसाच भात झोडायची कामे व्हायची.परंतू आता खळी राहीलेली नाहीत.खाचरातच ताडपत्री अंथरून त्यावर भात झोडतात.पुर्वी खळ्यात लोक चप्पल घालत नसत.परंतू ताडपत्रीने पाय भाजत असल्यामुळे चप्पल घालूनच भात झोडायला लागते.परंतू खळ्याची मजा ताडपत्रीला नाही.

खळ्यात धान्य असल्यामुळे रात्री खळ्यात मुक्काम करावा लागे.बरोबर दोघे तीघे मित्र किंवा जेष्ठ माणसे असत.संध्याकाळी खळ्यात झोपल्यावर गार वारा व वर आकाशाचे छत,त्यामध्ये चांदण्या,उगवता किंवा अस्ताला गेलेला चंद्र पहायला मजा वाटे.आकाशात ध्रूव तारा,तिकांड,बाज,ती चोरून नेऊ पहाणारे चोर,असे चांदण्यांचे प्रकार पहाताना व त्याबद्दल जेष्ठांकडुन माहीती ऐकायला मोठे कुतुहल वाटे.

सकाळी भात झोडायला पाच- सात गडी असत.प्रत्येकाकडे रस्सी असे.रस्सीच्या सहाय्याने भात झोडायला सुरूवात करत.पहिले दोन ठोके भाताच्या राशीवर मारून उरलेले ठोके लाकडी घडवंचीवर मारत.एकच खणाखणी होई.भाताचे भारे पटापट कमी होत.

खळ्यात भात झोडल्यावर बराच कचरा होई.याला *गळंदा* म्हणतात.हा गळंदा गोळा कराण्याचे काम एखादा वयस्कर माणुस करत असे.

दुपार पर्यंत भात झोडुन झालेले असे.खळ्यात भाताची रास तयार असे.चांगले पीक आल्यावर भाताची भलीमोठी रास तयार होई.शेतक-याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असे.घराकडुन गुळाभाताचा नैवेद्य आणुन धान्याच्या राशीला व शेताला दाखवायचा.भाताच्या राशीत सकाळी ठेवलेला नारळ फोडायचा.नंतर गुळाभाताचा नैवेद्य व नारळाच्या खोब-याचा तुकडा पानावर खायचा..हे खाताना खुप मजा यायची.

दुपार नंतर सुपाच्या पाठीमागे कोरड्या राखेने गुणाकाराच्या रेघा मारायच्या.व भात उपनायाला सुरूवात करायची.हे काम तज्ञ माणुस करायचा.वारा नसल्यावर वारा यायची वाट पहायला लागायची..त्या दुरदृष्टीनेच जेथे वारा असतो अशा ठिकाणी खळी तयार केलेली असत.

भात उपणुन झाल्यावर पोत्यात भरले जायचे.तो पर्यंत आंधार झालेला असे.या भातांची बाचकी घरी घेऊन आंधारातुन जाताना नाकीनऊ येत.

काही शेतकऱ्यांच्या खळ्यात भाताच्या राशीला कोंबडा कापायची प्रथा आसायची.संध्याकाळी खळ्यावर कोंबड्याचा पातळ रस्सा व भात खायला मोठी मजा यायची.भरपुर भात व तितकाच गरम रस्साअसायचा.काही जण खाऊन झाल्यावर नुसताच गरम रस्सा पीत असत.

भाताची झोडणी झाल्यावर ओल असलेले शेत नांगरून हरभरा,मसुर किंवा गहू पेरत.चांगले पीक येई.या पीकाचे रान डुकरांपासुन संरक्षण करण्यासाठी लोक शेतात मांडव करत.त्या मांडवावर रात्री झोपायचे.काहीजण जमीणीवर त्रिकोणी खोपटे करून त्यामध्ये झोपत.मांडवाच्यावार झोपायला मजा येई.आजुबाजुंच्या शेतकऱ्यांच्या आरोळ्यांनी शिवार दुमदुमुन जात असे.मांडवावर मेंढी कोट खेळत.नंतर पत्र्याचा डबा वाजवायचा..किंवा दिवाळीतले शिल्लक रोज एक दोन फटाके वाजवायचे..मोठीच गम्मत असे.

हारभरा भरल्यावर एखादा शेतकरी शेतात हुळा खायला येण्याचे *आवातन* देई.आम्ही चारपाच जण शेतात जात असू.खळ्यात काटक्या व गवत पेटवून त्यावर मस्त घाट्यांनी भरलेला हरभरा भाजला जात असे.हरभरा भाजुन झाल्यावर आग विझवुन तेथेच बसून गप्पा गोष्टी करत हरभ-याचा हुळा आम्ही फस्त करत.कधीकधी हभभरा समजुन एखादा गरम खडा तोंडात जाई.जीभ भाजे.परंतू चार पाच मित्रांबरोबर हरभ-याचा/वाटाण्याचा किंवा गव्हाचा हुळा खाताना मोठी मौज वाटत असे.हुळा खाऊन झाल्यावर एव्हाना आंधार पडू लागलेला असे.

असे ते भारलेले दिवस होते.हे दिवस मी पाहिले व अनुभवलेही. हे मोठेच भाग्य म्हणावे लागेल.

लेखक – श्री.रामदास तळपे

Avatar
About रामदास किसन तळपे 5 Articles
ग्रामीण संस्कृती
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..