नवीन लेखन...

पार्क आणि हिरवळ

हल्ली मी सकाळी न चुकता पार्क मधे फिरायला जातोच…!!
म्हणजे पूर्वीही जायचो.पण त्यात सातत्य नव्हतं..आता आहे.
आता असं काय वेगळं घडलंय असे तुम्ही विचाराल ना?
(विचारा हो..!! तसंही मी सांगणारच आहे तुम्हाला..)

झालंय काय की पार्क मधे दोन नवीन ‘चेहरे’ येउ लागलेत. त्यामुळे माॕर्नींग वाॕक मधे अचानक माझा इंटरेस्ट वाढलाय.

म्हणजे कसंय पहा..वयाच्या चाळीशीत आल्यावर आम्हा पुरुषांना कसं आता आपल्या वयाला व तब्येतीला मानवतील अशाच चेह-यांकडे पहावेसे वाटणे हे स्वाभाविकपणेच होते. हे नवीन चेहरेही ‘तसेच’ आहेत.

आता या वयात टीन एजर्स कडे पहाणेही होत नाही व मनाला पटतही नाही. तसे चांगले चेहरे त्या वयोगटातही असतात..पण शेवटी ‘नाथा कामताच्या’ शब्दात बोलायचं तर “बाबा रे..’त्यांचं’ जग वेगळं..’आपलं’ जग वेगळं..”

त्यामुळे रोज दिसणा-या हिरवळीची आपोआप सेग्रेगेशन मनातच होते व ‘पस्तीस आणि पुढे’ या सेफ वयोगटात मोडणारी हिरवळ कोणती हे नकळत नक्की होते व मग आपल्याला ‘फोकस्ड’ रहायला मदत होते.

त्यासाठी तुम्हाला एक करावं लागतं..हिरवळीची पार्क मधे चालण्याची जी जनरल डायरेक्शन असते त्याच्या उलट्या दिशेने चालणे तुम्हाला अर्थातच क्रमप्राप्त असते..म्हणजे अॕन्टी क्लाॕक वाइज..तेही अगदी सराईत पणे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एका राउंड मधे ही ‘हिरवळ’ तुम्हाला दोनदा क्राॕस करते. यापेक्षा जास्त (नेत्र) सुख तसेही आम्हा पामरांना आणखी कशाला हवं असतं..नाही का हो? (ये हरीयाली और ये रास्ता..!)

हां..तर विषय दोन नवीन चेह-यांचा होता. तशी पार्क मधे एरवीही खूपशी ‘हिरवळ’ असतेच हो..!! म्हणजे ‘नेत्र सुख’ की वैसे कमी नही है.. पण या दोघी येउ लागल्या पासून एक वेगळी ‘रौनक’ आलीय पार्क मधल्या सकाळच्या वाॕकला एवढं नक्की.

त्या दोघी साधारण एकाच वयाच्या आहेत..नुकतीची पस्तीशी क्राॕस केली असावी..कारण चेह-यावर तारुण्याचं व अनुभवाचं तेज समसमान दिसतं. माझ्यासारखी ‘जोहरी की नजर’ तेवीस चोवीस कॕरेट च्या फरकात ‘हिरवळीचे वय’ ओळखू शकतो. त्याबाबतीत आपला अभ्यास दांडगा आहे. (नाही नाही.. डाॕक्टरेट वगैरे नाहीय..पण आहे अभ्यास..लेखक माणसाला करावा लागतो)

तुम्हाला म्हणून सांगतो या विषयातल्या अभ्यासासाठी तुमच्याकडे काही ‘स्किलसेट’ आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे ‘हिरवळीला’ कधीही लक्षात येईल इतपत निरखू नये. प्रत्येक राउंडला थोडेसे ओझरते पहावे..हिरवळ जवळ आली की आपण त्या गावचेच नाही हे दाखवावे लागते. सोपे नाही हो ते..त्यासाठी मुरलेले डोळेच हवेत.

दुसरे स्किल म्हणजे तुमचा चेहरा निष्पाप हवा.. तुम्ही स्वतः निष्पाप असलेच पाहिजे असे नाही..(आणि ते कोणीच नसत हो..!! सो डोंट वरी..) समोरुन येणारी हिरवळ तुमच्याही पेक्षा जास्त सराइत आहे हे नेहमी लक्षात ठेवावे. त्यामुळे चेहरा जितका इनोसंट तेवढं तुमचं इंप्रेशन चांगले असतं. “नजर भरके देख लिया और उनको पता भी न चला” या प्रकारात शक्यतो सारे मोडावे.

तिसरी गौष्ट..चेह-या बरोबर तुमची बाॕडी लँग्वेज ही परफेक्ट हवी. तुम्ही वाॕक करताना हिरवळी शेजारुन पास होताना हात उगीच गोल फिरवणे, वर खाली करणे किंवा खांद्याचे व्यायाम करणे असे प्रकार टाळावेत. काही लोक फिरताना टाळ्या वाजवत असतात. हिरवळीसाठी हे सर्वच ‘लक्षवेधी’ या प्रकारात मोडतात जे त्यांना थोडे ‘लाउड’ वाटू शकतात व तुमचे इंप्रेशन डाउन करतात. शिवाय तुमच्या घामाचा ‘घमघमाट’ त्यांच्या नाकापर्यंत चुकून पोचला तर तुम्ही ‘ढीसच’. त्यामुळे तुम्ही घामाळू असाल तर ‘सुरक्षित अंतर ठेवा’ हा मंत्रा तुमच्यासाठी.

आता हे ‘डूज आणि डोन्ट्स’ मधले ‘डोन्टस’ झाले.
तर काही ‘डूज’ देखील आपणास माहित असावे लागतात. (माझ्या पुरुष मित्रांनो..साॕरी.. सध्या या विषयावर क्लासेस वगैरे घ्यायचा विचार नाहीय माझा)

आता ‘डूज’ मधे शक्य असेल तर रोज नवीन टी शर्ट, स्वेट शर्ट घालून यावे..किंवा दोन तीन टी शर्टस आलटून पालटून वापरावेत. शुज स्वच्छ असावेत. ट्रॕक पँट स्वच्छ असावी. (म्हणजे लोक आठवडाभर एकच टी शर्ट आणि एकच ट्रॕक पँट अगदी ताबडतात हो..धन्य आहे अशा लोकांची).

शक्यतो खुरटी दाढी नसावी. (बायकोला काही कळू न देता दाढी करुन आलात तर अजून उत्तम). पण खुरटी दाढी तुमच्या चेह-याला शोभत असेल तर ठेवायला हरकत नाही..त्याने एक मॕचो फिल येतो असे काही हिरवळींना मी बोलताना ऐकलय. (वाॕक करताना कानावर पडणा-या बोलण्याकडे कधी दुर्लक्ष करु नये. बायका बोलता बोलता अशी एखादी ‘पते की’ गोष्ट शेअर करतात)

दुसरं..खिशात कोणताही मोबाईल असो खिशातून आय-फोन ची एक मस्त पांढरी वायर बाहेर काढून कानात लावावी व गाणी ऐकत चालण्याचा फक्त देखावा करावा. प्रत्यक्ष गाणी ऐकण्याची गरज नाही…नाहीतर हिरवळीच्या बोलण्यावर लक्ष कसे ठेवणार? (फोन मात्र शेवटपर्यंत खिशातून बाहेर काढू नये..नाहीतर तुमची ब्रँड व्हॕल्यू घसरलीच म्हणून समजा).

तर ही झाली पूर्व तयारी..कारण इतर ठिकाणांप्रमाणेच इथेही फर्स्ट इंम्प्रेशन इज लास्ट इंम्प्रेशन…!

असो..नमनाला घडाभर तेल झालं..पण विषयाला धरुन असल्याने व माझ्या इतर पुरुष मित्रांना मदत होईल या उदात्त हेतूने थोडे विषयांतर केले. (अब क्या करे मौसी..अपना दिलही कुछ ऐसा है).

तर या दोघींची एंट्री पार्क मधे झाल्यापासून उगीचच ‘कुछ कुछ होता है राहूल..तुम नही समझोगे’ हा आमच्या तरण्या वयातला डाॕयलाॕग आठवत राहतो. बहुतेक वेळेला डिझायनर टाॕप आणी ट्रॕक पँट हा त्यांचा पेहराव मनाला मोहून जातो.(ये मोह मोह के धागे..) आठवड्यातून कधी एक दिवस अचानक टी शर्टही दिसतो तर मग कधी एकदम चुडीदारच… शुद्ध देसी..

पण जे काही ड्रेसींग असतं ते अगदी दोघींमधे काॕमन असतं..म्हणजे आधी ठरवून..एकदम प्लॕन्ड वगैरे.
प्रत्येक पेहरावात त्या दोघी अतिशय ग्रेसफुलच दिसतात.
कुठे नाव ठेवायला जागा नाही..

हल्ली हल्ली दोघी पार्क मधे येउ लागलेत. साधारण महिना झालाय. फिरताना त्या हळू आवाजात एकमेकांशी बोलत असतात. (दोन बायका, मग त्या कुठेही असोत..न बोलता बरोबर चालूच शकत नाहीत हे संशोधना अंती सिद्ध झाले आहे..असो) तर त्या दोघींचं जे काही शब्द प्रत्येक वेळी कानावर पडत राहतात व त्यातून गाळलेल्या जागा भरुन माझ्यासारख्या लेखक प्रकृतीच्या माणसाला साधारण एवढे नक्की कळलेय की दोघी विवाहीत आहेत (हं..ते अपेक्षितच आहे..उलट एक प्रकारे चांगलय ते..), एकीला एक मुलगा आहे तर दुसरीला एक मुलगी आहे…(एक के बाद बस..म्हणून मेन्टेन्ड आहेत बरं..मी स्वतःलाच सांगतो), दोघी काॕमर्स शिकलेल्या आहेत (‘बॕलन्स’ तिथून आलाय तर..!), दोघी एकत्र शिकल्या होत्या एके काळी..आणि दोघांचेही अरेंज्ड मॕरेज झालेत (हे कसं कळल बुवा..असं विचारु नका..सगळे ट्रेड सिक्रेट्स मी नाही शेअर करणार…!!)

आता या गोष्टींची प्राथमिक माहिती मिळाल्यामुळे मला एवढं नक्की माहित आहे की त्यांच्या आयुष्यात जो काही ‘रोमान्स’ आहे तो दोघींच्या लाईफ मधे ‘शादी के बाद’ वाला आहे..ज्याचा ग्राफ हा लग्नानंतर बहुतेक जोडप्यांमधे फक्त खाली घरंगळतच येत असतो.
(असे संशोधना अंती सिद्ध झाले आहे…कशाला संशोधन करतात ना हे लोक? हे तर आम्हाला माहितच असतं)

दोघींच्या बोलण्यात येणा-या विषयात ८०% भाग हा मुलांची शाळा, त्यांचा अभ्यास, क्लासेस या भोवती असतो आणि इतर सारे विषय २०% मधे असतात. (नव-यां विषयी तर मी एक टक्काच ऐकलय) मला तर एव्हाना त्या दोघींच्या मुलांचीच नाही तर त्यांच्या शाळेची व अगदी त्यांच्या क्लास टिचरची नावे देखील कळली आहेत.

महिन्या भरात पार्कच्या वाॕकींग ट्रॕक वर आठवड्यातून सहा दिवस रोज दहा फे-या या प्रमाणे १५०० वेळा आम्ही एकमेकांना पास झालोय. (करा करा कॕल्क्युलेशन करा तुम्ही लगेच..!)

नजरा आता ओळखायला लागल्या आहेत. चेहरा अब जाना पहचाना लग रहा है. शेजारुन पास होताना चेहरा पॕसिव्ह मोड मधून अॕक्टिव्ह मोड मधे येउ लागलाय. एखादं बारीकसं स्मित चेह-यांवर सकाळी प्रथम दर्शनी यायला लागलय. दोघींच्या चेह-यावर आलटून पालटून येणारं माधुरी स्माईल मुळे ‘धक धक करने लगा’ हे गाणं, माझ्या न वाजणा-या हेडफोनमधेही ऐकू यायला लागलय. त्यामुळे कधीकधी दहा नंतर एखादी अकरावी फेरी अनाहूतपणे व्हायला लागली आहे.

हे सर्व होत असताना काल अचानक एक घटना झालीय आणि माॕर्नींग वाॕकला एक वेगळाच ‘गोल्डन टच’ मिळालाय.

झालं काय की पार्क मधे एक ठिकाणी थोडा छोटा उंच सखल भाग आहे..तिथे जरा जपून चालावं लागतं. सगळेच जण तिथे थोडी काळजी घेतात. मीही घेतो.

पण त्या दिवाशी त्या दोघी ठरवून तो तामीळ ’96’ फिल्म मधल्या त्रिशाने घातलेला ‘जानू’ च्या कॕरेक्टरसारखा पिवळा टाॕप व निळी जिन्स पहिल्यांदा घालून आलेल्या मला लांबूनच दिसल्या आणि झालं..माझा अगदी त्याच चित्रपटातला ‘के. रामचंद्रन’ झाला हो…

दिलाचा ठोका चुकला..आणि घडू नये ते घडले.

नेमकं त्या खड्ड्याच्या इथे दुर्लक्ष झालं व माझा पाय वाकडा पडला (शब्दशः वाकडा पडला हो चालताना..! नाहीतर मी तसा फार सभ्य माणूस आहे). पाय ट्वीस्ट होउन मी तिथेच धाराशयी झालो..आणि समोरुन त्या येत होत्या.

मला क्षणभर मेल्याहून मेल्यासारखं झालं…पण क्षणभरच..

कारण मी पडलेले पाहताच आजूबाजूच्या लोकांबरोबर त्याही पटकन माझ्याजवळ धावत आल्या आणि….

होल्ड यूवर ब्रेथ..

दोघींनीही मला हात दिला…

माझ्यासमोर आता यक्ष प्रश्न होता..कुणाचा हात धरुन उभा राहू..?

देव असे गोड प्रश्न आयुष्यात खूप कमी वेळा देतो हो…!
काय, बरोबर ना?

– सुनील गोबुरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..