नवीन लेखन...

बादशहा चोरीच्या गाड्यांचा

मोटार कार, दुचाकी, मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांत विलक्षण वाढ झाली होती. नियमितपणे वर्तमानपत्रांत गाडयाचोरी बाबत बातम्या ठळकपणे प्रसिध्द होत होत्या. मी, त्यावेळी ठाणे शहरात गुन्हे शाखेत नेमणूकीस होतो. सन – १९९८ ते २००० या वर्षांत खंडणी विरोधी पथकात असतांना एका चकमकीमध्ये माझ्या डाव्या हाताला गोळी लागून जखमी झालो होतो.

यथावकाश औषधोपचार केला व कर्तव्यावर रूजू झालो. परंतु दरम्यानच्या काळात तत्कालीन पोलीस आयुक्त श्री. एस. एम. शंगारी साहेबांनी माझी ठाणे गुन्हे शाखा, युनिट – १ मध्ये बदली केली.

बदलीचा आदेश शिरसावंद्य मानुन सप्टेंबर २००० मध्ये गुन्हे शाखा युनिट – १ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्ता घुले यांना रिपोर्ट करून कामकाजाला सुरूवात केली. परंतु रोजच्या मोटार वाहन चोरीच्या घटनांना वृत्तपत्रांनी बरीच प्रसिध्दी देउन पोलीस खात्याची आणि गुन्हे शाखेची झोप उडविली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी खास मिटींग बोलावून सर्व युनिटस् आणि पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सक्त कारवाईचे आदेश दिले होते.

गुन्हे शाखेकडून अनेक बातमीदारांच्या बातम्यांवरून गुन्हे शाखेकडून दररोज डझनभर संशयितांना कक्ष कार्यालयात आणून त्यांच्याकडे विचारपूस केली जात होती. परंतु पदरी निराशाच येत होती.

मोटार वाहन चोरीचे प्रमाण वाढत असतांना अंबरनाथमध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून सहा-सात लोकांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मोठा दरोडा घातला होता. त्या सर्व आरोपींची रेखाचित्रे प्रसारीत करण्यात आली होती. त्या रेखाचित्रांमधील आरोपींचा शोध सुरू केला होता. गुन्हा गंभीर आणि एका व्यापाऱ्याच्या घरात झालेला असल्याने समाजामध्ये पोलीस खात्याबद्दल अतिशय तिखट प्रतिक्रिया उमटत होत्या.

सर्व युनिटस्च्या अधिकारी आणि अंमलदार यांच्यापुढे आरोपींनी नविन आवाहन उभं केलं होतं. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करून आरोपींचा छडा लावण्यासाठी रात्रीचा दिवस करीत होता. बातमीदारांनी दिलेली बातमी अधिकारी स्वतः पडताळून पहात होते. पण हाती काहीही लागत नव्हतं. समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली होती. त्याच बरोबर आरोपी पकडण्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. पोलिसांसमोर एक मोठं आवाहन निर्माण झालं होतं.

माझ्याबरोबर माझे सहकारी जनार्दन थोरात, राजकुमार कोथमिरे असे सर्वजण अहोरात्र परिश्रम करीत होते. एके दिवशी माझ्याकडे काम करणारे जुने पोलीस हवालदार शिवाजी पाटील आणि भेरवे हे दोघेजण आले. शिवाजी पाटील खूप जुना हवालदार गुन्हे शाखेत जास्तीतजास्त काम केलेलं असल्याने, गुन्हेगारांची नस अन् नस जाणणारा असा अंमलदार होता. शिवाजी पाटील म्हणाले,

‘चला साहेब आज बादशहा मिळणार.’

‘बादशहा’ कोण बादशहा? माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं.

‘चला साहेब, आता वेळ घालवू नका, चांगली बातमी मिळाली आहे.” शिवाजी पाटील म्हणाला.

मी माझे सोबत काम करणारे सहकारी श्री. थोरात, राजकुमार कोथमिरे आणि स्टाफ अशी तीन वेगवेगळी पथकं तयार केली. गुन्हे शाखेच्या कार्यालयाजवळ आर.टी.ओ. कार्यालय, तर त्याच्या बाजूला ठाणे मध्यवर्ती कारागृह असलेला परिसर असल्याने लोकांची वर्दळ मोठया प्रमाणात होती. मोटार वाहन चोरी करून त्या वाहनांचे बनावट कागदपत्र तयार करून अशा वाहनांची नोंदणी आर. टी. ओ. मध्ये करून घेण्यासाठी काही संशयात आरोपी येणार असल्याची बातमी होती.

आम्ही सर्वजण जय्यत तयारी करून व पो. नि. श्री दत्ता घुले यांना बातमीची माहिती देउन मोहिमेवर रवाना झालो. ठाणे शहरातील मध्यवर्ती कारागृहाच्या समोर व आर. टी.ओ. कार्यालयाच्या आवारातील लोकांच्या गर्दीत आम्ही सर्व अधिकारी/ अंमलदार साध्या वेशात फिरू लागलो. सायंकाळी ४.०० वा. आम्ही सापळा रचून बसलो. घडयाळाचे काटे वेगाने फिरत होते. आणि आम्हा पोलिसांच्या नजरा संशयिताचा शोध घेण्यासाठी चौफेर भिरभिरत होत्या. तास-दोन तास झाले, संध्याकाळचे सहा वाजून गेले आणि आर.टी.ओ. कार्यालयातील लोकांची गर्दी कमी होऊ लागली.

आम्ही सापळा मागे घेतला. आज आमची शिकार हुकली होती. ज्या शिकारीसाठी आम्ही आतुरलेलो होतो, ती शिकारच आज त्या भागात फिरकली नाही. पुन्हा आम्ही खबऱ्यांच्या संपर्कात येउन माहिती घेतली. खबऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे चार आरोपी एका व्हॅनमधून येणार होते. खबर पक्की होती. पण माशी कुठे शिकली ते कळेना.

आमचा खबऱ्या आणि शिवाजी पाटील हवालदार पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. कोणत्याही परिस्थितीत आरोपींना पकडणे गरजेचे होते. आता आम्हाला मोटार वाहन चोरी करणाऱ्या आरोपींची पूर्ण माहिती बातमीदाराने दिली होती. त्यांचं वर्णन दिलं होतं. त्यांची चोरी करण्याची पध्दत सांगितली होती. परंतु आता वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय आमच्याकडे शिल्लक नव्हता.

२००१ सालातील जून महिना होता. क्राईम कॉन्फरन्समध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी मोटार वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यात पोलिसांना अपयश आल्याबद्दल गंभीर दखल घेवून नाराजी व्यक्त केली होती. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त धिवरेसाहेबांनी सर्व युनिटना सक्त सुचना दिलेल्या होत्या. सर्व पोलीस स्टेशन हद्दीत वेळोवेळी नाकाबंदी आणि एम. व्ही. सिझर ऑपरेशनची कारवाई चालू होती. तरीही दररोज मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडतच होते.

एका दिवशी तर एका तक्रारदाराने पोलीसठाण्यात येवून तक्रार दिली की, नविन मोटार सायकल नवनित मोटार्स शोरूम मधून खरेदी करून घरी जात होते. नविन मोटार सायकल विकत घेतल्याचा आनंद म्हणून मिठाई खरेदी करण्यासाठी, त्या तक्रारदाराने एका मिठाईच्या दुकानासमोर नवी कोरी गाडी पार्क करून मिठाई खरेदी करून येईपर्यंत दहा मिनिटांच्या अवधीत त्यांची मोटार सायकल चोरीस गेली होती. नवीन मोटार सायकलचे रजिस्ट्रेशन झालेले नव्हते, विमा उतरविलेला नव्हता, अशा परिस्थीतीत गाडीची चोरी झाली होती. आरोपींनी ही नवीनच पध्दत अवलंबिलेली होती. सर्व नवीन मोटार सायकल चोरीला जात होत्या. मोटारवाहन चोरीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्याच बरोबर सामान्य लोकांचा

पोलिसांवरील रोषही वाढत होता.

दररोज वरिष्ठांना उत्तर देता देता नाकी दम आला होता. पहिला सापळा फसल्यापासून आरोपींची काहीही माहिती मिळत नव्हती. खबरी सतत संपर्कात होते, परंतु आरोपींचे नशीब बलवत्तर होते. पोलिसांच्या नशिबात मात्र यशाचा मार्ग दिसत नव्हता. जून महिना संपत आला, आता पावसाने जोर धरला असल्याने, कामात अडथळे येत होते.

एके दिवशी आमच्या बातमीदाराने फोन करून आम्हास एके ठिकाणी बोलावलं. आमची टिम ज्या बातमीची चातकाप्रमाणे वाट पहात होतो, ती बातमी आम्हास मिळाली. ग्रिन सिग्नल मिळताच मी, थोरात, कोथमिरे, हवालदार जगदाळे, शिवाजी पाटील, मेटवे आणि इतर स्टाफ जय्यत तयारी निशी ऑफीसमधून बाहेर पडलो. कापुरबावडी नाक्यावर आमची मिटींग झाली. सर्वजण ठरलेल्या ठिकाणी साध्या वेशात सापळा रचून सावजाची वाट पहात थांबलो. आरोपी येणार होते. मध्यवर्ती जेलच्या परिसरात. पोलीस मुख्यालय, कोर्ट हाकेच्या अंतरावर. जागा माहित झाल्यानंतर आम्ही आश्चर्यचकीत झालो. पोलीस आयुक्तालयाच्या इतक्याजवळ आरोपी येणार यावर आमचा विश्वास बसत नव्हता.

“कधी कधी बातमीदारावर विश्वास ठेवावा लागतो, ” शिवाजी पाटील म्हणाले.

“पाटील तुम्ही म्हणता ते खोटं नाही. पण एवढया गजबजलेल्या ठिकाणी आरोपींना पकडणं मुष्कील होणार नाही का? ” मी विचारलं.

गर्दीच्या ठिकाणाहून आरोपींना पळून जाण्याची संधी अधिक असते”, कोथमिरे म्हणाले.

आम्ही वेगवेगळी पथकं तयार केली. प्रत्येक पथकात एक एक अधिकारी आणि २-३ कर्मचारी नेमले. कोर्ट नाक्यावर एक, जेलसमोर एक आणि एक कळवा पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशी तिन्ही पथकं कोणाला संशय येणार नाही, अशा रितीने आम्ही सापळा लावून थांबलो.

पावसाळयाचा मौसम चालू असल्याने, पावसाची रिपरिप सुरु होती. पावसाचा एक फायदा झाला होता. तो म्हणजे पथकातील काही अधिकारी आणि अंमलदार रेनकोट घालून उभे असल्याने कोणाला संशय येत नव्हता. आज आमच्या कामात निसर्गाने चांगली साथ दिली होती. आमच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार डोळयात प्राण आणून आरोपींचा शोध घेत होते.

दुपारी ३.०० वा. सापळा रचून आम्ही सर्वजण बसलो होतो. संध्याकाळचे साडेपाच वाजत आले होते. जवळ-जवळ अडीच तास आम्ही गाडीत बसून अवघडून गेलो होतो. बाहेर पाऊस चालू असल्याने, खाली उतरण्याची सोय नव्हती. जे अधिकारी व अंमलदार पावसात रेनकोट घालून येरझाया मारत होते, त्या सर्वांची उत्कंठा वाढली होती. कधी एकदा आरोपी येतात आणि आम्ही त्यांच्यावर झडप घालतो, अशी आमची अवस्था झाली होती.

यापूर्वी सापळा अयशस्वी झालेला असल्याने, यावेळी खूप खबरदारी घेणं आवश्यक होतं. आम्ही तिन्ही पथकातील अधिकारी व अंमलदार मोबाईल फोनवरून सतत एकमेकांच्या संपर्कात होतो. बातमीदार माझ्या नजरेच्या टप्प्यात उभा होता. मी त्याच्या इशाऱ्याची वाट पहात होतो. सायंकाळचे सहा वाजले असतील. मी ज्या ठिकाणी जेलसमोर उभा होतो, त्या ठिकाणापासून साधारण १०० फुट अंतरावर एक हिरवट रंगाची मारूती व्हॅन येउन उभी राहिली आणि त्याच वेळी आमच्या बातमीदाराने गाडीकडे बोट दाखवून इशारा केला. त्याबरोबर आम्ही ठरल्याप्रमाणे वेगवेगळया पथकाला जेलजवळ येण्याच्या सूचना दिल्या. काही मिनिटाच्या आत आम्ही चारही बाजूंनी मारूती व्हॅनला घेराव घातला. डोळयांची पापणी लवण्याच्या आत बसलेल्या तीन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.

हिरवट रंगाची मारूती व्हॅन आणि आतमधील तीन आरोपींना ताब्यात घेउन आम्ही गाडीची झडती घेतली. गाडीमध्ये अनेक नंबर प्लेट, कोऱ्या नंबर प्लेट तयार करून ठेवलेल्या सापडल्या. गाडीमध्ये एक ब्रिफकेस होती. त्या ब्रिफकेसची तपासणी केली असता, त्यामध्ये अनेक प्रकारच्या मोटार सायकल्स व मोटार कारच्या वेगवेगळया अंदाजे ५० चाव्या मिळाल्या. त्याच बरोबर अनेक वाहनांचे रजिस्ट्रेशन कोरे फॉर्म, अनेक रजिस्ट्रेशन बुक, त्यापैकी काहींमध्ये नांव-पत्ते लिहिलेले तर काही कोरी पुस्तके मिळून आली. त्याशिवाय वेगवेगळया मोटार सायकल आणि मोटार कारच्या शोरूमच्या नावांची लेटर पॅड, नाहरकत प्रमाणपत्रे, विक्री करण्यासाठी लागणारी प्रमाणपत्रे असे अनेक प्रकारचे बनावट कागदपत्र व मोटार वाहन चोरी करतांना लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

गाडीत जे आरोपी होते, त्यात एक ‘बादशहा’ सिकंदर ईक्बाल शेख, राहणार मुंब्रा २ ) महंमद इस्तफ खान राहणारा भिवंडी ३) सलाम मेहबूब शेख, राहणारा भिवंडी, असे होते. त्यापैकी आरोपी नंबर १ हा स्वत: बादशहा हया नावाने वावरत होता. तिन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडे मिळालेले कागदपत्र, चाव्या इत्यादी बाबत विचारपूस केली. परंतु त्यांच्याकडे आता काहीही उत्तर शिल्लक नव्हतं. त्या तीन आरोपींना अटक करून त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पूर्ण करून वरिष्ठांना घटनेचा अहवाल देउन पुढच्या तपासाला सुरूवात केली.

वरील आरोपींपैकी ‘बादशहा’ यास यापुर्वी एक-दोन वेळा अटक झाली होती. परंतु बाकी दोन आरोपी नवीन असल्याने आम्हाला तपासात त्यांचा चांगला उपयोग झाला. मोटार वाहन चोरी करणाऱ्या कुविख्यात टोळीला गजाआड करण्यात आम्हाला यश आले. त्यांच्या टोळीमध्ये आणखी त्यांचे साथीदार होते. त्यांचा लवकरात लवकर तपास करणं अत्यंत आवश्यक होतं. आम्ही पुन्हा वेगवेगळी पथके तयार करून फरारी आरोपींच्या मागे लागलो. दोन-तीन दिवसांच्या आत इतर चार असे आम्ही एकूण सात आरोपींना अटक केली.

आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत पाहून आम्ही गुन्हे शाखेमध्ये काम करणारे अधिकारी सुध्दा अवाक झालो होतो. आरोपींची वेगवेगळया पथकांकडून सतत चौकशी करून त्यांच्याकडून ३५ हिरोहोंडा मोटार सायकल आणि ९ चार चाकी वाहनं जप्त करण्यात आम्हाला यश आलं. ठाणे शहर व ग्रामिण वसई, विरार, भाईंदर, भिवंडी, डोंबिवली व कल्याण परिसरातून आरोपींनी गाडया चोरल्या होत्या. पहिला आणि मुख्य आरोपी ‘बादशहा’ उर्फ अब्दूल रझाक फाळके याला आम्ही बोलतं केलं.

गुन्हा करण्याची पध्दत, ठिकाण या बाबत तो माहिती देऊ लागला.

‘बादशहा’ उर्फ सिकंदर इक्बाल शेख वय अंदाजे ४० वर्षे, मजबूत बांधा, पोलीस अधिकाऱ्यासारखी पर्सनालिटी, गोरा-गोमटा, इंग्रजी, हिंदी, मराठी आणि उर्दू या भाषांवर प्रभूत्व असणारा.

“साहेब, आता तुम्ही पकडलंच आहे, तर मी सर्व हकिगत सांगतो, कशा पध्दतीने आम्ही गाडया चोरतो? का चोरतो? आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे मी हया गुन्हेगारी क्षेत्राकडे का वळलो? ”

“सांग, बादशहा, बोलत रहा”, मी म्हणालो.

“साहेब, लहानाचा मोठा मी मुंबईत गोवंडीच्या भागात झालो. जेमतेम १२वी पर्यंत शिक्षण घेतलं. घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. अब्बाजान छोटा-मोठा व्यवसाय करीत होते. कालांतराने ते वारले. घरात कमावतं कोणी नव्हतं. मला शाळा सोडावी लागली. मी मिळेल ते काम करीत होतो. पण घरचा खर्च भागत नव्हता. चांगली नोकरी मिळत नव्हती. माझी तब्येत चांगली आणि दिसायला रूबाबदार असल्यानं कोणी नोकरी देणार नव्हतं. माझ्याजवळ काम किंवा नोकरी करण्यासाठी कोणतीही कला अवगत नव्हती. फक्त एक कला मला जन्मताच होती आणि ती म्हणजे मला बोलण्याची सवय होती. मी समोरच्याला पाच-दहा मिनिटांत जिंकायचो. बोलबच्चन करून त्याला हातोहात फसवून हातचलाखीने त्याच्या अंगावरचे दागिने किंवा पाकीटामधील पैसे चोरत होतो. गोवंडीतील घर काही कारणास्तव सोडावं लागलं आणि आम्ही सर्वजण कुटुंबियांसह मुंब्याला रहायला आलो.

“मुंब्यात रहायला कधी आलास? ” मी प्रश्न केला.

‘साहेब १९९५-९६ साली.

“हं सांग, पुढे काय झालं?” मी विचारलं.

‘साहेब, उत्पन्नाचं साधन काहीच नव्हतं. कुठं जायचं म्हटलं तर बस किंवा लोकलचा प्रवास करावा लागत होता. एक दिवस मुंब्रा स्टेशनवर रात्री उशिरा लोकलमधून उतरलो. घरी जाण्यासाठी स्टेशनवरुन बाहेर आलो. रिक्षाने जाण्यासाठी जवळ पैसे नव्हते. मी घरी कसे जायचा या विचारात, रोडच्या बाजूला पार्क केलेल्या एका मोटार सायकलवर बसलो. मोटार सायकलवर बसल्या बसल्या किकवर पाय ठेवून एक किक मारली, अन् काय आश्चर्य मोटार सायकल स्टार्ट झाली. मी गाडीवरून खाली उतरून गाडी बंद करण्यासाठी चावीकडं बघीतलं, तर गाडीला चावीच नव्हती. साहेब, मी संधीचा फायदा घेउन अगदी स्वतःची गाडी असल्यासारखा रूबाबात घरी आलो. घराच्या समोर गाडी लावून घरी जाउन झोपलो. मनात भीती होती.

वाटलं जर मोटारसायकलचा मालक आला तर आपली काही खैर नाही.

सकाळी उठून बाहेर जाउन पाहिलं, आणलेली मोटार सायकल जागेवर होती. मी घरातून बाहेर पडलो. मोटार सायकल घेवून भिवंडीला माझा मित्र मोहंमद इसाक शेख याच्याकडे गेलो. तो जुन्या मोटार सायकल विक्रीचा धंदा करीत होता. त्याच्याकडे जाउन सर्व हकिगत सांगितली. त्याने गाडी बघितली, ओळखीच्या चावीवाल्याकडून चावी बनवून घेतली.’

“महंमद म्हणाला, ‘बादशहा, इसका नंबर प्लेट बदली करके लगाता हू।’ ‘मी विचारलं, “नंबर प्लेट कायको बदली करता है? ”

“ए पागल, नंबर प्लेट बदली करता हू, इसका मतलब, एक मोटार सायकल भंगार में पड़ी है। देख”. असं म्हणून त्यानं भंगारात पडलेली मोटार सायकल मला दाखवली. मग सांगितलं, “जुने गाडीका नंबर लगाता हू, कोई प्रॉब्लेम नही आयेगा।”

‘साहेब माझ्याजवळ पण गाडी नव्हती. महंमदची आयडीया मला आवडली. मग त्याच्या जुन्या मोटार सायकलची नंबरप्लेट लाउन मी बिनधास्त फिरत होतो. एक वेळ पोलिसांनी नाकाबंदीमध्ये पकडलं होतं साहेब, त्यावेळी ट्रफीक हवालदाराला बोलबच्चन देऊन माझी सुटका करून घेतली. पुढे हळुहळू पोलिसांची भीती कमी होऊ लागली. एक दिवस भिवंडीला महंमदच्या गॅरेजमध्ये बसलो होतो. त्यावेळी त्याच्या गॅरेजमध्ये सलाम शेख नावाचा त्याचा मित्र आला. तिथे सलामची आणि माझी ओळख झाली. सलाम त्या अगोदर एक-दोन वेळा चोरीच्या गुन्हयात जेलमध्ये जाऊन आला होता. आम्ही दररोज गॅरेजमध्ये एकत्र बसू लागलो. महंमद सलामला म्हणाला, “सलाम, मेरा गॅरेज जो है ना, अभी मै बंद करनेवाला हू ।”

“गॅरेज बंद करके क्या करेगा? ” मी विचारलं.

“सिंकदर और मै मोटार सायकलका शोरूम शुरू करने की सोच रहा हू।” महंमद म्हणाला.

“अरे भाई, इतनी छोटी जगह में शोरूम कैसा शुरू करेगा? मी विचारलं.

“देख सिकंदर, मेरा ठाणेमें एक शोरूम चलानेवाला दोस्त है। उसने मुझे बोला है, ‘तू शोरूम चालू कर, मै तुमको सब एजंटसे काम दिलवाना हूँ।’ महंमद म्हणाला. “अरे भाई तू देखता रह जायेगा, ऐसा शोरूम बनाऊंगा”.

“साहेब, महंमदने एक-दोन महिन्यांत गॅरेजच्या जागेत बदल करून एक छोटया गाळयात शोरूम सुरू केले. तो ठाण्यातून एका वेळी १० ते १५ मोटार सायकल आणून कमिशनवर विकत होता. पण फायदा जास्त मिळत नव्हता. एके दिवशी मी आणि महंमद ठाण्यात मोटार सायकल आणण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी बरेच लोक नवीन मोटार सायकल खरेदीसाठी येत होते. मी त्या लोकांना नवीन मोटार सायकल घेवून जातांना पहात होतो. पहाता-पहाता माझ्या डोक्यात एक आयडीया आली. त्याने बोलता बोलता थांबून एक मोठा श्वास घेतला. हाताचा अंगठा स्वत:च्या तोडाकडे नेऊन इशारा करीत पिण्यास पाणी मागितले. एका हवालदारने पाण्याची बाटली त्याच्या हातात दिली. दोन-चार घोट पाणी पिऊन त्याने बाटली खाली ठेवली व पुढे बोलू लागला.

“साहेब मला नक्की आठवत नाही. पण कोणता तरी त्योहार होता. तो म्हणाला.

“कोणता सण होता, आठव”, मी म्हणालो.

“नाही साहेब, मला सांगता येणार नाही. पण त्या सणाला मराठी लोक मिरवणूक काढतात, फेटे बांधतात.

मी त्याला म्हणालो थांबवून, “अरे, तो सण गुढी पाडव्याचा असेल.

“होय, साहेब बहुतेक पाडवाच होता. खूप लोक नवीन मोटार सायकल खरेदीला शोरूममध्ये आले होते. सगळे लोक गाडीची पूजा करून गाडया घेउन जात होते. मी महंमदकडे पहात म्हणालो,

“महंमद देख, वो आदमी गाडी लेके जा रहा है। उसका हम लोग पिछा करते है।

“पिछा करके क्या करेगा तू? ” महंमदने विचारले.

“अरे महंमद उसके घर तक पिछा करेंगे, वह आदमी घरके निचे गाडी पार्क करके घरमे जायेगा, उसी रात को हम गाडी उठायेंगे ।” सिकंदर म्हणाला.

“ए तू पागल हुवा है क्या? क्या जेलमे जानेका है क्या? ” महंमदने त्याला आश्चर्याने विचारले.

‘अरे सुन तो मेरी पूरी बात’’, सिकंदर म्हणाला. “ये नया गाडी है, रात को गाडी उठायेंगे, गाडी आरटीओमे रजिस्टर होनेके पहलेही चोरी करेंगे। और अपने शोरूममे रखेंगे।”

“अरे पागल, वह गाडी बेचनेके लिये शोरूमका सेल सर्टीफीकेट कहासे लायेगा तू? ” महंमदने विचारलं.

“सुन तो भाई, मेरे पेहेचानका एक आदमी है, जो अपनेको सेल सर्टीफीकेट बनाके देगा।” सिकंदर म्हणाला.

“देख महंमद, मेरा जो दोस्त है ना, उसको बोलके मै अलग अलग शोरूमके लेटरहेड बनाके लाता हूँ। हम लोग वह लेटरहेड पर कॉम्प्युटरपर सेल सर्टीफिकेट बनाके तयार करेंगे।” सिकंदर म्हणाला.

“चल बैठ गाडीपर हम लोग उसको मिलते है।” असे म्हणून सिकंदरने मोटार सायकल चालू केली. दोघेजण मुंब्यामध्ये एका कॉम्प्युटरच्या दुकानात गेले.

‘‘आवो, सिकंदर आवो, बहुत दिनोंके बाद आया है।” त्या दुकानातील खुर्चीवर बसलेला इसम म्हणाला.

‘अरे मुस्ताक, ये मेरा दोस्त महंमद भिवंडीमें रहता है।” सिकंदरने ओळख करून दिली.

सिकंदर आता बोलता-बोलता पुन्हा थांबला.

“सिकंदर बोल, पुढं काय झालं?” मी विचारल.

‘साहेब, आम्ही दोघांनी मुस्ताकला आयडीया देवून, वेगवेगळया शोरूमचे सेल सर्टीफीकेट बनवायला सांगितले. त्याच्या बदल्यात आम्ही त्याला प्रत्येक मोटार सायकल मागे काही पैसे देण्याचे कबूल केले. मुस्ताकने आम्हाला बसल्या बसल्या अर्ध्या तासाच्या आत दोन वेगवेगळया शोरूमची लेटर हेड तयार करून दिले. आम्ही एक दोन दिवसांतून तर कधी आठवडयातून एक नवीन मोटार सायकल शोरूम समोर वॉच ठेवून, ती गाडी आरटीओ मध्ये रजिस्टर होण्याच्या अगोदरच, त्याच रात्री चोरत होतो. चोरलेली नवीन गाडी बनावट लेटर हेडवर सेल सर्टीफीकेट बनवून महंमदच्या भिवंडीमधील शोरूम मध्ये ठेवून विकत होतो. गाडी चोरलेली असल्यामुळे कमिशन जास्त देत होतो. त्यामुळे महंमदच्या शोरूमचा धंदा जोरात चालला होता. जवळ जवळ आम्ही २ ते ३ महिने हा उदयोग करीत होतो. पण साहेब, हा आमचा धंदा जास्त दिवस नाही चालला,” असं बोलून तो थांबला.

“का, धंदा कसा काय बंद झाला? ” मी विचारले.

“काय साहेब, मजाक करताय, तुम्हीच तर आम्हाला अटक केली आहे.

मग धंदा कसा चालणार? ” सिकंदरनं विचारलं.

सिकंदर उर्फ बादशहा याने न थांबता दोन-तीन तासात सतत सर्व हकिगत कथन केली.

“सिकंदर, तुम्ही या गाडया कुठे कुठे विकल्या आहेत? ” मी विचारले.

“भिवंडी, कल्याण हया भागात ज्यांना विकल्या आहेत, त्यांचे नांव, पत्ते सर्वांची रजिस्टरमध्ये नोंद केली आहे.”

सिकंदरने सर्व गुन्हयांची कबूली दिली होती.

सिकंदरने गुन्हा कबूल करून, चोरून विकलेल्या सर्व गाडया देतो असं सांगितल्याने आम्ही दोन पंचांना बोलावून तसा पंचनामा केला.

सिकंदर उर्फ बादशहा आणि त्याच्या साथीदारांकडून आम्ही तब्बल ४५ नवीन मोटार सायकली जप्त केल्या. नवीन करकरीत मोटार सायकली गुन्हे शाखेच्या समोर पार्क केल्या होत्या. त्यावेळी गुन्हे शाखेचे ऑफीस एखादया मोटार सायकलच्या शोरूमसारखे दिसत होते.

अथक प्रयत्नांनंतर गुन्हे शाखेतील आम्हा अधिकाऱ्यांना एक मोठं यश मिळालं. वर्तमानपत्रात बातमी प्रसिध्द होताच, तक्रारदारांची रांग गुन्हे शाखेमध्ये लागली. सर्व गाडयांचे मूळ मालक मिळाले. वेगवेगळया पोलीस ठाण्यांत त्यांनी गुन्हे नोंदविलेले होते. मूळ तक्रारदार खुष झाले. परंतु ज्यांनी चोरीच्या मोटार सायकल विकत घेतल्या होत्या, ते मात्र नाराज झाले. त्यांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं.

आरोपी कितीही हुशार असला तरीही, तो कुठेतरी एखादा धागादोरा सोडून जात असतो. तो धागा पोलिसांना सापडायला कधीकधी थोडा वेळ लागतो, पण पोलीस तो धागा पकडून आरोपीला जेरबंद केल्याशिवाय रहात नाहीत.

सिकंदर उर्फ बादशहा आणि त्यांचे साथीदारांकडून अनेक गुन्हे उघडकीस आले होते. पण त्याशिवाय पोलिसांनादेखिल गुन्हेगाराची एक नवीन पध्दत समजली होती.

त्या काळात आम्ही गुन्हे शाखेचे अधिकारी तब्बल १५ दिवस अहोरात्र काम करीत होतो. कोणालाही घराची आठवण येत नव्हती. पोलीस आपलं घर हरवून, रात्रीचा दिवस करून, काम करीत होता. काम करतांना थकवा हा येत असतो, घराची आठवणही येत असते. परंतु ज्यांच्या गाडया चोरीला गेल्या होत्या, त्यांच्या गाडया त्यांना परत मिळाल्यामुळे, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्या डोळयातील आनंद पाहून पोलिसांना अत्यानंद होत होता.

त्या आनंदाच्या व मिळालेल्या यशाच्या धुंदीत थोडा वेळ का होईना, पोलिस आपलं घर, कुटुंब व कुटुंबातील व्यक्तींना विसरून गेलेला असतो.

-व्यंकट पाटील

व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.

Avatar
About व्यंकट भानुदास पाटील 7 Articles
सहायक पडोलिस आयुक्त या पदावरुन निवृत्त झालेले श्री व्यंकटराव पाटील ह पोलीस कथा लेखक आहेत तसेच त्यांच्या कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..