नवीन लेखन...

गोमुची पार्टी (गोमुच्या गोष्टी – क्रमांक १८)

गोमुला दोन महिने हॉटेलचं काम चालू असतांना आणि नंतरच्या एक महिन्याचा पगार व नफ्याचा भाग मिळाला.
आजवर गोमु आम्हां सर्व मित्रांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून पार्टी द्यायला लावत असे.
आता सर्व त्याच्या मागे लागले की आम्हाला पार्टी पाहिजे.
गोमुनेही फारसे आढेवेढे न घेतां पार्टी द्यायचं मान्य केलं.
ती सुध्दा तो “आपलेच हॉटेल”मध्येच देणार होता.
मी आणि अन्वय यांच्याखेरीज मक्या, प्रभ्या, सुरेश मेहता, बाळ्या आणि बाळ्याचा मावस भाऊ मितेश पार्टीला येणार होते आणि गोमु स्वत: आठवा.
अशी आठ जणांची पार्टी ठरली.
एका शनिवारी संध्याकाळी साडेसातला त्याने आम्हांला सर्वांना पार्टीला बोलावले.
नुकतंच रेस्टॉरंटबरोबर बार चालवण्याचंही लायसन्स मिळालं होतं.
त्या बारचा तो पहिलाच आठवडा होता.
‘आपलेच हॉटेल’ ह्या शब्दांखालीच बार अँड रेस्टॉरंट हे शब्द लिहिले गेले होते.
आतां हॉटेल फायद्यांत चालविण्याची गोमुची जबाबदारी दुपटीने वाढली होती.


आम्ही सर्व शनिवारची आतुरतेने वाट पहात होतो.
तेव्हा आम्हां सर्वांकडे मोबाईलवर व्हॉटसॲप असल्याने आमचा त्यावर गृपही झाला होता.
गृपला “अतरंगी दोस्त मंडळी’ असं नांवही दिलं होत.
त्यावर सारखी पार्टीबद्दलचीच चर्चा असे.
गोमुकडून मिळणारी ती पहिलीच पार्टी होती.
अन्वयशिवाय सर्वांचे मला अधूनमधून फोनही येत होते, “गोमुची पार्टी नक्की आहे ना ?”
गोमु आता मला रोज भेटत नसे.
पण त्याचा फोन दिवसांतून दोन तीन वेळां येई.
मीही त्याला शनिवारच्या पार्टीबद्दल विचारत असे.
तो म्हणे, “पक्या, मी कसा विसरेन ? हे सर्व अतरंगी तरी मला विसरू देतील कां ?
अतरंगीवर सारखं तेच चालू आहे.
मला आतां ते सर्व वाचायलाही वेळ मिळत नाही पण आपल्यासाठी मी खास शॅम्पेन मागवली आहे.
मात्र शनिवारी वेळेवर या.”


शनिवारी माझ्याकडे मक्या, प्रभ्या आधीच येऊन बसले.
सातनंतर मी व्हॉटस ॲप गृपवर मेसेजही पाठवला, “मी, मक्या आणि प्रभ्या, पंधरा मिनिटांत हॉटेलवर पोहोचतोय.”
अन्वयचा मेसेज आला की त्याला यायला दहा मिनिटे उशीर होईल.
बाळ्या आणि मितेश, सुरेशबरोबर येत होते.
सुरेशचा मेसेज आला की ते वेळेवर येताहेत.
पण गोमुकडून कांही उत्तर आलं नाही.
त्याच्या स्टेटसवर “लास्ट सीन 6.30p.m.” येत होतं.
मला वाटलं गोमु हॉटेलच्या कामांत व्यस्त असल्यामुळे त्याचं उत्तर आलं नाही.
आम्ही बरोबर सात वाजून वीस मिनिटानी हॉटेलवर पोहोंचलो.
तिथल्या एका सुपवायजरने आमचे स्वागत केले.
आम्हाला फॅमिली रूममध्ये नेले.
सुरेश, बाळ्या आणि मितेश हे तिघे तिथे आधीच बसले होते.
मी सुपरवायजरला विचारले, “तुमचे साहेब कुठे आहेत ?”
तो म्हणाला, “येतील ते पांच दहा मिनिटांत. त्यांना अचानक बाहेर जावे लागले. एवढ्यात यायला हवे होते.”
आमच्या गप्पा सुरू झाल्या.


पण गप्पा रंगत नव्हत्या.
सगळ्यांचे लक्ष गोमुकडे लागलं होतं.
दुसऱ्याने दिलेल्या पार्टीत सुध्दा गोमुच रंग भरत असे.
त्याच्याकडे जोकसचा खूप मोठा साठा होता.
आज तर त्याचीच पार्टी होती.
त्याच्या शिवाय गंमत नव्हती.
पावणेआठ वाजायला आले आणि अन्वय आला.
आम्हाला वाटलं अन्वयला कांही ठाऊक असेल.
पण त्यालाही कांही माहिती नव्हती.
आम्हाला वेळेवर यायला सांगणारा गोमु स्वत:च वेळ होऊन गेली तरी आला नव्हता.
अन्वयने सुपरवायजरला परत बोलावले आणि विचारले, “मॅनेजर साहेब कुठे गेलेत ?”
सुपरवायजर म्हणाला, “साहेब, आज एक गिऱ्हाईक खूप पिऊन तर्र झालं.
नंतर एकाएकी त्याला बरे वाटेना.
गृहस्थ पंचावन्न छप्पन वर्षांचा होता.
छातींत दुखतंय म्हणायला लागला.
आमच्या साहेबांनी त्याला आपल्या मागे स्कूटरवर बसवला आणि त्याच्या मागे त्याला धरून आणखी एकाला बसवला.
मग ते त्याला हॉस्पिटलमधे घेऊन गेले.
आम्ही सांगितलं आम्ही जातो पण त्यांनी ऐकलं नाही.
स्वत:च गेले.”
“पण त्याचा फोन कां बंद आहे ?
मी केव्हांपासून फोन करतोय त्याला.”
अन्वयने विचारले.
“बॅटरी संपली होती त्यांच्या फोनची.” सुपरवायजर म्हणाला.


सुपरवायजर विचारू लागला, “साहेब, तुम्हांला काय काय द्यायचं त्याचा मेनु साहेबांनी आधीच ठरवलेला आहे. मी आणायला सुरूवात करू कां ?”
पण गोमुशिवाय खाणं पिणं सुरू करायची कुणाचीच इच्छा नव्हती.
आम्ही त्याची वाट पहायचं ठरवलं.
सव्वाआठ वाजले तसे अन्वयने त्या सुपरवायजरला विचारले, “मॅनेजर कोणत्या हॉस्पिटलला घेऊन गेलेत त्याला?
आणि तो दुसरा वेटर बरोबर गेलाय त्याच्याकडे फोन असेल ना !”
सुपरवायजर म्हणाला, “साहेब त्याला ते अपोलो हॉस्पिटलला घेऊन जातो म्हणाले. त्यांच्याबरोबर गेलेला वेटर नुकताच गांवाहून आलाय. त्याच्याकडे फोन नाही.”
मक्या म्हणाला, “पण गोमुने कुणाच्या तरी फोनवरून कळवायला नको कां ?”
शंकेखोर प्रभ्या म्हणाला, “हो ना ! त्याला कुठे ॲक्सिडेंट तर झाला नसेल ?”
मी म्हणालो, “गप्प रे प्रभ्या.
काहीतरी अशुभ बोलू नकोस.
व्यवहारी सुरेश मेहता म्हणाला, “अरे हॉस्पिटलला फोन करूया. आता कळेल.”
त्याने लागलीच आपल्याच मोबाईलवर हॉसपिटलचा नंबर शोधून काढला आणि फोन लावला देखील.


गोमुने ज्यांना ॲडमिट करायला नेलं होतं त्यांच नाव सुपरव्हायजरला माहित नव्हतं आणि पेशंटचं नांव सांगितल्याशिवाय हॉस्पिटल काही माहिती द्यायला तयार नव्हतं.
मग अन्वयने अपोलोमधल्या आपल्या ओळखीच्या एका डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना विनंती केली की असा एक पेशंट ॲडमिट करायला कोणी आलं होतं कां हे चौकशी करून सांगा.
डॉक्टर म्हणाले, “मी पांच दहा मिनिटांत फोन करतो.”
आम्ही सर्व तोपर्यंत अस्वस्थ होतो.
पार्टीसाठी जमलो आणि हे काय ?
दहा मिनिटांच्या आतच डॉक्टरांचा पुन्हा फोन आला.
त्यांनी माहिती दिली.
एक असा पेशंट दीड तासांपूर्वी ॲडमिट झाला आहे.
त्याच्या बरोबरचा तो वेटर त्याच्याजवळ थांबला आहे.
तो पेशंट आला तेव्हां शुध्दीत नव्हता आणि त्याचा पत्ता म्हणून “ केअर ऑफ, मु.गो.गोरेगांवकर, आपलेच हॉटेल” असा दिला आहे.
पेशंट आता शुध्दीवर आहे.
काळजीचं कारण नाही.
अन्वयने डॉक्टरांचे आभार मानले.


अन्वय म्हणाला, “सात सव्वासातपर्यंत गोमु तिथून निघाला असणार ?
तिथून इथे यायला फार तर वीस पंचवीस मिनिटे लागतात.
म्हणजे गोमु केव्हांच यायला हवा होता.
आता तर नऊ वाजत आले.”
सर्वच जण काळजी करू लागले.
प्रभ्या म्हणाला, “गोमु, स्कूटर फास्ट चालवतो. अपघात तर नसेल ना झाला ?”
मक्या त्याची री ओढत म्हणाला, “हो, मी बसलोय त्याच्यामागे स्कूटरवर. कांही भरोसा नाही.”
बाळ्या म्हणाला, “मधल्या रोडवर खूप ट्रक असतात. एखाद्याने उडवला तर नसेल ना !”
मी म्हणालो, “गप्प बसा, अशुभ बोलू नका.”
मितेश म्हणाला, “बोलण्याचं काय घेऊन बसलास ! त्याला तिथे जखमी अवस्थेत कोणी मदत तरी केली असेल की नाही कोण जाणे ?”
मी त्यालाही गप्प बसवले आणि अन्वयला म्हणालो, “डीसीपी मला आणि गोमुला ओळखतात. आपण त्यांना कळवू या काय ?”
अन्वय म्हणाला, “मीही त्यांना ओळखतो. आपण त्यांना सेंट्रल सेलकडे चौकशी करायला सांगूया.”
हे बोलता बोलतां अन्वयने त्यांचा नंबर लावलाही होता.


ते फोनवर आले तसा अन्वय त्यांना म्हणाला, “सर, मी अन्वय पाटील बोलतोय. एक अर्जंट काम आहे ?”
अन्वयने फोन स्पीकरवर ठेवला होता.
फोनवर त्यांचा आश्वासक आवाज आला, “बोला पाटील, काय अर्जंट काम आहे ?”
“सर, तुम्हाला आमचा मित्र गोमाजी ठाऊक आहे ना ?” अन्वयने विचारले.
“अरे म्हणजे काय ? त्याला कसा विसरेन ?
तो नकली फोनच्या घोटाळ्यांत सांपडला होता, तोच ना !” साहेब उत्तरले.
अन्वयने सांगितले, “होय सर तोच. तो सध्या सीबीडी सेक्टर अकराच्या एका हॉटेलमधे मॅनेजर आहे.
सहा वाजतां एका ग्राहकाला अपोलोला ॲडमिट करायला घेऊन गेला.
तो पेशंट तिथे ॲडमिट आहे.
पण सातच्या सुमारास तिथून निघालेला गोमु अजून परत आलेला नाही.”
साहेब म्हणाले, “अन्वय, डोन्च्यु थिंक टू हवर्स मिसींग इज टू अर्ली टू रिपोर्ट टू पोलिस ?”
अन्वय म्हणाला, “काका तसं नाही.
आज तो आम्हाला त्याच हॉटेलात पार्टी देणार होता. आम्ही साडेसातपासून इथे वाट पाहतोय.
अशावेळी तो असा कुठे जाणार नाही.
त्याचा फोन चालू नाही आणि तो स्कूटरवरून गेला असल्याने आम्हाला काळजी वाटतेय.”
साहेब म्हणाले, “समजलो मी. सेंट्रल सेलमध्ये फोन करून मी चौकशी करतो.
गेल्या दोन तासांत ह्या भागांत कुठे अपघात झालाय कां ?
आय विल कॉल यु बॅक.”


गोमुच्या पार्टीला जमलेल्या आम्हां सर्वांचे चेहरे आतां उतरले होते.
“छे ! आपण काय पार्टीचे बेत केले आणि हे काय झालं ?” सुरेश मेहता म्हणाला.
आपली काळजी कोण कुठल्या शब्दांत व्यक्त करतंय, ह्याकडे माझं लक्ष नव्हतं.
गोमु आपल्या जीवनाचा किती अविभाज्य भाग आहे, ह्याचा मी विचार करत होतो.
माझं सारं लक्ष अन्वयच्या मोबाईलची रिंग कधी वाजत्येय इकडे होतं.
ती दहा-बारा मिनिटे मी कुणाशी संवाद करण्याच्या मनस्थितींत नव्हतो.
अन्वयचा हात हातांत धरून गप्प बसलो होतो.
बरोबर बारा मिनिटांनी फोन वाजला.
अन्वयने ‘हॅलो’ म्हणायच्या आधीच साहेब म्हणाले, “पाटील, मला सांगा, तुमचा मित्र स्कूटरवरून जातांना हेल्मेट घालून गेला होता कां ?” हा प्रश्न ऐकून माझ्या पोटांत धस्स झालं.
गोमु हेल्मेट कधीच वापरत नसे.
“नाही. पण कां काही अपघात झालाय कां ?”
अन्वयने आमच्या मनातला प्रश्न विचारला.
साहेब म्हणाले, “गेल्या दोन अडीच तासांत ह्या भागांत कोणताही अपघात झालेला नाही.
ही गर्दीची वेळ असल्यामुळे सर्वत्र आरटीओचे पोलिस होते.
नजरचुकीनेही कुणी कुठे तरी अपघात होऊन पडून राहिल्याचीही शक्यता नाही.”
अन्वय म्हणाला, “मग आतां ?”
साहेब म्हणाले, “पण स्पेशल स्क्वॅडने हेल्मेट न घालणाऱ्यांना आणि मोबाईलवर बोलणाऱ्यांना राऊंड अप करून सीबीडीच्या ऑफीसमधे नेलंय.
माझं ऑफीस आहे तिथेच.
मी बघतो आणि असेल तर दहा मिनिटांत पाठवतो तुमच्याकडे.”


साहेबांचा अंदाज सही निघाला.
त्यांनी फोन केल्यावर आरटीओच्या एका पोलिसांने गोमुच्या नांवाचा पुकारा केला.
तो समोर येतांच त्याला बाहेर आणले आणि सोडून दिले.
त्याची स्कूटरही परत दिली.
खरोखरीच दहा मिनिटांत गोमु आमच्या पार्टीला हजर झाला.
साडेसातची पार्टी साडे नऊनंतर सुरू झाली.
पण आता अतरंगी मंडळीच्या उत्साहाला उधाण आलं.
प्रथम सर्वांनी गोमुची यथेच्छ हजेरी घेतली.
“आतां तरी हेल्मेट घाल. आम्ही भेट देऊ कां ?” प्रभ्या म्हणाला.
तर मक्या म्हणाला, “स्कूटर तुला अन्वयने दिली. तिच्याबरोबर हेल्मेट पण द्यायला हवं होतं कां ?”
गोमु सगळ्यांना शांत करत म्हणाला, “हे बघा, आधीच लेट झालाय माझ्यामुळे. आता पहिल्यांदा खाणं पिणं.”
तोपर्यंत त्याने ठरवून ठेवल्याप्रमाणे स्टार्टर्स, काजू, इ. गोष्टींनी भरलेल्या डीशेस टेबलावर आल्या होत्या.
ग्लास शॅंपेनने भरले जात होते.
पार्टी सातला सुरू झाली असती तर कदाचित हा जोश आला नसता.
गोमुवरचं मोठं संकट, काल्पनिक असेल, टळल्याचा आनंद आम्हाला झाला होता.
सर्वांनी ग्लास उचलले आणि आम्ही सर्व ओरडलो, “थ्री चिअर्स फॉर द मॅनेजर गोमाजीराव, हीप हीप हुर्रे.”
गोमु म्हणाला, “आपल्या डीसीपी साहेबांच्या नांवाने चिअर्स करा.”
मी भारावून म्हणालो, “खरंच ! त्यांचा आपला काय ऋणानुबंध आहे कुणास ठाऊक ! दरवेळी मदतीला धावून येतात.”


नंतर ती पार्टी हॉटेलची दारं बंद करून रात्री बाराच्या पुढेही चालू राहिली, हे सांगायला नकोच.
खूप गप्पा झाल्या.
शाळेपासूनच्या आठवणी काढल्या.
कुळकर्णी सरांचा पिवळा कोट सर्वांनी पेनमधली शाई झाडून मागून निळा केल्याची आठवण काढून हंसलो.
गोमुच्या यशस्वी हॉटेल मॅनेजर होण्याचं सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं.
हॉटेलबद्दल बोलतांना गोमु म्हणाला, “अरे, हॉटेल चालवणे आतापर्यंत सोपं होतं पण आता चॅलेंजिंग होणार आहे”
मी विचारले, “ते कशामुळे ?”
गोमु म्हणाला, “अरे आपल्या हॉटेलला लागूनच एक हॉटेल येतंय !
त्यांच फर्निशिंगच काम जोरांत सुरू आहे.
कुणीतरी बाई मालक आहेत म्हणे.
बट डोन्ट वरी.”
त्या स्पर्धेसाठी गोमुने कसं तोंड दिलं ते पुढील भागांत.

क्रमशः

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..